Thursday, September 27, 2007

... 'परी' हिच्यासम हीच!

"ऐ फूलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कराना गजब हो गया" हे अख्खं गाणं साधनासाठी चुकूनच लिहिलंय असं मला फार वर्षांपासून वाटत आलं आहे. फार वर्षांपासून म्हणजे, एक - जेव्हा हे गाणं ऐकलं-बघितलं तेव्हापासून, आणि दोन - साधना कोण आणि मधुबाला कोण हे कळायला लागल्यापासून. ज्या वयात मी माधुरीच्या 'एक-दोन-तीन' वर फिदा होऊन स्वतःला अनिल कपूर समजायला सुरुवात केली होती, त्यावेळी बबिता-नंदा, नर्गिस-मीनाकुमारी, साधना-वैजयंतीमाला या जोड्या माझ्यासाठी 'कन्फ्यूजन'चं जिवंत उदाहरण ठरायच्या. पण या सगळ्यांमध्ये आपलं वेगळेपण जाणवून द्यायची, ती एक आणि एकच - मधुबाला. मधुबालाच्या बाबतीत कधीच कन्फ्यूजन झालं नाही आणि तसं होण्याचा चान्सच नव्हता!

टपोरे पाणीदार डोळे, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे जिवंत, रसरशीत ओठ, जीव ओवाळून टाकावंसं खळखळणारं हसू, कपाळावर एकाच किंवा दोन्ही बाजूंना मिरवणारं बटेचं अर्धवर्तुळ आणि एकूणच टवटवीत व्यक्तिमत्त्वाच्या मधुबालाने कोणाच्याही मनात घर न केलं तरच नवल! मधुबालाला घडवल्यानंतर देवाने जगात सुंदर स्त्री निर्माण केलीच नाही, या माझ्या ठाम मताला अद्यापही तडा गेलेला नाही. बहुधा तिच्या जन्मानंतर देवानं तो साचाच मोडून टाकला असावा. काय योगायोग आहे पहा, मधुबालाचा जन्म १४ फेब्रुवारीचा (सन १९३३) - म्हणजे साक्षात व्हॅलेन्टाइन डे च्या दिवशीच! या दिवशी एका गुडघ्यावर अर्धवट खाली बसून तिला साधं गुलाबाचं फूल देण्याचाही योग कुणाच्या नशिबात आल होता की नाही कोण जाणे; पण हिनं मात्र उण्यापुर्‍या छत्तीस वर्षांच्या अल्पायुष्यात करोडो हृदयांवर अधिराज्य गाजवलं. वयाच्या तेराव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार्‍या मधुबालानं अशोककुमारबरोबर बॉम्बे टॉकिजच्या 'महल' (आयेगा, आयेगा, आयेगा...आयेगा आनेवला...आयेगा...) मधून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दणदणीत पदार्पणाची वर्दी दिली आणि चाहते आणि चित्रपत्रकारिता विश्वाकडून 'वीनस ऑन द स्क्रीन'ची उपाधी मिळवली. अशोककुमारबरोबर 'हावडा ब्रिज', देव आनंद बरोबर 'काला पानी', किशोरकुमारबरोबर 'चलती का नाम गाडी' आणि 'हाफ तिकीट', भारतभूषण नावाच्या ठोकळ्याबरोबर (!! अरेरे!!) 'फागुन', 'गेटवे ऑफ इन्डिया' आणि 'बरसात की रात' हे तिचे लक्षात राहण्यासारखे काही चित्रपट. माझ्या तर ते एक से एक बढकर गाण्यांमुळे आणि त्यात दिसणार्‍या मधुबालेमुळेच लक्षात राहिलेत. हावडा ब्रिज मध्ये गोड हसून, मान वेळावून "आईयेए ए ए ए ए.......मेहेरबाँ" म्हणणारी मधुबाला कोण कशी विसरेल! चलती का नाम गाडी मध्ये "एक लडकी भिगी भागी सी" मधली साडीचा पदर पिळताना वैतागलेली आणि किशोरकुमारला करारी नजरेने खुन्नस देणारी, "पाँच रुपय्या बारा आना" मध्ये त्याच्याचबरोबर बागडणारी आणि निरागसपणे, अल्लडपणे त्याला "हाल कैसा है जनाब का" विचारणारी खट्याळ 'रेणू' कशी बरं लक्षात राहणार नाही?! गेटवे ऑफ इन्डिया मधली "दो घडी वो जो पास आ बैठे" म्हणणारी शांतस्वभावी, मंद हसणारी मधुबाला, काला पानी मध्ये "अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना" म्हणूण देव आनंदच्या नाकदुर्‍या काढणारी मधुबाला आठवणींच्या पडद्यावरून कशी पुसली जाईल? आणि तिच्या कारकिर्दीचा कळस ठरलेला 'मुघल-ए-आझम' - तो कसा विसरता येईल? "मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे" म्हणताना लाजून घूंघट उचलणारी पण त्याचबरोबर भर दरबारात षंढ सलीमला त्याच्या(च!) बापासमोर(च!) छातीठोकपणे "जब प्यार किया तो डरना क्या"विचारणारी अनारकली - विसरू शकू आपण तिला? मुळीच नाही!

या सौंदर्यदेवतेचं पडद्यामागचं आयुष्य मात्र बरंचसं इतरांसाठी जगण्यातच गेलं. आधी दिलीपकुमारची (आइच्यान!!!...दिलीपकुमार????? :( ) प्रेयसी म्हणून, मग किशोरकुमारची बायको म्हणून आणि सदान् कदा अताउल्ला खान या 'पठाणाची मुलगी' म्हणून. दिलीपकुमार आणि मधुबालाचा रोमान्स 'ज्वार भट्टा'च्या (सन १९४४) सेट्सवर चालू झाला, 'तराना' (१९५१) च्या वेळी भरात आला. 'नया दौर'च्या वेळेचे शूटिंगचे शेड्यूल दिलीपकुमारने आपल्या मुलीशी रोमान्स करण्यासाठी सोईचे असे बनवून घेतले आहे, या कारणास्तव अताउल्लासाहेबानं विरोध केला आणि मधुबालाची 'नया दौर' मधून हकालपट्टी होऊन वैजयंतीमाला त्यात आली. सायनिंग अमाउन्टच्या वादावरून निर्माते बी आर चोप्रा यांनी मधुबालाला कोर्टात खेचले आणि दिलीपकुमारने तिच्या व अताउल्लांच्या विरोधात शपथपत्र दिले. सहा वर्षांचा रोमान्स सहा मिनिटांपेक्षा कमी वेळात संपला. किशोरशी मात्र तिचा संसार तसा (बर्‍यापैकी) सुरळीत(च) पार पडला (किशोर अगदी रंगेल गडी असूनसुद्धा!) तिच्या हृदयाला भोक असल्याचे निदान होऊन ती लंडनला उपचारांसाठी गेली आणि तिकडून 'केवळ काही दिवसांचीच पाहुणी'चं सर्टिफिकेट घेऊनच आली. तरीही न खचून जाता तिने राज कपूर बरोबर सिनेसृष्टीत पुनरागमन करायचा प्रयत्न केला. पण सततच्या आजारपणामुळे तो यशस्वी ठरला नाही. डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का देत लंडनहून आल्यावर मधुबाला ९ वर्षे जगली! ५० च्या दशकात तिच्या हॉलिवूडमधल्या पदार्पणाचेही प्रयत्न चालू झाले होते. 'थिऍटर आर्ट' सारख्या मासिकात तिच्यावर पानभर मोठ्या छायाचित्रासह एक लेखही छापून आला होता. पण तिचे हॉलिवूड पदार्पण तसेच राहून गेले. अन्यथा मर्लिन मन्रो वगैरेंसारख्यांना तिने टफ फाइट दिली असती, यात शंकाच नाही. २३ फेब्रुवारी १९६९ ला, आपला ३६ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर १० दिवसांत मुमताज बेगम जेहान् देह् लवी - अर्थात आपल्या लाडक्या मधुबालाने सगळ्यांचा कायमच निरोप घेतला. गंमत अशी की त्या काळात तिच्यावर जी शस्त्रक्रिया होऊ शकली नाही किंवा अयशस्वी झाली, ती सध्या बरीच कॉमन समजली जाते.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला मधुबाला वेगवेगळ्या रूपांत दिसत आली आहे. अगदीच नकळत्या वयात मला ती नेहमीच परीकथांमधली पांढराशुभ्र फ्रॉक घातलेली, पाठीवर दोन पंख आणि हातात जादूची कांडी असलेली परी वाटायची. चलती का नाम गाडी मधली तिची खट्याळ, अल्लड, केसांना दोन रिबिनी बांधलेली निरागस रेणू कॉलेजात जाणार्‍या ताईसारखी वाटली. काला पानी मध्ये ती देवआनंदची प्रेयसी नाही, तर माझी स्वतःची गर्लफ्रेन्ड वाटली. तीच गोष्ट 'मिस्टर एन्ड मिसिज ५५' ची. आणि इतकी सालस आणि सोज्वळ की असे 'बायको मटिरिअल' आईपुढे उभे केले असते, तर तिने हसतहसत, आनंदाने होकार दिला असता ;) मधुबालानंतर माधुरी दिक्षित सोडून इतर कोणातही असा 'कुलीन गृहकर्तव्यदक्षपणा' सापडला नाही, आणि कदाचित सापडायचाही नाही. माधुरीचं मराठमोळेपण कोळणीची चोळी घालून "हमको आजकल है इन्तजार" वर नाचताना जितकं प्रसन्न आणि 'ऑब्विअस' आहे, तितकंच मधुबालाचं निर्मळ, शालीन असणं प्रसन्न आणि स्वाभाविक आहे. मराठमोळी मधुबाला पहायची असेल, तर परकर-पोलकं नेसून आणि काळ्या रिबिनी बांधून केसांच्या दोन वेण्या घातलेली 'नाच रे मोरा अंब्याच्या वनात'वर नाचणारी मधुबाला इमॅजन करा ;) म्हणजे मी काय म्हणतोय, ते ध्यानात येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकदा ती माझ्या लेखनाची प्रेरणा ठरली आहे. भिंतीवरच्या तिच्या भल्यामोठ्या पोस्टरशी संवाद साधताना अस्वस्थ शब्दांना प्रसन्नतेकडे जाण्यासाठीचं तिकीट मधुबालानं फाडावं; तिला कुर्निसात करूनच शब्दन् शब्द कागदावर उतरावा, आणि भानावर यायच्या आत एखादी कविता किंवा गझल तिकडे अवतीर्ण व्हावी; केवळ शब्दांनाच नव्हे, तर मनालाही उभारी यावी, आणि या देवतेला मनोमन मानाचा मुजरा करून आपण एक 'फ्रेश' सुरुवात करायला घ्यावी, यापेक्षा अधिक समर्थ प्रेरणा दुसरी काय असेल? पडद्यावरचा तिचा सफाईदार वावर, कधी लडिवाळ, कधी करारी तर कधी धीरगंभीर, अश्रूपूर्ण डोळ्यांनी आणि कमनीय भिवयांनी बोललेले लाखो संवाद आणि गालावरच्या खळीतून उधळलेले आनंदाचे कित्येक क्षण कैक लोकांच्या आयुषातले हजारो सेकंद उजागर करून गेले असणार, यात शंकाच नाही. मधुबाला 'हॉट' नव्हती, सुंदर होती. शी वाज नॉट 'हॉर्नी', शी वाज ब्यूटिफुल. ती केवळ नावापुरती नाही, तर लौकिकार्थानं 'वीनस ऑन द स्क्रीन' होती, 'गॉडेस्' होती याबाबत दुमत नसावे. मधुबाला हे फक्त एक व्यक्तिमत्त्व, सौंदर्य, वाद, गॉसिप्स, झगमगाट नाही; ते एक चिंतन आहे, समाधी आहे, असं मला वाटतं. आणि अशी समाधी लागली की मी नेहमीच म्हणतो -
दो घडी वो जो पास आ बैठे, हम जमाने से दूर जा बैठे...

...झाल्या बहु, होतीलही बहु, 'परी' हिच्यासम हीच...


लेखातील चित्रपटविषयक व इतर माहितीपूर्ण संदर्भः विकिपिडिया
छायाचित्रांचे सौजन्यः गूगल इमेज सर्च