Friday, July 13, 2007

रॅट-अ-टुइआपल्याकडे संजीव कपूरच्या पुस्तकांमधून पाककृती वाचून नानाविध प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या यादीत रेमी नावाचा एखादा उंदीरसुद्धा सामील झाला, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? जास्त विचार करू नकात. तुमच्यासमोर हे कल्पनाविश्व 'रॅट-अ-टुइ' नावाच्या एका दे-धमाल चित्रपटातून वॉल्ट डिस्ने पिक्चर्स-पिक्सार यांच्या संयुक्त विद्यमाने उभे करण्यात आले आहे. अकादमी पुरस्कार विजेते दिग्दर्शक ब्रॅड बर्ड आणि 'कार्स','फ़ाइंडिंग निमो' सारख्या चलतचित्रपटांचे निर्माते पिक्सार ऍनिमेशन्स हे या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र काअम करताना दिसणार आहेत.
गुस्तॉव्ह नावाच्या फ़्रान्समधील संजीव कपूरचे दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि त्याच्या पाककृतींचे पुस्तक यांवरून पदार्थ 'चवीने' खाण्यात आणि बनवण्यात रुची निर्माण झालेला रेमी नावाचा उंदीर पाकशास्त्राचा अभ्यास करतो. 'एनीवन कॅन कुक' हा गुस्तॉव्हचा मंत्र हा रेमीच्या आयुष्याचा मंत्र बनलाय. गुस्तॉव्हनेच रेमीला वेगवेगळ्या चवी 'शिकवल्या' आहेत. त्यामुळे समस्त उंदीर ज़मातीत रेमी एक क्रांतिकारी बनलाय. लाडका भाऊ एमिल आणि वडील, मित्रपरिवार यांच्याशी एका अपघाती विरहानंतर रेमी गुस्तॉव्हच्याच बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या पूर्वप्रसिद्ध रेस्तराँ मध्ये शिरतो. पारंपारिक प्रसिद्ध खाद्यपदार्थांची वाट न चोखाळता चायनीज़, मेक्सिकन अशा पदार्थांतून रेस्तराँचा कायापालट करणाचे गुस्तॉव्हचा उज़वा हात असलेल्या स्किनरचे बेत दिवंगत गुस्तॉव्हचा मुलगा लिंग्विनीच्या अनपेक्षित आगमनामुळे उधळले ज़ाण्याच्या बेतात आहेत. आधी पोऱ्या म्हणून भटारखान्यात रुज़ू झालेला लिंग्विनी रेमीच्या करामतींमुळे कोणतेही पाककौशल्य नसतानाही एक अप्रतिम, चवदार सूप बनवतो आणि अल्पावधीतच एक कुशल आचारी म्हणून ओळखला ज़ाऊ लागतो. लिंग्विनीमुळे आपले बेत उधळले ज़ाणार असल्याची तसेच लिंग्विनीकडे कोणतेही पाककौशल्य नसून कोणाच्यातरी 'छुप्या' मदतीने निरनिराळे पदार्थ बनवले ज़ात आहेत, याची ज़ाणीव झाल्यावर स्किनरने या प्रकरणाचा छडा लावायचा निश्चय केलाय; ज्याने लिहिलेल्या प्रतिकूल समीक्षेच्या धक्क्याने गुस्तॉव्ह मरण पावला, तो एगो नामक पाकसमीक्षक लिंग्विनीवरही डोळा ठेवून आहे; एकीकडे भाऊ, वडील, मित्रपरिवार आणि दुसरीकडे गुस्तॉव्हचा मूलमंत्र आणि सदैव बरोबर असलेले त्याचे आभासी अस्तित्त्व (त्याला 'भूत' म्हणवत नाही) अशा द्विधा मन:स्थितीत रेमी सापडलाय; भटारखान्यातलीच एक उत्तम आचारी असलेल्या कॉलेटच्या प्रेमात लिंग्विनी अडकलाय, हे रेमीला कळलंय, त्याला ते प्रेम सफल व्हावंसं वाटतंय पण त्याला एगो आणि स्किनर दोघांशी भिडायचंयसुद्धा! तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही, इतक्या विविधांगी कल्पना आणि मानवी भावनांचे चित्रण रेमी, एमिल,लिंग्विनी,कॉलेट, स्किनर, एगो यांच्यापासून रेस्तराँमधील ग्राहक, भटारखान्यातील इतर कर्मचारीवर्ग, रस्त्यावरचे लोक, पशुपक्षी यासारख्या बारीकसारीक गोष्टी या सगळ्यांमधून करण्यात आले आहे. रेमी आणि लिंग्विनीची अपघातानेच झालेली मैत्री, रेमीच्या वडिलांचे त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न, एमिल आणि रेमीचे अपघाती पुनर्मिलन, स्किनरशी दुष्मनी, कॉलेट आणि लिंग्विनीचं प्रेम, रेमीने बाबांना ऐकवलेलं 'चेन्ज इज़ नेचर' हे वाक्य, समस्त उंदीरमित्रांनी स्किनरची खाद्यपदार्थांच्या गोदामात बांधलेली मुटकुळी हे सगळंच प्रेक्षणीय आणि कौतुकास्पद! मनापासून दाद देण्याज़ोगं! रेमीच्या साथीने आणि प्रमुख सहभागाने बनवलेली 'रॅट-अ-टुइ' खाऊन एगोला आठवलेली स्वत:च्या आईच्या हातची चव आणि त्याच्या डोळ्यांत तरळलेलं पाणी हा चित्रपटाचा 'डिफ़ायनिंग सीन'!
