Wednesday, March 07, 2007

ऍडवायज़र <-> बडवायज़र <-> अपार्टमेंट <-> डिपार्टमेंट (३) - अ

सध्या अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये पैशाची अतिशय चणचण भासते आहे, असे सगळीकडे ऐकायला मिळते. त्याला अनुसरूनच, पदव्युत्तर शिक्षणासाठी इकडे येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना विद्यापिठाकडूनच आर्थिक मदत मिळण्याचे सुगीचे दिवस आता सरलेत. कोणत्याही ज्ञानशाखेत केवळ 'मास्टर्स' करायचे असेल, तर विद्यापिठाकडे पैसा नाही; मात्र 'डॉक्टरेट' करायची असेल, तर शुल्कमाफ़ी आणि ज़ोडीला अध्यापन अगर संशोधनात प्राध्यापकांना सहाय्य करण्याच्या मोबदल्यात मासिक भत्ता द्यायला ज़वळपास सगळीच विद्यापिठे एका पायावर तयार आहेत. आमचे विद्यापीठही याला अपवाद नाही. मात्र पैसा नसल्याची ओरड करणाऱ्या विद्यापिठांमधील एकेका प्राध्यापकाची विद्यापिठीय जन्मकुंडली (म्हणजे त्यांनी आतापर्यंत विद्यापिठात राहून काय काय संशोधन केले आहे, कुठले कुठले विषय शिकवले आहेत इ.) पाहिली, की त्यात सगळेच शुभग्रह धनलाभाच्या घरात ठाण मांडून बसलेले दिसतात. आणि गंमत म्हणजे या घरात कधीच शनी वक्री किंवा राहूकाल वगैरे प्रकार नसतो!
विद्यापिठात पाय ठेवताक्षणी 'मध्यमवर्गीय' भारतीय विद्यार्थ्याने करावयाची गोष्ट म्हणजे प्राध्यापकांच्या भेटीगाठी घेणे आणि कुणाकडे काही छोटेमोठे संशोधन संबंधित काम असेल, तर ते बिनपगारी करण्याची तयारी दर्शविणे. त्यामागे, पुढेमागे या महाशयांना आपले काम आवडेल, आणि आपल्याला पुढच्या सत्रापासून शुल्कमाफ़ी तसेच मासिक भत्त्याची दिवाळी भेट मिळेल, हे प्राध्यापक महोदय मग आपल्याला प्रबंधलेखनात नि संबंधित संशोधनात मार्गदर्शन करण्यासाठी आपले 'ऍडवायज़र' होतील, अशी भाबडी अपेक्षा! आल्याआल्याच ज्या महाभागाला आपण ओळखतही नाही, त्याच्यावर 'इंप्रेशन' मारायचे म्हणजे काय काय करायला लागते, यासंबंधीचे आवश्यक (?!) मार्गदर्शन इतर सिनिअर मंडळींकडून झालेले असतेच. प्राध्यापकाला आधी पत्र लिहून, त्यासोबत आपला 'रेझ्युमे' ज़ोडून भेटीची वेळ ठरवणे, इथपर्यंत बहुतेक सगळेच विद्यार्थी यशस्वी होतात, आणि भेटीच्या दिवशी ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच प्राध्यापकाच्या कार्यालयाबाहेर येऊन बसतात. २००५ सालच्या ऑगस्ट महिन्यात मी सुद्धा असाच एका विद्वानाच्या कार्यालयाबाहेर ताटकळत होतो.
"कम इन छ.. छचछ..क..र..पॅ.. नि.." माझ्याच नावातली शेवटची तीन अक्षरे उच्चारल्याची ज़ाणीव जेव्हा मला झाली, तेव्हा मी आत ज़ायला उठेपर्यंत प्राध्यापकसाहेब स्वतः मला रीतसर आत घेऊन ज़ाण्यासाठी आले होते. त्यांच्याशी हस्तांदोलन करून आत गेलो नि त्यांच्या समोर बसलो. माझी प्राथमिक ओळख वगैरे करून दिल्यानंतर मग मुद्द्याचे बोलणे चालू झाले.
"सो विच ऑफ़ माय प्रॉजेक्टस फ़सिनेट यू द मोस्ट?" या त्यांच्या प्रश्नाला मी पाठ केलेले उत्तर दिले. आदल्या रात्री साहेबांची प्रॉजेक्टस नज़रेखालून घालून त्यांवरची टिपणे तयार करण्यात, त्यांच्याशी संबंधित तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात मी जी तन्मयता आणि वेळ खर्च केले होते, तेच मी इंजिनिअरींगला असताना तेव्हाच्या अभ्यासात केले असते, तर फ़र्स्ट क्लास ऐवजी डिस्टिंक्शन नक्कीच मिळवले असते.
"बट यू सी धिस प्रॉजेक्ट हॅज़न्ट गॉट एनी फ़ंडस यट! आय हॅव फ़ाइल्ड ए नाइस प्रपोज़ल फ़ॉर इट ऍंन्ड आय ऍम होपिंग टु गेट टु मिलिअन डॉलर्स फ़ॉर इट. बिसाइडस दॅट रेस्ट ऑफ़ माय प्रोजेक्टस आर बिंग हॅन्डल्ड बाय माय पी एच डी स्टुडन्ट्स ऑलरेडी. सो डु यू वॉंट टु वेट फ़ॉर द अप्रूव्हल फ़ॉर धिस वन?"
माझ्या वडिलांच्या चाळीसएक वर्षांच्या सरकारी नोकरीत त्यांनी घेतलेल्या पगारांची नि भत्त्यांची बेरीज़सुद्धा दोन मिलिअन डॉलर्स झाली नसती. मी न म्हणण्याचा प्रश्नच नव्हता; पण महाशयांच्या आणखीही अटी होत्याच.
"यू विल ऑल्सो हॅव टु टेक माय कोर्स इन द नेक्स्ट सेमेस्टर ऍंड ऑब्टेन ऍन ए ग्रेड इन इट. बाय द वे शी इज़ माय वाइफ़ एलिया..." संगणकाच्या पडद्यावरील आपल्या नि आपल्या सौभाग्यवतींच्या, ग्रीसच्या कुठल्याशा समुद्रकिनाऱ्यावर घालवलेल्या सुटीतील, 'स्क्रीनसेव्हर' म्हणून अवतरलेल्या एका फ़ोटोकडे निर्देश करून ते म्हणाले.
"ही आमची कवळ्याची शांतादुर्गा. हे माझे आईबाबा. आणि ही माझी गर्ल..फ़्रें....." 'सांगू का मी पण सांगू' या आवेशात पण मनातल्या मनातच मीही.
म्हणजे आता पुढच्या सत्रापर्यंत थांबायचे? तोवर एखादी कामचलाऊ नोकरी करणे आलेच. नोकरी, अभ्यास सांभाळून यांचे काम करायचे म्हणजे मी लवकरच निजधामाच्या वाटेवर निघणार, हे मला डोळ्यांसमोर दिसू लागले.
"वुड यू लाइक टु हॅव सम फ़्राइज़? लेट अस गो फ़ॉर लंच इफ़ यू आर नॉट डुइंग एनिथिंग ग्रेट" महाशय खाण्यापिण्याच्या बाबतीत अगदी उदार दिसतायत. पण आज़च्या संकष्टीच्या दिवशी यांच्याकडे साबुदाणा खिचडीची मागणी कशी करायची? बरे पहिल्याच भेटीत कॉफ़ी किंवा सरबत तरी कसे मागायचे? माझा भिडस्तपणा असा नको तिथे नडतो! शेवटी कशीबशी उरलीसुरली भेट संपवून बाहेर पडलो. इतर दोन प्राध्यापकांकडूनही ज़वळपास सारखीच उत्तरे मिळाली. कोणाकडेच बिनपगारी काम न करता मी गपगुमान माझे स्वतःचे काम करायला सुरुवात केली.
माझ्याचसारखे अनुभव इतर काही मित्रांनाही आले होतेच. अशाच एका संध्याकाळी घराबाहेरच्या कट्ट्यावर अड्डा ज़मला असताना सगळ्यांनी आपापले अनुभव वाटून घेतले.
"अरे वो बंदा बोला उसको सी प्लस प्लस मे कोड करनेवालाही कोई चाहिये"
"क्या बात कर रहा है! मुझे तो बोला प्रॉजेक्ट मे सी प्लस प्लस की कोई ज़रूरत है ही नही वैसे. अजीब आदमी है यार!"
"मैने तो सोचा था उसके लिये वो गणेशजी की छोटीवाली मूर्ती और एक बॉक्स आग्रे का पेठा लेके जाउंगा. पर भूल गया..."
"अबे तू प्रॉफ़ के पास जानेवाला था की मंदिर में? पागल हो गया है क्या तू?"
अशी कित्येक सुखदु:खं मी पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या दोनेक महिन्यात बऱ्याचदा ऐकली होती.
अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सत्रात मात्र एका भारतीय प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र संशोधन करण्याची संधी मिळाली आणि तिथूनच ऍडवायज़र या व्यक्तिरेखेशी ज़रा ज़वळून संबंध आला.

Friday, March 02, 2007

बायको


'बायको' या शब्दाशी ओळख पहिल्यांदाच झाली, ती परीकथांमधून. राजाची 'बायको' म्हणजे राणी; वाघीण किंवा सिंहीण ही सुद्धा अनुक्रमे वाघाची नि सिंहाची 'बायको'च असायची. अगदी रामायण-महाभारतापासून ते अलीकडच्या परीकथांपर्यंत सगळीकडे राक्षससुद्धा कोणाला पळवायचे असले, की नेमका 'बायको'लाच पळवायचा. त्यामुळे 'बायको' ही जगातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे, अशी बालमनाची पक्की समज़ूत झालेली. परिणामी, "यावर्षी वाढदिवसाला काय घ्यायचं बंड्याला?", असं आजीने विचारलं की मीही बिनधास्त "आजी, आपण मला बायको घेऊया का?" म्हणत असे. मुंजीच्या वेळी मामालाच "मुलगी बायको म्हणून दे नाहीतर चाललो काशीला!", असे धमकावून सांगायची संधी मिळाली खरी, पण माझ्या परमप्रिय प्रतापी मामेबहिणीकडून बार्बी, मोटारगाड्या आणि भातुकलीवरून गालावर उमटवून घेतलेली बोटं आणि ओरखडे (वेळीच!) आठवले आणि 'काशी नको, पण ही महामाया आवर' स्थितीत मामाही स्वस्तात सुटला. अशा 'बायको'ला राक्षस का नि कसा पळवतो, याचं राहून राहून आश्चर्य वाटायचं.
परीकथांचे दिवस संपले आणि बायको ही संकल्पनाही हळूहळू बदलत गेली. एक पळवायची गोष्ट या स्थानावरून 'बायको'ला बढती मिळाली आणि ती उटीच्या बॉटनिकल गार्डनवरच्या उतरत्या हिरवळीवरून सलमान खानबरोबर लोळत येणारी 'मैंने प्यार किया' मधली भाग्यश्री पटवर्धन (पटवर्धन!), 'कयामत से कयामत तक' मधल्या आमीर खानला मागून धावत येऊन मिठी मारणारी जुही चावला किंवा झालंच तर ज्याचं नावही आज़ आठवत नाही अशा तद्दन टुकार चित्रपटातली, मिथुन चक्रवर्तीने झोपेतच हात पकडला म्हणून (आनंदाने!!!) दचकलेली रती अग्निहोत्री, अशा निरनिराळ्या (हव्याहव्याशा!) रुपात समोर यायला लागली. 'हम आपके हैं कौन' मधली सोज्वळ माधुरी हीच बायको आणि 'सबसे बडा खिलाडी' मध्ये कितीतरी मादकपणे 'भरो, मांग मेरी भरो' गाणारी ममता कुलकर्णी (कुलकर्णी!!) ही ('मांग मेरी भरो' म्हणाल्याने कितीही वाटली तरी) बायको नाहीच, हे सुद्धा व्यवस्थित समज़ायला लागलं. शाळेतलं आपलं पहिलं क्रश म्हणजेच आपली बायको, या समज़ुतीतून मग कविताबिविता लिहिणं, तिच्याचसाठी मधल्या सुटीत मैदानात भटकणं, ती शाळेत यायच्याआधी नि शाळा सुटल्यावर तिच्या बसस्टॉपवर घुटमळणं असली मजनुगिरी; आणि याचंच थोडं 'ज़ाणकार'(!) रूप म्हणजे कॉलेजात साज़रे केलेले व्हॅलेंटाइन डेज़, रोझ डेज़, भेट म्हणून दिलेली चॉकलेटं वगैरे सगळं. बहुभार्याप्रतिबंधक कायदा वगैरे गोष्टींच्या अस्तित्त्वाचीही ज़ाणीव नसल्याने या सगळ्या गोष्टी केवळ एकाच मुलीपुरत्या मर्यादित न ठेवता आज़वर 'बायको'साठी म्हणून निश्चित केलेल्या निकषांवर खरी उतरणारी किंवा उतरवली ज़ाणारी कुणीही मुलगी लैलाच्या भूमिकेत चपखल बसायला लागली आणि आयुष्यातलं बायकोचं स्थान पटकावायला कित्येक पर्याय उपलब्ध झाले.
