Thursday, November 16, 2006

डिपार्टमेंट <-> ऍडवायज़र <-> बडवायज़र <-> अपार्टमेंट (२)

अपार्टमेंट ते डिपार्टमेंट हे अंतर पायी चालत अवघे दहा मिनिटांचे आहे. मात्र मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, या तत्त्वाला जागून ते दहा मिनिटांचे चालणेही समूहात पार पाडायचे हा आमचा अलिखित नियम आहे. समूहात चालण्याचे फायदे म्हणजे रस्त्याने येणाऱ्याजाणाऱ्या गोऱ्या मडमांकडे पाहून आपल्याच भाषेत टीकाटिप्पणी करता येते (हो आता पक्षीनिरीक्षण वगैरे म्हणून आपणच आपली लाज का काढा!) एकट्याने गेल्यास, प्रयत्नपूर्वक आणि धीराने आपण चोरटी नजर भिरभिरवावी, आणि नेमके त्याच क्षणी तिने आपल्याकडे पाहून मधाळ हसू फेकले की आपण हिट विकेट व्हावे, अशी आपली गत होण्याइतकी कच्ची फलंदाजी कोणत्याही भारतीयाकडून चँपिअन्स ट्रॉफी वगळता इतरत्र केली जाऊ नये. समूहात चालण्याचा दुसरा एक फायदा म्हणजे तोंडाने अखंड (मार्गदर्शनयुक्त)बडबड करणारा तो सिनिअर आणि त्याच्या बाजूने आणि मागून चालणारे, मन लावून ऐकणारे, हसणारे-खिदळणारे ज्युनिअर्स असे चित्र फ्रेशर्सच्या मनात पक्के बसते आणि आपल्याविषयीचा आदर दुणावतो. ३:५० चे लेक्चर असेल, आणि घरी तुम्हाला पावणेचारास जाग आली, तर पायी चालण्यात वेळ न घालवता एक तर पुन्हा झोपून लेक्चर बंक करावे किंवा धावतपळत बस पकडून डिपार्टमेंट गाठावे. परीक्षेच्या काळात चित्र जरासे आशावादी दिसते. म्हणजे विद्यार्थी हातात पुस्तके, नोट्स किंवा तत्सम काहीतरी घेऊन डिपार्टमेंटला जाताना दिसतात. लोकांमधल्या सलीम अलींची जागा त्यांच्यात्यांच्यातल्या विद्यार्थ्यांनी घेतलेली असते, हाच काय तो आशादायी फरक.
डिपार्टमेंटची इमारत म्हणजे आमचे महाविद्यालय ही तीन मजली छोटेखानी पण तरीही डौलदार इमारत. लाल विटांचे बांधकाम, रेखीव रचना आणि उत्तम अंतर्सजावट. प्रांगणात निरनिराळी हिरवीगार झाडे, विविधरंगी फुले आणि दूरवर पसरलेली हिरवळ. बासरीवादकांसाठी धूर सोडायच्या खास जागा, कटाक्षाने स्वच्छता पाळणाऱ्या अमेरिकन वृत्तीशी अनुरूप अशी जागोजागी केलेली कचराकुंड्यांची सोय, ज्यांना टॉयलेट्स म्हणण्याची लाज वाटावी अशी स्वच्छ प्रसाधनगृहे, अशा अनेक सोईंनी नटलेली डिपार्टमेंटची इमारत. या इमारतीत इलेक्ट्रिकल व संगणकीय अभियांत्रिकी (Electrical & Computer Engineering किंवा ECE) आणि संगणक विज्ञान (Computer Science किंवा CSC) या दोन डिपार्टमेंट्सचा कारभार चालतो. त्या त्या डिपार्टमेंट्सशी संलग्न असणाऱ्या प्राध्यापक वर्गाची, प्रशासकीय कर्मचारी, विभागप्रमुख यांची कार्यालये, अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशा लहानमोठ्या प्रयोगशाळा नि त्यांत काम करणारे विद्यार्थीमजूर, प्राध्यापकांना संशोधनात तसेच अध्यापनात सहाय्य करणारे मोजके नशीबवान विद्यार्थी असं विश्व हे प्रत्येक डिपार्टमेंटची जान आणि शान आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रत्येक मजल्यावर विस्तीर्ण स्टुडंट्स लाउंज आहे. अभ्यास करताना झोप आली किंवा घरची अर्धवट झोप पूर्ण करायची असेल, तर त्यासाठी आरामशीर सोफासेट्स आहेत. एकाच चवीचे अनेक पदार्थ वेगवेगळ्या नावाने, आणि जवळपास सारख्याच चढ्या दराने विकणारे उपाहारगृह आहे. अभ्यास करताकरता तोंडाला चाळा म्हणून चॉकलेट, बबलगम, झालेच तर वेफर्स, कुकीज नि सोडा विकणारी व्हेंडिंग मशीन्स आहेत. विविध क्षेत्रांतील प्रज्ञावंतांची व्याख्याने आयोजित करण्यासाठी मोठी सभागृहे आहेत. आणि आम्हा विद्यार्थ्यांसाठी काशी-रामेश्वर किंवा मक्का-मदीना या तीर्थक्षेत्रांच्या तोडीच्या असलेल्या लेक्चर रूम्स आहेत.
डिपार्टमेंटमधली लेक्चर्स म्हणजे नुसती लेक्चर्स नसून एक आनंदमेळावा असतो. लेक्चरच्या वेळा या त्या वेळापत्रकाप्रमाणे न पाळता, स्वतःच्या सोईप्रमाणे पाळायच्या, हे येथील शिक्षणव्यवस्थेचे मूलभूत तत्त्व असल्याने ज्या दिवशी एखादा गृहपाठ सुपूर्त करायचा असेल किंवा तपासून मिळणार असेल, प्रॉजेक्ट सुपूर्त करायचे असेल किंवा प्राध्यापकांचे व्याख्यानच तसे अगदी महत्त्वाचे असे, त्यावेळी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे हजेरी लावावी. अन्यथा चारच्या लेक्चरला तुम्ही साडेचार-पावणेपाचाला जरी वर्गात गेलात, तरीही प्राध्यापकांसकट कोणालाही याचे सोयरसुतक नसते. त्यातून मध्येच भूक किंवा तहान लागली, तर बाहेर जाऊन खाणेपिणे वर्गात आणून खाता येते. म्हणजे तहानभूकही भागते आणि व्याख्यानातही अडथळा येत नाही. भारतात शिकताना भर वर्गात करंगळी वर करून लघुशंका उपस्थित करताना, शंभर वेळा केलेल्या विचाराने नकोसा झालेला जीव चेहऱ्यावर लगेच उमटायचा. इकडे तसा बाका प्रसंग येत नाही. सरळ उठून मोकळ्या मनाने मोकळे होण्यासाठी वर्गाबाहेर पडायचे. लेक्चरला बसून याहू किंवा गूगलवर बिनदिक्कत गप्पाही मारता येतात. अर्थात, ज्यांच्या व्याख्यानाच्या वेळेस असे सौभाग़्य लाभावे, अशी मंडळी फाऱ नाहीत पण तरीही कितीही चांगल्या-वाईट, ज्येष्ठ-कनिष्ठ प्राध्यापकांच्या व्याख्यानांना आंतरजालावरील निरोपकांवर नि चावड्यांवर हजेरी लावणारी मंडळी तर बरीच आहेत. आमची एक मैत्रीण तर निरोपकांवर "in lecture" असा फलक लावून गप्पा छाटते. गेलाबाजार मुद्दामहून एखाद्या चायनीज विद्यार्थ्याशी अस्खलित इंग्रजी बोलण्याचा खोडसाळपणा करून मग त्याच्या चेहऱ्यावरचे बावरलेले भाव पाहून सुवर्णपदक मिळवल्याच्या थाटात आमच्याकडे बघते. चायनीज विद्यार्थी तसे मूळचे हुशार; पण बिचारे संवाद साधण्यात भाषेमुळेच कमी पडतात. हिने किंवा इतर कोणीही शुद्ध इंग्रजीतून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरादाखल चायनीज विद्यार्थी डोळे मिटून, आणि सगळेच्या सगळे बत्तीस दात दाखवून जातिवंत हसला, ही खुशाल त्याला काही न समजले असल्याची पोचपावती समजावी. मात्र अमेरिकन असोत किंवा चायनीज किंवा इतर कोणी. सगळे विद्यार्थीवर्ग एककेकांशी सौहार्दपूर्ण वागतात, हे पाहून आनंद होतो आणि आपण परदेशी विद्यार्थी असल्याचा सावधपणा जरा निवळतो.
Engineering is a dry field world over या वाक्याची प्रचिती डिपार्टमेंटमधील मुलींकडे पाहून येते. पण डिपार्टमेंटल सोशल्स, हॅलोविन नि थँक्सगिव्हिंग अशा प्रसंगी आजवर कधीही न दिसलेली फुलपाखरं दिसू लागतात. आपल्याकडे मोठमोठ्या राजकीय पक्षांच्या प्रचारसभांना जशी गाडी भरून माणसं आणतात, तसेच अशा खेळकर आयोजनांना जास्तीत जास्त प्रतिसाद लाभावा, म्हणून विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेमार्फतच अशी 'मार्केटिंग स्ट्रॅटेजी' वापरली जाते की काय, असे वाटते. पण अशा खेळीमेळीच्या प्रसंगी विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय तसेच इतर कर्मचारी वर्ग आणि अर्थातच विद्यार्थी हे सगळे एकत्र येण्याचा आनंदसोहळा आणि त्याचाच एक भाग होणारे आमच्यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समुदाय या गोष्टी सारख्यासारख्या होत नसतात. दिवाळी, होळीसारखे कार्यक्रम स्थानिक भारतीय विद्यार्थी संघटनेमार्फत डिपार्टमेंटच्याच आशीर्वादाने इमारतीच्या मोठ्या प्रांगणातली जागा मिळवून राबवले जातात. त्याचबरोबर विविध कंपन्यांची माहितीसत्रेही डिपार्टमेंटमध्येच आयोजित केली जातात. अशा अनेक माहितीसत्रांना भारतीय विद्यार्थ्यांचा भरघोस पाठिंबा मिळतो. कारण असा पाठिंबा मिळवण्यासाठी 'फ्री फूड' ची खिरापत कंपन्यांनी जाहीर केलेली असते. संगणक विज्ञानाचे आमच्यासारखे विद्यार्थी खास ग्रीक आणि अरेबियन जेवणासाठी कुठल्याशा बांधकाम क्षेत्रातील कंपनीच्या माहितीसत्राला केवळ हजरच राहून नव्हे, तर तिच्या प्रतिनिधिंशी 'अमेरिकेतील सध्या हाती घेतलेले बांधकाम प्रकल्प आणि त्यातील रोजगाराच्या संधी' या विषयावर चर्चा करून आल्याचीही उदाहरणे आहेत. एखादी कंपनी भारतीय जेवण किंवा फुकटचा पापा जॉन्स पिझ्झा देणार असेल, किंवा गो पाक्स उपाहारगृहाच्या रविंदरकाकू दिवाळीनिमित्त सात डॉलरमध्ये अमर्याद बफे घोषित करतील तर ही माहिती समस्त भारतीय विद्यार्थी समुदायाला संघटनेच्या सामाईक ई-पत्राद्वारे कळवण्याचे सत्कार्यसुद्धा सगळ्या डिपार्टमेंट्सचे भारतीय विद्यार्थी इमानेइतबारे करत असतात. क्वचितप्रसंगी जेव्हा दैवाला मानवणार नाही, तेव्हा उलटा अनुभवही येतो. म्हणजे डिपार्टमेंटतर्फेच आयोजित केलेल्या सोशल मध्ये बार्बेक्यू आहे म्हणून उत्साहाने रांगेत उभे रहावे आणि प्रत्यक्षात वाढून घेण्याची पाळी आली, की तिकडे बीफ सोडून काहीही नाही, या सत्याचा साक्षात्कार व्हावा इथवर परिस्थिती ओढवते. अर्थात असे प्रसंग क्वचितच येतात, पण आले की झक मारत घरी जाऊन स्वयंपाक करावा लागतो किंवा जवळच्याच बर्गर किंग, किझनोज किंवा सबवेची वाट धरावी लागते.
अपार्टमेंट ते डिपार्टमेंट नि परत अशा प्रवासातला ऍडवायजरचा टप्पा तसा निरनिराळ्या किश्शांनी परिपूर्ण आणि कधीही चुकवू नये, असा असतो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. डिपार्टमेंटमध्येच बसून हे प्रवासवर्णन लिहीत असल्याचा आसुरी आनंद समस्त मनोगतींशी वाटून घेता येतोय, हेही नसे थोडके ;)

Wednesday, November 15, 2006

अपार्टमेंट <-> डिपार्टमेंट <-> ऍडवायज़र <-> बडवायज़र (१)

