Wednesday, April 21, 2010

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत. शाळेत इतिहास शिकताना क्वचित एखादा धडा अरबी टोळ्या, अल-जेब्रा, हादिस नि कुर-आन, नौरूज याबद्दल बोलू लागला की इतिहासासारखा विषयही आवडू लागायचा (इतर वेळी १८५७ ते १९४७ सोडून काही वाचायला मिळायचे नाही, हा भाग वेगळा!) अगदी अलीकडेपर्यंत अयातुल्ला खोमेनी, माह्मूद अह्मदेनिजाद वगैरे नावे कानावर पडत; इराण-पाकिस्तान-भारत गॅस पाइपलाइनसंबंधीच्या बातम्या वाचायला-ऐकायला मिळत; तेव्हाही कान आणि डोळे त्यांच्या दिशेने आपसूकच वळायचे. गाडी घेऊन सनीवेलातल्या रज्जो मध्ये पराठे खायला बाहेर पडावे नि बाजूच्याच चेलोकबाबी मधील लाल-पिवळा मंद प्रकाश नि ताज्या, गरम कबाबांचा वास पराठ्यांच्या बेताबद्दल मनात 'सेकन्ड थॉट' निर्माण करून जावा, असे आजवर अनेकदा घडले आहे. कालच्या टॅब्लॉइड ऑफ इन्डिया मधील ही बातमी वाचली आणि पर्शियाशी (आताचा इराण) आपले पोट, राजकीय नि ऐतिहासिक संबंध - नि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिक भूक - किती घट्ट जोडले गेले आहेत, याचा विचार नकळतच मनात डोकावला. कचेरीतील सोमवार संध्याकाळची वेळ, हातात गरमागरम चहा, कचेरीतील जवळच्या मित्राशी या सगळ्यावरून झालेल्या गप्पा आणि विचारांची देवाणघेवाण याची परिणती म्हणजे ही खरड.

मुळात तेहरानला नजीकच्या भविष्यकाळात प्रचंड मोठ्या भूकंपाचा गंभीर धोका आहे, हे राष्ट्राध्यक्षांनी जाहीर करावे नि त्यानुसार पावले उचलायच्या तयारीस लागावे, याला खूळ म्हणावे की दूरदृष्टी हे कळण्याइतपत पुरेशी माहिती माझ्यापाशी नाही. तसेही इराणला भूकंपांचे वावडे नसावे. १८२०-३० मध्ये तेथे सगळ्यात मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर अमेरिकेशी सततची भांडणे, पाकिस्तानातून अण्वस्त्र निर्मितीसंबंधित तंत्रज्ञानाची चोरी, इराकबरोबरचे युद्ध नि आता अमेरिकेच्याच पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांमार्फत आर्थिक निर्बंध लादून इराणची कोंडी अशा एक ना अनेक कारणांनी इराण हादरत असतेच. पण बातमीतील इराणी महाशयांच्या वक्तव्याने इराण नाही तर बाकीची दुनिया हादरेल, हे मात्र नक्की! लौकिकार्थाने कापसाची किंवा तागाची शेती, कृत्रिम धाग्यांची निर्मिती, गिरण्यांचे संप, रेडीमेड कपड्यांची आयात, फॅशन, जगप्रसिद्ध फॅशन डिझाइनर्स यांच्याशी फारसे जवळचे संबंध असणार्‍यांपैकी इराण नाही. तसे असतानाही धर्मात नमूद केल्यानुसार स्त्रियांनी नखशिखान्त अंग झाकणारी वस्त्रे परिधान करण्याचा पुरस्कार करणारे हे इराणी महाशय तसे संकुचित विचारांचेच म्हटले पाहिजेत. आकाराने तसेच संख्येने कमीत कमी कपडे वापरून त्यायोगे यंत्रमागांची घरघर, वातावरणातील कार्बनचे वाढते प्रमाण, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे कमी करण्याच्या दृष्टीने सगळे जग पावले उचलत असताना हे महाशय मात्र अगदी विरुद्ध दिशेने वाटचाल करू पाहत आहेत. याबद्दल खरे तर इराणाचा सार्वत्रिक निषेध व्हायला हवा; पण इराणने आपल्याला इतके काही भरभरून दिले आहे की निदान मला तरी असा निषेध करवत नाही.

