Tuesday, June 06, 2006

जगाच्या राजधानीतून - १

सयाजी शिंदे, रेणुका शहाणे, वर्षा उसगांवकर अभिनित 'अबोली' या चित्रपटातले 'बंबई मोठी बाबा बंबई मोठी, पैशाची दाटी समिंदराकाठी' हे गाणे त्या दिवशी अचानकच आठवले. अमेरिकेत येण्यापूर्वी अवघा जन्म मुंबईत गेलेला. त्यामुळे समुद्राकाठी असणाऱ्या पैशाच्या दाटीबरोबरच, मुंबईतील बी बी दादरचे (दादर पश्चिमचे!!) किर्तीकर मार्केट (त्याचे आधुनिक नाव वीर सावरकर मंडई आहे), शिवाजी पार्क नि लगतची चौपाटी, कुलाब्याचे बडे मियां नि दादरचे प्रकाश नि सायबिणी, रिगलपासून ते थेट प्रबोधनकार ठाकरेपर्यंतची नाट्य-चित्रपटगृहे, लोकलगाड्या नि 'बेस्ट' (खरोखर!), या सगळ्यासगळ्यातली मौज़ अनुभवलेली. तिसरीच्या भूगोलात महाराष्ट्राची राजधानी मुंबई असे घोकले होते. गेल्या बावीसएक वर्षांत त्याची पुरेपूर प्रचिती आली. राज्याचे प्रशासन, देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या आर्थिक नाड्या, अठरापगड ज़ातीधर्मांचे लोक, सगळे आमच्या चिमुकल्या मुंबईतच अडकलेले. त्यामुळे हे छोटेसे शहर 'राज'धानी म्हटल्यावर 'गर्व से कहो हम हिंदू हैं'सारखी 'गर्व से कहो हम मुंबईकर हैं'ची गर्जना मनात घुमायची.
जगाच्या राजधानीबाबत नुसतेच ऐकून होतो. प्रत्यक्ष पाहण्याचा योग मात्र इतक्या लवकर येईल असे वाटले नव्हते. वास्तविक डिसेंबरात फ़िलाडेल्फ़ियाला गेलो होतो, तेव्हाच दोन दिवसाचा न्यू यॉर्क दौरा आखला होता, पण काही अडेलतट्टू मंडळींनी न्यू यॉर्कला ज़ाण्याऐवजी 'न्यू यॉर्क'नावाच्या क्लबमध्ये जगाच्या राजधानीची सफ़र घडवली तेव्हा हसावे की रडावे कळेनासे होऊन गेले होते. यावेळी मात्र संधी सोडायची नव्हती. नाही म्हणायला विद्यापिठातले एक प्रशासकीय काम आड येत होते, पण तिथल्या 'दयाळू'(!?) बाईंना 'वीकेंडला घरी बोलावून भारतीय जेवण करून घालतो'चा नवस बोलल्यावर गाडी सुटायला तीनच तास बाकी असताना ते काम तडीस नेले (आता तर नवस फेडायलाच हवा!)
त्या तीन तासात कपडे घालण्यापासून (बॅगेत!!!!!) ते प्रवासातले खाणेपिणे, औषधे, कॅमेरा, इतर साधनसामुग्री यांच्या ज़मवाज़मवीत वेळ कसा ज़ात होता कळलेच नाही. हे सगळे चालू असतानाच एका हितचिंतकाने 'ग्रे हाउंडका ओव्हरनाइट जर्नी इतना सेफ़ नही है' सांगून बॅगेत घातलेले आमचे लॅपटॉप्स बाहेर काढायला लावले आणि त्याचबरोबर पाकिटातली काही रक्कमसुद्धा घरच्याच कपाटात बंद झाली. त्याचे सूचना देणे चालू असतानाच अस्मादिकांची स्वारी केव्हाच न्यू यॉर्कला पोचली होती. धावतपळत स्थानिक बस पकडून ग्रे हाउंड बस स्थानकावर गेलो. ग्रे हाउंड ही अमेरिकेच्या पूर्व किनारा आणि लगतच्या ठिकाणांना ज़ोडणारी बससेवा आहे. आमच्या गावातल्या त्या स्थानकावर गेल्यावर मुंबई सेंट्रलच्या एस टी स्थानकाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात, ग्रे हाउंड ही अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील एस टी आहे. 'अलिबाग अलिबाग' करणाऱ्या मुंबई सेंट्रलच्या गणवेशधाऱ्यांप्रमाणेच येथेही 'रिचमंड, बॉल्टीमोर, न्यू यॉर्क' अशी (उंची) नावे कोकलणारे सिनेमातल्या जल्लादांप्रमाणे भासणारे ग्रे हाउंडचे चालक असतात. 'कोमॉन कोमॉन मॅऽऽन' म्हणत एका जल्लादाने आमचे स्वागत केले. हातातली बॅग आणि तिकिटे छातीशी घट्ट आवळून भेदरलेल्या कोकरांसारखे आम्ही बसमध्ये शिरलो. बसमध्ये मी आणि माझा मित्र असे दोनच भारतीय आणि बाकीचे लक्कू! अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना 'निग्रो' किंवा 'ब्लॅक' म्हणणे म्हणजे ज़ातीवाचक शिवी देण्यासारखे आहे. त्यांना प्रेमाने 'आफ़्रिकन अमेरिकन' असे म्हणायचे (त्यांच्याबरोबर 'ब्लॅकजॅक' खेळताना लाडेलाडे 'आफ़्रिकन अमेरिकन जॅक' खेळतोय असे म्हणायचे ;) ) इकडच्या देसी जनतेने काळ्यांना कल्लू केले आणि त्यांची बलदंड शरीरयष्टी, निर्विकार पण तरीही ज़ुलमी नि एखाद्या खुन्यासारखा भासणारा चेहरा बघून त्यांना 'कल्लू' म्हणजे काय ते कळेल या (महाराष्ट्रीय) भीतीने 'कल्लू'चे 'लक्कू' केले.
बसमधल्या त्या लक्कूंच्या भीतीने आमची अख्खी रात्र आळीपाळीने सामानावर पहारा करण्यात (आणि रिचमंडच्या थांब्यावर आळीपाळीने अनावर विधी उरकण्यात) गेली. त्यांचे विचित्र इंग्रजीतील हास्यविनोद, गाणी आणि बसभर एअर फ़्रेशनरसारखा पसरलेला सिगार आणि मद्याचा (सु?)गंध यांनी आम्ही गुरखे आमच्या ड्युटीवर न झोपण्याची खबरदारी घेतली. चाळीस मिनिटे उशीराने धावत असलेली आमची बस चालकाने नियोजित स्थळी चाळीस मिनिटे आधीच कशी काय पोचवली, याचे उत्तर मात्र आम्हांला अज़ूनही मिळालेले नाही. वाटेत वॉशिंग़्टन डीसी ला (ही अमेरिकेची राजधानी) मेमोरिअल बिल्डिंग, बुश साहेबांचे निवासस्थान आणि वॉशिंग़्टनचा तो प्रसिद्ध मनोरा यांना निळ्यापांढऱ्या, दुधाळ प्रकाशात न्हाऊन निघाल्ले पाहिले. दुर्दैवाने त्यांना कॅमेऱ्यात बंद करता आले नाही.
नियोजित स्थळी म्हणजे न्यूअर्कला पोचलो तेव्हा सकाळचे साडेसहा झाले होते. मित्राची मावशी आम्हांला उतरवून घ्यायला यायची होती. पण ठरल्या वेळेचा चाळीस मिनिटे अगोदरच पोचल्याने आम्हीच तिला बस स्थानकावरून फ़ोन करून झोपेतून जागे केले. थोड्या काळजीयुक्त स्वरातच तिने 'मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही या' सांगितल्यावर तिच्यापेक्षा आमची काळजी वाढली (या क्षणी माझी आई असती तर कदाचित पुढच्याच बसने मला परत रालेला घेऊन आली असती!) पण न्यू यॉर्क मोहिमेवर निघालेल्या आम्ही मावळ्यांनी स्थानिक आगगाडीची तिकिटे काढून मावशीबाईंच्या घरची गाडी पकडली. 'न्यू जर्सी ट्रान्झिट' ही ती 'लोकल'. पण रुबाब, व्यवस्था सगळे आपल्या इंद्रायणी एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणीसारखे. ते पाहून नक्की 'लोकल' कशी असते असा प्रश्न मला पडला.