लेखाचे शीर्षक किंवा त्यातील शब्द अमेरिकेत राहणाऱ्या मनोगतींसाठी तरी नवीन नसावेत. आणि ज्यांना हे शब्द परिचयाचे नाहीत, त्यांची यथावकाश त्यांच्याशी (चांगलीच!) ओळख होईल, याबाबत खात्री बाळगावी. या शीर्षकातील '<->' या चिन्हाकडे "टू अँड फ़्रो" या अर्थाने बघावे; म्हणजे त्यावरून लेखकाच्या व त्याच परिस्थितीत दिवस काढणाऱ्या इतर अनेकांच्या दैनंदिन प्रवासाची (खरे तर परिस्थितीची!) कल्पना येईल. मुंबईकर चाकरमानी घर ते नोकरी, नोकरी ते घर असा प्रवास करतात. पण त्या दैनंदिन प्रवासाची गोडी अनुभवणारे कुणी अपूर्वाई, पूर्वरंग किंवा तत्सम लिहिण्याच्या फंदात पडत नाहीत. इकडे विद्यार्थी(दशेत) जीवन जगणाऱ्या बऱ्याच ज़णांचा प्रवास अपार्टमेंट ते डिपार्टमेंट ते ऍडवायज़र ते बडवायज़र आणि परत असा असतो. त्याच प्रवासवर्णनाचा हा पहिला भाग.
अपार्टमेंट म्हणजे किमान सहा मज़ल्यांची (उत्तुंग?) इमारत ही भारतीय व्याख्या अमेरिकेतील अपार्टमेंट्सनी चुकीची ठरवली. दोन बेडरूम्स विथ ऍटॅच्ड बाथरूम्स, एक हॉल, आणि स्वयंपाकघर (२ बीएचके) च्या सदनिकेस अपार्टमेंट म्हणतात, ही व्याख्या मी अमेरिकेतच येऊन शिकलो. वास्तविक शिक्षण पूर्ण होईपर्यंत दैनंदिन जीवनक्रमात अंग टेकायला मिळणारी धर्मशाळा यापलीकडे अपार्टमेंटचे महत्त्व फारसे काही नाही. त्यातूनही दुर्दैवाची गोष्ट अशी, की धर्मशाळेत निदान फ़ुकटात तरी अंग टाकता येते; अपार्टमेंटमध्ये झोपायला आपल्याला भाडे द्यावे लागते. वर घरमालकांची करडी नज़र असतेच... ए सी नीट आहे ना, कार्पेटची नासधूस केलेली नाही ना, चारपेक्षा जास्त लोक घरात राहत नाहीत ना.....या सगळ्याला सांभाळत दिवस काढायचे. इकडे आलो, तेव्हा बाकीचे घरसोबती (शाळेतले ते शाळासोबती तसे एकाच अपार्टमेंटमध्ये राहणारे घरसोबती) आधीच येऊन त्यांनी एक अपार्टमेंट बुकही करून टाकले होते. त्यामुळे इथल्या कुणा सिनिअरकडे विस्थापितासारखे तात्पुरते राहण्याची पाळीही आली नाही. आणि वसाहतीतील सगळ्यात स्वस्त अपार्टमेंट मिळाले म्हणून सगळेच खूश! बॅगा घेऊन आत पाऊल टाकले न टाकले तोच दोन सोफ़ासेट, दूरदर्शन संच, म्युझिक सिस्टम दृष्टीस पडल्यावर तर डोळ्यांत आनंदाश्रू तरळले! मात्र लवकरच "ये सब वो सुंदर, विक्रांत वगैरे लोगोंका है और यहांसे जानेवाला है" हे कळले, आणि हिरमुसायला झाले. नाही म्हणाला म्युझिक सिस्टम मालकीणबाईंची स्वतःची आहे, आणि ती घरातच राहणार आहे हे कळले, आणि फूल ना फुलाची पाकळीचे समाधान झाले.
जेटलॅग्ड अवस्थेतील पहिली झोप काढून दुसऱ्या दिवशी उठलो आणि आळोखेपिळोखे देत दार उघडून बाहेर गेलो. डोळे चोळून पाहिल्यानंतरही जेव्हा टमरेलच दिसेना, तेव्हा आपण चाळीत नसून अपार्टमेंट संस्कृतीमध्ये आहोत, याचा पहिला साक्षात्कार झाला. तसाच घरात येऊन बेडरुमाच्या कोपऱ्यातील विधिगृहातच 'विधी'पूर्वक सगळे करायचे ही समज़ूत पक्की केली आणि बाथरुमात शिरलो. बरे, मुंबईला असताना, उरलीसुरली झोप आत पूर्ण होण्यापूर्वीच बाहेरून गोखले दार ठोठवायचा आणि त्याच्या "चलाऽऽऽ" ला "ह्ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म" असे झोपून उठल्यावर आवाज़ाला जी नैसर्गिक धार येते, तिचे दणदणीत प्रत्युत्तर, आणि ज़ोडीला टमरेलभर पाणी त्याला ऐकू ज़ाईल इतपत वेगाने भस्सकन् ओतणे, अशा दुधारीने प्रत्युत्तर देऊन अस्मादिक बॅक टू घर. इथे तसे काही नाही. टू अँड अ हाफ़ बाथरूम म्हणजे काय हे बाहेरून कुणीच "चलाऽऽऽ" म्हणून ओरडले नाही की समज़ते. कारण आधीच आत कुणी असेल, तर दुसऱ्या बेडरुमातील विधिगृहात ज़ाता येते, किंवा अगदी वर्श्ट केसमध्ये तेही बिझी असेल, तर हॉलमधले अर्धे बाथरूम असतेच. वास्तविक हे जे अर्धे असते, त्याला बाथरूम म्हणणेही शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे. रोखठोक भाषेत फार फार तर त्याला "जेथे अंघोळ करता येत नाही असा संडास" असे म्हणता येईल आणि बेडरुमांतील विधिगृहांचीही तदनुसार जी करता येईल ती व्याख्या करता येईल. तांब्याभर पाणी मनसोक्त अंगावर घेणे, घसघसून साबण चोळणे आणि पाण्याच्या आवाज़ापेक्षाही मोठ्या आवाज़ात बाहेर ऐकू ज़ाईल इतक्या जोशात गाणे हेच आतापर्यंत अंगवळणी पडलेले. त्यामुळे शावर कर्टन लावलेले नाही, याची ज़ाणीव नाही; तशातच गरम-थंड पाणी कसे वापरायचे याचे ज्ञान नाही. जे दिसले ते रुचेल त्या बाज़ूला वळवले आणि शावर चालू झाला. भारतातून वर्षभरासाठी लागणारा हमामचा साठा आणल्याने शावरजेल कशाला वापरायचे?! अंघोळ उरकून नेहमीच्या सवयीने दोन हातांच्या अंगठ्यांवरून ज़ानवे फ़िरवत मुखाने गणपतीस्तोत्र चालू आणि हॉलमध्ये येरझाऱ्या. त्यातच "अबे साले ये क्या कर दिया यार!!!!!" अशी मित्राची किंकाळी ऐकून वर बेडरूममध्ये धावलो, तर बाथटबाच्या बाहेर माझ्या अंघोळीनंतर तयार झालेले तळे, आणि हातात ओलिचिंब झालेली स्वतःच्या शावरजेलची बाटली घेऊन उभा असलेला माझा बेडरुमी (अपार्टमेंटमध्ये एकत्र राहणारे ते रूमीज़ आणि जे एकच बेडरूम नि ऍटॅच्ड बाथरूम वापरतात, ते बेडरुमीज़) यांचे तसबिरीतल्या लक्ष्मीमातेप्रमाणे अगर सत्यनारायणाप्रमाणे झालेले दर्शन पाहून अमेरिकेतही माझ्या स्तोत्रपठणाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. मग एका बाज़ूला माझ्या अमेरिकन अंघोळीबद्दलच्या (अ)ज्ञानाचा उद्धार आणि दुसऱ्या बाज़ूला शावर कर्टन्स म्हणजे काय, ते कसे, का वापरायचे, याबद्दलचे ज्ञानदान अशी दुहेरी शिक्षकी भूमिका बेडरुमीने पार पाडली. तळे उपसायचे काम अर्थातच मी केले.
जेवणाच्या (म्हणजे जेवायच्या नाही, जेवण तयार करायच्या!) पाळ्या ठरवल्यानंतर माझी पाळी होती, त्यावेळी स्वयंपाकघरात पदार्पण केले. कुकिंग रेंज, हॉटप्लेट वगैरे सगळे प्रकार नवीनच. सुदैवाने ते कसे वापरायचे, कुठले बटण कशासाठी कुठे वळवायचे, ओव्हन कसा वापरायचा, साफ़ करायचा वगैरे सगळ्या सूचना आयत्याच रेंजवरच लिहिलेल्या असल्याने फारशी अडचण आली नाही. तरीसुद्धा दोनवेळा कुकीज़ आणि चिकनचा कोळसा करून झालाच. सुदैवाने हे महापातक माझ्या एकट्याच्याच हातून घडले नसल्याने आम्हां चौघांची एकमेकांना सामुदायिक क्षमा मिळाली. अमेरिकन सरकारचे जनरल ऍम्नेस्टीचे धोरण आम्ही आमच्या अपार्टमेंटापासूनच राबवायला सुरुवात केली, असे म्हटले, तर ते वावगे ठरू नये. कार्पेटवर बसून जेवले, तर खरकटे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे कार्पेट साफ़ कोण करणार, या भीतीने मांडी ठोकून जेवायची सवय मोडून, डायनिंग टेबलावर जेवायची सवयसुद्धा लावून घेतली. कुछ पाने के लिये (बहोत)कुछ खोना भी पडता है :(
दिवसांमागून दिवस ज़ाऊ लागले - अभ्यासालाही आणि स्वयंपाकघरात साठत चाललेल्या कचऱ्यालाही :D. त्यांचे परस्परांशी असलेले समप्रमाण कचराकुंडीतून बाहेर येऊन फ़्रीज़ज़वळची मोकळी ज़ागा, आणि नंतर घराचा दरवाज़ा उघडून आत शिरल्याशिरल्या जो शू रॅक आहे तो, इथवर सगळीकडे दिसू लागले. पिझ्झा बॉक्सेस, दुधाचे गॅलन्स, टोमॅटो प्युरीचे कॅन्स, अंड्याची टरफ़ले आणि असंख्य कागद नि किचन टिशूज़ यांच्यासाठी नसबंदी योजना असायला हवी होती की काय, असे वाटू लागले. आणि ज़सज़सा अभ्यास वाढत ज़ातो, तसतसे फ़्रीज़मधले खाणेही कमी होत ज़ाते. भाज्या, फळे दिसेनाशी होतात. दुधाचा शेवटचा गॅलन चालू झाला, की दुसऱ्या दिवशी प्यायचे ग्लासभर दूध आदल्या रात्रीच ग्लासात ओतून त्यावर "रिज़र्व्ह्ड" असा अलिखित शिक्का उमटवावा लागतो. ज्याच्या हाती ससा तो पारधी, तसे ज्याच्याकडे ग्लासभर दूध तो सावकार! सिंकमध्ये पडलेली घासायची भांडी आणि नुसता स्वयंपाकघरातलाच नाही तर एकूणाच घरातला कचरा, ही अभ्यास आणि वेळेची कमतरता यांची अनौरस अपत्ये आहेत. त्यांचे पालनपोषण करण्याची ज़बाबदारी आमच्यासारखे "बाळाचे बाप ब्रह्मचारी" मोठ्या आनंदाने पार पाडत असतात. या सत्रात मोज़ून दोन वेळा व्हॅक्यूम क्लीनर बाहेर आला होता. गणपतीबाप्पा आले होते तेव्हा आणि कुठूनशी अवदसा सुचून मालकीण स्वतः घरभाडे वसूल करायला येणार होती तेव्हा. आणि त्या दिवशी चक्क चक्क स्वयंपाकघरातल्या कचऱ्याचीही योग्य ती सोय करण्यात आली होती, असे समज़ले. ("असे समज़ते", असे म्हणायचे कारण म्हणजे तशी सोय लावण्यात माझा सहभाग़ नव्हता आणि त्या संध्याकाळी घरात पाऊल टाकल्यावर मला शू ऱॅकज़वळचे दुधाचे गॅलन्स दिसले नव्हते)
डिसेंबरमध्ये सत्रसमाप्ती असते, त्यावेळी तसेच त्याआधीच्या नोव्हेंबरात हॉलमध्ये पुस्तके, आईस्क्रीमच्या न घासलेल्या वाट्या, बुरसटलेली पिझ्झा स्लाइस आणि मॅगीचे रिकामे पाकीट, कोकाकोलाचा चिकट ग्लास, आणि चार दिवस बाउलमध्येच तळाशी राहून दगड झालेली दालफ़्राय, सहासात चमचे, चहाचे दोन कप, मोबाईल फ़ोन्सचे चार्जर्स, लॅपटॉप्स, म्युझिक सिस्टम यांच्या एकांत एक गुंतलेल्या अनेक वायरी, दप्तरं आणि लेक्चर नोट्स, पंधरा दिवस धुवायच्या राहिलेल्या जीन्स नि चार-एक अंडरवेअर्स, कोणाचा कोणता हे ओळखू न येणारे स्वेटर्स नि सोबत कधीकाळी पांढरे असलेले बनियन्स, यांपैकी काहीही किंवा सगळेच दिसत असते. फक्त रूमीज़ दिसत नाहीत. कोण कधी घरात असते, कोण कधी येतो, कधी ज़ातो, कधी झोपतो, काही पत्ता नसतो. घरी आल्यावर दहा पायऱ्या चढून बेडरुममध्ये ज़ाणेही जिवावर आलेले असते. मग कार्पेटवर किंवा सोफ़्यावरच ताणून द्यायची. बाहेर वज़ा एक आहे की वज़ा दोन अंश सेल्सिअस तापमान आहे, याचा झोपेवर परिणाम होऊ द्यायचा नसतो; तर झोपायला मिळते आहे, यातच सुख मानायचे असते. बऱ्याचदा तर आज़ूबाज़ूचे मित्रमैत्रिणी त्यांच्या कचऱ्यासकट येऊन अभ्यास करताना दिसतात. आतापर्यंत पार्ट्या, टाइमपास नि धांगडधिंग्यांसाठी फिरकणाऱी ही मंडळीच अपार्टमेंटमधले भाडेकरू असल्यासारखे वाटू लागतात. बहुदा याची ज़ाणीव त्यांनाही असावी म्हणूनच की काय, पण त्यांच्यातल्याच एकाने या महिन्याचे घरभाडे शेअर करण्याचीही तयारी दर्शवली. त्यातून आम्ही या वर्षी सिनिअर झाल्याने आमचे अपार्टमेंट म्हणजे वसाहतीतील सांस्कृतिक केंद्र, शिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, भारतीय विद्यार्थी समाजकल्याण केंद्र वगैरे बरीच केंद्रे झाले आहे. त्यामुळे या सुविधांचा विनाशुल्क लाभ घेणाऱ्या विद्यार्थीजनांसाठी आमचे अपार्टमेंट हाच दिवसाचा शेवटचा मुक्काम असतो....... दुसऱ्या दिवशी डिपार्टमेंटला ज़ाण्यापूर्वी.

Saturday, June 10, 2006

नऊ ते पाच - शेवट

एक भ्रमणध्वनी संच आणि इतर भ्रमणध्वनी संच, संगणक, पीडीए अशा अनेक उपकरणांमधील '(सु)संवाद' ज्याद्वारे साधला ज़ातो, ते 'ब्लू टूथ' तंत्रज्ञान राबवणारे सॉफ़्टवेअर तपासणे या खास कामावर माझी नियुक्ती झाली. या तंत्रज्ञानाच्या नावावरून त्याचा आणि दातांचा (किंवा दातांच्या रंगाचा ... मोत्यासारखे शुभ्र, पिवळट, (निळे!) आणि क्लोज़ अपच्या त्या प्रसिद्ध जाहिरातीत शिशुवर्गातील मुलांनी सांगितलेले आपल्या शिक्षिकेच्या दातांचे काही रंग) काही संबंध असतो की नाही, याबद्दल मी अज़ूनही माहिती मिळवण्याच्या खटपटीत आहे. तो चिंतनाचा स्वतंत्र विषय आहे. पहिल्याच दिवशी एकदम 'ढासू' दिसणारे काही भ्रमणध्वनी संच तपासणीसाठी हातात पडले आणि मी त्यांच्या प्रेमात. त्यामुळे तपासणीच्या सगळ्या पायऱ्या वाचून, त्या समज़ावून घेऊन तदनुसार ते संच तपासणे हे सगळे मी इमानेइतबारे केले. ज़े काही निकाल हाती आले, त्यांची नीट नोंद केली आणि त्याबद्दल ओ एल् ची शाबासकीसुद्धा मिळवली. मला खूप आनंद झाला त्या दिवशी. झालेला सगळा आनंद घरी येईस्तोवरच्या तासाभराच्या प्रवासात, कुणाबरोबर तरी वाटून घेण्यापूर्वीच पूर्ण हरवून गेला. सकाळाची अपुरी झोप येताना बसमध्ये काढली (कार्यालयात नव्हे!) आणि घरी आल्यावर मस्तपैकी ताणून दिली. दररोज़चे नऊ ते पाचचे हे वेळापत्रक असेच, तंतोतंत, प्रामाणिकपणे राबवायचे (अगदी बसमधल्या झोपेसकट!) हा विचार तेव्हाच पक्का केला.