भिवया आणि डोळ्यांच्या कल्पक हालचाली आणि त्यातून जिवंत झालेली पात्रं हे डिस्नेच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य या चित्रपटातही ठळकपणे ज़ाणवतं. आनंदित रेमी, रात्रीचे झगमगीत पॅरीस पाहून भारावलेला रेमी, घाबरलेला रेमी जितक्या कल्पकतेने रंगवलाय, तितक्याच कल्पकतेने त्याचे टवटवीत, उभारलेले कान गळपटवून आणि भिवया कपाळाच्या मध्यभागी एकवटवून 'तो निराश आहे' हे दाखवलंय. आळशी, बावळट लिंग्विनी, कॉलेटचे चुंबन घेऊन चक्रावलेला लिंग्विनी, 'टॉमबॉय' कॉलेट आणि लिंग्विनीवर रागावून मग रडणारी कॉलेट - एकूण एक पात्रे प्रेमात पडावीत अशी आहेत. चित्रपटाचा नायक रेमी हा तर टॉम ऍंन्ड जेरीमधल्या जेरीनंतर नंबर दोनचा 'क्यूट' उंदीर असावा; कदाचित मिकी माउसपेक्षाही जास्त. एक 'काहीच्या बाही', 'इमॅजन व्हॉटेवर' प्रकारची गोष्ट असली, तरीही तर्कसुसंगत आहे. कोठेही विस्कळीत झालेली नाही. 'लिंक तुटली' हा प्रकार कोठेही बघायला मिळत नाही. प्रसंगानुरूप श्रवणीय पार्श्वसंगीत आणि त्याला अनुकूल असा रंगीबेरंगी बॅकड्रॉप ही डिस्नेची खासियत प्रत्येक फ़्रेममधून ज़ाणवते. रंगसंगतीही प्रसंगानुरूप आणि भावानुरूप. पात्रांना त्यांचे वय, स्वभाव आणि कथानकातील भूमिका यांच्या अनुसारच आवाज़ देण्यात आले आहेत; आणि ते देताना फ़्रेंच उच्चारांकडे कटाक्षाने लक्ष पुरवण्यात आले आहे. अंधाऱ्या गोदामाचा दरवाज़ा उघडल्यानंतर आत येणाऱ्या प्रकाशाचा मार्ग, त्यानुसार होणारी सावल्यांची हालचाल, विविध प्रकारच्या भाज्या ठराविक पद्धतीने कापण्याचे आचाऱ्यांचे कौशल्य हे बारकावेही अचूकपणे टिपण्यात आले आहेत. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स (आपण पात्राकडे/वस्तूकडे/दृश्याकडे वरच्या दिशेने तिरकस पाहत आहोत, असे मानून त्या वस्तू/पात्राचे/दृश्याचे केलेले चित्रण), 'ओवर द शोल्डर्स' शॉट्स (मुख्य पात्रावर एखाद्या दुय्यम वस्तू अगर पात्राच्या आडून केंद्रित केलेला कॅमेरा आणि टिपलेल्या हालचाली) अशा उत्कृष्ट चित्रणकौशल्याची ज़ोड मिळाल्यानंतर चित्रपट प्रेक्षणीय आणि खासम् खास झाला नाही तरच नवल. आणि चित्रपट आणखी छान करायचा म्हटला तर तो फ़ोर-डी करता येईल (तो 'छोटा चेतन' बघताना लावलेला काळा गॉगल म्हणजे थ्री-डी आणि त्याच्या ज़ोडीला तुमची सीट हादरवणारे, तिची उंची अलगद कमीजास्त करून नि कार्पेट सळसळवून किंवा तत्सम पद्धतीने तुम्ही स्वत: पडद्यावरील घटनांमध्ये सामील आहात, असा भास निर्माण करणे म्हणजे फ़ोर-डी) पण दोन-एक तासांच्या चित्रपटासाठी असे आभास निर्माण करणे आव्हानात्मक आणि कदाचित आर्थिक तसेच तांत्रिकदृष्ट्या, कथानकाच्या दृष्टिकोनातून 'फ़िज़ीबल' (मराठी प्रतिशब्द? नकोच!) नसावे.
भारतात हा चित्रपट आहे त्या स्वरूपात पहायला मिळाल्यास उत्तम! नाहीतर रेमीचे 'रामू' करून नि हास्यास्पद भाषांतरे करून उत्तम चित्रपटांना गालबोट लावण्याची परंपरा कायम राखली ज़ाण्याचीच शक्यता जास्त. मात्र असा उत्तम चित्रपट प्रत्येक लहान मुलापर्यंत सर्वदूर पोचवण्याचे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे चित्रपट वितरकांचे प्रामाणिक प्रयत्न असतील, तर निदान पात्रांच्या नावांशी आणि संवादांशी झालेली तडज़ोड सहन करण्याचीही तयारी ठेवणे श्रेयस्कर.
एकुणातच, लहानांबरोबरच मोठ्यांनीही मनमोकळेपणाने आनंद लुटावा, असा मस्त चित्रपट!

अधिक माहितीसाठी: रॅट-अ-टुइ

Tuesday, July 03, 2007

एका पदवीदान समारंभाची गोष्ट

मे २००५ मध्ये मला अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर ती काळी की गोरी हे सुद्धा पहायला मिळाले नव्हते. मुंबई विद्यापिठाचा पदवीदान समारंभ डिसेंबर २००५ मध्ये पार पडला आणि तेव्हा अमेरिकेतील माझे पदव्युत्तर शिक्षण २५% पूर्ण झाले होते. त्यामुळे काळा डगला, डोक्यावर ती चौकोनी टोपी आणि हातात पदवीचे भेंडोळे अशा अवतारातला फोटो काढून मिरवायची संधी कधी मिळते, याकडे लक्ष लागून राहिलेले. साधारण दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतील माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन 'मास्टर ऑफ़ कंप्यूटर सायन्स' ही पदवी मिळाली आणि ते स्वप्न साकार झाले. आईबाबांना समारंभाचे आमंत्रण पाठवून, त्यांचे व्हिज़ाचे सोपस्कार उरकून त्यांनी इकडे येण्यासाठी विमानात पाय ठेवेस्तोवर पदवीदान समारंभ अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला होता. त्यांचे तिकीट दोन वेळा बदलणे, प्रवासाची तयारी, औषधे या सगळ्यात मी अमेरिकेत असून आणि परीक्षा चालू असूनही अडकलोच होतो. आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा प्रवास करून येण्याचा तणाव, लेकाच्या भेटीची तळमळ या सगळ्यात अनावश्यक सामानाचा व्यत्यय नको म्हणून त्यांची बॅगही मुंबई-पुणे प्रवासातल्या सामानासारखी भलतीच आटोपशीर झाली होती. आईबाबा येणार आणि आपले कौतुक करणार, शाबासकी देणार याची उत्सुकता लागून राहिली असल्याने तीन दिवसही खूप मोठा काळ वाटत होता. अमेरिकेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मातापित्याचे स्वागत करायला हा गडी साधारण दोन-एक तासांचा प्रवास करून डेट्रॉइटला ज़ायचा होता; पण ऐन वेळी खराब हवामानामुळे अस्मादिकांचे विमान त्यांच्या नंतर पोचले आणि मी माझ्या आईबाबांचे स्वागत करण्याऐवजी त्यांनीच माझे स्वागत केले. मीराताईंच्या चिरंजिवांच्या पदवीदान समारंभाबाबतचे लेखन वाचल्यानंतर तर खराब हवामान आणि पदवीदान यांचे जन्मजात वैर असावे, असेच वाटून गेले. विमानात मिळालेली काळीकुट्ट, दूध-साखर नसलेली कॉफ़ी आणि एका मुज़ोर हवाईसुंदरीबद्दलची तक्रारसुद्धा आई ज्या कौतुकाने सांगत होती, ते पाहिल्यावर माझ्या उच्च शिक्षणाचे आणि तिच्या डोळ्यांत तरळलेल्या आनंदाश्रूंचे चीज़ झाल्याचे वाटले.
डेट्रॉइटला माझ्या मावसबहिणीकडे दोन दिवस घालवून आम्ही आमच्या गावी समारंभाच्या आदल्या दिवशी परतलो. आईबाबांच्या लग्नाचा आणि आईचा असे लागोपाठच्या दिवशीचे दोन्ही वाढदिवस त्यांना विमानात झोपा काढून साज़रे करायला लागल्याने आम्ही डेट्रॉइटलाच एक छोटीशी पार्टी उरकून घेतली. पदवीदान समारंभाच्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त उत्साहाने आईबाबाच तयार होत होते. बाबांचा कडक इस्त्रीचा सफारी, आईची शिफ़ॉन साडी आणि मॅचिंग ब्लाउज़ आधीच ठरले असल्याने त्यांना तयार व्हायला मुळीच वेळ लागला नाही. मात्र कोणता शर्ट, कोणता टाय हे ठरवताना मात्र माझी बरीच पर्म्युटेशन्स-कॉंबिनेशन्स चालू होती. अखेर मनासारखा नट्टापट्टा झाल्यावर आम्ही घरून निघालो तेव्हा पदवीदान समारंभ अवघ्या १५ मिनिटांवर येऊन ठेपला होता. आईबाबांबरोबरच सुपरिचित मनोगती विनायककाका आणि रोहिणीकाकू, माझे मित्रमैत्रिणी, खोलीमित्र (रूममेटस) आमच्याबरोबर. त्यातच माझे दोन रूममेटसही माझ्याबरोबर ग्रॅज्युएट होणार आणि त्यातल्या एकाचे कुटंब त्याच्याबरोबर. एकूणच मोठा लवाज़मा होता.
संपूर्ण विद्यापिठाचा पदवीदान समारंभ खूप मोठा, धडाकेबाज़ काहीसा नखरेल पण तरीही हवाहवासा. प्रॉव्हिडन्स बॅप्टिस्ट चर्चमध्ये झालेला आमच्या संगणकशास्त्र विभागाचा पदवीदान समारंभ मात्र सुनियोजित आणि आटोपशीर. मोज़की पण मोलाची भाषणे, विचारांची देवाणघेवाण आणि मग पदव्या प्रदान करण्याचा सोहळा आटोपून बाहेर पडेस्तोवर साधारण तीन तास उलटून गेले होते. छायाचित्रे काढणे, मास्तरांना भेटणे, आईबाबांच्या सगळ्यांशी औपचारीक ओळखी, गप्पाटप्पा, हास्यविनोद यांत पोटात कावळे ओरडायला लागल्याची ज़ाणीव झाली नव्हती; पण 'बिर्याणी हाउस'च्या दारातून आत शिरल्यावर मात्र गप्पांपेक्षा अधिक - खाण्यासाठी - तोंड चालू लागले. जेवण आटोपून आणि नंतरच्या गावजेवणासाठीची आवश्यक खरेदी करून घरी गेलो तेव्हा संध्याकाळचे सात वाज़ून गेले होते. विनायककाका आणि रोहिणीकाकूंना त्यांच्या गावी वेळेत पोचणे आवश्यक असल्याने गरमागरम चहा झाल्यावर त्यांनी आमचा निरोप घेतला. रात्रीच्या जेवणासाठी त्यांना थांबता आले असते तर काकूंच्या हातची कोणती डिश चाखायला मिळाली असती, हे स्वप्नरंजन मी आज़ही अधूनमधून करत असतो
अमेरिकेतील विद्यार्थी समुदायामध्ये आपल्यातल्याच कोणाचीतरी आई आल्याचा आनंद हा इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठा असतो. आणि त्या आनंदाचा चवदार मोठेपणा हा दरदिवशी एक पदार्थ या हिशेबाने साठ-एक बटाटेवडे, तितक्याच इडल्या, चार किलो चिकन, कोलंबीभात आणि सोलकढी, पावभाजी, झुणकाभाकर नि चटणी, पराठे, थालिपिठे, पोहे नि उपमा, छोले/मटार उसळ, नानाविध भाज्या आणि मुख्य म्हणजे गरमागरम, तूप लावलेल्या पोळ्या यांच्या डिशच्या डिश काही मिनिटातच संपायला लागल्या की ठळकपणे ज़ाणवतो. एरव्ही अमेरिकेत असताना पोळी-भाजी, आमटीभात आणि बाज़ूला आंबा किंवा मिरचीचे लोणचे, पापड/तळलेली मिरची/सांडगे किंवा कोशिंबीर यांपैकी काहीतरी असा चौरस आहार दिवसातून दोन वेळा सोडाच पण दोन महिन्यांतून एकदा मिळण्याचेही सुख नाही फक्त काही दिवसच मिळालेल्या या सुखाने आम्हां सगळ्यांचे आमच्याआमच्या 'लोडशेडिंग'चे बेत एकहाती उधळून लावले; पण त्या पंधरा-सोळा मुखांनी प्रत्येक डिश चाटूनपुसून खाताना दिलेला ढेकररूपी दुवा ही माझ्या आईबाबांसाठी पुत्रविरहावरची दवा ठरणार यात मुळीच शंका नाही. आमेन!!!

समारंभाची छायाचित्रे येथे पाहता येतील.