तिकडच्या तिकीट तपासनिसांची पद्धतही अजबच. तुमच्याकडचे तिकीट घेऊन कुठे जायचे हे पाहून आपल्याज़वळच्या तिकीटसदृश एका कागदी पट्टीवर ठराविक वेळा 'टाक् टाक्' करून ज़वळच्या टोच्याने भोके पाडणार आणि तुमच्या आसनावर एका पट्टीत ते खोवणार. त्या पट्टीवर पाडलेली भोके आणि तुम्हाला जेथे जायचे आहे ते ठिकाण यांचा काहीतरी परस्परसंबंध आहे. तो काय आहे ह ज़ाणून घ्यायचा प्रयत्न केला असता तपासनीस मामा मनापासून हसले ("काय तू! च्यायला इतके पण कळत नाही?! ज़ाऊ दे, सोड" अशी काहीशी भावना!) आणि पुढच्या प्रवाशाकडे गेले.
आम्हांला 'रावे' नावाच्या स्थानकावर उतरायचे होते. त्यामुळे मावशीबाईंनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून (डोळ्यांत तेल (आतापर्यंत पाणी आले होते, बदल म्हणून थोडे तेल घालायला लागले!) घालून स्थानकांची नावे वाचत आणि हे स्थानक कुठले आहे हे सांगणाऱ्या गाडीतील ध्वनिक्षेपकावरील गोड आवाज़ाकडे कान लावून) न्यूअर्क नंतरची एअरपोर्ट, नॉर्थ एलिझाबेथ, एलिझाबेथ आणि लिंडन ही स्थानके सोडली आणि रावेला उतरलो.

