Wednesday, April 04, 2007

शब्दसाधना

मनोगत या संकेतस्थळावर श्री. द्वारकानाथ कलंत्री यांनी शब्दसाधना नावाचा एक चांगला प्रयोग चालवला आहे. व्यवहारातील, शास्त्रीय शिक्षणातील अनेक प्रचलित बिगर-मराठी शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द शोधणे/तयार करणे असे या प्रयोगाचे स्वरूप आहे. प्रस्तुत शब्दसाधना एक 'प्रयोग' म्हणून निश्चितच स्तुत्य आहे. प्रयोगातून काय साध्य होणार आहे, माहीत नाही. पण 'करून पहायला काय हरकत आहे' या भूमिकेतून करण्यास हरकत नसावी. एडिसनच्या बाबतीत असे ऐकले आहे की फ़िलामेंट म्हणून १२०० विविध वस्तू अयशस्वीपणे वापरून झाल्यानंतर तो म्हणाला की "या १२०० वस्तू फ़िलामेंट म्हणून वापरता येणार नाही, हे तरी मी आता १००% खात्रीने सांगू शकतो". शब्दसाधनेचेही असेच काहीसे असावे असे वाटते. मुद्दा हा आहे, की एडिसनकडे १२०० वस्तू वापरण्याइतकी चिकाटी होती, ती या प्रयोगात असावी. प्रयोगाअंती ज़े गवसेल, त्याचा उपयोग काय आणि/किंवा कसा, ही चर्चा काहीतरी गवसल्यानंतरच करता येईल. प्रस्तुत प्रयोगामागील प्रयोगशीलता, जिज्ञासू वृत्ती आणि धडपड याला सक्रीय पाठिंबा द्यायला निश्चितच आवडेल.
प्रयोगाच्या संभाव्य निकालांचा किंवा त्याच्या अधिक्षेत्राचा सखोल विचार केल्यावर, शास्त्रीय लेखन, संशोधन आणि अभ्यास या क्षेत्राकडून या प्रयोगाला तसेच त्याच्या निकालाला मिळणारी मान्यता याबाबत मी पूर्णपणे साशंक आहे. नवनवीन आणि कदाचित शुद्ध मराठी शब्दांमुळे प्रचलित सोप्या आणि कदाचित अमराठी शब्दांद्वारे चालू असलेल्या अभ्यासाला,संशोधनाला प्राप्त होणारे अतिक्लिष्ट रूप निश्चितच मान्यताप्राप्त आणि उपयुक्त नाही. ऑपरेटिंग सिस्टमचा अभ्यास करताना थ्रेडसना 'धागा', प्रोसेसेसना 'प्रक्रिया' असे संभाव्य शब्द योजणे (मराठीच्या दुराग्रहापायी हे आणि असे शब्द इतरत्र पाहण्यात आले आहेत) हे त्यांच्यातला 'शास्त्रीय'पणा किंवा त्यांमागे दडलेला शास्त्रीय अर्थ यांसाठी निश्चितच मारक आहे. त्यातून ज़वळपास सारखेच भासणारे शास्त्रीय शब्द त्यांच्या अंगभूत गुणधर्मांमुळे शास्त्रीय संदर्भांत वेगळे असतात. ही सूक्ष्म अर्थभिन्नता (subtle differences) पर्यायी मराठी शब्दांच्या माध्यमातून समाविष्ट केली ज़ाईलच असे नाही. उदाहरणार्थ डेटाबेस आणि डेटा वेअरहाउस. डेटाबेस म्हणजे विदागार. मग डेटा वेअरहाउस म्हणजे काय? डेटाबेस क्रॅश झाला म्हणजे विदागार कोसळले. पण 'कोसळणे' या क्रियापदाला अपेक्षित असलेला 'डोलारा', 'उत्तुंग बहुमज़ली इमारत', आशाअपेक्षा, स्वप्नांचे बंगले यांपैकी त्या बिचाऱ्या विदागारात काहीच नाही. त्यातून शास्त्रीय संशोधन हे केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरतेच अर्यादित नाही; ते जगभर चालू असते. शास्त्रीय ज्ञानाची वैश्विक देवाणघेवाण होत असते. उद्या अशाच एका जागतिक परिसंवादात अमेरिकन, चिनी, जपानी, युरोपीय संशोधकांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना डेटाबेससाठी 'विदागार'चा हट्ट धरणे यात काही समंजसपणा दिसत नाही. शास्त्रीय शिक्षणाच्या क्षेत्रात तरी शब्दसाधनेच्या संभाव्य निकालांचा आवाका इयत्ता दहावीच्य पठ्यपुस्तकांच्या पुढे ज़ाईलसे दिसत नाही, आणि तसा ज़ाऊही नये! मूलभूत शास्त्रीय शिक्षणातून अशा योग्य शब्दांची ओळख होणे स्पृहणीय आहे, पण या पायाभूत शिक्षणाद्वारे एकदा उच्च शिक्षणाचे दरवाज़े खुले खाले, की मराठमोळ्या शास्त्रीय शब्दांचे महत्त्व 'अँटिक पीस'पेक्षा फार वेगळे असेल, असे मला वाटत नाही. विमान आकाशात उडवायलाच आणि उडायला लागेपर्यंतच लाँचपॅड आवश्यक असते ऍट्रिअम आणि व्हेंट्रिकलसाठी अलिंद आणि नीलय माहीत असावे; पण माहीतच असावे.
प्रादेशिक संपर्क आणि प्रसार माध्यमे, दृक् श्राव्य माध्यमे (ज़से बातम्या इ.), व्यासपिठावरील मराठी या क्षेत्रांमध्ये शब्दसाधनेच्या माध्यमातून अपेक्षित सुधारणा निश्चितच घडवता येतील. मात्र चित्रपट, मालिका इत्यादींमध्ये - जे साहित्यिक किंवा लिखित मराठीपेक्षा दैनंदिन जीवन, व्यापारउदीम, शास्त्रीय/राजकीय/सर्वसामान्य आणि सर्वमान्य सामाजिक कल्पना यांचे प्रतिबिंब आहेत; ज्यातून 'बोलले' ज़ाते, संवाद साधला ज़ातो - या साधनेच्या निकालाबरहुकूम नवीन (योग्य?) शब्दांचा भरणा झाला, तर त्याला मान्यता मिळणे नाही. साधेसोपे शब्द सापडले, ते ज़र सद्य शब्दांची क्लिष्टता कमी करत असतील, तरच त्यांना मान्यता मिळावी. पण बोली मराठी, शास्त्रीय शिक्षण या क्षेत्रामधील डेटाबेससारख्या शब्दांमधला सोपेपणा विदागारसारख्या शब्दांतून आणखी सुधारेल, असे म्हणणे मला पटत नाही. किंबहुना त्यामुळे क्लिष्टता वाढते. उद्या माझ्या बंगाली मैत्रिणीला 'चल चित्रपट देखने जाते है' म्हटले (चित्रपट हा हिंदी शब्दही आहे आणि आम्हा दोघांची संवाद साधण्याची सामाईक भाषा हिंदी किंवा इंग्रजी आहे, हे गृहीत धरून), तर संपलेच! भिन्न संस्कृती, भाषा, आचारविचार यांची सरमिसळ आपल्याच समृद्धीसाठी उपयुक्त ठरत असेल, तर आपलेच पाय ओढण्याचा पारंपारीक मराठी बाणा काय कामाचा? मराठी भाषा प्राचीन काळापासून आज़तागायत कित्येक अमराठी शब्दांच्या समावेशातूनही समृद्धच होत आली आहे, आणि राहीलही. त्यामुळे अमराठी शब्दांच्या समावेशातून तिच्या अस्तित्त्वाबाबत चिंता करण्याचे काहीच कारण नाही. त्याचबरोबर शब्दसाधनेच्या प्रयोगाला तात्त्विक विरोध असणाऱ्यांच्या मराठिविषयीच्या प्रेमाबाबत शंका घेण्याचेही कारण नाही. इंग्रज़ाळलेली व्यापारी मराठी वर्तमानपत्रे, बातमीपत्रे, सरकारी दप्तरे, लिखित साहित्य इत्यादींमधील अपेक्षित सुधारणा हे या साधेनेचे उद्दिष्ट असलेच पाहिज़े, त्याबाबत हट्ट ज़रूर असावा; पण दैनंदिन व्यवहार आणि शास्त्रीय शिक्षण या क्षेत्रांमध्ये अशा शब्दांचा प्रवेश ही घुसखोरी किंवा अतिक्रमण ठरू शकेल आणि हट्टाला दुराग्रहाचे किंवा अतिरेकाचे स्वरूप प्राप्त होईल, ज़े निश्चितच अपेक्षित नसावे. प्रयोगाचे अपेक्षित अधिक्षेत्र निश्चित करून ही धडपड पुढे रेटली, तर उत्तम!
तेव्हा हा प्रयोग यापुढे या निश्चित मर्यादित उद्दिष्टांसह पुढे नेल्यास आनंद होईल. शब्दसधनेत याआधीही काही वेळा सहभागी होतो, पुढेही राहीन. पण त्याचबरोबर मराठीतीलच एक ख्यातनाम साहित्यिक दत्तो वामन पोतदार यांचा 'बहुभाषक व्हा' हा संदेश येथे उधृत करायचा मोह आवरत नाही.

Monday, April 02, 2007

मैंने प्यार किया - सुरुवात

प्रेमाच्या बाबतीत तर मला पाडगावकरांचं 'तुमचं आमचं अगदी सेम असतं', हे मुळीच पटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं प्रेम त्याच्या किंवा तिच्यासाठी इतकं जिवलग आणि खास असतं की ते इतर कुणासारखं होऊच शकत नाही. मग त्यात फोनवरचं तासन् तास बोलणं असो; समुद्रकिनाऱ्यावर एकत्र हिंडणं, एकत्र खाल्लेली भेळ किंवा भुट्टा किंवा 'कच्ची कैरी'चा गोला असो; की क्लासला ज़ातो/ते आहे सांगून बागेत भेटणं असो. सगळं अगदी स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळंच असतं. वह्यापुस्तकांतून 'आज़ कुठे कधी भेटायचं' ठरवणाऱ्या चिठ्ठ्या पास करणं हे प्रेम असतं; दूधवाला, किराणा सामान, डॉक्टर, इलेक्ट्रिसिटी यांची बिलं त्या त्या पाकिटात भरून ठेवताना चुकणारे हिशेब आणि त्यावरून ऐकू येणारे 'तू म्हणजे ना डोक्याला ताप आहेस नुसता/ती!', हे प्रेम असतं; आणि ज्या भावलीसाठी आजीकडून स्वेटर विणून घेतला, तिच्या डाव्या डोळ्याच्या ज़ागी दिसत असणारं नुसतंच भोक आणि डोक्यावरचे तुरळक केस यांची पर्वा न करता तिला कुशीत घेऊन झोपणं, हे सुद्धा प्रेमच असतं. इतकं विविधांगी प्रेम कसं बरं सेम असू शकेल? मी प्रेम केलंय ते अशा सेम नसलेल्या प्रेमावर.
प्रेम ही संकल्पना, किंवा तिचा आपण लावत असलेला अर्थ, या दोन गोष्टी एकत्र किंवा आळीपाळीने स्थलकालपरत्त्वेच नव्हे तर वयपरत्त्वेही बदलत असतात, असं माझं ठाम मत आहे. मी जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडलो, तेव्हा भातुकली खेळणाऱ्या माझ्या बालमैत्रिणीच्या प्रेमात पडलो होतो; भातुकली खेळताना ती ज्या रिअल लाइफ़ 'सांसारीक' सिच्युएशन्स तयार करायची, त्यांच्या प्रेमात पडलो होतो; की भातुकलीसाठी तिच्या घरून मिळणाऱ्या 'पेप्पी' आणि 'अंकल चिप्स'च्या प्रेमात पडलो होतो, हे सांगणं कठीण आहे. आमच्याच काही मित्रमैत्रिणींची त्या 'अंकल चिप्स'सारखीच कुरकुरीत प्रेमं (प्रेम या शब्दाचं अनेकवचन काय आहे हो?) आम्ही आज़ही एन्जॉय करतो. तेव्हा आम्हा दोघांची एक प्रतिक्रिया नेहमीच असते - "आपलं 'लफ़डं' कधी झालंच नाही!" पोरं कसली दिवटी आहेत, याची ज़ाणीव आमच्याआमच्या आईबाबांना वेळीच झाल्याने भातुकलीमधले आमचे 'आई-बाबा' हे रोल्स 'ताई-दादा' मध्ये बदलणे, हे असं लफ़डं न होण्याचं कारण असावं. लफ़डं हे 'प्रेम इन इटसेल्फ़' आहे, असं मला नेहमीच वाटत आलंय. प्रेमाची खुमारी लफ़ड्यात अनुभवायला मिळण्याचं भाग्य फार कमीज़णांच्या नशिबात असतं. तुमचंआमचं लफ़डं सलमान-कतरीनाच्या लफ़ड्यासारखं स्टारडस्ट किंवा चित्रलेखाच्या मुखपृष्ठावर झळकणारं, झगझगीत नसलं तरी किमान आईबाबांपासून चोरून ठेवण्यासारखं, मित्रमैत्रिणींच्या कौतुकाचा आणि वाती वळताना साठेमामींच्या जिव्हाळ्याचा विषय ठरू शकणारं नक्कीच असतं. मराठीच्या पुस्तकातली बालकवींची 'पारवा' तोंडी परीक्षेला आहे, हे माहीत असूनही पाठ नसते, आणि करताही येत नाही. पण परदेसमधलं 'दो दिल मिल रहे हैं' अथपासून इतिपर्यंत मुखोद्गत व्हायला अजिबात कष्ट पडत नाहीत. क्लास बंक करून प्लाझाला पिक्चर बघायचा. मग बिल्डिंगखाली आल्यावर आधी वर कोणी ज़ायचं आणि मग अर्ध्या तासाने कोणी ज़ायचं याचं प्लानिंग करायचं. झालंच तर गणपतीच्या मखराची सज़ावट करताना, तिची किंवा त्याची आयडिया कितीही आवडली, तरी मुळीच पाठिंबा न देता इतरांवर त्याचा निर्णय सोपवून, 'मी डावा गाल खाज़वला म्हणजे मला तुझी आयडिया आवडली', हे प्लान करायचं. किती ही सृजनशीलता! प्रेमात पडल्यावर काय काय पापड लाटावे लागतात, हे त्या बिचाऱ्या प्रेमवीरांनाच ठाऊक असतं. आणि त्यांच्या या धाडसाला 'लफ़डं' म्हणून सारी दुनिया या प्रेमाला एक नकारात्मक छटा देऊन टाकते. अशा कित्येक लफ़ड्यांवर मी मनापासून प्रेम केलंय - स्वत:ची नसली तरी!
'बाज़ारात दालचावलचे भाव काय आहेत', किंवा 'प्रेम कशाशी खातात कळतं का तुला' वगैरे घिसेपिटे प्रश्न प्रेमात तहानभूक हरवलेल्यांना कसे हो पडणार? आपल्या जानेमनला शाहरूख 'जाम म्हणजे जाम' इतका (कदाचित आपल्यापेक्षाही जास्त!) आवडतो, हे माहीत असलं की 'कुछ कुछ होता है' बघताना तिकिटावर किती उडाले की उडवले, याचा विचार करायचा नाही, हे त्यांना कळतं. त्याचबरोबर जिप्सीतली पावभाजी या महिन्याच्या उरलेल्या पॉकेटमनीत बसणार नाही, हे सुद्धा त्यांना नक्कीच माहीत असतं. त्याला आवडतो म्हणून मी माझा मोरपिशी पंजाबी घालायचा नि त्यावर काळी ओढणी घ्यायची; आणि तिला आवडत नाही म्हणून मी पर्पल लूज़र घालायचा नाही, हे त्यांना कळतं. पहिल्या मज़ल्यावरून ती बघते आहे म्हणून चौकात क्रिकेट खेळताना आपली विकेट ज़ाऊ द्यायची नाही हा त्याचा निर्धार असतो - बॉल मांड्यांवर ज़बरी शेकत असला तरी! आणि वर्गात बसून असाइनमेंट पूर्ण करत असला, तरी त्याचं लक्ष नाटकाच्या तालमीत आहे, हे माहीत असल्याने डायलॉग विसरायचा नाही, याकडे तीही कटाक्षाने लक्ष देते. शाळाकॉलेजातून बाहेर पडल्यावर नोकऱ्या केल्या, गाठीशी चार पैसे ज़मायला लागले, आणि घरच्यांनी स्थळं बघायला सुरुवात केली, की घरी सांगायचं हा बेत तर कितीतरी आधीपासून तयार असतो. नव्या ज़मान्यातले साहित्यविश्वातले कित्येक अनामिक कवी हे प्रेमाचीच देणगी आहेत. चार ओळी असोत किंवा चाळीस; छंदात असो वा नसो, गझल असो की मुक्तक की चारोळी; पण ते कविता करतात आणि स्वतःला व्यक्त करतात. सुरात गाता येत नसलं तरीही ऑर्केस्ट्रा ऑडिशन्ससाठी किंवा अभिनयाचं अंग नसतानाही नाटकासाठी नाव देतात. असं अचूक प्लानिंग, असंख्य तडज़ोडी शिकवणारं प्रेम, काहीतरी करून दाखवण्याची आणि स्वतःचं वेगळं अस्तित्त्व निर्माण करण्याची ऊर्मी ज़ागवणारं प्रेम, असंख्य कवितांमधून व्यक्त होणारं प्रेम - या प्रेमावर मी प्रेम केलंय. डाळतांदळाचे भाव आणि गझलेचं व्याकरण माहीत असूनही!
कधीकधी नकोसं वाटतं असं प्रेम करणं. जेव्हा कुणी अमृता देशपांडे, रिंकू पाटील जिवंत ज़ाळली ज़ाते. जेव्हा आपण हृतिक रोशनसारखे दिसत नाही किंवा आपल्याकडे होंडा सिविक नाही, हे कोणालातरी कळतं. आमच्या वयात वर्षाचं अंतर आहे; ती जैन आहे, मी कोकणस्थ चित्पावन आहे आणि आम्ही पुढे गेलोच तर नक्की कोणालातरी हार्ट ऍटॅक येणार, याची ज़ाणीव होते. तिचे बाबा लार्सन ऍंड टूब्रोमध्ये जी एम आहेत आणि माझे बाबा मंत्रालयात हेडक्लार्क, हे लक्षात येतं. आधीचं गुलाबी लफ़डं नुसतं लफ़डं राहत नाही, तर त्याचं 'सॉलिड प्रकरण' बनतं, कधीकधी दारावर पोलीसही येतात. मोरपिशी पंजाबी घालावासा वाटत नाही की जिप्सीत ज़ावंसंही वाटत नाही. क्रिकेट खेळताना क्लीन बोल्ड होऊनही फरक पडत नाही. मग एकमेकांच्या सुखासाठी प्रार्थना करत प्रेमवीर आपापल्या रस्त्याने चालू पडतात. पण प्रेमाची अनुभूती घेऊन आणि त्या अनुषंगाने मिळणारे 'लाइफ़ मॅनेजमेंट'चे धडे घेऊनच.
इतक्या गहन आणि सर्वांगसुंदर विषयावर सर्वसमावेशक धडी देणारा मी कोणी 'लव्ह गुरु' नाही. पण ढोबळमानाने या प्रेमाचे अनेक प्रकार आणि स्वतःला तसेच इतरांना आलेले अनुभव, प्रेमातल्या टिप्स आणि पिटफ़ॉल्सचं प्रामाणिक चित्रण या मालिकेद्वारे करण्याचा प्रयत्न आहे. अनुभवी प्रेमवीरांना यात स्वतःला हुडकता आले, तर आनंदच आहे. आणि होतकरू प्रेमवीरांसाठी ही मालिका अगदी नवनीत गाईड नाही, पण किमान क्विक रेफ़रन्स पॉकेट डिक्शनरी स्वरूपातले मार्गदर्शक ठरले, तरी खूप आहे!