इराण म्हटले की सगळ्यात पहिल्यांदा मला आठवतो तो 'कोपर्‍यावरचा इराणी'. मुंबईत एके काळी बहराला आलेली ही जमात आजकालच्या पिढीला माहीतदेखील असेल की नाही, अशी शंका येते. बरे आपण म्हणावे "तो कोपर्‍यावरचा इराणी.." आणि समोरच्याने "कोण रे?" असे विचारून आपलेच दात घशात घालावेत, अशी स्वतःची गत करून घ्यायला मला तरी आवडायचे नाही. इराण्याला नाव नसतेच. ज्याच्या हाटेलावर नावाची पाटी असेल, तो अस्सल इराणी नाहीच. किंबहुना तो नेहमी कुठल्यातरी कोपर्‍यावरचाच असल्याने नि तुम्ही मुंबईत जेथे कोठे असाल, तिथून कोपरभरच लांब असल्याने 'कोपर्‍यावरचा इराणी' इतकीच त्याची ओळख पुरेशी असते. मग ते भेटीचे ठिकाण असो, नवख्या माणसाने पत्ता चुकू नये म्हणून सांगायची खूण असो, सकाळी कचेरीत जायच्या आधी ब्रून-मस्का किंवा बन-मस्का, आम्लेट-पाव नि कटिंग हा ठरलेला नाश्ता हाणायची जागा असो की फुकटात पेपर वाचायला मिळायचे नि त्यातील बातम्यांचा काथ्याचे (व घड्याळ्याच्या काट्यांचे!) कूट करायचे वाचनालय! कॉलेजात जायला लागल्यावर मग घरी येताना मटण पॅटिस किंवा खिमा पॅटिस, टोस्ट किंवा खारी, कधी लहर आलीच तर पुडिंग, चहा नि सिगरेट असा शाही बेत मित्रांच्या संगतीने जमवायचा. तुम्ही नेहमीचे गिर्‍हाइक असाल, तर तुम्हाला खुर्ची उलटी फिरवून बसण्याचीही मुभा असते. शक्य तितक्या जुनाट काळ्या रंगाची खुर्च्या-टेबले, त्यांवर तितक्याच उठून दिसणार्‍या पांढर्‍या कपबशा नि बाउल्स, स्टीलचे चकचकीत चमचे आणि रोमन आकडे असलेले, टोल्यांचे पण कधी टोले न वाजणारे घड्याळ ही अस्सल इराण्याची ओळख आहे. कालौघात त्याच्या पुढील पिढीतील नतद्रष्टांनी हाटेलांना 'कॅफे गुडलक' किंवा तत्सम नावे देणे, आतले फर्निचर नूतनीकरणाच्या नावाखाली बदलणे, विनाकारण उत्तर भारतीय नि दाक्षिणात्य पदार्थही उपलब्ध करून देणे वगैरे सांस्कृतिक भेसळ करून ही ओळख पुसायला सुरुवात केली. मॅक्डोनाल्ड वगैरे चालू झाल्यावर तर सगळी पिढीच बिघडू लागली; पण निष्ठावान खवय्या इराण्याला विसरला नाही नि त्याच्याच जिवावर उरलासुरला इराणी अजूनही तग धरून आहे. अंधेरी स्टेशनबाहेरील मॅक्डोनाल्ड मध्ये जितकी गर्दी असते त्याच्या अनेकपट गर्दी समोरच्या इराण्याकडे असते! मॅक्डीच्या बाहेरील जोकर जितके लक्ष वेधून घेत नाही तितके इराण्याच्या बसक्या कपाटाच्या काचेमागील पिवळाजर्द वर्ख नि पापुद्रे ल्यालेले नि वेड लावणारा घमघमाट सुटलेले खिमा पॅटिस, मटण पॅटिस, खारी, मावा केक वगैरे मला खुणावत असतात.

नदीचे मूळ नि ऋषीचे कूळ विचारू नये असे काहीतरी ऐकून आहे. इराण्याच्या बाबतीतही हे तितकेसे खोटे नसावे. कारण ज्याला भारतात लौकिकार्थाने पारशी समजले जाते तो मूळचा इराणी (पर्शियन) आहे, आणि इराणी असूनही त्याचा धर्म मुस्लिम नाही, त्याला दाढी नाही तर डोकीवर ज्यूंसारखी छोटी लाल गोल टोपी नि अंगात पैरण आहे वगैरे लक्षात येऊ लागले की गोंधळ उडालाच म्हणून समजा. अलीकडे महंमद अली रोड वर काही इराणी ढंगाची हाटेले दिसली ते हायब्रिड इराणी किंवा अस्सल मुसलमान असावेत, असे वाटते. त्यांच्याकडे बिर्याणी, खिमा, चिकन कोर्मा, कबाब वगैरे हाणायला मिळते; त्याची लज्जत औरच. पण त्याची ब्रून-मस्का नि चायशी तुलना करू नये. यू कॅनॉट कम्पेअर अ‍ॅपल्स अ‍ॅन्ड ऑरेन्जेस! (यू मे लव बोथ, दो!) त्यामुळे इराणी ईद साजरी न करता नौरूज कसा काय साजरा करतो, मशिदीत न जाता अग्यारीत कसा सापडतो इ. प्रश्नांचे खरे उत्तर इराणमध्ये ईद आणि नौरूज दोन्ही जोरदार साजरे कसे होतात, याच्याच उत्तरात दडले आहे. किंबहुना इराणमधील बिगरमुस्लिम इराणी तेथील जाचक धार्मिक निर्बंधांना कंटाळूनच भारतात येऊन थडकला असावा की काय, अशी कधी कधी शंका येते. प्रत्यक्षात, हा झोराष्ट्रीयन समाज बव्हंशी इराणबाहेर स्थलांतरीत झाल्यानंतरच तेथे मुस्लिमप्राबल्य असलेले लोकजीवन रुजले, असे कुठेतरी वाचायला मिळाले. आणि ते नुसतेच रुजले नाही तर बहरलेसुद्धा!