पण नव्याचे नऊ दिवस या न्यायाने हळूहळू कामातील नाविन्य संपले. सगळे कसे 'यांत्रिक' होऊन गेले. सकाळी नऊपासून सायंकाळी पाचपर्यंत एका ठराविक साचेबद्ध कामाचा कंटाळा येऊ लागला आणि मग मुख्य कामाबरोबरच 'ज़ोडधंदे' शोधायला सुरुवात झाली. सहकाऱ्यांबरोबरचे हास्यविनोद हा त्यांपैकीच एक. अमेरिकेत एक बरे (आणि विचित्र) आहे. तुमच्या दुप्पट-तिप्पट वयाच्या माणसालाही अगदी नावाने हाक मारता येते. आमचा व्यवस्थापकसाहेब 'आज़ोबा' म्हणण्याइतका मोठा नसला तरी सामान्यपणे आपण ज्यांना अहोज़ाहो करतो, तेव्हढा 'काका'छाप मोठा नक्कीच आहे. पण तरीही त्याला आपल्या लंगोटीमित्रासारखे "हे स्टीव्ह, व्हॉट्सप" ('क्या रे भिडू स्टीव्ह, कैसा है'छापाचे!) म्हणणे सुखावून ज़ाते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी ज़रा जास्तीच खेळीमेळीचे वातावरण असते. पण मला दिसणारी नाण्याची दुसरी बाज़ू अशी आहे, की यामुळे इकडच्या 'काका', 'आज़ोबा' यांच्याज़वळ ज़ाणाऱ्या व्यक्तिरेखांबद्दलचा आदरभाव निर्माण व्हायला आणि तो रुज़ला की चिरकाल कायम रहायला तुलनेने जास्त वेळ लागतो. साहेबापासून ते थेट कंपनीच्या उपाहारगृहातील आचाऱ्याबरोबर थट्टामस्करी चालू झाल्याने कामाचा कंटाळा थोडातरी निवळला आणि नवीन ज़ोम आला. त्याचबरोबर क्युबिकलसमोरून पॉला, ज्युडी, एमी, XXXचे खळखळणे (माझ्या मित्रपरिवारात सध्या या फुल्या फारच प्रिय असून प्रकरण मुलीच्या फोटोपर्यंत (तो तर केव्हाच मिळालाय!) गेले असून आता ते कुंडलीपर्यंत (ती आहे की नाही हे मलाच माहीत नसणे, हे माझे अहोभाग़्य!) आणि त्याच्याही पुढे नेण्याचा कट शिज़ायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सदर पाककृती लवकरात लवकर पूर्ण न होण्याच्या खबरदारीस्तव आणि वाचकांच्या कल्पनाशक्तीस वाव द्यावा म्हणून तूर्तास फुल्याच!), झेरॉक्स मशीनचा आणि प्रिंटरचा लयबद्ध आवाज़, दर आठवड्याच्या बैठका, त्यातली मला अजिबात न कळणारी चर्चा, काम करताकरता अधूनमधून डोळ्यांवर ऐकायला येणारे 'सोजा राजकुमारी सोजा' (आणि तसे झाल्यावर लगेच कॉफ़ीमेकरकडे घेतलेली धाव!), दिवसातून एकदातरी व्हेंडिंग मशीनमध्ये ज़ाणारे काही क्वार्टर्स (स्थानिक २५ पैसे) आणि बाहेर येणारा सोडा अगर चिप्स आणि या सगळ्यात दडलेले कष्टाचे काम यांमुळे माझे नऊ ते पाच स्थिरस्थावर झाल्यासारखे वाटू लागले. दररोज़चे काम करतानाच कॅरोलायना हरिकेन्सच्या हॉकी गेमबद्दलची चर्चा होते. वीकेंडला काय केले आणि येत्या वीकेंडला काय करायचे आहे, याचे वेळापत्रक व्हेरिफ़िकेशनच्या वेळापत्रकाइतकेच सूत्रबद्धपणे बनवले ज़ाते. तसे झाले की येणाऱ्या शुक्रवारच्या संध्याकाळच्या प्रतीक्षेत आठवड्याचे बाकीचे दिवस सुसह्य होऊन गेल्याचे ज़ाणवतही नाही. संध्याकाळी बसमधून घरी येताना काढलेल्या तासभर झोपेला आता सकाळी कार्यालयात ज़ातानाच्या बसमधील चाळीस मिनिटांच्या झोपेची साथ मिळू लागली, एव्हढाच काय तो ठरवलेल्या वेळापत्रकातला छोटासा (?) बदल.

डिसेंबरात भारतात ज़ायचा बेत आहे. त्यासाठीचे तिकीट आतापासूनच आरक्षित केले नाही, तर लवकरच किमती गगनाला भिडणार हे अटळ सत्य डोळ्यांसमोर दिसते आहे. फ़ीचे पैसे, देणेकऱ्यांची देणी हा सांसारिक स्वरुपाचा खर्च विद्यार्थीदशेतच झेलायला लागतोय. पण अज़ून आतापर्यंत काम केलेल्या तीन आठवड्यांचा सोडा, तीन दिवसांचाही पगार मिळालेला नाही. ते सुद्धा आम्ही तासाच्या बोलीवर काम करणारे वेठबिगार असताना. बरे आतापर्यंत एकही खाडा केलेला नाही. पण आमच्या हक्काच्या साडेअठरा डॉलर प्रतिताससाठी झगडणारा कोणी शरद रावांसारखा कैवारी (! हाहाहा... पगार नसला झाला की काय काय (वाट्टेल ते!) आठवेल/सुचेल काही सांगता येत नाही, हे मला आता पुरेपूर पटले हो!) इकडे नाही आणि इकडे संप बिंप पुकारता येण्याचा अनुभव आणि कौशल्य दोन्ही नाही ः( कौशल्य आहे ते सॉफ़्टवेअरच्या तंत्राचे, ज्ञानाचे, त्यामधील पायाभूत संकल्पना आणि त्यांच्या उपयोजनाचे. अनुभव आहे तो कष्ट करण्याचा आणि नीट काम करण्याचा.

गिरणगावातल्या बंद पडलेल्या गिरण्यांचे भोंगे कधी काळी वाज़लेले ऐकले आहेत माझ्या कानांनी. तिथला मुंबईकर साडेअठरा 'रुपये' प्रतितासापेक्षा कमी पगारावर आयुष्य काढत आला आणि भोंग्यांच्याच गजरावर त्याला ज़ाग येत असे. त्यामानाने मी बराच सुखवस्तू परिस्थितीत दिवस ढकलतोय (?) याची ज़ाणीव झाल्यावर पुढच्या पहाटे गजर झाला रे झाला की दात घासायला बेसिनसमोर उभे राहण्याची अनामिक प्रेरणा मिळते. अशा वेळी माझे 'नऊ ते पाच' मला पगारापासून बरेच दूर कुठेतरी घेऊन गेलेले असते.

नऊ ते पाच - १

गजराच्या घड्याळाचा गजर कसा वाज़तो, हे ऐकायची कधी पाळी न आल्याने (गरज़च न पडल्याने) 'गजर झाल्यावर झोपेतून उठणे' या प्रकाराशी माझा आज़तागायत संबंध नव्हता. माझ्यासाठी "अरे मेल्या, ऊठ आता. साडेआठ वाज़ले. ऐद्यासारखं खायचं आणि लोळायचं, बास्! बाकी काही नाही", अशी आईने चालू केलेली आरती हाच खरा गजर. झालंच तर या मुख्य आरतीला ज़ोडूनच, "कामात काडीची मदत नाही","अभ्यासाच्या नावानेही शून्य", इत्यादी आरत्या गाऊन झाल्यावर, अगदीच निरुपाय झाला, की "चिटणिसांचा गुण लागलाय, दुसरं काही नाही", अशी मंत्रपुष्पांजली! पूर्वजांवरच (आणि त्यांच्या कर्तृत्त्वावरच!)असे खळबळजनक आरोप झाले, की नंतर मात्र प्रसाद वाटायला बाबा हज़र!!! मग तो प्रसाद भक्षण करून अस्मादिकांची स्वारी बिछान्यातून बेसिनवर. गॅलरीत तोंडात ब्रश धरून पुढची उरलीसुरली झोप काढायची (म्हणजे तसा प्रयत्न करायचा) आणि काकडआरती सुरू झाल्यावर दूध, अंघोळीसाठी पुन्हा घरात पाऊल टाकायचे हा दिनक्रम. पण इकडे यायच्या दिवशी विमानतळावर "अमेरिकेत कसा रे उठणार तू स्वतःचा स्वतः आणि कसं सगळं वेळेवर आवरणार भराभ्भर!" या वाक्यातली आईच्या जिवाची तगमग, ती दिनचर्या अंगवळणी पडलेल्या माझ्यासारख्या(निगरगट्टा)लाही क्षणभर भावूक (!) करून गेली ः(

चालू उन्हाळ्यात सहाय्यक अभियंता म्हणून एके ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळाली, आणि (नाईलाज़ाने) गजरावर उठणे(ही) आले. आज़पावेतो हे पद फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोऱीबंदर येथील मुख्य कार्यालयातच अस्तित्त्वात आहे, असे मला वाटत होते. आणि त्या कार्यालयातला त्या अभियंता साहेबाचा कारभार पाहून अशी नोकरी मिळणे खरंच भाग्याचे आहे, असेही वाटायचे ;) त्यामुळे सदर कंपनीकडून मला 'सहाय्यक अभियंता' पदासाठीचा प्रस्ताव आल्यावर मी त्याचा हसतमुखाने स्वीकार केला. तासाचे साडेअठरा डॉलर्स मिळत असतील, तर म्या गरीबाची घड्याळाच्या गजरावर उठण्याचीही तयारी आहे (वावा! काय पण पराक्रम!) नोकरीचा हा प्रस्ताव स्वीकारण्यामागे अमेरिकेतील शिक्षणाच्या आगामी सत्राची फी, अगदी पूर्ण नसली तरी बव्हंशी ज़मवणे आणि आज़वरच्या तांत्रिक ज्ञानाचा संगणक आणि दूरसंचार क्षेत्रात उद्योगधंद्याच्या तसेच अर्थार्जनाच्या दृष्टीने कसा फ़ायदा होतो हे पाहणे असा दुहेरी उद्देश होता (अर्थात "फ़र्स्ट थिंग्ज़ फ़र्स्ट"च्या तत्त्वानुसार, येथेसुद्धा, पहिला उद्देश पहिला आणि दुसरा उद्देश दुसरा!)

नोकरीच्या पहिल्याच दिवशी मी ठरल्या वेळी कार्यालयात न पोचल्याने, कंपनीच्या आवारातच माझ्या निरोप समारंभाची तयारी पहायला मिळेल, या विचाराने पाचावर धारण बसली होती. अर्थात, गजरावर उठण्याच्या नेट प्रॅक्टिसचाही तो पहिलाच दिवस असल्याने, मी स्वतःला उदार मनाने माफ़ केलेच होते म्हणा. ज़ोडीला बस चुकल्याचे सबळ कारणसुद्धा तयार ठेवले होते. मात्र कामाचा पहिलाच दिवस असल्याने कंपनी आपल्या नादान कर्मचाऱ्याची पहिलीच (आणि शेवटचीच) चूक पोटात घालेल असा दृढ विश्वास, आणि कार्यालयात (उशीरा) पोचलेले इतर काही समदुःखी सहकारी पाहून जिवात जीव आला. मनुष्यबळ व्यवस्थापिका (हुश्श! एच आऱ मॅनेजर किती सुलभ सुटसुटीत आहे, नाही का?!) बाईंनी स्वागत करून एका स्वतंत्र कक्षात नेले. तेथे नवीन कर्मचाऱ्यांसाठी कंपनीतर्फ़ेच एक माहितीसत्र आयोजित करण्यात आले होते. कंपनीची संरचना, काम, व्यापार, सुरक्षा, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि ज़बाबदाऱ्या यांसंबंधी आवश्यक ती माहिती दिली गेली. माहिती देणारी मनुष्यबळ खात्याची ती कर्मचारी एखाद्या हवाईसुंदरीसारखी असल्याने हे सत्र मुळीच कंटाळवाणे झाले नाही ः) आवश्यक कागदपत्रांसंबंधीची सगळी औपचारीकता आटोपून झाल्यावर मला आणि माझ्याच चमूत माझ्याबरोबर काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या माझ्या विद्यार्थीमित्रांना आमच्या चमूनायकाने (खरे तर चम्या नायकाने! पण इकडे यांना आदराने ओ एल् म्हणायचे. ओ एल् = ऑब्जेक्ट लीड!) वरच्या मज़ल्यावरील आमच्या नियोजित विभागात नेले. दरम्यान, जेवणाच्या वेळेत (कंपनीच्याच खर्चात = फुकटात) सुग्रास भोजनाचा लाभ झाला आणि गजर लावून मेहनतपूर्वक उठल्याच्या कष्टांचे फळ मिळाल्याच्या भावनेने अगदी कृतकृत्य व्हायला झाले. मग चमूतील इतर सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर ओळख करून देण्याघेण्यासाठी पाचदहा मिनिटांची 'ओळखपरेड' झाली. खरे तर तेव्हाच बारा आठवड्यांच्या या 'कैद-ए-बामुशक्कत'ची पुसटशी कल्पना यायला हवी होती. पण पुत्रप्रेमाने अंध झालेल्या (की डोळे दिपलेल्या?) धृतराष्ट्रासारखेच 'साडेअठरा डॉलर प्रतितास' पाहून माझे डोळे दिपले होते. पहिल्या दिवशीचे पाच वाज़ले आणि कोंडवाड्यातल्या ज़नावरासारखा मी बससाठी मोकाट धावलो. खरं सांगू का? माणसाने आयुष्यभर कॉलेजातला नि शाळेतला विद्यार्थीच रहावे, कधी मोठेबिठे होऊ नये, आणि नोकरीबिकरीच्या मायाजालात अडकू नये, असे त्यावेळी वाटले होते. 'आय ऍम नॉट मेड फ़ॉर धिस नाइन टु फ़ाइव्ह स्टफ़' अशी पक्की खात्री झाली होती हो मनाची!

दुसऱ्या दिवशीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मी भ्रमणध्वनी (मोबाइल फोन!) मध्ये ज़े सॉफ़्टवेअर वापरले ज़ाते, त्याचे कार्य अपेक्षेप्रमाणे चालते की नाही, हे सॉफ़्टवेअर कंपनीच्या प्रमाणभूत पद्धतीनुसार लिहिले गेले आहे की नाही, त्याचा दर्जा काय आहे, गुणवत्ता किती आहे, ते निकषांबरहुकूम आहेत की नाही, ग्राहकांना दिलेल्या वचननाम्यातली वचने सॉफ़्टवेअर पूर्ण करेल की नाही (निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष कसे आपापला जाहीरनामा प्रसिद्ध करून आपल्याला गंडवतात, तसे तर काही या सॉटवेअरमुळे होणार नाही ना?!), इत्यादी इत्यादी तपासण्या करण्याचे काम करतो. या सगळ्याला एक छान सोपा शब्द आहे, 'सॉफ़्टवेअर व्हेरिफ़िकेशन'. आता, जे लोक हे सॉफ़्टवेअर लिहितात (त्यांना 'डेव्हलपर्स' म्हणतात), ते या कामाला आणि हे काम करणाऱ्या आमच्यासारख्या पामरांना तुच्छ नज़रेने पाहतात आणि या सगळ्या धर्मकार्याची फक्त 'टेस्टिंग' अशी संभावना करतात. वास्तविक पडताळा (व्हेरिफ़िकेशन) हे तपासणी/चाचणी (टेस्टिंग) बरोबरच आणखीही काही अशा विस्तृत स्वरुपाचे काम आहे. आणि महत्त्वाचेसुद्धा आहे (तुम्ही भले कितीही काही सॉफ़्टवेअर लिहाल हो! पण ते चालायला हवे ना आणि प्रमाणबरहुकूम असले पाहिज़े ना!) त्यामुळे डेव्हलपर्सनी केलेल्या कोणत्याही हेटाळणीकडे दुर्लक्ष करून 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'च्या तत्त्वाने प्रामाणिकपणे, सचोटीने हे धर्मकार्य सिद्धीस न्यायचे हे आमच्या व्यवस्थापक साहेबांनी या पदासाठी मुलाखत घेतानाच माझ्या मनावर पक्के बिंबवण्याची खबरदारी घेतली होती. 'व्हेरिफ़ायर' किंवा 'टेस्टर' हे डेव्हलपरच्या अस्तित्त्वाला धोका असल्याची भीती डेव्हलपरच्या मनात बसली, की त्यांची मुज़ोरी बरीचशी निवळते, वगैरे कानमंत्र दिले गेले आणि माझे 'नऊ ते पाच' चालू झाले.

Wednesday, June 07, 2006

जगाच्या राजधानीतून - शेवट



परतीच्या छोटेखानी प्रवासात न्यूयॉर्क दर्शनातील एकूण उत्सुकता ज़रा कमी झाल्यासारखे वाटले. असे का होते आहे याची चाचपणी केली असता पोटातल्या कोकलणाऱ्या कावळ्यांनी त्याचे उत्तर दिले. काहीतरी खायलाच पाहिज़े, हे तर कळत होते पण उरलेसुरले न्यूयॉर्कसुद्धा बघायचे होते. बोट पुन्हा बॅटरी पार्कला (न्यूयॉर्कमधला भाऊचा धक्का ;)) आल्यावर तेथे खाण्यापिण्याचे बरेचसे (चांगले पण महाग) पर्याय खुले होते. ज़वळच एक हौशी कलाकार अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेसारखा पोशाख करून आणि चेहऱ्याची तशी रंगरंगोटी करून अमेरिकेचा राष्ट्रध्वज हातात घेऊन उभा होता आणि येणाज़ाणाऱ्या चिल्ल्यापिल्ल्यांशी हस्तांदोलन करून त्यांना आकर्षित करत होता. मग त्यांचे आपापल्या पालकांकडे त्याच्याबरोबर फ़ोटो काढून घेण्यासाठी सुरू झालेले हट्ट पाहून मला त्या सगळ्या प्रकारामागील 'बिझनेस स्ट्रॅटिजी' कळली. तशीच काहीशी मोर्चेबांधणी बाज़ूलाच बसलेल्या एका कृष्णवर्णीय भिकाऱ्याने केली होती. आपल्या मनात आज़वर 'भिकारी' या व्यक्तिरेखेचे ज़े चित्र कायम झाले आहे, ते लक्षात घेता, अमेरिकेतील या व्यक्तिरेखांना भिकारी म्हणणे मला खरोखरच जिवावर येते. या महाशयांनी छान युक्ती केली होती. येणाज़ाणारे पर्यटक कोणत्या देशाचे आहेत हे अचूक हेरून त्या देशाचे राष्ट्रगीत तो आपल्या व्हायोलीनवर वाज़वत होता. अर्थात, त्याने 'जन-गण-मन' सुद्धा वाज़वले. पण आम्ही भारतीय आणि त्यातून मराठी माणूस. राष्ट्रगीत संपेस्तोवर आम्ही ताठ मानेने 'सावधान' स्थितीत उभे होतो (म्हणजे काय, तर खिशातून पैसे काढून भीक दिली नाही. भारतात असताना चार आणे, आठ आणे अगदी क्वचित प्रसंगी बाहेर निघालेही असतील, पण डॉलर? छे! कधीकधी मला माझ्या अशा वागण्याचे हसूही येते. हे योग्य की अयोग्य असा प्रश्नही पडतो. पण उत्तर मात्र कधीच मिळत नाही ः( )
बॅटरी पार्कबाहेरील एका फेरीवालीकडून न्यूयॉर्कची आठवण म्हणून दोन टी शर्टस् घेतले (ते सुद्धा पाच डॉलरमध्ये दोन! अमेरिकेत असे 'गुड् डील' मिळण्याला आणि अर्थातच मिळवण्याला फार महत्त्व आहे) निदान पोलीस तरी अपेक्षाभंग करणार नाही या आशेपोटी पुढचा पत्ता ज़वळच उभ्या असलेल्या पोलिसालाच विचारला. त्याच्या सुचवणीनुसार त्याने सांगितलेल्या ठिकाणी बसची वाट पाहत उभे राहिलो. आता आम्हांला एंपायर स्टेट ही जगप्रसिद्ध गगनचुंबी इमारत बघायला ज़ायचे होते.
बसमधून बघायला मिळालेले न्यूयॉर्कही तितकेच सुंदर आणि अमेरिकेतील इतर काही शहरांच्या तुलनेने बरेच वेगळे वाटले. बसमधून बाहेरची वर्दळ आणि चिरकालीन आनंद नि समाधानाचे चेहरे रंगवलेली माणसे बघायला मजा येत होती. हा न्यूयॉर्कमधला 'सामान्य'(?!) माणूस. सोमवार ते शुक्रवार काम आणि शनिवार-रविवार कामाच्या दुप्पट आराम. रस्त्याच्या दुतर्फ़ा छोटीमोठी दुकाने, उपाहारगृहे, मध्येच न्यूयॉर्क विद्यापीठ, मॅरिअट फ़ायनॅन्शिअल सेंटर हॉटेल, बसथांबे असे सगळे बघत बस पुढे चालत होती. इच्छित स्थळी उतरल्यानंतर उजवीकडचा रस्ता पकडून पन्नास-एक पावले गेलो आणि १०३ मज़ली एंपायर स्टेटचे पहिले दर्शन झाले.
इमारतीत पाऊल टाकण्याआधी पोटोबाची पूजा करायची ठरली. ज़वळच उभ्या असलेल्या गाडीवरून सीग कबाबचा सुगंध जीभ चाळवत होता. त्याच्या बाज़ूच्या गाडीवर खारे दाणे, चणे, मसालेदा काज़ू वगैरेची गाडी होती (अमेरिकेतही चणेवाल्याचे दर्शन झाले आणि मी भरून पावलो;मात्र त्याच्याकडे मुंबईचा चनाछोर काही मिळाला नाही ः() सीग कबाब आणि मसालेदार काज़ू हे आमचे त्या दिवशीचे जेवण आटोपले आणि एंपायरमध्ये प्रवेश केला. अपेक्षेप्रमाणे याही ठिकाणी विमानतळसदृश सुरक्षाव्यवस्था होतीच. तिच्यातून यथासांग पार पडून, तिकिटे काढून दूरनियंत्रित लिफ़्टमध्ये चढलो. आत उभे राहून ज़ाणवणारही नाही अशा वेगाने ज़ाणाऱ्या त्या लिफ़्टने आम्ही ज़वळज़वळ एका मिनिटातच ८६व्या मज़ल्यावरील सज्ज्यात पोचलो.

ही इमारत न्यूयॉर्कचे आणखी एक भूषण. वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ज़ुळे मनोरे उभे राहिस्तोवर ही न्यूयॉर्कमधली सर्वात उंच इमारत होती. आणि अर्थात आता त्या मनोऱ्यांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर ही सर्वात उंच इमारत आहे. हिचे बांधकाम विल्यम लँब या स्थापत्यशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली १७ मार्च १९३० रोजी चालू झाले. एक वर्ष ४५ दिवसांच्या अथक परिश्रमांनंतर ही पूर्ण उभी राहिली. हिच्या उभारणीस न्यूयॉर्कचे तत्कालीन राज्यपाल आणि त्यांचे सहकारी यांचा आर्थिक तसेच राजकीय मार्गाने वरदहस्त लाभल्याचे समज़ते. इमारतीचा इतिहास, काही दुर्मिळ छायाचित्रे, सद्यस्थिती आणि पर्यटकांसाठी उपयुक्त माहिती याबद्दल उत्सुकता असणाऱ्यांनी http://www.esbnyc.com/index2.cfm या इमारतीच्या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी. आज़ही ही इमारत 'न्यूयॉकची राजदूत' म्हणून अभिमानाने मिरवते.

इमारतीचे मुख्य आकर्षण म्हणजे ८६व्या मज़ल्यावरून चहूबाज़ूंनी दिसणारे 'अख्खे' न्यूयॉर्क. तेथील निरीक्षण सज्ज्यात उभे राहून आपण जगाच्या डोक्यावर उभे असल्याचा भास झाल्यावाचून राहत नाही. हडसन नदी, ब्रूकलिन पूल, एलिस आणि लिबर्टी बेटे असा नज़ारा एका बाज़ूला आणि दुसरीकडे न्यूयॉर्क बंदर, मेटलाइफ़ इन्शुरन्स बिल्डिंग आणि इतर अनेक गगनचुंबी इमारती. एंपायर स्टेटच्या उंचीपुढे त्या खुज्याच वाटत होत्या. कदाचित हेच या एंपायर नामक एंपरर चे एंपायर ः) रस्त्यावरच्या गाड्या तर अक्षरशः मुंग्यांप्रमाणे भासत होत्या. आणि साहजिकच, माणसे तर दिसतही नव्हती.

घोंघावणारा वारा, सहपर्यटकांचे हसणेखिदळणे आणि छायाचित्रे काढणे आणि सूर्यास्त यांनी गज़बज़लेली एंपायर स्टेट मनसोक्त भटकून झाल्यावर बाहेर पडलो. पुढचा मुक्काम होता टाइम स्क्वेअर (याला टाइम 'चौक' म्हणणे मला खरेच आवडणार नाही. चौक असावा तर तो म्हणजे अप्पा बळवंत चौक, हुतात्मा चौक असा काहीतरी. यांना 'चौक' म्हणण्यातला जिव्हाळा आणि शान टाइम स्क्वेअरला चौक म्हणण्यात नाही and vice versa)

टाइम स्क्वेअर म्हणजे फ़क्त रोषणाई आणि नुसती रोषणाई. टाइम स्क्वेअर म्हणजे जाहिराती आणि रहदारी. टाइम स्क्वेअर म्हणजे निळे, लाल, हिरवे, गुलाबी सगळ्या रंगांचे दिवे. येथील विद्युत जाहिरातफलकांवर आपली जाहिरात लावण्याचा दर प्रतिसेकंद काही दशलक्ष डॉलर्सच्या घरात असल्याचे समज़ते. त्यामुळे कोकाकोला, एच एस् बी सी, सॅमसंग यांसारख्यांचे लाड हा टाइम स्क्वेअर इमानेइतबारे पुरवतो. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध 'हार्ड रॉक कॅफ़े' येथेच. बँक ऑफ़ अमेरिकेचे कार्यालय, 'व्हर्जिन' हे गाण्यांच्या कॅसेट्स, सीडीज़, डीव्हीडीज़ चे प्रसिद्ध दुकान, एक मोट्ठे खेळण्यांचे दुकान सारे काही येथे होते. आणि नुसतेच उभे नव्हते तर रोषणाईने ओसंडून वाहत होते. न्यूयॉर्क पोलीस खात्याची इमारत तर विद्युत रोषणाईने इतकी झगमगून गेली होती, की लालबागचा राजा किंवा गणेश गल्लीचा गणपती अगर चेंबूरच्या टिळकनगरचा छोटा राजनचा गणपती यांचे वैभव त्या झगमगाटापुढे फिके पडावे. आमच्याकडच्या काही पोलीस ठाण्यामध्ये आज़ही मेणबत्तीच्या प्रकाशात कारभार चालतो, याचे त्यावेळी खूप वाईट वाटले. "टाइम स्क्वेअरमधील एक शतांश टक्के वीज़ महाराष्ट्राला दिली तर देव अमेरिकेचे (थोडेतरी) भले करो", अशी प्रार्थना करण्याचा मोह मी त्यावेळी मुळीच आवरला नाही (आणि एन्रॉनच्या करंटेपणाच्या नावाने बोटे मोडायलाही विसरलो नाही) जाहिरातींबरोबरच दोन तीन विशाल विद्युतपटलांवर बातम्या चालू होत्या. दिवसाचे हवामान आणि आठवडाभराच्या हवामानाचे अंदाज़ वर्तवणे चालू होते. शेअर निर्देशांक दाखवला ज़ात होता. ज्ञानविज्ञान, राजकारण, मौज़मजा सगळे येथे हातात हात घालून, गुण्यागोविंदाने नांदत होते.

टाइम स्क्वेअरच्या प्रकाशात मनसोक्त न्हाऊन निघाल्यावर ज़वळच्याच एका उपाहारगृहात रात्रीचे जेवण घेतले. खरे तर आम्हांला न्यूयॉर्क मध्ये भेळपुरी, पाणीपुरी असे चाटवर्गीय पदार्थ नि तिथल्या वडापावची चव घ्यायची होती. पण फारच उशीर झाल्याने तो संकल्प सिद्धीस नेता आला नाही. एका भारतीय चायनीज़ (म्हणजे जेथील चायनीज़ जेवणाला आपल्या पुण्यामुंबईतल्या 'गाडीवरच्या चायनीज़'ची चव असते) उपाहारगृहात हादडायचा बेतही पाण्यात गेला. फार फार वाईट वाटले ः(
रात्रीच्या साडेबारा वाज़ताही या भागात तुळशीबागेत असते तशी (किंबहुना त्याहून जास्त) गर्दी होती. सारे न्यूयॉर्क शनिवारच्या रात्रीत झिंगले होते. जेवून झाल्यावर तडक घरी आलो आणि मुकाट्याने झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी अंमळ लवकरच (सकाळचे ११ म्हणजे तसे लवकरच नाही का!) परतीची बस पकडायची होती. टाइम स्क्वेअरचा लखलखाट इतका भिनला होता अंगात, की डोळे मिटूनही झोप येत नव्हती. झोपायलासुद्धा प्रयत्न करावे लागतील असे काही बरेवाईट प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात. टाइम स्क्वेअर भेट हा त्यांपैकीच एक म्हणावा लागेल.
आदल्या दिवशीच्या चकचकीत न्यूयॉर्क भेटीमुळे आलेला थकवा आणि न्यूयॉर्क दौरा संपल्याचे दुःख यांचा परिणाम म्हणून परतीची बस पकडताना मन (आणि अंग!) थोडे ज़ड झाले होते. मावशीचा निरोप घेऊन बसमध्ये बसलो. सुदैवाने या प्रवासात लक्कू कमी होते त्यामुळे प्रवास सुखाचा होणार होता. आमच्या अंगात न्यूयॉर्कला घेतलेले 'आय लव्ह न्यूयॉर्क'वाले टी शर्टस् पाहून काही सहप्रवासी आमच्याकडे ज़रा हेटाळणीपूर्ण नज़रेने पाहत आहेत ('कुठल्या गावाहून आलेत' अशी काहीशी नज़र!) हे आमच्या नज़रेतून सुटले नव्हते. तरीही न्यूयॉर्क भेटीचा अपार आनंद यत्किंचितही कमी होऊ न देता मी उरलीसुरली झोप बसमध्येच काढली. ज़ाग आली, तेव्हा माझे 'गाव' आले होते. बसमधून उतरलो आणि घराकडे रवाना झालो.

उण्यापुऱ्या दोन दिवसांच्या सहलीतला हा दोन तपांचा आनंद उपभोगून मी स्वगृही परतलो होतो. खूप मजा केली. माझ्यातला प्रवासी सुखावला होता आणि विद्यार्थी आपल्या सामान्यज्ञानात आणि अनुभवात भर टाकून आला होता. जगाच्या राजधानीत फिरण्याचे आणि ती अनुभवण्याचे भाग्य काहीसे लवकरच लाभल्याचे समाधान चेहऱ्यावर झळकत होते. या सहलीने मला काही ताणतणावाचे प्रसंग, दुःखे या सगळ्यांपासून दूर दूर नेऊन प्रकाशाच्या, आनंदाच्या राज्यात, सुखवर्षावात न्हाऊ घातले होते. आतापर्यंतची मरगळ झटकून नव्या ज़ोमाने कामाला लागायची प्रेरणा या प्रवासातून मिळाली. अशा तरतरीत करणाऱ्या सहली तुमच्याआमच्या सगळ्यांच्याच वाट्याला येवोत हीच सदिच्छा. पंधरा दिवसांपूर्वीच्या त्या सहलीची ही कहाणी आता या भागात सुफळ संपूर्ण होते आहे. कोणा अनामिक कवीमनातून उमटलेल्या मला अज़ूनही स्मरत आहेत -

हासत दुःखाचा केला मी स्वीकार
वर्षिले चांदणे पिऊन अंधार
प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री!

Tuesday, June 06, 2006

जगाच्या राजधानीतून - ३



डुलतडुलत मिस न्यू जर्सी समुद्राच्या रँपवर कॅटवॉक करत होती आणि आम्ही आसपासचे सौंदर्य न्याहाळण्यात रंगून गेलो होतो. न्यूयॉर्कच्या किनाऱ्यापासून दूर ज़ाताना मॅनहॅटन स्कायलाइन, जगप्रसिद्ध ब्रूकलिन पूल, डाव्या हातास न्यू जर्सी आणि उजवीकडे न्यूयॉर्क असे विहंगम दृश्य दिसत होते. ज़ोडीला भुर्ऱकन ज़ाणारी अमेरिकन तटरक्षक दलाची एखादी नौका आणि आकाशातून न्यूयॉर्क दर्शन घडवण्याची ज़बाबदारी पेलणारे एखादे हेलिकॉप्टर (अमेरिकेत या वाहनाला चॉपर म्हणायचे बरे का! ;)) होतेच. पहिला थांबा होता एलिस बेटाचा ज़े लिबर्टी बेटाच्या बाज़ूलाच आहे. पण एलिस बेटावर एक संग्रहालय आणि छान हवा या यतिरिक्त दुसरे काही नसल्याचे मावशीबाईंनी सांगितल्याने आम्ही तेथे उतरलो नाही. पाचच मिनिटात मिस न्यू जर्सी लिबर्टी बेटाकडे सरकल्या आणि 'हाऽऽ', 'ओऽऽ' च्या गजरात जनतेने आपापले कॅमेरे सरसावले. मिस न्यू जर्सींची स्वातंत्र्यदेवतेला हळुवार प्रदक्षिणा चालू झाली आणि वेगवेगळ्या कोनांमधून त्या देवीला कॅमेऱ्यांच्या क्लिकक्लिकाटांचे दंडवत लाभले.
आता देवी आली म्हणजे तिची कथाही आलीच! हा अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा फ़्रान्सने अमेरिकेला आंदण म्हणून दिला. त्यावेळी तो तांब्याचा की ब्राँझचा होता. त्याला छान झळाळी होती. कालांतराने त्यातील तांब्याचे ऑक्सिडेशन होऊन हिरव्या रंगाचा तांब्याच्या ऑक्साइडचा थर तयार होऊन पुतळ्यावर ज़मा झाला आणि आता हा पुतळा हिरवट पिस्ता रंगाचा झाला आहे. न्यूयॉर्कमधील अनेक टोलेजंग इमारतींच्या छतांचा रंग हिरवा असण्याचीही हीच हकीकत आहे. आणि ती इत्थंभूत सांगणारा माहितीफलक पुतळ्याच्या चरणी समर्पित आहे, हे वेगळे सांगायलाच नको. मी मात्र अगदी अलीकडेपर्यंत हा पुतळा ताजमहालाच्या रंगासारख्या पांढऱ्याशुभ्र रंगाचा आहे, असेच समज़त होतो आणि सगळी माहिती वाचून झाल्यावर, ऑक्साइडचा थर खरवडून काढून पुतळ्याला पूर्वीची झळाळी प्राप्त करून देण्यासाठी हा धनवान देश काहीच का करत नाही, असा प्रश्न माझ्या बालमनाला पडल्यावाचून राहिला नाही.
पुतळा ज्या चबुतऱ्यावर उभा आहे, तेथे पुतळ्याच्या पायथ्याशी असलेल्या सज्ज्यातून दूरस्थ न्यूयॉर्कचे सुंदर दर्शन घडते. तसेच पुतळ्याच्या मुकुटातूनही शहराचे अतिसुंदर दृश्य दिसते. दुर्दैवाने आम्हांला या दोन्ही ठिकाणी ज़ाता आले नाही. अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांसाठी हे स्थळ बंद करण्यात आले होते. अलीकडेच ते पुन्हा खुले करण्यात आले आहे. पुतळ्याच्या उज़व्या हातात उंचावलेली मशाल असून तिची ज्योत सोन्याची आहे. डाव्या हातात एक पुस्तक असून त्यावर ४ जुलै १७७६ लिहिले आहे. हा नक्कीच अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा असणार ज़ो थॉमस जेफ़रसनने तयार केला होता (तारखेवरून आठवले. अन्यथा माझे इतिहासज्ञान फ़ारसे स्पृहणीय नाही!) पुतळ्याचा डावा पाय खंबीरपणे रोवला असून उज़वा पाय पुढचे पाऊल टाकण्यासाठी किंचितसा उचलला आहे. खंबीरपणे रोवलेले पाऊल हे अमेरिकन सामर्थ्याचे प्रतीक आहे. या देशाने आर्थिक आणि राजकीय क्षितिजांवर लावलेले प्रगतीचे झेंडे, विज्ञान-तंत्रज्ञानात केलेली प्रगती, शिस्तबद्ध जीवनमान आणि पायाभूत सोईसुविधांचा विकास यांद्वारे जगात पक्के केलेले स्थान म्हणजे या स्वातंत्रदेवतेचे खंबीर पाऊल. उचललेले उज़वे पाऊल म्हणजे सतत प्रगतीशील आणि गतीशील असल्याची निशाणी. नवी क्षितिजे पादाक्रांत करण्याची महत्त्वाकांक्षा (ज़से मध्यपूर्वेतील इराक, सिरीया वगैरे ;)) आणि अवघ्या जगाचे नेतृत्त्व करण्याच्या क्षमतेचे प्रतीक. उंचावलेली मशाल म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, प्रगतीकडे ज़ाण्याची दिशा दाखवणारा दिशादर्शक (म्हणजे आम्ही नायक आणि तुम्ही अनुयायी. "आमच्या मागून यायचे हं बाळांनो, मस्ती करायची नाऽही!" असा भावार्थ ः)) (हे सगळे स्थलकालोत्पन्न विचार असून त्यांच्याशी या भटकंतीचा वाटाड्या या नात्याने माझ्यातला लेखक सहमत असेलच असे नाही ः)), बुशसाहेब मात्र नक्कीच असतील)
हल्ली ही देवता ज़राशी काळवंडली आहे. तो वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे की अमेरीका नावाच्या आपल्या लेकराची वाटचाल याचि देही याचि डोळां पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे, हे तीच सांगू शकेल ;)
या ठिकाणी सगळ्याच पर्यटकांनी भरभरून फ़ोटो काढले. मूर्तीची भव्यता एकाच दृष्टिक्षेपाच्या आवाक्यापलीकडची आहे खरी. भालचंद्र नेमाड्यांनी 'कोसला' मध्ये अजिंठा लेण्यांचे वर्णन करताना म्हटल्याप्रमाणे याही ठिकाणी मूर्तीवर वारंवार डोळे फिरवावे लागतात. मूर्ती पाहणे इतकेच आपण करू शकतो (ती 'समज़ते' फक्त अमेरिकेलाच बहुतेक!) तिच्या कपड्यांवरील चुण्यांपासून ते सुबक बांध्यापर्यंत, हातातील पुस्तकापासून ते रेखीव मुकुटापर्यंत सगळेच वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. पहावे आणि नक्कीच पहावे यासारखे काहीतरी.
या बेटावर पर्यटकांच्या सोईसाठी एक उपाहारगृह कम विश्रांतीगृह आहे. पर्यटनस्थळ असले तरी शिस्त, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था लक्षणीय आहे. मूर्तीवर किंवा चबुतऱ्यावर तर सोडाच, पण तेथील साध्या भिंतींवरसुद्धा 'विजू लव्ह्ज़ मुक्या'सारखी किंवा इतर ('भ'/'म' कारी) मुक्ताफळे कोणीही उधळलेली नाहीत. कोणाच्या घराण्याचा उद्धार केलेला नाही, की कोणाचा दूरध्वनी क्रमांक लिहिलेला नाही. शिवाजीमहाराजांनासुद्धा त्यांचे गडकिल्ले या ज़ागेइतके स्वच्छ आणि त्यामुळेच सर्वार्थाने पवित्र राहिलेले नक्कीच आवडले असते.
आणखी खूप वेळ तिथल्या सदैव ताज्या वाटणाऱ्या पिवळ्यापोपटी हिरवळीवर बसून मूर्तिचिंतन करण्याचा विचार होता, पण एका सुरक्षा रक्षकाने सायंकाळी पाच वाज़ता नम्रपणे 'आता घरी ज़ाण्याची वेळ झाली' असे सांगितले (दंडुका आपटत 'चलो चलो चलो' केले नाही, त्यामुळे थोडे चुकचुकल्यासारखे झाले खरे!) त्यामुळे पुन्हा बेटावरील धक्क्याकडे पावले वळली. 'मिस न्यू जर्सी'चा कॅटवॉक पुन्हा अनुभवायचा होता ः)

जगाच्या राजधानीतून - २


पण तो सूर्योदय उजाडलेला पहायलाच मिळाला नाही. पहायला मिळाले ते टळटळीत ऊन आणि घड्याळात वाज़लेला 'दुपारचा' एक! म्हणजे यावेळीही न्यू यॉर्क बोंबलले म्हणायचे ः( पण सुदैवाने देविकामावशी म्हणाली की अज़ून वेळ गेलेली नाही. स्टॅच्यू ऑफ़ लिबर्टी मात्र सायंकाळी पाचला पर्यटकांसाठी बंद होतो. त्यामुळे पटापट आवरून न्यू यॉर्कला ज़ाणारी गाडी पकडणे क्रमप्राप्त होते. सकाळच्या न्याहारीला तिने केलेली थालिपिठे कोंबून आणि अक्षरशः कावळ्याची अंघोळ आटोपून आम्ही घराबाहेर पडलो आणि धावतच गाडी पकडली.
न्यूअर्कला गाडी बदलायची होती. न्यू जर्सी ट्रान्झिटमधून आता आम्ही 'पाथ'मध्ये आलो होतो. ही न्यू यॉर्क मधली मेट्रो रेल. ट्रान्झिटपेक्षा देखणी आणि आपल्या मध्य नि पश्चिम रेल्वेसारखी गज़बज़लेली. ज़रा मुंबईत आल्यासारखे वाटले. गप्पाटप्पा करत मुक्कामी उतरलो. मुक्काम होता 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'. साडेचार वर्षांपूर्वी जेथे ते दोन प्रसिद्ध जुळे मनोरे (ट्विन टॉवर्स) उभे होते आणि लादेनने त्यांवर विमाने आपटवून अनेक निष्पाप जिवांचे बळी आणि असंख्य शिव्याशाप घेतले तेच. सध्या तिकडे फ़क्त शून्य आहे (ग्राउंड ज़ीरो) आणि आधीच्या मनोऱ्यांपेक्षाही जास्त उंचीचे स्मारक उभारण्याचे काम चालू आहे. त्याचबरोबर त्या वास्तूबाबत माहिती देणारे, हल्ल्याबाबत माहिती देणारे नि न्यू यॉर्क शहराने घडवलेल्या माणुसकी व जिद्दीचे गोडवे गाणारे फलक आहेत.
वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ते ज़ुळे मनोरे उध्वस्त करून लादेनने अमेरिकेच्या 'कानाखाली आवाज़ काढला' असे म्हणतात. अमेरिकी आर्थिक स्वायत्तता आणि सार्वभौमत्त्व यांचे प्रतीक, अमेरिका ही जागतिक महासत्ता असल्याची ती निशाणी, प्रत्येक अमेरिकी नागरिकाच्या अस्मितेचा मानबिंदू असे सगळे त्या मनोऱ्यांबरोबरच जेव्हा धुळीला मिळाले त्यावेळी रस्त्यावरचा फाटका अमेरिकनसुद्धा कोट्याधिशाइतकाच हळहळला असेल. आज़ही न्यू जर्सीला मित्रासोबत मॅनहॅटनची आकाशरेषा (स्कायलाइन!) न्याहाळताना त्या मनोऱ्यांची अनुपस्थिती ज़ाणवत होती. आज़वर चित्रातच त्यांना पाहिले होते. प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नव्हता. आणि जेव्हा तो आला, तेव्हा ते तेथे नव्हते (दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत). "दे आर मिसिंग" असे ज़वळच उभा असलेला एक अमेरिकन खेदपूर्वक म्हणाला. मला मात्र तेथे फिरताना खंत लागून राहिली होती, ती जगातल्या अनेक प्रेक्षणीय स्थळांपैकी नि वास्तुशिल्पांपैकी एक नष्ट झाल्याची. तेथे फिरताना ज़वळज़वळ प्रत्येक फलकावर ते ज़ुळे मनोरे माझे लक्ष वेधून घेत होते. आज़ ज़र ते तेथे असते तर कसे दिसले असते, याचाच विचार मी करत होतो. आणि त्याचबरोबर एक विचित्र आंतरीक आनंद झाला होता, तो मुंबईत (आणि भारतात) असे कोणतेही टोलेजंग वास्तुशिल्प नसल्याचा, जे तमाम भारतीयांच्या अस्मितेचे नि भारताच्या राजकीय,आर्थिक वगैरे वगैरे अस्मितेचे प्रतीक आहे (ये मेल्या लादेन! कुठे आपटवणार आहेस विमान? असा तो वन रूम किचन मराठमोळा मध्यमवर्गीय आनंद ः))
वर्ल्ड ट्रेड सेंटरसमोरून सरळ आतल्या बाज़ूस ज़ाणारा रस्ता भटकंतीसाठी निवडला आणि आमच्या पायगाडीला किक मारली. अमेरिकेत आल्यापासून प्रथमच मी 'फेरीवाले' पाहत होतो. हा रस्ता मुंबईच्या फॅशन स्ट्रीटची आठवण करून देत होता. रस्त्यावर बसून खाण्यापिण्याचे जिन्नस, कपडे, अत्तरे, पायताणे इत्यादींची विक्री चालली होती. पर्यटक तसेच स्थानिक इतरेजन खरेदीत रमले होते. आमचा आपला दृष्टीक्रय (विंडो शॉपिंग!) चालू होता. न्यूयॉर्क इतकी रहदारी मी आज़वर अमेरिकेत फिरलेल्या ठिकाणी कुठेच बघितलेली नाही. तो ट्रॅफ़िक डोळेभरून पाहिल्यावर, मी जेथे राहतो त्याला आमच्या स्थानिक मित्रमंडळात 'खेडेगाव' का म्हणतात, ते पटले. आनंदाची गोष्ट म्हणजे आसपासच्या दुकानांमध्ये तसेच रस्त्यावर बरीचशी आशियाई (प्रामुख्याने भारतीय) तोंडे दिसत होती. त्यामुळे परदेशात राहत आहोत ही ज़ाणीव काही काळ पुसली गेली. खूप बरे वाटले. पुढे ज़ातोय तोच फेरीवाल्यांची पळापळ चालू झाली आणि कळले की पोलिसांची धाड पडली आहे. छान! म्हणजे दादर(पश्चिम) स्थानकाबाहेर जशी 'गाडी आली गाडी आली' अशी वर्दी येते आणि सगळे फेरीवाले आपले चंबूगबाळे आवरून पळ काढतात, तसाच काहीसा हा प्रकार. मन सुखावले. पण इथले मामा लोक बहुदा हप्ता घेत नसावेत. कारण दोनच मिनिटात रस्ता पादचाऱ्यांसाठी मोकळा झाला होता ः) अमेरिकेतील ती दादरकर समस्या पाहून माझ्यातल्या दादरकराची छाती अभिमानाने फुलून आली. अमेरिकेतील दहा महिन्यांच्या वास्तव्यानंतर पहायच्या राहून गेलेल्या गज़बज़ाट, रहदारी, आवाज़ या सगळ्या गोष्टी मला 'याचि देही याचि डोळा' अनुभवायला मिळत होत्या.
फिरत फिरत, इकडेतिकडे वाट विचारत आम्ही न्यूयॉर्क शेअर बाज़ाराज़वळ पोचलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेत तुम्ही कोणाला पत्ता विचारला तर ती व्यक्ती गडबडून ज़ाते. घरटी किमान दोन गाड्या घेऊन भटकणाऱ्या अमेरिकन मंडळींना रस्ते नि पत्ते कसे माहीत नसतात, याचे राहून राहून आश्चर्य वाटायचे. मात्र या प्रश्नाला मॅपक्वेस्ट, गूगल मॅप्स, रोड ऍटलस् अशी उत्तरे मिळाली. जिथे जायचे आहे ते ठिकाण, आणि जिथून जायचे आहे ते ठिकाण हे दोन्ही अंत्यबिंदू नोंदवायचे आणि इंटरनेटवरून रस्ते व पत्ते शोधायचे, याची या मंडळींना इतकी सवय आहे, की उद्या त्यांच्यापैकी कोणाला पुण्यात वाडिया कॉलेजच्या आसपास सोडले आणि बुधवार पेठेतल्या पोस्टात ज़ायचे आहे असे सांगितले, तर बिचारा उद्विग्न होऊन आत्महत्या बित्महत्या करायचा. आमच्याकडे अमुक रस्त्यावरचा तमुक पानवाला कुठे आहे, हे कोणीही लीलया सांगतो. त्यासाठी आम्हांला नकाशे गुगलून काढायला लागत नाहीत. येथे मात्र न्यूयॉर्क शेअर बाज़ाराकडे ज़ाणारा रस्ता कुठे आहे, या आमच्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात "दॅट्स ऍक्च्युअली अ गुड क्वेश्चन" अशी होत होती. अमेरिकन माणसाच्या स्थल-दिशा ज्ञानाची कीर्ती ऐकून होतोच, आज़ ती अनुभवायला मिळत होती.

शनिवार असल्याने बरेच पर्यटक होते. हास्यविनोद, छायाचित्रण आणि खाण्यापिण्याची रेलचेल होती. न्यूयॉर्क शेअर बाज़ार आणि तेथील वातावरण पाहून तरी १९२९ च्या जागतिक मंदीत हा बाज़ार रसातळाला पोचला होता आणि अवघी अमेरिका दिवाळखोरीत निघाली होती, हे सांगूनही खरे वाटले नसते. त्याच्या बरोबर समोरच अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग़्टन यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. याच ठिकाणी त्यांनी ३० एप्रिल १७८९ रोजी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती. मग जॉर्जसाहेबांबरोबर एक छायाचित्र काढले. शेज़ारच्या गोऱ्याचा अस्वलसदृश (!) बलदंड कुत्रा आणि ज़वळून चाललेल्या मडमेचे शेंबडे फ़्रेंच पूडल यांच्या प्रेमळ संवादांना कंटाळून आम्ही तिकडून काढता पाय घेतला.
हे सगळे आटोपेस्तोवर दुपारचे ३ वाज़ले. दुपारच्या जेवणाला बुट्टी मारायचे ठरले कारण आता अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेच्या दर्शनास ज़ायचे होते. वैष्णोदेवीस ज़ाताना, एकवीरेच्या दर्शनास ज़ाताना कष्ट करून ज़ायचे असते. पायऱ्या चढत, नागव्या पायाने नि दगडधोंड्यांची पर्वा न करता, मुखी देवीनामाचा जप करत ('तूने मुझे बुलाया शेरावालिये' स्टाइलमध्ये) आणि श्रद्धायुक्त, निर्मळ अंतःकरणाने; पण या देवतेच्या दर्शनासाठी खास बोटींची सोय आहे (आपल्याकडे घारापुरीची लेणी पाहण्यासाठी भाऊच्या धक्क्यावरून लाँच पकडतात तसे). कारण हिचे देवालय खुद्द न्यूयॉर्कमध्ये नसून ज़वळच्याच लिबर्टी बेटावर आहे. आपल्याकडे कश सागरकन्या, मरमेड, मत्स्यगंधा वगैरे असतात, तशी आमच्याकडे कोणा मिस न्यू जर्सी नामक बोटीचे तिकीट होते. आणि ते तिकीट मिळवण्यासाठी आम्हांला, वानखेडेवरच्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे तिकीट मिळवायला जितकी रांग असेल, त्यापेक्षा मोठ्या रांगेत पाऊण तास ताटकळायला लागले. अर्थात मिस न्यू जर्सी म्हणण्याइतके तिच्याकडे काही नव्हते म्हणा (तिच्यापेक्षा आपल्या मिस केशवजी नाईक चाळ छाप अंबेसेडर्स किंवा भाऊचा धक्क्यावरची 'मुंबईची देखणी' सुद्धा देखण्या वाटाव्यात), पण ११सप्टेंबरच्या त्या हल्ल्याचा अमेरिकेने इतका धसका घेतलाय, की बोटीत चढण्यापूर्वी अक्षरशः विमानतळावर असते तशा सुरक्षेव्यवस्थेतून पार पडावे लागले. अखेर बोटीत चढलो आणि महासत्तेच्या स्वातंत्र्यदेवतेचे पहिले दर्शन झाले.
लिबर्टी बेटावर पोचून आम्ही या स्वातंत्र्यदेवतेची, १० महिन्यांची प्रतीक्षा, ग्रे हाउंडच्या प्रवासातले जागरण आणि अर्थातच खर्ची घातलेले शंभर-एक डॉलर्स, या सगळ्याच्या खणानारळाने ओटी भरण्यासाठी आता आणखी अर्धा तास वाट बघायची होती.

जगाच्या राजधानीतून - १

सयाजी शिंदे, रेणुका शहाणे, वर्षा उसगांवकर अभिनित 'अबोली' या चित्रपटातले 'बंबई मोठी बाबा बंबई मोठी, पैशाची दाटी समिंदराकाठी' हे गाणे त्या दिवशी अचानकच आठवले. अमेरिकेत येण्यापूर्वी अवघा जन्म मुंबईत गेलेला. त्यामुळे समुद्राकाठी असणाऱ्या पैशाच्या दाटीबरोबरच, मुंबईतील बी बी दादरचे (दादर पश्चिमचे!!) किर्तीकर मार्केट (त्याचे आधुनिक नाव वीर सावरकर मंडई आहे), शिवाजी पार्क नि लगतची चौपाटी, कुलाब्याचे बडे मियां नि दादरचे प्रकाश नि सायबिणी, रिगलपासून ते थेट प्रबोधनकार ठाकरेपर्यंतची नाट्य-चित्रपटगृहे, लोकलगाड्या नि 'बेस्ट' (खरोखर!), या सगळ्यासगळ्यातली मौज़ अनुभवलेली. तिसरीच्या भूगोलात महाराष्ट्राची राजधानी मुंबई असे घोकले होते. गेल्या बावीसएक वर्षांत त्याची पुरेपूर प्रचिती आली. राज्याचे प्रशासन, देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या आर्थिक नाड्या, अठरापगड ज़ातीधर्मांचे लोक, सगळे आमच्या चिमुकल्या मुंबईतच अडकलेले. त्यामुळे हे छोटेसे शहर 'राज'धानी म्हटल्यावर 'गर्व से कहो हम हिंदू हैं'सारखी 'गर्व से कहो हम मुंबईकर हैं'ची गर्जना मनात घुमायची.
जगाच्या राजधानीबाबत नुसतेच ऐकून होतो. प्रत्यक्ष पाहण्याचा योग मात्र इतक्या लवकर येईल असे वाटले नव्हते. वास्तविक डिसेंबरात फ़िलाडेल्फ़ियाला गेलो होतो, तेव्हाच दोन दिवसाचा न्यू यॉर्क दौरा आखला होता, पण काही अडेलतट्टू मंडळींनी न्यू यॉर्कला ज़ाण्याऐवजी 'न्यू यॉर्क'नावाच्या क्लबमध्ये जगाच्या राजधानीची सफ़र घडवली तेव्हा हसावे की रडावे कळेनासे होऊन गेले होते. यावेळी मात्र संधी सोडायची नव्हती. नाही म्हणायला विद्यापिठातले एक प्रशासकीय काम आड येत होते, पण तिथल्या 'दयाळू'(!?) बाईंना 'वीकेंडला घरी बोलावून भारतीय जेवण करून घालतो'चा नवस बोलल्यावर गाडी सुटायला तीनच तास बाकी असताना ते काम तडीस नेले (आता तर नवस फेडायलाच हवा!)
त्या तीन तासात कपडे घालण्यापासून (बॅगेत!!!!!) ते प्रवासातले खाणेपिणे, औषधे, कॅमेरा, इतर साधनसामुग्री यांच्या ज़मवाज़मवीत वेळ कसा ज़ात होता कळलेच नाही. हे सगळे चालू असतानाच एका हितचिंतकाने 'ग्रे हाउंडका ओव्हरनाइट जर्नी इतना सेफ़ नही है' सांगून बॅगेत घातलेले आमचे लॅपटॉप्स बाहेर काढायला लावले आणि त्याचबरोबर पाकिटातली काही रक्कमसुद्धा घरच्याच कपाटात बंद झाली. त्याचे सूचना देणे चालू असतानाच अस्मादिकांची स्वारी केव्हाच न्यू यॉर्कला पोचली होती. धावतपळत स्थानिक बस पकडून ग्रे हाउंड बस स्थानकावर गेलो. ग्रे हाउंड ही अमेरिकेच्या पूर्व किनारा आणि लगतच्या ठिकाणांना ज़ोडणारी बससेवा आहे. आमच्या गावातल्या त्या स्थानकावर गेल्यावर मुंबई सेंट्रलच्या एस टी स्थानकाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात, ग्रे हाउंड ही अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील एस टी आहे. 'अलिबाग अलिबाग' करणाऱ्या मुंबई सेंट्रलच्या गणवेशधाऱ्यांप्रमाणेच येथेही 'रिचमंड, बॉल्टीमोर, न्यू यॉर्क' अशी (उंची) नावे कोकलणारे सिनेमातल्या जल्लादांप्रमाणे भासणारे ग्रे हाउंडचे चालक असतात. 'कोमॉन कोमॉन मॅऽऽन' म्हणत एका जल्लादाने आमचे स्वागत केले. हातातली बॅग आणि तिकिटे छातीशी घट्ट आवळून भेदरलेल्या कोकरांसारखे आम्ही बसमध्ये शिरलो. बसमध्ये मी आणि माझा मित्र असे दोनच भारतीय आणि बाकीचे लक्कू! अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना 'निग्रो' किंवा 'ब्लॅक' म्हणणे म्हणजे ज़ातीवाचक शिवी देण्यासारखे आहे. त्यांना प्रेमाने 'आफ़्रिकन अमेरिकन' असे म्हणायचे (त्यांच्याबरोबर 'ब्लॅकजॅक' खेळताना लाडेलाडे 'आफ़्रिकन अमेरिकन जॅक' खेळतोय असे म्हणायचे ;) ) इकडच्या देसी जनतेने काळ्यांना कल्लू केले आणि त्यांची बलदंड शरीरयष्टी, निर्विकार पण तरीही ज़ुलमी नि एखाद्या खुन्यासारखा भासणारा चेहरा बघून त्यांना 'कल्लू' म्हणजे काय ते कळेल या (महाराष्ट्रीय) भीतीने 'कल्लू'चे 'लक्कू' केले.
बसमधल्या त्या लक्कूंच्या भीतीने आमची अख्खी रात्र आळीपाळीने सामानावर पहारा करण्यात (आणि रिचमंडच्या थांब्यावर आळीपाळीने अनावर विधी उरकण्यात) गेली. त्यांचे विचित्र इंग्रजीतील हास्यविनोद, गाणी आणि बसभर एअर फ़्रेशनरसारखा पसरलेला सिगार आणि मद्याचा (सु?)गंध यांनी आम्ही गुरखे आमच्या ड्युटीवर न झोपण्याची खबरदारी घेतली. चाळीस मिनिटे उशीराने धावत असलेली आमची बस चालकाने नियोजित स्थळी चाळीस मिनिटे आधीच कशी काय पोचवली, याचे उत्तर मात्र आम्हांला अज़ूनही मिळालेले नाही. वाटेत वॉशिंग़्टन डीसी ला (ही अमेरिकेची राजधानी) मेमोरिअल बिल्डिंग, बुश साहेबांचे निवासस्थान आणि वॉशिंग़्टनचा तो प्रसिद्ध मनोरा यांना निळ्यापांढऱ्या, दुधाळ प्रकाशात न्हाऊन निघाल्ले पाहिले. दुर्दैवाने त्यांना कॅमेऱ्यात बंद करता आले नाही.
नियोजित स्थळी म्हणजे न्यूअर्कला पोचलो तेव्हा सकाळचे साडेसहा झाले होते. मित्राची मावशी आम्हांला उतरवून घ्यायला यायची होती. पण ठरल्या वेळेचा चाळीस मिनिटे अगोदरच पोचल्याने आम्हीच तिला बस स्थानकावरून फ़ोन करून झोपेतून जागे केले. थोड्या काळजीयुक्त स्वरातच तिने 'मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही या' सांगितल्यावर तिच्यापेक्षा आमची काळजी वाढली (या क्षणी माझी आई असती तर कदाचित पुढच्याच बसने मला परत रालेला घेऊन आली असती!) पण न्यू यॉर्क मोहिमेवर निघालेल्या आम्ही मावळ्यांनी स्थानिक आगगाडीची तिकिटे काढून मावशीबाईंच्या घरची गाडी पकडली. 'न्यू जर्सी ट्रान्झिट' ही ती 'लोकल'. पण रुबाब, व्यवस्था सगळे आपल्या इंद्रायणी एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणीसारखे. ते पाहून नक्की 'लोकल' कशी असते असा प्रश्न मला पडला.

तिकडच्या तिकीट तपासनिसांची पद्धतही अजबच. तुमच्याकडचे तिकीट घेऊन कुठे जायचे हे पाहून आपल्याज़वळच्या तिकीटसदृश एका कागदी पट्टीवर ठराविक वेळा 'टाक् टाक्' करून ज़वळच्या टोच्याने भोके पाडणार आणि तुमच्या आसनावर एका पट्टीत ते खोवणार. त्या पट्टीवर पाडलेली भोके आणि तुम्हाला जेथे जायचे आहे ते ठिकाण यांचा काहीतरी परस्परसंबंध आहे. तो काय आहे ह ज़ाणून घ्यायचा प्रयत्न केला असता तपासनीस मामा मनापासून हसले ("काय तू! च्यायला इतके पण कळत नाही?! ज़ाऊ दे, सोड" अशी काहीशी भावना!) आणि पुढच्या प्रवाशाकडे गेले.
आम्हांला 'रावे' नावाच्या स्थानकावर उतरायचे होते. त्यामुळे मावशीबाईंनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून (डोळ्यांत तेल (आतापर्यंत पाणी आले होते, बदल म्हणून थोडे तेल घालायला लागले!) घालून स्थानकांची नावे वाचत आणि हे स्थानक कुठले आहे हे सांगणाऱ्या गाडीतील ध्वनिक्षेपकावरील गोड आवाज़ाकडे कान लावून) न्यूअर्क नंतरची एअरपोर्ट, नॉर्थ एलिझाबेथ, एलिझाबेथ आणि लिंडन ही स्थानके सोडली आणि रावेला उतरलो.

मित्राच्या मावशीकडे गरमागरम पोहे, आदल्या रात्रीचा खिमापाव, पावभाजी, संत्र्याचे सरबत असा जंगी बेत होता. त्यावर आडवा हात मारला, अंघोळ आटोपली, टीव्हीवर 'ब्लू स्ट्रीक' हा धमाल चित्रपट लावला आणि तो बघून झाल्यावर मस्तपैकी ताणून दिली. साडेनऊ तासांच्या प्रवासाचा इतका शीण ज़ाणवत होता, की सोफ़्यावर पडल्यापडल्या झोप कधी लागली कळलेसुद्धा नाही. संध्याकाळी मित्राने उठवले तेव्हा आठ वाज़ून गेले होते (आज़काल म्हणजे उन्हाळ्यात अमेरिकेत 'रात्री'(!) नऊला वगैरे सूर्यास्त होतो. हिवाळ्यात मात्र 'संध्याकाळी'(!) पाचालाच रात्रीच्या साडेआठसारखा काळोख होतो) भराभर आवरून घेतले कारण 'दा विंची कोड' बघायला ज़ायचे होते. चित्रपट बघायला ज़ाण्यापूर्वी तेथील 'ओक ट्री रोड' वर ज़रा भटकलो. हा रस्ता म्हणाजे पुण्यातला लक्ष्मी रोड किंवा दादरचा कबुतरखान्याज़वळचा परिसर आहे. बिस्मिल्ला नि ए वन चिकन शॉपपासून घसीटामल हलवाई, कंगन ज्युवेलर्स, शगुन सारीज़्, अमेरिकेतील प्रसिद्ध 'पटेल ब्रदर्स' (भारतीय वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू भांडार या प्रकारात मोडणारी अमेरिकेतील दुकानांची प्रसिद्ध साखळी... त्यावरूनच 'पटेल' आडनावाच्या लोकांना अमेरिकेचा व्हिज़ा मिळायला इतके कष्ट का पडत असावेत, याची थोडीशी कल्पनाही आली. अमेरिकेत आलेला पटेल इथेच राहून असा फळला-फुलला नसता, तर आज़ ओक ट्री रोड आहे तसा दिसला नसता... रामसेंप्रमाणेच हे पटेल बंधू किती असा प्रश्न पडायला हरकत नाही) असे सगळे भटकल्यावर एका केरळी उपाहारगृहात जेवलो. बऱ्याच दिवसांनी अस्सल केरळी मसाले आणि ओल्या नारळाचा चव असलेले, खोबरे असलेले जेवण पोटात गेले. ते सुद्धा हळदीच्या पानाच्या मंद, प्रसन्न सुगंधासह!कृतकृत्य झालो. तृप्त मनाने ढेकर देऊन बाज़ूच्याच चित्रपटगृहात गेलो आणि 'द विंची कोड' पाहिला. फ़र्स्ट डे लास्ट शो. मजा आली.
आटोपल्यावर टॅक्सी पकडून घरी आलो आणि पुन्हा ताणून दिली. दुसऱ्या दिवशीची सकाळ कधी उजाडतेय याची वाट पाहतच झोपलो. न्यू यॉर्क आता एका सूर्योदयावर येऊन ठेपले होते.

Saturday, May 27, 2006

वाढदिवसाची अमूल्य भेट!


