Saturday, May 27, 2006

वाढदिवसाची अमूल्य भेट!


आईबाबा आणि मित्रमैत्रिणींपासून हज़ारो मैल लांब असताना वाढदिवस 'साज़रा' होऊ शकतो, ही कल्पनाच मुळात असह्य आहे. त्यामुळे परवा माझ्या वाढदिवसादिवशी आणि किंबहुना त्याच्या दोन-एक दिवस आधीपासूनच 'काय कपाळ साज़रा करणार' अशी भावना झाली होती. त्यातच कार्यालयात नवीनच रुज़ू झालेला असल्याने बराच 'स्व-अभ्यास' चालू होता (ज़से स्वतःहून कॉफ़ी मेकरवर कॉफ़ी बनवायला शिकणे, इतर कर्मचाऱ्यांशी काम सोडून बाकीच्या सगळ्या विषयांवर गप्पा मारायला शिकणे, भ्रमणध्वनी प्रणाली पडताळा चमूच्या (सॉफ़्टवेअर व्हेरिफ़िकेशन ग्रुप!!!) साप्ताहिक बैठकीत चर्चेच्या मुद्द्यांपेक्षा समोरच्या अमँडाशी दृष्टीविनोद(!) करण्यातली मजा अनुभवणे वगैरे) या अभ्यासात घरी येईस्तोवर इतके थकायला होते(!) की आठवडाभराची झोप काढण्यासाठीसुद्धा वेळ मिळत नाही (कार्यालयात आणि साप्ताहिक बैठकीत झोपणे तर मुळीच परवडणार नाही! अभ्यास कसा हो होणार नाहीतर! ;)); वाढदिवस 'साज़रा' करणे तर बाज़ूलाच राहिले.

दोन दिवसांपूर्वीच विद्यापिठातला जगजीत सिंगचा गाण्यांचा नियोजित कार्यक्रम 'हाऊसफ़ुल्ल' असल्याचे कळले होते. हा कार्यक्रम माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला असल्याने तीच वाढदिवसाची भेट असा स्वतःचा आगाऊ समज़ करून घेतला होता, आणि परीक्षा झाली की बघू, म्हणून तिकिटे आरक्षित करण्यात दिरंगाई केली होती (त्याबद्दल इकडच्या समस्त देसी जनतेने मला वेड्यात काढणेही झाले होते) वास्तविक कार्यक्रमाची घोषणा, तिकिटांसंबंधी कुणाला संपर्क करायचा वगैरे माहिती तीन महिने (अति)आगाऊच मिळाली होती, पण परीक्षा आणि अभ्यासाच्या धांदलीत तिकिटे काढायचे लक्षातच राहिले नाही, आणि आता इतक्या सुंदर कार्यक्रमाला मुकावे लागणार याची हळहळ लागून राहिली होती. तरीसुद्धा देवा (आणि दैवा) वर भरवसा ठेवून काहीही झाले तरीसुद्धा तिकीट मिळवायचा प्रयत्न करायचाच या निर्धाराने अस्मादिकांची स्वारी कार्यालयातून घरी येण्याऐवजी विद्यापिठाच्या आवारात वळली.

अपेक्षेप्रमाणेच कार्यक्रमाला अलोट गर्दी होती. अनिवासी भारतीय आणि पाकिस्तानी कुटुंबे, विद्यार्थीवर्ग, नोकरदार, बाबागाडीतल्यांपासून ते काठी टेकत चालणाऱ्यापर्यंत सगळ्या वयाचे, सगळ्या प्रकृतींचे प्रेक्षक कार्यक्रमाला लाभले होते. साडी, सुरवार-कुर्ता वगैरे पारंपारिक पोषाखातल्या बऱ्याचज़णांनी यानिमित्ताने आपापला सांस्कृतिक दिन साज़रा करण्याचे मनावर घेतल्याचे दिसत होते. पण त्याचबरोबर आपण अमेरिकेत राहतो याचा बडेजाव मिरवणे चालू होतेच, जसे 'कूल' ऐवजी 'खूऽल' (!), 'वॉटर' ऐवजी 'वॉठर्र' याप्रमाणे (उत्साहाच्या भरात कोणी एक पटेल की शहा चक्क 'गिव मी टू वॉटर्स' असे म्हणाले. भावना महत्त्वाच्या म्हणून माझ्यातल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याने त्यांचे चुकीचे इंग्रजी व्याकरण पोटात घातले!) माझ्या दोन मित्रांना आयोजकांनी स्वयंसेवक म्हणून नियुक्त केल्याने आणि मी तूर्तास प्रेक्षक किंवा स्वयंसेवक कोणीही नसल्याने समाजसेवा करताना उडणारी त्यांची तारांबळ (विनातिकीट!!) बघायला मजा येत होती. पावणेदोन तासांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी एकदाचे तिकीट मिळाले. ते सुद्धा जिचे तिकीट होते, ती व्यक्ती न आल्याने. अर्थातच त्या तिकिटासाठी मला जास्त किंमत मोज़ायला लागली हे अधिक सांगणे न लगे (कार्यक्रमाचे शेवटचे तिकीट दोनशे डॉलर्सना विकले गेल्याचे ऐकले होते तेव्हा माझे खिसे दडपले होते, पण आयत्या वेळी मला मिळालेले हे तिकीट त्यामानाने चौपट स्वस्त पडले म्हणायला हरकत नाही) एका बाईंनी "अरे पैंतीस डॉलरवाला तिकीट पचपन में कैसे बेच रहे हो"चा घरगुती लढाऊपणा (अपेक्षेप्रमाणे!)दाखवला खरा, पण "अरे मेडम, डोलर चाहिये के साहब का गाना चाहिये" म्हणून आयोजकांनी बाईंना कधीच चारीमुंड्या चीत केले. शेवटी शिस्तबद्धपणे रांगेत उभे राहून सभागृहात गेलो नि स्थानापन्न झालो. तोवर जगजीतचे "होशवालों को खबर क्या" चालूही झाले होते.

मंचावर अतिशय साधी सज़ावट, समोर मध्यभागी रांगोळी, डाव्या हातास साथीला सिताऱ व बासरी, मागे गिटार नि सिंथेसायझर, उजवीकडे तबला, ढोलक आणि घुंगरू, आणि मध्यभागी गज़लसम्राट स्वतः गातोय, असे ते दृश्यच त्या संध्याकाळचे पहिले समाधान देऊन गेले. जिवाचा कान करून मी शब्दन् शब्द हृदयात साठवत होतो.

हम् लबों से कह न पाए उनसे हाल-ए-दिल कभी
और वो समझे नहीं ये खामोशी क्या चीज़ है

और वो समझे नहीं ये नंतरची शांतता खूप काही सांगून गेली. त्यानंतरची खामोशी टाळ्यांच्या कडकडाटात नि 'वाहवा', 'क्या बात है' च्या गजरात कुठेशी हरवून गेली. आणि त्यानंतर सुरू झाला शब्द आणि सुरांचा चमत्कार.

गज़ल ही खरी शब्दप्रधान गायकी. पण जगजीतच्या आवाज़ाने आणि सुरांनी गज़लेला शब्दांच्या पलीकडे नेले आहे. त्याला प्रत्यक्ष गाताना ऐकले की गीताच्या बोलांपेक्षा त्याच्या आवाज़ानेच वेड लागते. याचा अर्थ शब्दांचे मोल कमी होते असा मुळीच नाही, तर एकाच शब्दाचे किंवा शेराच्या मिसरेचे अनेक पदर तो आपल्या गायनातून उलगडून दाखवत असतो. त्यामुळे शब्दांची किंमत दुणावते असेच म्हणायला लागेल. जगजीतचा धीरगंभीर आवाज़, पण योग्य वेळी हवा तिकडे तोच गंभीर आवाज़ थोडासा खट्याळ होणं, एखाद्या मिसरेतील एक किंवा अनेक शब्द गाताना शब्दांवर ज़ोर देणं अगर शब्दांनुसार आवाज़ातले चढ-उतार सांभाळणं यांमुळे ते गाणं फ़क्त कवीचं किंवा गायकाचं न राहता आपसूक श्रोत्यांचंसुद्धा होऊन ज़ातं. तेरे बारे में जब सोचा नही था, कोई फ़र्याद तेरे दिल में दबी हो जैसे या आणि अशा कित्येक गज़लांमधून आणि कवितांमधून जगजीत सिंग नावाची जादू प्रेक्षकांना संमोहित करत होती आणि आम्ही सगळे तिच्या तालावर डोलत होतो. कोई फ़र्याद तेरे दिल में ही वास्तविक हुस्न-ए-मतला गज़ल आहे. आणि त्यातला दुसरा मतला हाच गज़लेचा गाभा किंवा हासिल-ए-गझल शेर (ज़से गाण्याचे ध्रुवपद) आहे, हे जगजीत सिंगने ती गज़ल गायल्याशिवाय पटत नाही. अर्थात याबाबत दुमत असू शकते, पण आधीच म्हटल्याप्रमाणे त्या आवाज़ातच अशी काही जादू आहे की कोणता(ही) शेर किंवा शब्द श्रोत्याच्या मनात कायमचा घर करून राहील हे गायकानेच ठरवावे आणि श्रोत्यांनी त्याला मूक मान्यता द्यावी. ऐकणाऱ्याला आपलेसे करणाऱ्या या वशीकरणाची कला लाभलेल्या निवडक व्यक्तींमध्ये जगजीत सिंग हे नाव नक्कीच आहे आणि असेलही! हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले या गालिबच्या गज़लेचा मक्ता गाताना तर जगजीत गाण्यामध्ये इतका हरवून गेला, की त्याने तो मक्ता चार-पाच वेळा गायला आणि गातागाताच त्याचा अर्थसुद्धा सांगितला. मैखाना, वाइज़ यांच्यातला उपरोधात्मक परस्परसंबंध, तो गाण्यातून तसेच विनोदातून स्पष्ट करताना तसेच इतरही काही शेर समज़ावून सांगताना त्याने दाखवलेली विनोदबुद्धी, हित्ने इन्शाची कल चौदवी की रात थी गाताना प्रत्येक शेराची सानी मिसरा टाळ्या घेत होती. 'मक्ता पेश करता हूं, इन्शाजी की गज़ल है, हित्ने इन्शा' म्हटल्यावर अवघे सभागृह कान टवकारून बसले.

बेदर्द ,सुननी हो तो चल, कहता है क्या अच्छी गज़ल,
आशिक तेरा, रुसवा तेरा, शायर तेरा, इन्शा तेरा

सानी मिसरा गाऊन झाल्यावर उमटलेले वावा-वावा आणि तोच टाळ्यांचा कडकडाट कान भरून साठवून घेतला. सरकती जायें है रुखसी नकाब आहिस्ता आहिस्ता च्या वेळी तर पहिल्या ओळीपासून श्रोत्यांनी ठेका धरला होता आणि 'आहिस्ता आहिस्ता' म्हणायला सुरुवात केली होती. हया यकलख्त आई और शबाब नंतरचे आणि दबे होठों से देते हैं जवाब नंतरचे, इधर तो जल्दी जल्दी है, उधर नंतरचे आहिस्ता आहिता तर श्रोत्यांनीच पूर्ण केले. वो बेदर्दी से सरकाते हैं अमी और मैं कहूं उनसे मधल्या बेदर्दी वर घेतलेल्या हरकती तर निव्वळ अप्रतिम! ठुकराओ के अब के प्यार करो, मैं नशे में हूं मधल्या नशा शब्द गातानाच्या वेळची त्याच्या आवाज़ातली नशा, मैं नशे में हूं वरच्या हरकती खरोखरच सगळ्यांनाच चढल्या होत्या असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. मी इथे ते लिहिण्यापेक्षा आणि तुम्ही वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष ऐकून झिंगण्यातच खरी मौज आहे. होठों से छू लो तुम, तुम इतना जो मुस्करा रहे हो, वो कागज़ की कष्टी वो बारिश का पानी या 'टिपिकल' जगजीत गज़लासुद्धा झाल्या. मात्र त्यातले माझ्या आवडीचे काही शेर त्याने न गायल्याने मी ज़रा खट्टू झालो (पण जरासाच! ः) ) काही गज़लांची चित्रपटीय आवृत्ती आणि प्रत्यक्ष मैफ़िलीतील आवृत्ती यांतला फ़रकसुद्धा ज़ाणवत होता, पण चित्रपट संगीताला मिळणारी आधुनिक तंत्रज्ञानाची ज़ोड, एकूणच गाण्याचे संदर्भ, गरज़ यांनुसार ती आवृत्ती,ते गाणे घडत असते. प्रत्यक्ष मैफ़िलीची गोष्टच काही वेगळी असते आणि मजा और असते. चित्रपटातील अशी काही गाणीच हृदयात घर करून राहिल्याने ती प्रत्यक्षात मैफ़िलीत ऐकताना त्यांचा पुरेपूर आनंद लुटता येतोच असे नक्कीच नाही. मात्र दोन्हींच्या संदर्भांतला फ़रक लक्षात घेता अशी मजा लुटणे तितकेसे कठीणही नसते एव्हढे मात्र सांगू शकतो. खरे तर जगजीतची काही गाणी ही अतिशय सुमार दर्जांच्या चित्रपटांमध्ये होती. गाणी लोकांच्या हृदयांत अज़ूनही आहेत, चित्रपट नक्कीच नाहीत.

गाताना ध्वनीनियंत्रकांना आणि वादक साथीदारांना सूचना देणे, 'मॉनिटरमें बेस कम करो', 'सितार बढाओ' हे सगळेसगळे श्रोत्यांना सुखावून ज़ात होते. गाण्याच्याच ज़ोडीला गाणे चालू असतानाच सितार-तबला, तबला-घुंगरू जुगलबंदी आणि बासरी, सिंथेसाइझर, गिटार यांचे 'सोलो' आविष्कार ज़बरदस्त परिणाम साधून ज़ात होते आणि अर्थातच टाळ्यांची बिदागी घेऊन जात होते. प्रामाणिकपणे आणि तितक्याच तन्मयतेने साथ करणाऱ्या आपल्या या सगळ्या साथीदारांबद्दलचे प्रेम आणि कृतज्ञता जगजीत त्यांना आपली कला सगळ्यांसमोर सादर करण्याची संधी देऊन व्यक्त करत होता, असेच मला वाटले. आणि त्यातच या कलाकाराचे मोठेपण सामावले आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी नित्यनेमाचे आभार प्रदर्शन वगैरे झाले; आणि कार्यक्रमाची सांगता होतानाच २५ मे सुद्धा उजाडला होता. प्रेक्षकांनी जगजीतबरोबर छायाचित्र काढण्यासाठी रांग लावली होती; पण दैवाने यावेळी मला घरी झोपायला न्यायचे ठरवले होते. मिणमिणत्या दिव्यांच्या उजेडात जगजीतचे एकेक गाणे असे काही सुखावून गेले होते की मला माझ्या वाढदिवसाची अमूल्य आणि अविस्मरणीय भेट मिळाली होती. कार्यक्रमाला एकटाच होतो आणि कदाचित त्यामुळेच एकाग्र चित्ताने गाणी आणि गज़ला ऐकता आल्या, ज़गता आल्या. माझ्या कानांनी ज़े ऐकले, डोळ्यांनी ज़े पाहिले, ते तुमच्या मनात पोचवण्यासाठी हा वृत्तांताचा खटाटोप. मध्यंतरातले थंडगार बटाटवडे आणि कोल्ड्रिंकवर वाया गेलेल्या वेळ आणि पैशाची काही किंमतच उरली नव्हती. घरी आल्यावर सर्वसाक्षीकाकांचे सुंदर शुभेच्छापत्र आणि ज़ोडीला मनोगतींच्या शुभेच्छा ही आणखी एक भेट! त्यामुळे जगजीतचे हेच शब्द नव्याने ज़गायला मिळाले -

मुझको कदम कदम पे भटकने दो वाइज़ों
तुम अपना कारोबार करो,मैं नशे में हूं

Thursday, May 11, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

टॅगिंगचा खेळ कदाचित आपल्याला माहीत असेल. एखाद्या विषयाशी संबंधित प्रश्नांची आपण उत्तरे द्यायची आणि आपल्या परिचितांना/मित्रांना तेच प्रश्न विचारून त्यांची या संदर्भातील मते जाणून घ्यायची आणि त्यांनी हीच साखळी पुढे चालवायची असे या खेळाचे स्वरूप आहे. बुक-टॅगिंग हा त्यातला माझा एक आवडता प्रकार. हाच उपक्रम मराठी ब्लॉगविश्वातही राबवावा, या हेतूने हा लेखप्रपंच.
ज्याने हा खेळ चालू केला तो माझा मित्र नंदन होडावडेकर याचे या निमित्ताने पुन्हा एकदा आभार आणि त्याच्या मराठी जगण्याच्या नि जगवायच्या या प्रयत्नांमध्ये माझे खारूताईचे योगदान.
या खेळात अर्थात सर्वप्रथम महत्त्वाचे आहे ते आपले सहकार्य. पुस्तकांविषयी विचारलेल्या काही प्रश्नांची कृपया यथामती उत्तरे आपापल्या ब्लॉगवर लेख (पोस्ट) लिहून द्यावीत आणि शक्य झाल्यास तुमच्या परिचित/अपरिचित मराठी भाषक ब्लॉगर्सना (३ ते ५) हेच प्रश्न विचारावेत. सध्या मराठी अनुदिनीकारांची संख्या
२०० च्या पुढे गेली असल्याने ही साखळी बरीच वाढू शकेल, नवीन पुस्तकांच्या आणि ब्लॉगर्सच्या ओळखी होतील आणि छोट्याशा प्रमाणावर का होईना, माहितीच्या या महाजालात मराठी पुस्तकनिष्ठांची एक मांदियाळी तयार होईल.
असो, नियमांत अधिक वेळ न घालवता मी माझ्यापासून प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात करतो

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -
'लज्जा'
मूळ लेखिकाः तस्लीमा नसरीन
मराठी अनुवादः लीला सोहनी

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -
बांगलादेशच्या स्वातंत्राच्या वेळी तेथे उसळलेल्या जातीयवादी हिंसाचाराचे आणि तेथील हिंदूंच्या मनातील दहशतीचे,त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, आदर्शवाद विरुद्ध व्यवहारी वृत्ती या झुंजीचे सुंदर चित्रण केलेले हे पुस्तक. आणि ते केले गेले आहे ते एका हिंदू बंगाली कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवून. प्राण गेला तरी बांगलादेश ही मातृभूमी असल्याने तिला सोडून ज़ाणे ज़मणार नाही या आदर्शवादाला प्राणपणाने ज़पणारे या कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सुधामयबाबू दत्त, त्यांचा बेरोज़गार पण तरीही वडिलांप्रमाणेच कणखर,जिद्दी/हट्टी मुलगा सुरंजन, हट्टी मुलाच्या जिद्दीला कंटाळून नि परिस्थितीच्या हातात स्वतःला सोपवून आला दिवस आज़ारी नवऱ्याच्या सेवेत निष्ठापूर्वक व्यतीत करणारी त्याची आई किरण्मयी आणि सुरंजनची धाकटी बहीण माया असे हे कुटुंब. मायाचे जहांगिर नावाच्या एका मुस्लिम युवकाबरोबर प्रेमसंबंध आहेत, जो सुरंजनचा मित्र आहे. जातीयवादी दंगलींच्या पार्श्वभूमीवर हे प्रेमसंबंध, आणि एकूणच या कुटुंबाचे शेजारपाजारच्या मुस्लिम कुटुंबांशी असलेले पूर्वीचे सलोख्याचे संबंध, सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात झालेले बदल/स्थित्यंतरे, प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनातील विचारांची वादळे, त्यांची स्वतःशीच होत असलेली भांडणे, स्वतःचीच समज़ूत काढणे, त्याचबरोबर आपल्या प्रिय मुला-मुलीबाबत, आई-बाबांबाबत वाटणारी काळजी आणि प्रेम या सगळ्याचे परिणामकारक चित्रण करणारे सुंदर, सजीव, छोटे-मोठे प्रसंग हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. माया घरातून गायब होणे, तिच्यावरील बलात्काराच्या बातमीने हादरलेले दत्त कुटुंब आणि त्यातूनच उद्विग्न झालेल्या सुरंजनने एका वेश्येला घरी बोलावून तिच्यावर 'बलात्कार' करून अघोरी सूड उगवण्याचा अन् आत्मसमाधान शोधण्याचा केलेला अनाकलनीय प्रयत्न, अखेर परिस्थितीला शरण जाऊन मोडून पडलेला सुधामयबाबूंचा आदर्शवाद आणि दत्त कुटुंबाची बांगलादेश सोडून ज़ाण्याची तयारी हा कथेचा नि पुस्तकाचा शेवट.
छोटे-मोठे पण तरीही महत्त्वाचे प्रसंग जिवंत करणारी, व्यक्तिरेखेच्या मनाचे बारीकसारीक पैलू उलगडून दाखवणारी लेखनशैली. सहज आणि प्रवाही अनुवाद. पण दंगलीतल्या आर्थिक आणि मनुष्यहानीची कल्पना देणारी आकडेवारी, वर्तमानपत्रातल्या वास्तववादी तसेच अतिरंजित बातम्या ही पुस्तकाच्या आणि लेखनाच्या सौंदर्याला नि परिणामकारकतेला काहीसे गालबोट लावते असे माझे मत आहे. निर्घृण कृत्यांची, मानसिक हानीची आणि अनुभवांची तुलना आणि मोजदाद आकडेवारीने करता येत नाही. अनुभवांनी पोळलेली माणसे आकडेवारीच्या पलीकडची असतात हेच खरे नाही का!
मूळ लेखिका तस्लीमाबाईंना या पुस्तकाबद्दल बरेच पुरस्कार मिळाले असून बांगलादेशातील कट्टरपंथियांच्या रोषासही त्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यांची हत्या करणाऱ्यास या मूलतत्त्ववादी, धर्मांध संघटनांकडून खास पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचेही सर्वश्रुत आहे.
अनुवादिका लीलाताई सोहनी यांनाही या अनुवादासाठी महाराष्ट्र शासनातर्फ़े विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे.

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके -
तशी बरीच आहेत जसे श्रीमान योगी, स्वामी, मृत्यंजय, पु. ल. ची बहुतेक सगळी पुस्तके, भा. रा. भागवतांचे बालसाहित्य इ. पण चाकोरीबद्ध नसलेली किंवा वेगळी पण तरीही प्रभावी वाटलेली अशी म्हणजे -
महात्म्याची अखेर - जगन फडणीस
झुलवा - उत्तम बंडू तुपे
हिटलर - वि. स. वाळिंबे
एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-

भावार्थदीपिका - संत ज्ञानेश्वर
गीतारहस्य - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
स्मृति-चित्रें - लक्ष्मीबाई टिळक
गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे
ययाती - वि‌. स. खांडेकर

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
'कोल्हाट्याचं पोर' हे डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे पुस्तक खूप आवडले. कोल्हाटी समाजातल्या लोकांचे हलाखीचे जीवन, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी, निकृष्ट सामाजिक दर्जा नि वास्तववादी जगाशी दूरान्वयानंही नसलेला संबंध, पण तरीही किशोररावांसारख्या काही नवोदितांची जिद्द, जगण्यावरचे प्रेम,पुरोगामी विचार यांमुळे या समाजाला दिसलेले प्रगतीचे नवकिरण या सगळ्याचे चित्रण, किशोररावांची त्यांच्या आईसाठीची भक्ती, प्रेम आणि मानसिक गुंतवणूक यांचे चित्रण हे खरोखरच वाचनीय आहे.
किशोररावांनी एका बक्षीस समारंभाच्या वेळी सांगितलेले त्यांचे अनुभव जेव्हा त्यांच्याच हातून बक्षीसरुपात मिळालेल्या पुस्तकातून, त्यांच्याच शब्दांत जिवंतपणे अनुभवायला मिळाले तेव्हा त्या बक्षीसाचे खरे मोल कळले असे म्हणावयास हरकत नाही.

हा खेळ पुढे चालू ठेवण्यासाठी पुढील ५ खेळाडूंची निवड करण्याची प्रक्रिया माझ्यातर्फ़े सध्या चालू असून येत्या आठवड्यात ती पूर्ण होईल अशी आशा आहे. तेव्हा फिरून इथे चक्कर टाकण्याचे आमंत्रण आगाऊच देऊन ठेवतो ः)

मी निवडलेली पहिली खेळाडू: राधिका
मी निवडलेली दुसरी खेळाडू: अदिती