Saturday, August 28, 2021

डिजिटल बैराग्याचे महानिर्वाण



 

गम और ख़ुशी में फर्क ना महसूस हो जहॉं
मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया
“नंबर त्वेल, मिडीयम फ्राईज, डाएट कोक?” जॅक इन द बॉक्स च्या जुनाट, तपकिरी, पंजाभर रुंदीच्या खिडकीतून आलेल्या दक्षिण अमेरिकन गोडव्याने साहिरचे शब्द फुटेनासे झाले. कुठली असेल ही? मेक्सिको? निकाराग्वा? पेरू? विचार करताकरताच बैराग्याने त्याचं अमेरिकन एक्स्प्रेस त्या गोडव्याकडे देऊन टाकलं आणि हातात कोंबलेली ब्राऊन बॅग पॅसेंजर सीटवर फेकून तो ड्राईव्ह-थ्रू मधून चालता झाला. “सर, युअर कार्ड” वगैरे खिडकीतले शब्द ऐकून न ऐकल्यासारखे करून. दक्षिण अमेरिकेतून आलेल्या, तपकिरी कातडीच्या, चुणचुणीत नि ‘हॉट’ ललना बैराग्याला स्वतःच्याच जातकुळीतील, कधीकधी रक्ताच्या नात्यातील वाटत. अमेरिकन स्वप्नाच्या ओढीने इकडे येणाऱ्या लमाणांच्या तांड्यातील सगळे शेवटी सारखेच. कुणी भिंतीवरून उड्या टाकून येतात, कुणी भुयारातून, तर आपल्यासारखे कुणी सरळमार्गी, विमानाचं तिकीट काढून नि कागदपत्रं घेऊन. इतकाच काय तो फरक. शेवटी अमेरिकेतलं कुठलं तरी छोटंमोठं शहर सगळ्यांना गिळून टाकतं.
रात्रीचे १:२७ वाजले होते. साहिर, देव आनंद, रफीशी जोडलेली माझी नाळ बैरागी आता कधी कापणार, या विवंचनेत मी त्याची सोबत करतच राहिलो. आम्हा दोघांना पोटात घेतलेली होंडा ऍकॉर्ड मिलपिटसच्या दुर्गंधीत, काळ्याकुट्ट काळोखात येऊन थांबली. गाडीचे दरवाजे-खिडक्या न उघडताही, मिलपिटस आलं, हे हायवे २३७ वरून Zanker Road वर बाहेर पडताना कळतंच. ग्वादालूपे नदी, कायोटी खाडी आणि अल्विजोचं विस्तीर्ण खाजण इकडे एकमेकात मिसळून जातात. बैरागी इकडे बरेचदा यायचा. येतो. हे मिसळणं बघितलं, की त्याला शिवडीची खाडी आठवते, तिथले लाल-गुलाबी रोहित पक्षी आठवतात. क्रान्तीवीर मधला ‘यह हिंदू का खून, यह मुसलमान का खून’ करत चवताळलेला, आपल्या पंजावर स्वतःच्याच रक्तात, वस्तीतील मुसलमानाचं रक्त मिसळून, सर्वधर्मसमभावाचे फण्डे देणारा नाना पाटेकर आठवतो. बैराग्याचा एक दृष्टिक्षेप माझ्यासाठी ‘आप का हुक्म सर-ऑखोंपर’ असतो. मग आम्ही यूट्यूबवर तो डायलॉग दोन-तीनदा बघतो. डिम्पलला बघतो.
आतासुद्धा हे सगळं बघितलंच. दूरवर कुठेतरी संथ तालावर उघडझाप करणारे चार लाल दिवे बघितले. ते नेहमीसारखे चारच आहेत, हे सुद्धा मोजून बघितलं. तिथेच असलेल्या पण आता न दिसणाऱ्या डंबार्टन पुलाच्या दोन्ही बाजूसुद्धा गाढ झोपल्या होत्या. उजवीकडचे मिशनचे डोंगर नेहमीप्रमाणेच ‘ऑल इज वेल’ची ग्वाही देत होते.
इथलं मिसळणं मग पुढे सॅन फ्रॅन्सिस्कोच्या उपसागरात जाऊन आणखी मोठं होतं. त्या उपसागराच्या एकीकडे सॅन फ्रान्सिस्को, एकीकडे बर्कली, एकीकडे ओकलंड. फरक इतकाच, की या शहरांमध्ये माणसं मिसळलेली असतात. मुंबईसारखीच. उंचच उंच इमारतींच्या गराड्यात. त्या सुद्धा इतक्या उंच की वर बघताबघता मान मोडून एखादा खोल खाली कुठेतरी पडेल. इकडे माणसं काम करतात, खातात, इकडून तिकडे चालतात, धावतात, गाड्या चालवतात, भिका मागतात. जगतात. कुणी इमारतींमध्ये, कुणी वस्त्यांमध्ये; कुणी झोपडपट्टयांमध्ये, कुणी रस्त्यावर.
अशा कुठल्याच गगनचुंबी इमारतीत ना तो राहिला होता, ना त्याने कधी काम केलं होतं. मुंबईत नाही, आणि इकडेही नाही. मुंबईत तर आता आडवं पसरायला जागाच उरलेली नाही. आता पसरायचं असेल, तर उभं. आकाशात. क्रेनवर चढून, सरळसोट. त्या वरच्या टोकावरून मग कुठेतरी धारावी दिसेल, कुठे सायन, कुठे माहिमचं मच्छीमार नगर. ही सगळी कधीतरी शहरं होती. शहरंसुद्धा नाहीत, बेटं! आता त्या वस्त्या झाल्या आहेत. वेशीवरच्या, वेशीबाहेरच्या नाहीत; वेश्येसारख्या. सतत तिकडे डोकावणं होतं, त्यांचंही खुणावणं होतं; जावंसं वाटतं, पण गांडीत दम नसतो. बैराग्याच्यासुद्धा! बैरागी असूनही! आपल्याला हवं असलेलं जगणं आपण जगतोय, की मिळालेलं? आणि आपल्याला हा जो प्रश्न सतावतो, तोच प्रश्न तिथल्या कुणाला सतावत असेल तर? जर या दोघांची, त्यांच्या जगण्याची अदलाबदल केली तर? न जाणो आपल्यासारखाच कुणी भेटला तिकडे, आणि ‘हमने उनको भी छुपछुपके आते देखा इन गलियों में’ गायला लागला तर?
बैरागी भानावर आला, तेव्हा त्याचं अमर प्रेम गात होतंच! हे झालं, की बास करू, असा विचार त्याच्या मनात आला. पण शर्मिलाची पुष्पा त्याला करीनाच्या चमेलीकडे घेऊन गेली. आणि ती मग पुढे राधिका आपटेच्या गार्बोकडे. अमर प्रेमाचं बदललेलं स्वरूप बैराग्याला झेपेचना. किंबहुना प्रेम म्हणजे नक्की काय? आपल्याला कळलं, आपण केलं ते? की आणखी काही? पडताळणीसाठी मग त्याने स्वत:च्या अमर प्रेमाची सगळी गोष्ट फेसबुकवर वाचायला सुरुवात केली. साखरपुड्याचे फोटो, लग्नाचे फोटो, ऍनिव्हर्सरीचे फोटो. फोटोच फोटो. अधेमधे भरल्या ताटातल्या लोणचं-कोशिंबीरी-पापडासारख्या तोंडी लावायला कविता वगैरे. आपल्याच प्रेमाची खात्री पटली असली, तरी त्याला तिलांजली द्यायच्या करारावर थोड्या वेळापूर्वी केलेली डिजिटल स्वाक्षरी त्याच्या डोक्यातून जाईना. डाएट कोकचा एक घोट, मग एक फ्राय तोंडात टाकायचं, मग परत एक घोट अशा सुसूत्र तालावर त्याने एकामागोमाग एक फोटोतून स्वतःला अन-टॅग करायला आणि मग तो फोटो डिलीट करायला सुरुवात केली. ‘आमची पहिली दिवाळी’, ‘पहिली मकरसंक्रान्त’, ‘द डे आय बिकेम ब्राईड’ वगैरे फोटो मात्र अमर प्रेमाच्या मालकीचे असल्यामुळे, त्याला ते डिलीट करता आले नाहीत. फेसबुकवरील स्वतःच्या डिजिटल संपत्तीचा वारसदार नेमण्याची सोय फेसबुकने नुकतीच जाहीर केली. त्यामुळे आपल्या या डिजिटल पाऊलखुणा, त्याच कराराद्वारे, तिच्या नावे करून टाकाव्यात का, असाही विचार त्याच्या मनाला चाटून गेला. पण एकदा वैराग्य पत्करलं की कसली संपत्ती, कसल्या खुणा नि कसलं काय?! त्यापेक्षा सगळ्याची विल्हेवाट लावणं इष्ट! तोच मार्ग त्याने निवडला आणि फेसबुक अकाउंट डिलीट केलं.
तेच इंस्टाग्रामच्या बाबतीत. ‘एक अकेला इस शहर में’ - त्याचं इंस्टाग्राम हँडल! सगळे आवडीचे, ओळखीच्यांचे फीड्स चाळून घेतले. नटनट्या, खेळाडू, नातेवाईक, मित्रमैत्रिणी; आई. मग बेंबीखाली साड्या नेसून, बिनबाह्यांची पोलकी घालून उत्तान नाचणाऱ्या रॅण्डम बायका; स्वतःच्याच स्वयंपाकघरात नवीनच काहीतरी चमत्कृती साकारणारे नि तिला पाककृती म्हणणारे रॅण्डम, हौशी आचारी; काहीतरी सामाजिक, धार्मिक, आर्थिक, असंबद्ध, बोजड, तात्त्विक बोलणारे, स्वतःला ‘इन्फ्लुएन्सर्स’ म्हणवणारे वगैरे वगैरे वगैरे. सगळ्यांचं, सगळीकडे, सगळं आलबेल आहे, याची खात्री झाल्यावर, त्याने आपला मोर्चा एका विवक्षित अकाउंटकडे वळवला. याची गांड मारायची राहूनच गेलं, ही रुखरुख आजही लागली आहेच, हे लक्षात आल्यावर त्याला स्वतःच्याच अर्धवट, अपूर्ण वैराग्याची शरम वाटली. चेहऱ्यावर एक खिन्न, बिचारं हसूही उमटलं. पण त्यावरचा तोडगा आधीच शोधून काढलेला असल्याने, निश्चिन्त मानाने त्याने इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केलं.
आता पाळी व्हॉट्सऍपची. काय वाटेल त्या कारणासाठी तिकडे भूछत्रांप्रमाणे उगवलेल्या असंख्य समूहांतून तो कधीच बाहेर पडला होता. पण तिथे शिल्लक असलेल्या फक्त एकाच चॅटमध्ये जन्मोजन्मांपासून गुंतले आहेत, असे वाटावेसे प्राण त्याला कधीच सोडवता आले नाहीत.
इत्यलम्. You just be! 🤗🤗🤗
इतकंच टाईप करून मग तिच्या प्रोफाइल पिक्चरपाशी तो बराच रेंगाळला. तिला डोळे भरून साठवून घेतलं. डोक्यातल्या सगळ्या विचारमैथुनाचा निचरा फक्त तिच्याच कुशीत होतो, हे माहीत असल्याने, आताही त्याने हात आखडता घेतला नाही.
सगळे डिजिटल पाश, गुंते, संबंध, जे म्हणाल ते, जमतील तसे एकामागोमाग मोकळे केल्यावर त्याच्यात विजयश्री संचारली. कोक, फ्राईज संपून जमाना झाला होता. क्लक सॅन्डविचचा शेवटचा तुकडा तोंडात कोंबताकोंबता माझ्याकडे बघून म्हणाला ‘यूट्यूब लाईव्ह’. करोनाकाळापासून वाढवत नेलेले केस आणि दाढी हातानेच त्यातल्या त्यात विंचरून तो येशू ख्रिस्ताच्या थाटात तयार झाला. गाडीच्या मागच्या सीटवर पडलेले रनिंग शूज घातले. गो लाईव्ह वर क्लिक केलं आणि मला सोबतीला न घेताच, एकटाच धावत सुटला.
रात्रीचं रनिंग? हे माझ्यासाठी नवीनच होतं. पण किती मैल? आणि स्ट्राव्हा चालूच केलं नाही. फिटबिटसुद्धा इथेच पडलंय. त्याची पाठमोरी आकृती जेव्हा, जिथे दिसेनाशी झाली, तिथेच, त्याच्या पुढच्याच क्षणी कुणीतरी पाण्यात धप्प पडल्याचा आवाज आला, इतकंच.
परतीचे सगळे मार्ग आणि कारणं स्वखुशीने नष्ट केलेल्या एकाचं महानिर्वाण माझ्याव्यतिरिक्त आणखी कोणी लाईव्ह बघितलं असेल, कुणास ठाऊक! हा ना बुद्ध, ना सदेह वैकुंठी जाणारा तुकाराम, ना आंबेडकर, ना येशू, ना आणखी कोणी. त्यांची स्मारकं होतात, आणि याच्यासारख्या बैराग्याच्या पोलीस केसेस, इतकाच काय तो फरक आहे.