तेही वय मागे पडल्यानंतर मात्र मित्रमैत्रिणींसोबत दंगामस्ती नि उनाडक्या करण्याबरोबरच बायको 'कशी' हवी, 'का' हवी अशा अनेक प्रश्नांवर 'गंभीर' या प्रकारात मोडणाऱ्या चर्चा होऊ लागल्या. 'दिल चाहता है' मध्ये 'जो खुद जिये और मुझे जिने दे, ज़्यादा इमोशनल-विमोशनल ना हो' म्हणून आमीर खानने 'बायको'ला आणखी एक 'डायमेन्शन' ('मिती' हा काय बोअर शब्द आहे!) दिलं. सासूसुनांच्या मालिकांमधून स्मृती मल्होत्रा ज़शी बायको असू शकते, तशीच सुप्रिया पिळगावकरही बायको असू शकते, हे सुद्धा ज़ाणवलं. मग मला समज़ून घेणारी, माझ्या आवडीनिवडींशी बऱ्यापैकी मिळत्याज़ुळत्या आवडीनिवडी असणारी, मतमतांतरांचा आदर करणारी नि त्याबरोबरच स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करू शकणारी, सुखदु:खात साथ देणारी, उच्चशिक्षित नि नोकरी करणारी, माझ्या आईबाबांचा आदर असणारी पण तरीही बऱ्यापैकी 'मॉड' (म्हणजे काय ते अज़ून माहीत नाही!) वगैरे वगैरे 'स्टिरिओटिपिकल' अपेक्षा असणं ओघाओघाने आलंच. माझ्या मित्रमंडळींपैकी अनेकांनी तर पदवीधर झाल्याझाल्या आपापली 'प्रकरणं' रीतसर 'अप्रूव्ह'ही करून घेतली. मायदेशापासून हज़ारो मैल दूरवर आमच्या इनबॉक्समध्ये चक्क मित्रमैत्रिणींच्या लग्नाच्या आमंत्रणपत्रिका येऊन पडू लागल्या! नको त्या वेळी आपल्यालाही या दिव्यातून कधी तरी ज़ावं लागेल, अशी भयानक ज़ाणीवही झाली. पण त्याचबरोबर 'मुलगा गझलाबिझला, कविता लिहितो म्हणे', 'पुढे आणखी शिकायचं म्हणतोय हो, बघा बुवा काय ते!', झालंच तर 'बाकी सगळं ठीक आहे, पण तसं बऱ्यापैकी दिसण्याइतकं (!) पोट आहे (?!)' असे (अगदी आमच्या खात्यापित्या घराण्यावर ज़ाणारे!) अनेक शेरेही मिळणारच, याची खात्री झाली, की लगोलग सुरक्षिततेची भावनाही निर्माण व्हायची. बायको हे किती अजब रसायन आहे, हे आज़वर इतरांच्या अनुभवांवरून, बोलण्यावरून, (अगदी प्रसाद शिरगावकरांच्या 'बायको नावाचं वादळ' सारख्या भन्नाट साहित्यकृतींवरूनसुद्धा) लक्षात आलंच होतं. म्हणजे उद्या मी (ज़र!) गज़रा घेऊन आलो(च!), तर तो माळून मला स्वतःबरोबर मटार सोलायला बसवणारी बायको आवडेल, की नाटकाला ज़ाऊया म्हटल्यावर "डार्लिंग, किटी पार्टीला ज़ाऊया का आज़चा दिवस?" विचारणारी बायको आवडेल, हे ज़ोवर ठरवता येत नाही, हॉटेलात जेवल्यावर माझ्याच ग्लासातून रोझ मिल्कशेक पिणारी बायको हवी की शँपेनचा ग्लास उंचावून 'चिअर्स' करणारी बायको हवी, हे ठरवता येत नाही (म्हणजे 'विच ऑफ़ द टु इज़ (मोअर?) बेअरेबल, हे ठरवता येत नाही! ऍक्सेप्टेबल काय आहे, हा वेगळाच मुद्दा आहे), थोडक्यात तोवर आपण 'सेफ़' आहोत, ही ज़ाणीवच सुखावह वाटते. आपण म्हणावं की "मला झोप येते आहे गं बाई!", आणि बायकोने म्हणावं "नाटकं करू नकोस जास्त, ज़रा पिल्लूचा युनिफ़ॉर्म कपाटातून काढून हँगरला लावून ठेव उद्यासाठी"; रविवारी दुपारी मस्तपैकी सोलकढी-भात नि फ़्राय पापलेटच्या जेवणानंतर चटईवर पडल्यापडल्या आपण तिच्या अंगावर हात टाकावा आणि उतू गेलेल्या दुधाच्या वासानं तिने दचकून स्वयंपाकघरात धाव घ्यावी; लग्नाआधी "आज़ संध्याकाळी कुठेतरी ज़ाऊया का"वर मी चालू केलेला फोन तास-दीड तासाने "चल बॉस आला, मी ठेवते" वर संपवणाऱ्या बायकोनेच, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी घेतलेली साडी बोहारणीला द्यायचे दिवस आले की मात्र गाडीवरची गवार घेताना "आठ रुपे में देनेका है तो बोल" म्हणताना दाखवलेले व्यवहारचातुर्य दाखवावे, आणि प्रसंगी तिनेच घरी स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय, म्हणून हॉटेलात घेऊन ज़ावं; पोराबरोबर क्रिकेटची मॅच बघताना बायकोने मस्तपैकी भजी तळावी, तीही इंडियाच्या टीमचा नि आम्हां बापलेकांचा उद्धार करतच, आणि इतकंच नव्हे तर प्रतिस्पर्ध्याची विकेट पडल्यावर आमच्या जल्लोषात तिनेही सामील व्हावं; अशा अनेकानेक 'माफ़क' अपेक्षा पूर्ण करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बायको, ही व्याख्या सर्वमान्य आहे की नाही, फ़ारच आदर्शवादी आहे की वास्तववादी वगैरे प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत, तोवर निवांत असे पानभर लेख खरडण्यास आपण पूर्ण मोकळे असतो, हे लक्षात ठेवावे नि वेळेचा असा सदुपयोग करावा.
मुंबई विद्यापिठाच्या अभियांत्रिकीच्या एखाद्या पेपरात उपटलेला अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्नसुद्धा सुसह्य ठरावा, असे हे यक्षप्रश्न ज्या परीक्षेत येतात, त्या परीक्षेत केट्या घेत पुढे ज़ाण्यापेक्षा (बरे, महत्त्वाचा मुद्दा असा की तशा त्या कधी क्लिअरसुद्धा करता येत नाहीत ) विषय फ़र्स्ट अटेंप्टच क्लिअर करावा किंवा ज्ञानशाखाच बदलून घ्यावी, अशा टोकाच्या भूमिकेचाही विचार 'मार्केट'मध्ये येऊ घातलेल्या तरुणांच्या डोक्यात घोळल्यास नवल ते काय! पण तरीही आमच्याच एका बंधुराजांकडून त्यांच्या स्वतःच्या साखरपुड्याच्या दिवशी जेव्हा "अगर शादी ऐसा लड्डू है, जो खाए वो पछताए, जो ना खाए, वो भी पछताए, तो बेटर है की खाकेही पछताओ", हे ऐकले त्यावेळी मात्र 'बायको'वर गेले दोन तास इतके मोठे पारायण खरडले, ते खरडण्याचे मला त्यावेळी कसे काय सुचले नाही, असे वाटून गेले आणि त्याचवेळी कोणत्याही विषयावर टोकाची भूमिका घेऊन चालत नाही, हे पटले. 'बायको'सारख्या नाज़ूक पण तरीही ज्वलंत विषयावर तर नाहीच!