Wednesday, February 14, 2007

या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थितागेल्या शनिवारी आमच्या विद्यापिठात हिंदू विद्यार्थी संघटनेतर्फ़े सरस्वती पूजेचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाला याआधी कधीच हजेरी लावली नव्हती आणि जूनपासून सॅन होज़ेला गेल्यानंतर रालेला कधी परत यायला मिळेल आणि असे कार्यक्रम, संमेलने यांत सहभागी होता येईल की नाही, ते सांगता येत नाही. त्यामुळे यावर्षी सरस्वती पूजेला हजेरी लावायचे नक्की केले.
विद्यापिठाच्या ज़ुन्या आवारातील (ज्याला आता ऐतिहासिक आवार(historical campus) संबोधले ज़ाते) मॅन सभागृहात आटोपशीरपणे हा सोहळा रंगला होता. देवी सरस्वतीची अतिशय प्रसन्न करणारी मूर्ती, आज़ूबाज़ूची साधीच पण तरीही नज़रेत भरणारी कल्पक सज़ावट आणि सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह यांमुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली होती. सरस्वतीचे पूजन, मंत्रपठण नि आरती आणि त्यानंतरचे प्रसादभक्षण अशा छोटेखानी कार्यक्रमात संध्याकाळचे चार-एक तास कसे निघून गेले कळलं सुद्धा नाही. पण या सगळ्या वेळेच्या सदुपयोगाचं प्रयोजन असलेल्या सरस्वतीच्या चेहर्‍यावरची कोणालाच न दिसलेली अनेक प्रश्न घरी आल्यावर चहा घेतानाही मला अस्वस्थ करत होती.
सर्व प्राणिमात्रांमध्ये विद्येच्या रूपाने वास करणार्‍या या देवीची आराधना केवळ मंत्र नि आरत्यांपुरतीच मर्यादित का म्हणून रहावी? आज़ मी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतोय; पण माझ्या भारतातच असे किती ज़ण आहेत की ज्यांना शिक्षणापासून वंचित रहायला लागतंय? गावागावांमध्ये आज़ही शिक्षणाबद्दल उदासीनता आहेच. सरकारने अनेक योजना चालू केल्या आहेत, हे खरं. मुलींसाठी मोफ़त शिक्षण, सर्वत्र मोफ़त प्राथमिक शिक्षण, अनेक सवलती नि आरक्षणे अशा कित्येक मार्गांनी सरकार शिक्षणाचा प्रचार नि प्रसार करायचे प्रयत्न करते आहे, हे आम्ही नाकारत नाही. शाळांना मिळणारी अनुदाने, भूखंड किंवा इतर प्रकारची मदत, दूरदर्शनवरील 'स्कूल चले हम', 'पूरब से सूर्य उगा', अशा एकापेक्षा एक सरस जाहिरातींद्वारे केला ज़ाणारा शिक्षणप्रचार यांचंही महत्त्व आम्हांला कळते. पण यापलीकडे ज़ाऊन सरकार ग्रामीण भागात जागृती निर्माण करण्यासाठी काय़ करते आहे, हे आम्हांला कळत नाही. ग्रामपंचायतीच्या सभांमधून आम्हांला शिक्षणाच्या योजना नि साधने यांबाबत माहिती मिळण्य़ापेक्षा किंवा ती मिळवण्यापेक्षा शेतज़मिनीवरून होणारी भांडणे, गावातील भाऊबंदकी आणि पंचायतीतील राजकारण यांत जास्त रस असतो. शिक्षणासाठी मिळालेली सरकारी मदत शाळेची इमारत उभारण्यात खर्च झाली की सरपंचाच्या घरची दारू आणण्यात, हे कळत नाही; आणि त्याबाबत विचारणा करण्याइतके सामाजिक स्वातंत्र्य, राजकीय जागरुकता यांपैकी कसलाच आवाज़ आमच्याकडे काहीच नाही. त्यामुळे आम्ही आवाज़ काढायचा म्हटला तरी तो ऐकला ज़ाण्यापूर्वीच विरून ज़ायची शक्यता अधिक.
आणि असा आवाज़ उठवण्यापूर्वी हे सुद्धा पहायला नको का की आमच्या गावांमधले किती आईबाबा त्यांच्या मुलांना - खास करून मुलींना - शाळेत पाठवतात? किती मुले सातवी किंवा दहावीच्याही पलीकडे ज़ाऊन शिकतात? जी मुले शिकत नाहीत, त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळण्याची सोय आहे का? नसते काही ज़णांना शिकायची आवड. काही ज़णांना प्रयत्न करूनही गणित, शास्त्र, भाषा इत्यादी विषयांच्या अभ्यासात, शिक्षणात गोडी निर्माण होत नाही. कबूल आहे आम्हांला हे. पण मग अशी अशिक्षित मनुष्यसंपत्ती आम्ही व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन समाजोपयोगी कार्यासाठी अधिक सक्षम केली तरी चालू शकेल नाही का? त्यादृष्टीने आमच्याकडे काय योजना आहेत? त्याबाबत किती माहिती उपलब्ध आहे नि किती जागरुकता आहे?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, तर आवश्यक आहे स्वकृती आणि माहितीचा अधिकार. सध्याचं चित्र अधिक प्रसन्न, आश्वासक, आशादायी बनवायची ज़बाबदारी माझी स्वत:ची आहे, ही ज़ाणीव प्रत्येकालाच असणं महत्त्वाचं आहे. स्वहिताच्या नि आत्मसमाधानाच्या संकुचित चष्म्यातून दिसणारं जग हे बरंच काही न दिसल्याचंच चिन्ह आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण नि आपल्याबरोबरच आपल्या येणार्‍या पिढ्यांनी शास्त्रोक्त शिक्षण घेणं आणि इतरांना ते घेण्यासाठी उद्युक्त करणं महत्त्वाचं आहे. समाजात सध्या चांगल्या शिक्षकांची कमी आहे. त्यामुळे सामाजिक जागरुकता प्रभावीपणे निर्माण होत नाही, याचं दु:ख आहेच; पण त्याबरोबरच दुसरं दु:ख आहे ते शिक्षकी पेशाला चिकटलेल्या बाज़ारीकरणाचं. "आयुष्याच्या उत्तरार्धात मला प्राध्यापक म्हणून काम करायला आवडेल", असं मी एकदा म्हटलं होतं. त्यावेळी ज़मलेल्या मंडळींकडून केला गेलेला उपहास या पेशाबद्दल असलेली सर्वदूर उदासीनताच दर्शवतो. आणि हे असंच चालत राहिलं तर सध्यच्या परिस्थितीत सुधारणा होण्याबाबत फ़ारसं आशावादी न राहिलेलंच श्रेयस्कर.