आईबाबा आणि मित्रमैत्रिणींपासून हज़ारो मैल लांब असताना वाढदिवस 'साज़रा' होऊ शकतो, ही कल्पनाच मुळात असह्य आहे. त्यामुळे परवा माझ्या वाढदिवसादिवशी आणि किंबहुना त्याच्या दोन-एक दिवस आधीपासूनच 'काय कपाळ साज़रा करणार' अशी भावना झाली होती. त्यातच कार्यालयात नवीनच रुज़ू झालेला असल्याने बराच 'स्व-अभ्यास' चालू होता (ज़से स्वतःहून कॉफ़ी मेकरवर कॉफ़ी बनवायला शिकणे, इतर कर्मचाऱ्यांशी काम सोडून बाकीच्या सगळ्या विषयांवर गप्पा मारायला शिकणे, भ्रमणध्वनी प्रणाली पडताळा चमूच्या (सॉफ़्टवेअर व्हेरिफ़िकेशन ग्रुप!!!) साप्ताहिक बैठकीत चर्चेच्या मुद्द्यांपेक्षा समोरच्या अमँडाशी दृष्टीविनोद(!) करण्यातली मजा अनुभवणे वगैरे) या अभ्यासात घरी येईस्तोवर इतके थकायला होते(!) की आठवडाभराची झोप काढण्यासाठीसुद्धा वेळ मिळत नाही (कार्यालयात आणि साप्ताहिक बैठकीत झोपणे तर मुळीच परवडणार नाही! अभ्यास कसा हो होणार नाहीतर! ;)); वाढदिवस 'साज़रा' करणे तर बाज़ूलाच राहिले.

दोन दिवसांपूर्वीच विद्यापिठातला जगजीत सिंगचा गाण्यांचा नियोजित कार्यक्रम 'हाऊसफ़ुल्ल' असल्याचे कळले होते. हा कार्यक्रम माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला असल्याने तीच वाढदिवसाची भेट असा स्वतःचा आगाऊ समज़ करून घेतला होता, आणि परीक्षा झाली की बघू, म्हणून तिकिटे आरक्षित करण्यात दिरंगाई केली होती (त्याबद्दल इकडच्या समस्त देसी जनतेने मला वेड्यात काढणेही झाले होते) वास्तविक कार्यक्रमाची घोषणा, तिकिटांसंबंधी कुणाला संपर्क करायचा वगैरे माहिती तीन महिने (अति)आगाऊच मिळाली होती, पण परीक्षा आणि अभ्यासाच्या धांदलीत तिकिटे काढायचे लक्षातच राहिले नाही, आणि आता इतक्या सुंदर कार्यक्रमाला मुकावे लागणार याची हळहळ लागून राहिली होती. तरीसुद्धा देवा (आणि दैवा) वर भरवसा ठेवून काहीही झाले तरीसुद्धा तिकीट मिळवायचा प्रयत्न करायचाच या निर्धाराने अस्मादिकांची स्वारी कार्यालयातून घरी येण्याऐवजी विद्यापिठाच्या आवारात वळली.

अपेक्षेप्रमाणेच कार्यक्रमाला अलोट गर्दी होती. अनिवासी भारतीय आणि पाकिस्तानी कुटुंबे, विद्यार्थीवर्ग, नोकरदार, बाबागाडीतल्यांपासून ते काठी टेकत चालणाऱ्यापर्यंत सगळ्या वयाचे, सगळ्या प्रकृतींचे प्रेक्षक कार्यक्रमाला लाभले होते. साडी, सुरवार-कुर्ता वगैरे पारंपारिक पोषाखातल्या बऱ्याचज़णांनी यानिमित्ताने आपापला सांस्कृतिक दिन साज़रा करण्याचे मनावर घेतल्याचे दिसत होते. पण त्याचबरोबर आपण अमेरिकेत राहतो याचा बडेजाव मिरवणे चालू होतेच, जसे 'कूल' ऐवजी 'खूऽल' (!), 'वॉटर' ऐवजी 'वॉठर्र' याप्रमाणे (उत्साहाच्या भरात कोणी एक पटेल की शहा चक्क 'गिव मी टू वॉटर्स' असे म्हणाले. भावना महत्त्वाच्या म्हणून माझ्यातल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याने त्यांचे चुकीचे इंग्रजी व्याकरण पोटात घातले!) माझ्या दोन मित्रांना आयोजकांनी स्वयंसेवक म्हणून नियुक्त केल्याने आणि मी तूर्तास प्रेक्षक किंवा स्वयंसेवक कोणीही नसल्याने समाजसेवा करताना उडणारी त्यांची तारांबळ (विनातिकीट!!) बघायला मजा येत होती. पावणेदोन तासांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी एकदाचे तिकीट मिळाले. ते सुद्धा जिचे तिकीट होते, ती व्यक्ती न आल्याने. अर्थातच त्या तिकिटासाठी मला जास्त किंमत मोज़ायला लागली हे अधिक सांगणे न लगे (कार्यक्रमाचे शेवटचे तिकीट दोनशे डॉलर्सना विकले गेल्याचे ऐकले होते तेव्हा माझे खिसे दडपले होते, पण आयत्या वेळी मला मिळालेले हे तिकीट त्यामानाने चौपट स्वस्त पडले म्हणायला हरकत नाही) एका बाईंनी "अरे पैंतीस डॉलरवाला तिकीट पचपन में कैसे बेच रहे हो"चा घरगुती लढाऊपणा (अपेक्षेप्रमाणे!)दाखवला खरा, पण "अरे मेडम, डोलर चाहिये के साहब का गाना चाहिये" म्हणून आयोजकांनी बाईंना कधीच चारीमुंड्या चीत केले. शेवटी शिस्तबद्धपणे रांगेत उभे राहून सभागृहात गेलो नि स्थानापन्न झालो. तोवर जगजीतचे "होशवालों को खबर क्या" चालूही झाले होते.

मंचावर अतिशय साधी सज़ावट, समोर मध्यभागी रांगोळी, डाव्या हातास साथीला सिताऱ व बासरी, मागे गिटार नि सिंथेसायझर, उजवीकडे तबला, ढोलक आणि घुंगरू, आणि मध्यभागी गज़लसम्राट स्वतः गातोय, असे ते दृश्यच त्या संध्याकाळचे पहिले समाधान देऊन गेले. जिवाचा कान करून मी शब्दन् शब्द हृदयात साठवत होतो.

हम् लबों से कह न पाए उनसे हाल-ए-दिल कभी
और वो समझे नहीं ये खामोशी क्या चीज़ है

और वो समझे नहीं ये नंतरची शांतता खूप काही सांगून गेली. त्यानंतरची खामोशी टाळ्यांच्या कडकडाटात नि 'वाहवा', 'क्या बात है' च्या गजरात कुठेशी हरवून गेली. आणि त्यानंतर सुरू झाला शब्द आणि सुरांचा चमत्कार.

गज़ल ही खरी शब्दप्रधान गायकी. पण जगजीतच्या आवाज़ाने आणि सुरांनी गज़लेला शब्दांच्या पलीकडे नेले आहे. त्याला प्रत्यक्ष गाताना ऐकले की गीताच्या बोलांपेक्षा त्याच्या आवाज़ानेच वेड लागते. याचा अर्थ शब्दांचे मोल कमी होते असा मुळीच नाही, तर एकाच शब्दाचे किंवा शेराच्या मिसरेचे अनेक पदर तो आपल्या गायनातून उलगडून दाखवत असतो. त्यामुळे शब्दांची किंमत दुणावते असेच म्हणायला लागेल. जगजीतचा धीरगंभीर आवाज़, पण योग्य वेळी हवा तिकडे तोच गंभीर आवाज़ थोडासा खट्याळ होणं, एखाद्या मिसरेतील एक किंवा अनेक शब्द गाताना शब्दांवर ज़ोर देणं अगर शब्दांनुसार आवाज़ातले चढ-उतार सांभाळणं यांमुळे ते गाणं फ़क्त कवीचं किंवा गायकाचं न राहता आपसूक श्रोत्यांचंसुद्धा होऊन ज़ातं. तेरे बारे में जब सोचा नही था, कोई फ़र्याद तेरे दिल में दबी हो जैसे या आणि अशा कित्येक गज़लांमधून आणि कवितांमधून जगजीत सिंग नावाची जादू प्रेक्षकांना संमोहित करत होती आणि आम्ही सगळे तिच्या तालावर डोलत होतो. कोई फ़र्याद तेरे दिल में ही वास्तविक हुस्न-ए-मतला गज़ल आहे. आणि त्यातला दुसरा मतला हाच गज़लेचा गाभा किंवा हासिल-ए-गझल शेर (ज़से गाण्याचे ध्रुवपद) आहे, हे जगजीत सिंगने ती गज़ल गायल्याशिवाय पटत नाही. अर्थात याबाबत दुमत असू शकते, पण आधीच म्हटल्याप्रमाणे त्या आवाज़ातच अशी काही जादू आहे की कोणता(ही) शेर किंवा शब्द श्रोत्याच्या मनात कायमचा घर करून राहील हे गायकानेच ठरवावे आणि श्रोत्यांनी त्याला मूक मान्यता द्यावी. ऐकणाऱ्याला आपलेसे करणाऱ्या या वशीकरणाची कला लाभलेल्या निवडक व्यक्तींमध्ये जगजीत सिंग हे नाव नक्कीच आहे आणि असेलही! हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले या गालिबच्या गज़लेचा मक्ता गाताना तर जगजीत गाण्यामध्ये इतका हरवून गेला, की त्याने तो मक्ता चार-पाच वेळा गायला आणि गातागाताच त्याचा अर्थसुद्धा सांगितला. मैखाना, वाइज़ यांच्यातला उपरोधात्मक परस्परसंबंध, तो गाण्यातून तसेच विनोदातून स्पष्ट करताना तसेच इतरही काही शेर समज़ावून सांगताना त्याने दाखवलेली विनोदबुद्धी, हित्ने इन्शाची कल चौदवी की रात थी गाताना प्रत्येक शेराची सानी मिसरा टाळ्या घेत होती. 'मक्ता पेश करता हूं, इन्शाजी की गज़ल है, हित्ने इन्शा' म्हटल्यावर अवघे सभागृह कान टवकारून बसले.

बेदर्द ,सुननी हो तो चल, कहता है क्या अच्छी गज़ल,
आशिक तेरा, रुसवा तेरा, शायर तेरा, इन्शा तेरा

सानी मिसरा गाऊन झाल्यावर उमटलेले वावा-वावा आणि तोच टाळ्यांचा कडकडाट कान भरून साठवून घेतला. सरकती जायें है रुखसी नकाब आहिस्ता आहिस्ता च्या वेळी तर पहिल्या ओळीपासून श्रोत्यांनी ठेका धरला होता आणि 'आहिस्ता आहिस्ता' म्हणायला सुरुवात केली होती. हया यकलख्त आई और शबाब नंतरचे आणि दबे होठों से देते हैं जवाब नंतरचे, इधर तो जल्दी जल्दी है, उधर नंतरचे आहिस्ता आहिता तर श्रोत्यांनीच पूर्ण केले. वो बेदर्दी से सरकाते हैं अमी और मैं कहूं उनसे मधल्या बेदर्दी वर घेतलेल्या हरकती तर निव्वळ अप्रतिम! ठुकराओ के अब के प्यार करो, मैं नशे में हूं मधल्या नशा शब्द गातानाच्या वेळची त्याच्या आवाज़ातली नशा, मैं नशे में हूं वरच्या हरकती खरोखरच सगळ्यांनाच चढल्या होत्या असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. मी इथे ते लिहिण्यापेक्षा आणि तुम्ही वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष ऐकून झिंगण्यातच खरी मौज आहे. होठों से छू लो तुम, तुम इतना जो मुस्करा रहे हो, वो कागज़ की कष्टी वो बारिश का पानी या 'टिपिकल' जगजीत गज़लासुद्धा झाल्या. मात्र त्यातले माझ्या आवडीचे काही शेर त्याने न गायल्याने मी ज़रा खट्टू झालो (पण जरासाच! ः) ) काही गज़लांची चित्रपटीय आवृत्ती आणि प्रत्यक्ष मैफ़िलीतील आवृत्ती यांतला फ़रकसुद्धा ज़ाणवत होता, पण चित्रपट संगीताला मिळणारी आधुनिक तंत्रज्ञानाची ज़ोड, एकूणच गाण्याचे संदर्भ, गरज़ यांनुसार ती आवृत्ती,ते गाणे घडत असते. प्रत्यक्ष मैफ़िलीची गोष्टच काही वेगळी असते आणि मजा और असते. चित्रपटातील अशी काही गाणीच हृदयात घर करून राहिल्याने ती प्रत्यक्षात मैफ़िलीत ऐकताना त्यांचा पुरेपूर आनंद लुटता येतोच असे नक्कीच नाही. मात्र दोन्हींच्या संदर्भांतला फ़रक लक्षात घेता अशी मजा लुटणे तितकेसे कठीणही नसते एव्हढे मात्र सांगू शकतो. खरे तर जगजीतची काही गाणी ही अतिशय सुमार दर्जांच्या चित्रपटांमध्ये होती. गाणी लोकांच्या हृदयांत अज़ूनही आहेत, चित्रपट नक्कीच नाहीत.

गाताना ध्वनीनियंत्रकांना आणि वादक साथीदारांना सूचना देणे, 'मॉनिटरमें बेस कम करो', 'सितार बढाओ' हे सगळेसगळे श्रोत्यांना सुखावून ज़ात होते. गाण्याच्याच ज़ोडीला गाणे चालू असतानाच सितार-तबला, तबला-घुंगरू जुगलबंदी आणि बासरी, सिंथेसाइझर, गिटार यांचे 'सोलो' आविष्कार ज़बरदस्त परिणाम साधून ज़ात होते आणि अर्थातच टाळ्यांची बिदागी घेऊन जात होते. प्रामाणिकपणे आणि तितक्याच तन्मयतेने साथ करणाऱ्या आपल्या या सगळ्या साथीदारांबद्दलचे प्रेम आणि कृतज्ञता जगजीत त्यांना आपली कला सगळ्यांसमोर सादर करण्याची संधी देऊन व्यक्त करत होता, असेच मला वाटले. आणि त्यातच या कलाकाराचे मोठेपण सामावले आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी नित्यनेमाचे आभार प्रदर्शन वगैरे झाले; आणि कार्यक्रमाची सांगता होतानाच २५ मे सुद्धा उजाडला होता. प्रेक्षकांनी जगजीतबरोबर छायाचित्र काढण्यासाठी रांग लावली होती; पण दैवाने यावेळी मला घरी झोपायला न्यायचे ठरवले होते. मिणमिणत्या दिव्यांच्या उजेडात जगजीतचे एकेक गाणे असे काही सुखावून गेले होते की मला माझ्या वाढदिवसाची अमूल्य आणि अविस्मरणीय भेट मिळाली होती. कार्यक्रमाला एकटाच होतो आणि कदाचित त्यामुळेच एकाग्र चित्ताने गाणी आणि गज़ला ऐकता आल्या, ज़गता आल्या. माझ्या कानांनी ज़े ऐकले, डोळ्यांनी ज़े पाहिले, ते तुमच्या मनात पोचवण्यासाठी हा वृत्तांताचा खटाटोप. मध्यंतरातले थंडगार बटाटवडे आणि कोल्ड्रिंकवर वाया गेलेल्या वेळ आणि पैशाची काही किंमतच उरली नव्हती. घरी आल्यावर सर्वसाक्षीकाकांचे सुंदर शुभेच्छापत्र आणि ज़ोडीला मनोगतींच्या शुभेच्छा ही आणखी एक भेट! त्यामुळे जगजीतचे हेच शब्द नव्याने ज़गायला मिळाले -

मुझको कदम कदम पे भटकने दो वाइज़ों
तुम अपना कारोबार करो,मैं नशे में हूं

Thursday, May 11, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

टॅगिंगचा खेळ कदाचित आपल्याला माहीत असेल. एखाद्या विषयाशी संबंधित प्रश्नांची आपण उत्तरे द्यायची आणि आपल्या परिचितांना/मित्रांना तेच प्रश्न विचारून त्यांची या संदर्भातील मते जाणून घ्यायची आणि त्यांनी हीच साखळी पुढे चालवायची असे या खेळाचे स्वरूप आहे. बुक-टॅगिंग हा त्यातला माझा एक आवडता प्रकार. हाच उपक्रम मराठी ब्लॉगविश्वातही राबवावा, या हेतूने हा लेखप्रपंच.
ज्याने हा खेळ चालू केला तो माझा मित्र नंदन होडावडेकर याचे या निमित्ताने पुन्हा एकदा आभार आणि त्याच्या मराठी जगण्याच्या नि जगवायच्या या प्रयत्नांमध्ये माझे खारूताईचे योगदान.
या खेळात अर्थात सर्वप्रथम महत्त्वाचे आहे ते आपले सहकार्य. पुस्तकांविषयी विचारलेल्या काही प्रश्नांची कृपया यथामती उत्तरे आपापल्या ब्लॉगवर लेख (पोस्ट) लिहून द्यावीत आणि शक्य झाल्यास तुमच्या परिचित/अपरिचित मराठी भाषक ब्लॉगर्सना (३ ते ५) हेच प्रश्न विचारावेत. सध्या मराठी अनुदिनीकारांची संख्या
२०० च्या पुढे गेली असल्याने ही साखळी बरीच वाढू शकेल, नवीन पुस्तकांच्या आणि ब्लॉगर्सच्या ओळखी होतील आणि छोट्याशा प्रमाणावर का होईना, माहितीच्या या महाजालात मराठी पुस्तकनिष्ठांची एक मांदियाळी तयार होईल.
असो, नियमांत अधिक वेळ न घालवता मी माझ्यापासून प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात करतो

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -
'लज्जा'
मूळ लेखिकाः तस्लीमा नसरीन
मराठी अनुवादः लीला सोहनी

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -
बांगलादेशच्या स्वातंत्राच्या वेळी तेथे उसळलेल्या जातीयवादी हिंसाचाराचे आणि तेथील हिंदूंच्या मनातील दहशतीचे,त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, आदर्शवाद विरुद्ध व्यवहारी वृत्ती या झुंजीचे सुंदर चित्रण केलेले हे पुस्तक. आणि ते केले गेले आहे ते एका हिंदू बंगाली कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवून. प्राण गेला तरी बांगलादेश ही मातृभूमी असल्याने तिला सोडून ज़ाणे ज़मणार नाही या आदर्शवादाला प्राणपणाने ज़पणारे या कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सुधामयबाबू दत्त, त्यांचा बेरोज़गार पण तरीही वडिलांप्रमाणेच कणखर,जिद्दी/हट्टी मुलगा सुरंजन, हट्टी मुलाच्या जिद्दीला कंटाळून नि परिस्थितीच्या हातात स्वतःला सोपवून आला दिवस आज़ारी नवऱ्याच्या सेवेत निष्ठापूर्वक व्यतीत करणारी त्याची आई किरण्मयी आणि सुरंजनची धाकटी बहीण माया असे हे कुटुंब. मायाचे जहांगिर नावाच्या एका मुस्लिम युवकाबरोबर प्रेमसंबंध आहेत, जो सुरंजनचा मित्र आहे. जातीयवादी दंगलींच्या पार्श्वभूमीवर हे प्रेमसंबंध, आणि एकूणच या कुटुंबाचे शेजारपाजारच्या मुस्लिम कुटुंबांशी असलेले पूर्वीचे सलोख्याचे संबंध, सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात झालेले बदल/स्थित्यंतरे, प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनातील विचारांची वादळे, त्यांची स्वतःशीच होत असलेली भांडणे, स्वतःचीच समज़ूत काढणे, त्याचबरोबर आपल्या प्रिय मुला-मुलीबाबत, आई-बाबांबाबत वाटणारी काळजी आणि प्रेम या सगळ्याचे परिणामकारक चित्रण करणारे सुंदर, सजीव, छोटे-मोठे प्रसंग हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. माया घरातून गायब होणे, तिच्यावरील बलात्काराच्या बातमीने हादरलेले दत्त कुटुंब आणि त्यातूनच उद्विग्न झालेल्या सुरंजनने एका वेश्येला घरी बोलावून तिच्यावर 'बलात्कार' करून अघोरी सूड उगवण्याचा अन् आत्मसमाधान शोधण्याचा केलेला अनाकलनीय प्रयत्न, अखेर परिस्थितीला शरण जाऊन मोडून पडलेला सुधामयबाबूंचा आदर्शवाद आणि दत्त कुटुंबाची बांगलादेश सोडून ज़ाण्याची तयारी हा कथेचा नि पुस्तकाचा शेवट.
छोटे-मोठे पण तरीही महत्त्वाचे प्रसंग जिवंत करणारी, व्यक्तिरेखेच्या मनाचे बारीकसारीक पैलू उलगडून दाखवणारी लेखनशैली. सहज आणि प्रवाही अनुवाद. पण दंगलीतल्या आर्थिक आणि मनुष्यहानीची कल्पना देणारी आकडेवारी, वर्तमानपत्रातल्या वास्तववादी तसेच अतिरंजित बातम्या ही पुस्तकाच्या आणि लेखनाच्या सौंदर्याला नि परिणामकारकतेला काहीसे गालबोट लावते असे माझे मत आहे. निर्घृण कृत्यांची, मानसिक हानीची आणि अनुभवांची तुलना आणि मोजदाद आकडेवारीने करता येत नाही. अनुभवांनी पोळलेली माणसे आकडेवारीच्या पलीकडची असतात हेच खरे नाही का!
मूळ लेखिका तस्लीमाबाईंना या पुस्तकाबद्दल बरेच पुरस्कार मिळाले असून बांगलादेशातील कट्टरपंथियांच्या रोषासही त्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यांची हत्या करणाऱ्यास या मूलतत्त्ववादी, धर्मांध संघटनांकडून खास पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचेही सर्वश्रुत आहे.
अनुवादिका लीलाताई सोहनी यांनाही या अनुवादासाठी महाराष्ट्र शासनातर्फ़े विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे.

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके -
तशी बरीच आहेत जसे श्रीमान योगी, स्वामी, मृत्यंजय, पु. ल. ची बहुतेक सगळी पुस्तके, भा. रा. भागवतांचे बालसाहित्य इ. पण चाकोरीबद्ध नसलेली किंवा वेगळी पण तरीही प्रभावी वाटलेली अशी म्हणजे -
महात्म्याची अखेर - जगन फडणीस
झुलवा - उत्तम बंडू तुपे
हिटलर - वि. स. वाळिंबे
एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-

भावार्थदीपिका - संत ज्ञानेश्वर
गीतारहस्य - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
स्मृति-चित्रें - लक्ष्मीबाई टिळक
गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे
ययाती - वि‌. स. खांडेकर

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
'कोल्हाट्याचं पोर' हे डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे पुस्तक खूप आवडले. कोल्हाटी समाजातल्या लोकांचे हलाखीचे जीवन, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी, निकृष्ट सामाजिक दर्जा नि वास्तववादी जगाशी दूरान्वयानंही नसलेला संबंध, पण तरीही किशोररावांसारख्या काही नवोदितांची जिद्द, जगण्यावरचे प्रेम,पुरोगामी विचार यांमुळे या समाजाला दिसलेले प्रगतीचे नवकिरण या सगळ्याचे चित्रण, किशोररावांची त्यांच्या आईसाठीची भक्ती, प्रेम आणि मानसिक गुंतवणूक यांचे चित्रण हे खरोखरच वाचनीय आहे.
किशोररावांनी एका बक्षीस समारंभाच्या वेळी सांगितलेले त्यांचे अनुभव जेव्हा त्यांच्याच हातून बक्षीसरुपात मिळालेल्या पुस्तकातून, त्यांच्याच शब्दांत जिवंतपणे अनुभवायला मिळाले तेव्हा त्या बक्षीसाचे खरे मोल कळले असे म्हणावयास हरकत नाही.

हा खेळ पुढे चालू ठेवण्यासाठी पुढील ५ खेळाडूंची निवड करण्याची प्रक्रिया माझ्यातर्फ़े सध्या चालू असून येत्या आठवड्यात ती पूर्ण होईल अशी आशा आहे. तेव्हा फिरून इथे चक्कर टाकण्याचे आमंत्रण आगाऊच देऊन ठेवतो ः)

मी निवडलेली पहिली खेळाडू: राधिका
मी निवडलेली दुसरी खेळाडू: अदिती

Monday, March 20, 2006

माझा आवडता ऋतू




मी लुटलेल्या विचारांच्या सोन्यापैकी असलेलं हे आपट्याचं एक पान-



दिवसांमागुनी दिवस संपले,
ऋतूंमागुनी ऋतू,
जिवलगा, कधी रे येशील तू?

गाणं नेहमीचंच. तुमच्या, माझ्या, सगळ्यांच्या ओळखीचं. पण आज मात्र ते गुणगुणताना कुणासाठी तरी आसुसण्यापेक्षा, जिवलगाची वाट बघण्यापेक्षा, येणाऱ्या नवीन ऋतूलाच 'कधी रे येशील तू' असं विचारावसं वाटतंय. ऋतूचक्रातून अनंत आवर्तनं गाणाऱ्या निसर्गराजाचा नवीन रंग बघण्याची हुरहूर लागून राहिलीये. होलिकोत्सवाच्या समाप्तीनंतर लागलेत वसंताचे वेध. करड्या, सुकलेल्या वृक्षवेलींच्या अंगाखांद्यावर डवरलेली पांढरी-पिवळी फुलं, बोचऱ्या थंडीचा त्रास कमी करणारी सोनेरी ऊब, आपल्या जोडीदारास साद घालणारा कोकीळ, या सगळ्यांसाठी जीव वेडावलाय. पण सगळी दुनिया वसंताच्या स्वागतासाठी सज्ज झाली असताना मी मात्र माझा आवडता ऋतू कोणता, या एकाच प्रश्नाचं उत्तर देण्याच्या प्रयत्नांत.

आणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा किती फसवं आहे पहा. वसंताचं नाव घ्यावं, तर मनात पावसाच्या सरी थैमान घालणार. त्या झेलून चिंब भिजायचं ठरवलं, तर घोंघावणारा वारा नि बोचरी थंडी, अंगणतली शेकोटी, तिच्याभोवती फेर धरून गायलेली गाणी हिवाळ्याचं नाव पुढे करणार. बरं, पर्याय तर मर्यादित आहेत, आणि फ़िफ़्टी-फ़िफ़्टी, ऑडिअन्स पोल किंवा फ़ोन-अ-फ़्रेंडची जीवनरेखासुद्धा कामाची नाही. या कोड्याचं उत्तर दिलं तर बक्षीस म्हणून एक करोड रुपयेसुद्धा कमी पडावेत अशी अवस्था. पण त्याच वेळी, उत्तर शोधल्याशिवाय स्वस्थ न बसण्याची खुमखुमीसुद्धा. त्यातच हे निबंधलेखनाचं निमित्त.

माझा आवडता ऋतू शोधण्याच्या प्रयत्नांत आजतागायतच्या बावीस वर्षांच्या या आयुष्यरुपी चित्रपटाची रिळं रिवाइंड करून पहावीत, तर दिसतो 'बालपणीचा काळ सुखाचा'. कोणीही येऊन गोबरे गालगुच्चे घेऊन जावं, नि आपण मात्र टकाटका बघत बसावं; मध्येच गोड हसून सगळ्यांची शाबासकी मिळवावी, आणि कुणी लाडानं कडेवर घेतलंच, तर बिनदिक्कत आपल्या प्रेमानं त्याला किंवा तिला भिजवून वर साळसूदपणे गळा काढावा. आयुष्यातला वसंतच तो जणू. आईनं घेतलेला अभ्यास, बाबांकडून झाडूनं खाल्लेला मार, शाळेतल्या बाईंचे चुका केल्यावर दटावणारे डोळे, पण त्याचबरोबर परीक्षेत पहिला नंबर आल्यावर याच सगळ्यांनी मला डोक्यावर घेऊन नाचणं. शाळेपासून आजपर्यंत नेहमीच बरोबर राहिलेले मित्रमैत्रिणी, आलेले अनुभव आणि झालेले संस्कार यांनी रुजवलेलं आजचं तरुणपण. बालपणीचे ते नानाविध रंग, त्या सोनेरी दिवसांची अजूनही जाणवणारी ऊब आणि त्या वसंतानं दिलेली आजच्या ग्रीष्माची नि पुढच्या पावसाळ्याची नि हिवाळ्याची वर्दी.

आज हाच वसंत मला पावसासारखं भिजवून टाकतोय. आठवणींच्या सरींमध्ये चिंब झाल्यानंतर दरवळणाऱ्या तारुण्याच्या सुगंधाचा गोडवा आज जास्त मोहक वाटतोय. आयुष्याच्या या टप्प्यावर सगळेच ऋतू आपापला ठसा उमटवू पाहताहेत. आजपर्यंत मिळवलेलं यश, उद्याबद्दलच्या अपेक्षा नि स्वप्नं या सगळ्यांबरोबरच जाणीव होतेय ती नवीन जबाबदाऱ्यांची आणि पार पाडाव्या लागणाऱ्या नवीन भूमिकांची. जे मिळवलं ते टिकवायचं आणि ते टिकवतानाच नवीन काहीतरी मिळवायचं असे दुहेरी चटके देणारा ग्रीष्मसुद्धा आजच अनुभवायला मिळतोय. आणि तो सुद्धा आठवणींच्या पागोळ्यांवरून टपटपणाऱ्या बालपणीच्या रंगीबेरंगी वसंताचा पाऊस अंगावर झेलताना. म्हणजे या तारुण्याला पुढच्या आयुष्याची वर्दी देणारा नि गत आयुष्याचे रंग नव्याने उलगडून दाखवणारा वसंत समजावं, जबाबदारी नि स्पर्धेच्या रणरणत्या उन्हात घाम गाळायला लावणारा ग्रीष्म समजावं, की आषाढसरींनी जन्माला घातलेल्या, मनात खळखळणाऱ्या विचारांच्या धबधब्यांनी कानात दडे बसवणारा पाऊस समजावं, हे कळेनासं होऊन गेलंय.

तारुण्याच्या या पावसाळ्यातच लपलाय गृहस्थाश्रमाचा हिवाळा. काही वर्षं अनुभवलेली कुणाच्यातरी प्रेमाची ऊब, आणि ती हरवल्यावर चोरपावलांनी आलेली मनातली पानगळ. चार-सहा वर्षांत आजचा पावसाळा संपलेला कळणारही नाही; आणि नोकरीधंदा, संसार, रोजचं नऊ ते पाच, मुलंबाळं हे सगळं झोंबायला लागेल. आजवर जे काही शिकायला नि अनुभवायला मिळालं, त्याचेच स्वेटर्स, मफ़लर्स विणून तेव्हा वापरायचेत. हीच त्यावेळची शेकोटी असणार आहे हे आज कळतंय. अनंतात कुठेतरी लपलेल्या होळीत स्वतःला झोकून दिलं नि पानगळीतल्या तपकिरी-पिवळ्या पानासारखं हळुवार तरंगत गळून पडलं की मगच आयुष्याचं हे ऋतूचक्र पूर्ण होईल याची जाणीव करून देणारा हिवाळासुद्धा ऐन उमेदीच्या काळात जाणवतोय खरा. आणि म्हणूनच कालच्या बालपणीचा वसंत नि उद्याच्या उरलेल्या आयुष्याचा हिवाळा यांत सँडविच झालेलं सगळे ऋतू सामावलेलं माझं आजचं तारुण्य हा माझा आवडता ऋतू. विचारांची बैठक, तर्कसंगती, निबंधाची शब्दसंख्या नि मांडणी इत्यादी मोजपट्ट्या हा ऋतू अनुभवायला, त्यातला आनंद लुटायला (की मोजायला?) कामाच्या नाहीत. हा आनंद पोटभर पिऊन घेणं, डोळे भरून साठवून घेणं हेच या ऋतूचं बिनव्याजी कर्ज - परतफेडीची यत्किंचितही अपेक्षा न ठेवलेलं. मनातल्या प्रत्येक कोपऱ्याची, जीवनातल्या प्रत्येक सेकंदाची या ऋतूत केलेली गुंतवणूक मात्र महत्त्वाची आहे.

माझा आवडता ऋतू कोणता या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची आता गरज उरलेली नाही. या निबंधातूनच मला माझं उत्तर मिळालंय. किंबहुना माझ्या सदाबहार, तरुण मनानं ते आपल्याआपणच हुडकून काढलंय. कदाचित आयुष्यभर 'अजून यौवनात मी' गाण्यासाठीच. What about you?