Tuesday, December 19, 2017

दाढी - एक वाढवणे

देशाच्या राजकारणात, समाजकारणात सध्या मुस्लिमांचे स्थान काहीही असो; पण शीरकुर्मा, कबाब, बिर्याणी वगैरे बनवावी त्यांनीच. आणि आपण मस्त चापावी! या यादीत दाढीसुद्धा समाविष्ट केली, तर त्याचे नवल नाही. म्हणजे लांब दाढीचा पिढीजात (आणि धर्मादाय?!) वारसा सांभाळणाऱ्या कुणी गालावर साबण चोळून, वस्तऱ्यातलं ब्लेड बदलून तो गालावर मोरपिसागत फिरवल्याचा जो काही आनंद बिल्डिंगखालच्या मुहम्मदाचा वस्तरा फिरल्यावर व्हायचा, तसा बायकोच्या षठीसामाशी फिरणाऱ्या मखमली (नवागतांना मार्गदर्शन - हे असंच म्हणायचं आणि लिहायचं, ग्राउंड रियालिटी काहीही असो!) हातातूनही कधी जाणवला नाही. मुळातच स्वतःची दाढी स्वतःच करण्याइतकं कंटाळवाणं काम आपल्याच नशिबी का यावं, या विचाराचीच खंत इतकी मोठी असायची, की कॉलेजात असताना अर्ध्याधिक पॉकेटमनी सलूनमध्ये खर्ची घालायला कधी फारसा विचार करावाच लागला नाही. अमेरिकेत आल्यावर विद्यार्थीदशेत आणि नंतरही बाहेरून दाढी करून घेणं बजेटमध्ये बसत नसल्याने झक मारत ते काम स्वतःच करावं लागे. मुळात ते काम वाटणं यातच सगळं आलं. त्यातून इंजिनिअर म्हटल्यावर तो क्लीन शेवन किंवा किमान आखीव दाढी राखणारा असावा, हा समजच अमेरिकेने हाणून पाडला. कामाव्यतिरिक्त तुमची - आणि त्याहूनही महत्त्वाचं, तुमच्या दाढीची - कुणालाच पडलेली नसल्याने, एक काळजी कायमची मिटली. किंबहुना दाढी वाढलीये म्हणजे ऑफिसात दिवसरात्र, अतिमहत्त्वाचं, लय ब्येक्कार काम चाललं आहे, अशीच प्रतिमा सगळ्यांच्या मनात उभी करता यायची. मग मुली बघणे वगैरे कार्यक्रम चालू झाल्यावर, आपली नाही तरी घरच्यांची इज्जत जास्त प्रिय झाल्याने दाढी करावी लागायचीच; पण एकदा लग्न झाल्यावर तो प्रश्नही निकालात निघाला. अधूनमधून फ्रेंच दाढी, गोटी वगैरे प्रकार चालूच असायचे; पण त्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत त्यांच्या आकाराच्या व्यस्त प्रमाणात असल्याने दाढी करायचा कंटाळा एक्स्पोनेनशली वाढायचा. त्यातच केस, दाढी आणि पोट ज्या वेगाने वाढायचं वरदान चिटणीस घराण्यातल्या पुरुषांना लाभलंय, ते देशाच्या विकासदराला लाभतं, तर आज मोदीसरांना जरा कमीच शिव्या खाव्या लागल्या असत्या. पण ते असो. गेल्या वर्षभरात विराट कोहलीपासून रवींद्र जडेजापर्यंत अख्ख्या भारतीय क्रिकेट टीमने दाढी राखली आणि त्यांचं सोशल मीडिया (फिमेल फॅन)फॉलोइंग वाढलं; शाहिद कपूर आणि रणवीर सिंगने दाढी राखली आणि आमच्या हिचं उडता पंजाब, पद्मावती वगैरे नॉन्सेन्स गोष्टींवरचं प्रेम उतू जाऊ लागलं, हे माझ्यासारख्या चाणाक्षांच्या नजरेतून सुटतं, तरच नवल! थोडक्यात दाढी वाढवणं, राखणं आउटराईट 'इन' झालंय, याचा साक्षात्कार झाला. दसरा संपून दिवाळीचे वेध लागतात, तसे नो शेव्ह नोव्हेंबरचे वेध सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच लागले. आणि तो नो शेव्ह नोव्हेंबर वर्षाखेरीपर्यंत लांबवून नववर्षाच्या मुहूर्तावर १ जानेवारीलाच दाढी करायची, असा संकल्प सोडला. हाच तो क्षण - सप्टेंबर ९, २०१७. यावेळी डोके आणि चेहरा दोन्ही ठिकाणे पेरणीसाठी अनुकूल होती:
मग वाढतावाढता वाढे असणाऱ्या बलभीमाप्रमाणे दाढी वाढू लागली. यापूर्वीही दोन-तीन आठवडे, अगदी एक महिनाही दाढी न करता आपण कसे दिसू शकतो, हे बघितल्याने साधारण ऑकटोबरच्या मध्यापर्यंत  विशेष बदल जाणवलाच नाही. ऑकटोबर १४, २०१७ रोजी ही स्थिती होती:
नाही म्हणायला, 'जरा तरी बरी' दिसावी म्हणून थोडाफार आखिवरेखीवपणा आणायचा प्रयत्न चालू ठेवला होता. ओठ आणि हनुवटीमधल्या जागेत, आणि गाल आणि कल्ल्यांच्यामधल्या मोकळ्या जागेत थोडंफार कोरीवकाम चालू होतं. ऑकटोबरच्या शेवटपर्यंत फार काही बदललं होतं अशातला भाग नाही. ऑकटोबर २६/२७, २०१७ कडे ही परिस्थिती होती:
शेवटी नो शेव्ह नोव्हेंबर उजाडला आणि हनुवटीवरचं कोरीवकाम बंद करायचा निर्णय घेतला. पोराला सुद्धा आता सवय झाली असल्याने उम्मा घेतानाच्या सुरुवातीसुरुवातीच्या "बाबा, दाढी टोचते"च्या कंप्लेंटी मागे पडत चालल्या होत्या. काही मित्रमैत्रिणींनी "काय रे, बायकोला चालते का?" हे ठेवणीतले पण तसे बऱ्यापैकी बोथट झालेले हत्यार उपसलेच; पण बायकोच जवळ नसल्याने, आणि मी ती संधी "ट्रम्पच्या इमिग्रेशन पॉलिसीज किती चुत्त्या आहेत! माझ्या बायकोसारख्या हायली क्वालीफाईड कॅलिफोर्नियन टॅक्सपेअरला सुद्धा केवळ H4-EADच्या घोटाळ्यामुळे काही काळ भारतात जावं लागतंय" असं ठणकावून सांगत, सामाजिक सहानुभूती मिळवून वाया न दवडल्याने, त्या घिस्यापिट्या, पांचट विनोदापासून कायमची मुक्ती मिळाली. तरी नोव्हेंबरात बायको दोन आठवड्यांसाठी का होईना अमेरिकेत काही कामानिमित्त आलीच. तिला रिसीव्ह करायला विमानतळावर गेलो, तर मला "दादा/मामा/काका, दोन मोठ्या आणि दोन छोट्या बॅगा आहेत, किती घेणार ते एकदाच फायनल सांगा" असं तर ती ऐकवणार नाही ना, याचीच धाकधूक होती. पण दिवाळीच्या आसपास मित्रपरिवारात झालेल्या पार्ट्यान्चे फोटोज बघून तिने जरी "बाबा, यू आर लुकिंग सो स्केरी" असे म्हटले असले, तरी किमान 'नवरा' ही ओळख टिकून राहील, याची कुठेतरी आशावाजा खात्री होतीच. तिला ओळख पटली, रिसीव्ह करणे वगैरे पार पाडून घरी आलो. नो शेव्ह नोव्हेंबराचे सबळ कारण पुढे केल्याने बिचारीच्या नल-दमयंती स्वप्नांना गालबोट लागले, अशी तक्रार स्वतःच करून this growth will help you grow in experience, as a human, असा माफीनामाही स्वतःच पदरात पाडून घेतला. प्रेमभंगाचे दु:ख बिअरमध्ये बुडवायची संधी साधायला दहा दिवस लागले. नोव्हेम्बर १८, २०१७ रोजी शेवटी तो सुवर्णयोग आलाच:
मध्यंतरीच्या काळात दाढी वाढवण्याचे प्रयोग करून त्याचे सामाजिक पडसाद काय उमटतात, याचा अनुभव घेतलेल्या काहीजणांशी गप्पा झाल्या. मिडल-ईस्टर्न दुकानात गेल्यावर "हे ब्रदर" संबोधले जाणे, किंवा स्थानिक टॅक्सीचालकांकडून नि ट्रकचालकांकडून 'सतश्री अकाल' ऐकायला मिळणे, वगैरे अनुभव ऐकायला मिळाले. नजीकच्या भूतकाळातला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड वगैरे ठिकाणचा वर्णद्वेषाचा आणि वंशद्वेषाचा इतिहास लक्षात घेता आपल्या 'अशा' दिसण्याने देव न करो पण जीवावर बेतणार नाही ना, याची मनात कुठेतरी खोलवर दडलेली भीती अधूनमधून डोकं वर काढायची; पण स्काईपवर आईशी बोलताना "काय घाणेरडा दिसतोयस, कधी करणार दाढी" असं विचारलं गेलं की आणखी चेव यायचा. मायला, स्वप्नील जोशी, वैभव तत्त्ववादी, इतकंच काय तो कोण कुठला अभिजित खांडकेकर सुद्धा दाढी ठेवतो, तर आम्ही का नाय?! कॅलिफोर्नियाचा कोकण समजल्या जाणाऱ्या सॅन होजे, सांता क्लारा, सनीव्हेलसह झालेल्या संयुक्त महाराष्ट्रात वर्णद्वेषाचा बळी जाण्याइतके आपण कमनशिबी नाही, याचा दिलासा अनेकांनी दिला. त्या बळावर प्रवास चालू ठेवला. अतिप्रेम आणि अतिकोप अशा भावनिक आंदोलनातून जेव्हा पाच वर्षांचं पोर जातं आणि तुमची दाढी हातात धरून सारख्याच भावनावेगानं गदागदा हलवतं, तेव्हा खरं तर मरणप्राय वेदना होऊन बोंब ठोकायची वेळ आलेली असते; पण आदल्याच रात्री तुमच्या मांडीवर बसून एकत्र पिक्चर बघताना, अंगचटीला येऊन अंग घासणाऱ्या मांजरासारखं, त्याने आपलं डोकं नि मान प्रेमाने तुमच्या दाढीवर किमान पाचेक मिनिटं घासून घेतलेली असते, हे विसरता येत नाही. त्या प्रेमळ तैलभावनेने दाढीचीही छान निगा राखली जाते. पाच वर्षाच्या चिमुरड्याला आजपर्यंत जसं डोळ्यात तेल घालून वाढवलं, तसंच दाढीचंही झालंय, हे तुम्हाला कळतं. जातायेता शक्य असेल तेव्हा केस विंचरावेत, तशी दाढीही विंचरणेबल झालीये, हे लक्षात आल्यापासून तुमच्या जीन्सच्या खिशात एक छोटी फणी आलेलीच असते. मिशीला पीळ देणे, तुर्रेबाज मिशी आरशात न्याहाळणे आता तुम्हाला जमू लागल्याने तुम्ही भलतेच खूष असता. मग 'मिशांना तूप लावणे' वगैरे वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग न करता सरळ स्वतःच्याच मिशांवर करायची स्वप्नं तुम्ही बघू लागता. तोवर डिसेंबरचा मध्य उजाडलेला असतो, आणि साधारण डिसेंबर १६, २०१७ ला अशी स्थिती होते:
उरलेल्या पंधरवाड्यात हवी तेव्हढी वाढो, पण नियमित विंचरणे होईल, मिशांना तूप लावून त्या पिळणे होईल आणि ३१ डिसेंबर २०१७ रोजी रात्री झोपायच्या आधी तुम्ही एक 'क ड क' सेल्फी काढून मगच झोपी जाल, असं प्रॉमिस स्वतःला करून तुम्ही तुमचं ब्लॉग पोस्ट थांबवता.