  1. परिस्थिती बदलली पाहिज़े, अशी बोंब न मारत बसता ती बदलण्यासाठी स्वत: काहीतरी करा.

  2. शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करणं, केवळ आर्थिक मदतच नव्हे तर प्रत्यक्ष सहभागातून हे कार्य साधणं, याचं महत्त्व इतर कशापेक्षाही जास्तच आहे. शाळासाठी नुसत्या देणग्या देऊ नकात, तर शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुज़ू व्हा किंवा आपल्या घरीच गरज़ू विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घ्या. त्यासाठी योग्य तो मोबदला घ्या, पण विद्यार्थ्याच्या आर्थिक पार्श्वभूमीचा यथायोग्य विचार करून, पटल्यास नि गरज़ पडल्यास त्यांना मोफ़त शिकवण्यासाठी मागेपुढे पाहू नकात.

  3. सरकारी शैक्षणिक योजनांचा प्रचार करा. सरकारकडून योग्य ती माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करा नि या अधिकाराबाबत जनसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करा. जनता नि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करता येत असेल, तर नि:संकोच नि नि:स्वार्थीपणे तसे करा.

  4. शास्त्रोक्त नि पारंपारीक शिक्षणात रस नसलेल्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, ते पहा.

या आणि अशा अनेक गोष्टी केल्या तर धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्षाला चार लाख रुपये भरणारा विद्यार्थी नि गडचिरोलीच्या कुठल्याशा पाड्यामधला कधीही शाळेत न गेलेला बालमज़ूर असं टोकाचं निराशावादी चित्र दिसणार नाही. विद्यार्थीदशेत असताना यातल्या सगळ्याच गोष्टी करता येणं शक्य नसेलही, पण जितक्या ज़मत असतील, त्या करायला तरी आपण मागेपुढे पाहू नये.


पाहूया तर प्रयत्न करून. सरस्वतीच्या चेहर्‍यावरची अनेक प्रश्नचिन्ह कदाचित आपल्याला पुसता येतील.