शॉर्ट स्कर्ट्स, फ्रॉक्स आणि डोक्याला रुमाल बांधलेल्या पारशी तरुणींचे मूळ मुस्लिमप्राबल्य असलेल्या मध्यपूर्वेतील इराणमध्ये आहे, यावर तर सुरुवातीला विश्वासच बसत नसे. खरे तर गोरा रंग, धनुष्याकृती रेखीव भिवया, सरळ तजेलदार नाक, पाणीदार डोळे, मधाळ हसू आणि कमनीय बांधा यांच्या कसोटीवर खरी उतरणारी पारशी तरुणी विरळीच. पारशी तरुणींनी जमाना नाचवावा तो फॅशन, बिनधास्तपणा नि रंगीबेरंगी फुलांची किंवा इतर मुक्तहस्त चित्रे असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कपड्यांच्या जोरावर. याउलट उपरोल्लेखित गुणविशेष असलेली इराणी मुस्लिम तरुणी तुलनेने कमी बोलकी, अदबशीर, सोज्वळ चेहरेपट्टी असलेली; गोड बोलणारी. अर्थात पारशी संस्कृती भारतात बहरली नि इराणी मुस्लिम संस्कृती इराणमध्ये. त्यामुळे इराणमधील स्त्रियांच्या जीवनाबद्दल जे काहीशा विस्ताराने ऐकता आले, ते कचेरीतील दोन इराणी स्त्री सहकार्‍यांकडूनच. इराणमधील स्त्रीवर्गात शिक्षणाचे वाढू लागलेले प्रमाण, गणित नि विज्ञानातील तसेच स्थापत्यशस्त्रातील प्रगती व त्यातील स्त्रियांचे योगदान, स्त्रीवर्गाचा कला, साहित्य नि पत्रकारिता क्षेत्रातील वाढता प्रभाव याबद्दल त्या भरभरून बोलतात तेव्हा इराणमधील स्त्रीजीवनाची व त्यातील स्थित्यंतराची पुसटशी तरी कल्पना यावी. असे असताना टाइम्स ऑफ इन्डियामधील उपरोल्लेखित बातमीमधील मुक्ताफळे उधळणार्‍या इराणी मुल्लाची मते या प्रगतीशील समाजाला कशी मागे खेचू पाहत आहेत, हे स्पष्ट व्हायला हवे.

बर्‍यापैकी खुलेआम पद्धतीने इराणमध्ये चालू असलेली अण्वस्त्रनिर्मिती; पाकिस्तानातून झालेली तंत्रज्ञानाची चोरटी आयात; धगधगते, प्रतिकूल, इराणविरोधी आंतरराष्ट्रीय वातावरण नि दबाव या सगळ्याला सध्या सामोरा जात असलेला इराणी गझला, रुबाया, फार्सी भाषा, प्रिन्स ऑफ पर्शियासारखे लोकप्रिय संगणकी खेळ, सोहराब नि रुस्तुम च्या रंजक गोष्टी, आशियाई फुटबॉल, वेगवेगळ्या प्रकारच्या चहांची चाहत, गोलाब नि त्याचे अत्तर या सगळ्याशीही थेट संबंधित आहे, हे नजरेआड करता येत नाही. मध्यपूर्वेतील या अ‍ॅटमबॉम्बच्या पोटात दडलेली ही सगळी रसायने जगात अगोदरच सर्वसमाविष्ट झाली आहेत. पुढेमागे काही स्फोट व्हायचाच असेल तर तो अशा सर्वदूर संस्कृतीप्रसाराचाच व्हावा, म्हणजे अमेरिकेत बसूनही आम्हांला भायखळ्याच्या रिगल किंवा ग्रान्ट रोडच्या मेरवानच्या सुखाला पारखे झाल्याची चुटपुट लागून रहायची नाही.