मित्राच्या मावशीकडे गरमागरम पोहे, आदल्या रात्रीचा खिमापाव, पावभाजी, संत्र्याचे सरबत असा जंगी बेत होता. त्यावर आडवा हात मारला, अंघोळ आटोपली, टीव्हीवर 'ब्लू स्ट्रीक' हा धमाल चित्रपट लावला आणि तो बघून झाल्यावर मस्तपैकी ताणून दिली. साडेनऊ तासांच्या प्रवासाचा इतका शीण ज़ाणवत होता, की सोफ़्यावर पडल्यापडल्या झोप कधी लागली कळलेसुद्धा नाही. संध्याकाळी मित्राने उठवले तेव्हा आठ वाज़ून गेले होते (आज़काल म्हणजे उन्हाळ्यात अमेरिकेत 'रात्री'(!) नऊला वगैरे सूर्यास्त होतो. हिवाळ्यात मात्र 'संध्याकाळी'(!) पाचालाच रात्रीच्या साडेआठसारखा काळोख होतो) भराभर आवरून घेतले कारण 'दा विंची कोड' बघायला ज़ायचे होते. चित्रपट बघायला ज़ाण्यापूर्वी तेथील 'ओक ट्री रोड' वर ज़रा भटकलो. हा रस्ता म्हणाजे पुण्यातला लक्ष्मी रोड किंवा दादरचा कबुतरखान्याज़वळचा परिसर आहे. बिस्मिल्ला नि ए वन चिकन शॉपपासून घसीटामल हलवाई, कंगन ज्युवेलर्स, शगुन सारीज़्, अमेरिकेतील प्रसिद्ध 'पटेल ब्रदर्स' (भारतीय वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू भांडार या प्रकारात मोडणारी अमेरिकेतील दुकानांची प्रसिद्ध साखळी... त्यावरूनच 'पटेल' आडनावाच्या लोकांना अमेरिकेचा व्हिज़ा मिळायला इतके कष्ट का पडत असावेत, याची थोडीशी कल्पनाही आली. अमेरिकेत आलेला पटेल इथेच राहून असा फळला-फुलला नसता, तर आज़ ओक ट्री रोड आहे तसा दिसला नसता... रामसेंप्रमाणेच हे पटेल बंधू किती असा प्रश्न पडायला हरकत नाही) असे सगळे भटकल्यावर एका केरळी उपाहारगृहात जेवलो. बऱ्याच दिवसांनी अस्सल केरळी मसाले आणि ओल्या नारळाचा चव असलेले, खोबरे असलेले जेवण पोटात गेले. ते सुद्धा हळदीच्या पानाच्या मंद, प्रसन्न सुगंधासह!कृतकृत्य झालो. तृप्त मनाने ढेकर देऊन बाज़ूच्याच चित्रपटगृहात गेलो आणि 'द विंची कोड' पाहिला. फ़र्स्ट डे लास्ट शो. मजा आली.
आटोपल्यावर टॅक्सी पकडून घरी आलो आणि पुन्हा ताणून दिली. दुसऱ्या दिवशीची सकाळ कधी उजाडतेय याची वाट पाहतच झोपलो. न्यू यॉर्क आता एका सूर्योदयावर येऊन ठेपले होते.

No comments: