Tuesday, June 06, 2006

जगाच्या राजधानीतून - ३



डुलतडुलत मिस न्यू जर्सी समुद्राच्या रँपवर कॅटवॉक करत होती आणि आम्ही आसपासचे सौंदर्य न्याहाळण्यात रंगून गेलो होतो. न्यूयॉर्कच्या किनाऱ्यापासून दूर ज़ाताना मॅनहॅटन स्कायलाइन, जगप्रसिद्ध ब्रूकलिन पूल, डाव्या हातास न्यू जर्सी आणि उजवीकडे न्यूयॉर्क असे विहंगम दृश्य दिसत होते. ज़ोडीला भुर्ऱकन ज़ाणारी अमेरिकन तटरक्षक दलाची एखादी नौका आणि आकाशातून न्यूयॉर्क दर्शन घडवण्याची ज़बाबदारी पेलणारे एखादे हेलिकॉप्टर (अमेरिकेत या वाहनाला चॉपर म्हणायचे बरे का! ;)) होतेच. पहिला थांबा होता एलिस बेटाचा ज़े लिबर्टी बेटाच्या बाज़ूलाच आहे. पण एलिस बेटावर एक संग्रहालय आणि छान हवा या यतिरिक्त दुसरे काही नसल्याचे मावशीबाईंनी सांगितल्याने आम्ही तेथे उतरलो नाही. पाचच मिनिटात मिस न्यू जर्सी लिबर्टी बेटाकडे सरकल्या आणि 'हाऽऽ', 'ओऽऽ' च्या गजरात जनतेने आपापले कॅमेरे सरसावले. मिस न्यू जर्सींची स्वातंत्र्यदेवतेला हळुवार प्रदक्षिणा चालू झाली आणि वेगवेगळ्या कोनांमधून त्या देवीला कॅमेऱ्यांच्या क्लिकक्लिकाटांचे दंडवत लाभले.
आता देवी आली म्हणजे तिची कथाही आलीच! हा अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा फ़्रान्सने अमेरिकेला आंदण म्हणून दिला. त्यावेळी तो तांब्याचा की ब्राँझचा होता. त्याला छान झळाळी होती. कालांतराने त्यातील तांब्याचे ऑक्सिडेशन होऊन हिरव्या रंगाचा तांब्याच्या ऑक्साइडचा थर तयार होऊन पुतळ्यावर ज़मा झाला आणि आता हा पुतळा हिरवट पिस्ता रंगाचा झाला आहे. न्यूयॉर्कमधील अनेक टोलेजंग इमारतींच्या छतांचा रंग हिरवा असण्याचीही हीच हकीकत आहे. आणि ती इत्थंभूत सांगणारा माहितीफलक पुतळ्याच्या चरणी समर्पित आहे, हे वेगळे सांगायलाच नको. मी मात्र अगदी अलीकडेपर्यंत हा पुतळा ताजमहालाच्या रंगासारख्या पांढऱ्याशुभ्र रंगाचा आहे, असेच समज़त होतो आणि सगळी माहिती वाचून झाल्यावर, ऑक्साइडचा थर खरवडून काढून पुतळ्याला पूर्वीची झळाळी प्राप्त करून देण्यासाठी हा धनवान देश काहीच का करत नाही, असा प्रश्न माझ्या बालमनाला पडल्यावाचून राहिला नाही.
पुतळा ज्या चबुतऱ्यावर उभा आहे, तेथे पुतळ्याच्या पायथ्याशी असलेल्या सज्ज्यातून दूरस्थ न्यूयॉर्कचे सुंदर दर्शन घडते. तसेच पुतळ्याच्या मुकुटातूनही शहराचे अतिसुंदर दृश्य दिसते. दुर्दैवाने आम्हांला या दोन्ही ठिकाणी ज़ाता आले नाही. अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांसाठी हे स्थळ बंद करण्यात आले होते. अलीकडेच ते पुन्हा खुले करण्यात आले आहे. पुतळ्याच्या उज़व्या हातात उंचावलेली मशाल असून तिची ज्योत सोन्याची आहे. डाव्या हातात एक पुस्तक असून त्यावर ४ जुलै १७७६ लिहिले आहे. हा नक्कीच अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा असणार ज़ो थॉमस जेफ़रसनने तयार केला होता (तारखेवरून आठवले. अन्यथा माझे इतिहासज्ञान फ़ारसे स्पृहणीय नाही!) पुतळ्याचा डावा पाय खंबीरपणे रोवला असून उज़वा पाय पुढचे पाऊल टाकण्यासाठी किंचितसा उचलला