गजराच्या घड्याळाचा गजर कसा वाज़तो, हे ऐकायची कधी पाळी न आल्याने (गरज़च न पडल्याने) 'गजर झाल्यावर झोपेतून उठणे' या प्रकाराशी माझा आज़तागायत संबंध नव्हता. माझ्यासाठी "अरे मेल्या, ऊठ आता. साडेआठ वाज़ले. ऐद्यासारखं खायचं आणि लोळायचं, बास्! बाकी काही नाही", अशी आईने चालू केलेली आरती हाच खरा गजर. झालंच तर या मुख्य आरतीला ज़ोडूनच, "कामात काडीची मदत नाही","अभ्यासाच्या नावानेही शून्य", इत्यादी आरत्या गाऊन झाल्यावर, अगदीच निरुपाय झाला, की "चिटणिसांचा गुण लागलाय, दुसरं काही नाही", अशी मंत्रपुष्पांजली! पूर्वजांवरच (आणि त्यांच्या कर्तृत्त्वावरच!)असे खळबळजनक आरोप झाले, की नंतर मात्र प्रसाद वाटायला बाबा हज़र!!! मग तो प्रसाद भक्षण करून अस्मादिकांची स्वारी बिछान्यातून बेसिनवर. गॅलरीत तोंडात ब्रश धरून पुढची उरलीसुरली झोप काढायची (म्हणजे तसा प्रयत्न करायचा) आणि काकडआरती सुरू झाल्यावर दूध, अंघोळीसाठी पुन्हा घरात पाऊल टाकायचे हा दिनक्रम. पण इकडे यायच्या दिवशी विमानतळावर "अमेरिकेत कसा रे उठणार तू स्वतःचा स्वतः आणि कसं सगळं वेळेवर आवरणार भराभ्भर!" या वाक्यातली आईच्या जिवाची तगमग, ती दिनचर्या अंगवळणी पडलेल्या माझ्यासारख्या(निगरगट्टा)लाही क्षणभर भावूक (!) करून गेली ः(
चालू उन्हाळ्यात सहाय्यक अभियंता म्हणून एके ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळाली, आणि (नाईलाज़ाने) गजरावर उठणे(ही) आले. आज़पावेतो हे पद फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोऱीबंदर येथील मुख्य कार्यालयातच अस्तित्त्वात आहे, असे मला वाटत होते. आणि त्या कार्यालयातला त्या अभियंता साहेबाचा कारभार पाहून अशी नोकरी मिळणे खरंच भाग्याचे आहे, असेही वाटायचे ;) त्यामुळे सदर कंपनीकडून मला 'सहाय्यक अभियंता' पदासाठीचा प्रस्ताव आल्यावर मी त्याचा हसतमुखाने स्वीकार केला. तासाचे साडेअठरा डॉलर्स मिळत असतील, तर म्या गरीबाची घड्याळाच्या गजरावर उठण्याचीही तयारी आहे (वावा! काय पण पराक्रम!) नोकरीचा हा प्रस्ताव स्वीकारण्यामागे अमेरिकेतील शिक्षणाच्या आगामी सत्राची फी, अगदी पूर्ण नसली तरी बव्हंशी ज़मवणे आणि आज़वरच्या तांत्रिक ज्ञानाचा संगणक आणि दूरसंचार क्षेत्रात उद्योगधंद्याच्या तसेच अर्थार्जनाच्या दृष्टीने कसा फ़ायदा होतो हे पाहणे असा दुहेरी उद्देश होता (अर्थात "फ़र्स्ट थिंग्ज़ फ़र्स्ट"च्या तत्त्वानुसार, येथेसुद्धा, पहिला उद्देश पहिला आणि दुसरा उद्देश दुसरा!)
नोकरीच्या पहिल्याच दिवशी मी ठरल्या वेळी कार्यालयात न पोचल्याने, कंपनीच्या आवारातच माझ्या निरोप समारंभाची तयारी पहायला मिळेल, या विचाराने पाचावर धारण बसली होती. अर्थात, गजरावर उठण्याच्या नेट प्रॅक्टिसचाही तो पहिलाच दिवस असल्याने, मी स्वतःला उदार मनाने माफ़ केलेच होते म्हणा. ज़ोडीला बस चुकल्याचे सबळ कारणसुद्धा तयार ठेवले होते. मात्र कामाचा पहिलाच दिवस असल्याने कंपनी आपल्या नादान कर्मचाऱ्याची पहिलीच (आणि शेवटचीच) चूक पोटात घालेल असा दृढ विश्वास, आणि कार्यालयात (उशीरा) पोचलेले इतर काही समदुःखी सहकारी पाहून जिवात जीव आला. मनुष्यबळ व्यवस्थापिका (हुश्श! एच आऱ मॅनेजर किती सुलभ सुटसुटीत आहे, नाही का?!) बाईंनी स्वागत करून एका स्वतंत्र कक्षात नेले. तेथे नवीन कर्मचाऱ्यांसाठी कंपनीतर्फ़ेच एक माहितीसत्र आयोजित करण्यात आले होते. कंपनीची संरचना, काम, व्यापार, सुरक्षा, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि ज़बाबदाऱ्या यांसंबंधी आवश्यक ती माहिती दिली गेली. माहिती देणारी मनुष्यबळ खात्याची ती कर्मचारी एखाद्या हवाईसुंदरीसारखी असल्याने हे सत्र मुळीच कंटाळवाणे झाले नाही ः) आवश्यक कागदपत्रांसंबंधीची सगळी औपचारीकता आटोपून झाल्यावर मला आणि माझ्याच चमूत माझ्याबरोबर काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या माझ्या विद्यार्थीमित्रांना आमच्या चमूनायकाने (खरे तर चम्या नायकाने! पण इकडे यांना आदराने ओ एल् म्हणायचे. ओ एल् = ऑब्जेक्ट लीड!) वरच्या मज़ल्यावरील आमच्या नियोजित विभागात नेले. दरम्यान, जेवणाच्या वेळेत (कंपनीच्याच खर्चात = फुकटात) सुग्रास भोजनाचा लाभ झाला आणि गजर लावून मेहनतपूर्वक उठल्याच्या कष्टांचे फळ मिळाल्याच्या भावनेने अगदी कृतकृत्य व्हायला झाले. मग चमूतील इतर सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर ओळख करून देण्याघेण्यासाठी पाचदहा मिनिटांची 'ओळखपरेड' झाली. खरे तर तेव्हाच बारा आठवड्यांच्या या 'कैद-ए-बामुशक्कत'ची पुसटशी कल्पना यायला हवी होती. पण पुत्रप्रेमाने अंध झालेल्या (की डोळे दिपलेल्या?) धृतराष्ट्रासारखेच 'साडेअठरा डॉलर प्रतितास' पाहून माझे डोळे दिपले होते. पहिल्या दिवशीचे पाच वाज़ले आणि कोंडवाड्यातल्या ज़नावरासारखा मी बससाठी मोकाट धावलो. खरं सांगू का? माणसाने आयुष्यभर कॉलेजातला नि शाळेतला विद्यार्थीच रहावे, कधी मोठेबिठे होऊ नये, आणि नोकरीबिकरीच्या मायाजालात अडकू नये, असे त्यावेळी वाटले होते. 'आय ऍम नॉट मेड फ़ॉर धिस नाइन टु फ़ाइव्ह स्टफ़' अशी पक्की खात्री झाली होती हो मनाची!
दुसऱ्या दिवशीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मी भ्रमणध्वनी (मोबाइल फोन!) मध्ये ज़े सॉफ़्टवेअर वापरले ज़ाते, त्याचे कार्य अपेक्षेप्रमाणे चालते की नाही, हे सॉफ़्टवेअर कंपनीच्या प्रमाणभूत पद्धतीनुसार लिहिले गेले आहे की नाही, त्याचा दर्जा काय आहे, गुणवत्ता किती आहे, ते निकषांबरहुकूम आहेत की नाही, ग्राहकांना दिलेल्या वचननाम्यातली वचने सॉफ़्टवेअर पूर्ण करेल की नाही (निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष कसे आपापला जाहीरनामा प्रसिद्ध करून आपल्याला गंडवतात, तसे तर काही या सॉटवेअरमुळे होणार नाही ना?!), इत्यादी इत्यादी तपासण्या करण्याचे काम करतो. या सगळ्याला एक छान सोपा शब्द आहे, 'सॉफ़्टवेअर व्हेरिफ़िकेशन'. आता, जे लोक हे सॉफ़्टवेअर लिहितात (त्यांना 'डेव्हलपर्स' म्हणतात), ते या कामाला आणि हे काम करणाऱ्या आमच्यासारख्या पामरांना तुच्छ नज़रेने पाहतात आणि या सगळ्या धर्मकार्याची फक्त 'टेस्टिंग' अशी संभावना करतात. वास्तविक पडताळा (व्हेरिफ़िकेशन) हे तपासणी/चाचणी (टेस्टिंग) बरोबरच आणखीही काही अशा विस्तृत स्वरुपाचे काम आहे. आणि महत्त्वाचेसुद्धा आहे (तुम्ही भले कितीही काही सॉफ़्टवेअर लिहाल हो! पण ते चालायला हवे ना आणि प्रमाणबरहुकूम असले पाहिज़े ना!) त्यामुळे डेव्हलपर्सनी केलेल्या कोणत्याही हेटाळणीकडे दुर्लक्ष करून 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'च्या तत्त्वाने प्रामाणिकपणे, सचोटीने हे धर्मकार्य सिद्धीस न्यायचे हे आमच्या व्यवस्थापक साहेबांनी या पदासाठी मुलाखत घेतानाच माझ्या मनावर पक्के बिंबवण्याची खबरदारी घेतली होती. 'व्हेरिफ़ायर' किंवा 'टेस्टर' हे डेव्हलपरच्या अस्तित्त्वाला धोका असल्याची भीती डेव्हलपरच्या मनात बसली, की त्यांची मुज़ोरी बरीचशी निवळते, वगैरे कानमंत्र दिले गेले आणि माझे 'नऊ ते पाच' चालू झाले.
No comments:
Post a Comment