आहे. खंबीरपणे रोवलेले पाऊल हे अमेरिकन सामर्थ्याचे प्रतीक आहे. या देशाने आर्थिक आणि राजकीय क्षितिजांवर लावलेले प्रगतीचे झेंडे, विज्ञान-तंत्रज्ञानात केलेली प्रगती, शिस्तबद्ध जीवनमान आणि पायाभूत सोईसुविधांचा विकास यांद्वारे जगात पक्के केलेले स्थान म्हणजे या स्वातंत्रदेवतेचे खंबीर पाऊल. उचललेले उज़वे पाऊल म्हणजे सतत प्रगतीशील आणि गतीशील असल्याची निशाणी. नवी क्षितिजे पादाक्रांत करण्याची महत्त्वाकांक्षा (ज़से मध्यपूर्वेतील इराक, सिरीया वगैरे ;)) आणि अवघ्या जगाचे नेतृत्त्व करण्याच्या क्षमतेचे प्रतीक. उंचावलेली मशाल म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, प्रगतीकडे ज़ाण्याची दिशा दाखवणारा दिशादर्शक (म्हणजे आम्ही नायक आणि तुम्ही अनुयायी. "आमच्या मागून यायचे हं बाळांनो, मस्ती करायची नाऽही!" असा भावार्थ ः)) (हे सगळे स्थलकालोत्पन्न विचार असून त्यांच्याशी या भटकंतीचा वाटाड्या या नात्याने माझ्यातला लेखक सहमत असेलच असे नाही ः)), बुशसाहेब मात्र नक्कीच असतील)
हल्ली ही देवता ज़राशी काळवंडली आहे. तो वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे की अमेरीका नावाच्या आपल्या लेकराची वाटचाल याचि देही याचि डोळां पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे, हे तीच सांगू शकेल ;)
या ठिकाणी सगळ्याच पर्यटकांनी भरभरून फ़ोटो काढले. मूर्तीची भव्यता एकाच दृष्टिक्षेपाच्या आवाक्यापलीकडची आहे खरी. भालचंद्र नेमाड्यांनी 'कोसला' मध्ये अजिंठा लेण्यांचे वर्णन करताना म्हटल्याप्रमाणे याही ठिकाणी मूर्तीवर वारंवार डोळे फिरवावे लागतात. मूर्ती पाहणे इतकेच आपण करू शकतो (ती 'समज़ते' फक्त अमेरिकेलाच बहुतेक!) तिच्या कपड्यांवरील चुण्यांपासून ते सुबक बांध्यापर्यंत, हातातील पुस्तकापासून ते रेखीव मुकुटापर्यंत सगळेच वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. पहावे आणि नक्कीच पहावे यासारखे काहीतरी.
या बेटावर पर्यटकांच्या सोईसाठी एक उपाहारगृह कम विश्रांतीगृह आहे. पर्यटनस्थळ असले तरी शिस्त, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था लक्षणीय आहे. मूर्तीवर किंवा चबुतऱ्यावर तर सोडाच, पण तेथील साध्या भिंतींवरसुद्धा 'विजू लव्ह्ज़ मुक्या'सारखी किंवा इतर ('भ'/'म' कारी) मुक्ताफळे कोणीही उधळलेली नाहीत. कोणाच्या घराण्याचा उद्धार केलेला नाही, की कोणाचा दूरध्वनी क्रमांक लिहिलेला नाही. शिवाजीमहाराजांनासुद्धा त्यांचे गडकिल्ले या ज़ागेइतके स्वच्छ आणि त्यामुळेच सर्वार्थाने पवित्र राहिलेले नक्कीच आवडले असते.
आणखी खूप वेळ तिथल्या सदैव ताज्या वाटणाऱ्या पिवळ्यापोपटी हिरवळीवर बसून मूर्तिचिंतन करण्याचा विचार होता, पण एका सुरक्षा रक्षकाने सायंकाळी पाच वाज़ता नम्रपणे 'आता घरी ज़ाण्याची वेळ झाली' असे सांगितले (दंडुका आपटत 'चलो चलो चलो' केले नाही, त्यामुळे थोडे चुकचुकल्यासारखे झाले खरे!) त्यामुळे पुन्हा बेटावरील धक्क्याकडे पावले वळली. 'मिस न्यू जर्सी'चा कॅटवॉक पुन्हा अनुभवायचा होता ः)

No comments: