Saturday, June 10, 2006

नऊ ते पाच - शेवट

एक भ्रमणध्वनी संच आणि इतर भ्रमणध्वनी संच, संगणक, पीडीए अशा अनेक उपकरणांमधील '(सु)संवाद' ज्याद्वारे साधला ज़ातो, ते 'ब्लू टूथ' तंत्रज्ञान राबवणारे सॉफ़्टवेअर तपासणे या खास कामावर माझी नियुक्ती झाली. या तंत्रज्ञानाच्या नावावरून त्याचा आणि दातांचा (किंवा दातांच्या रंगाचा ... मोत्यासारखे शुभ्र, पिवळट, (निळे!) आणि क्लोज़ अपच्या त्या प्रसिद्ध जाहिरातीत शिशुवर्गातील मुलांनी सांगितलेले आपल्या शिक्षिकेच्या दातांचे काही रंग) काही संबंध असतो की नाही, याबद्दल मी अज़ूनही माहिती मिळवण्याच्या खटपटीत आहे. तो चिंतनाचा स्वतंत्र विषय आहे. पहिल्याच दिवशी एकदम 'ढासू' दिसणारे काही भ्रमणध्वनी संच तपासणीसाठी हातात पडले आणि मी त्यांच्या प्रेमात. त्यामुळे तपासणीच्या सगळ्या पायऱ्या वाचून, त्या समज़ावून घेऊन तदनुसार ते संच तपासणे हे सगळे मी इमानेइतबारे केले. ज़े काही निकाल हाती आले, त्यांची नीट नोंद केली आणि त्याबद्दल ओ एल् ची शाबासकीसुद्धा मिळवली. मला खूप आनंद झाला त्या दिवशी. झालेला सगळा आनंद घरी येईस्तोवरच्या तासाभराच्या प्रवासात, कुणाबरोबर तरी वाटून घेण्यापूर्वीच पूर्ण हरवून गेला. सकाळाची अपुरी झोप येताना बसमध्ये काढली (कार्यालयात नव्हे!) आणि घरी आल्यावर मस्तपैकी ताणून दिली. दररोज़चे नऊ ते पाचचे हे वेळापत्रक असेच, तंतोतंत, प्रामाणिकपणे राबवायचे (अगदी बसमधल्या झोपेसकट!) हा विचार तेव्हाच पक्का केला.

पण नव्याचे नऊ दिवस या न्यायाने हळूहळू कामातील नाविन्य संपले. सगळे कसे 'यांत्रिक' होऊन गेले. सकाळी नऊपासून सायंकाळी पाचपर्यंत एका ठराविक साचेबद्ध कामाचा कंटाळा येऊ लागला आणि मग मुख्य कामाबरोबरच 'ज़ोडधंदे' शोधायला सुरुवात झाली. सहकाऱ्यांबरोबरचे हास्यविनोद हा त्यांपैकीच एक. अमेरिकेत एक बरे (आणि विचित्र) आहे. तुमच्या दुप्पट-तिप्पट वयाच्या माणसालाही अगदी नावाने हाक मारता येते. आमचा व्यवस्थापकसाहेब 'आज़ोबा' म्हणण्याइतका मोठा नसला तरी सामान्यपणे आपण ज्यांना अहोज़ाहो करतो, तेव्हढा 'काका'छाप मोठा नक्कीच आहे. पण तरीही त्याला आपल्या लंगोटीमित्रासारखे "हे स्टीव्ह, व्हॉट्सप" ('क्या रे भिडू स्टीव्ह, कैसा है'छापाचे!) म्हणणे सुखावून ज़ाते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी ज़रा जास्तीच खेळीमेळीचे वातावरण असते. पण मला दिसणारी नाण्याची दुसरी बाज़ू अशी आहे, की यामुळे इकडच्या 'काका', 'आज़ोबा' यांच्याज़वळ ज़ाणाऱ्या व्यक्तिरेखांबद्दलचा आदरभाव निर्माण व्हायला आणि तो रुज़ला की चिरकाल कायम रहायला तुलनेने जास्त वेळ लागतो. साहेबापासून ते थेट कंपनीच्या उपाहारगृहातील आचाऱ्याबरोबर थट्टामस्करी चालू झाल्याने कामाचा कंटाळा थोडातरी निवळला आणि नवीन ज़ोम आला. त्याचबरोबर क्युबिकलसमोरून पॉला, ज्युडी, एमी, XXXचे खळखळणे (माझ्या मित्रपरिवारात सध्या या फुल्या फारच प्रिय असून प्रकरण मुलीच्या फोटोपर्यंत (तो तर केव्हाच मिळालाय!) गेले असून आता ते कुंडलीपर्यंत (ती आहे की नाही हे मलाच माहीत नसणे, हे माझे अहोभाग़्य!) आणि त्याच्याही पुढे नेण्याचा कट शिज़ायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सदर पाककृती लवकरात लवकर पूर्ण न होण्याच्या खबरदारीस्तव आणि वाचकांच्या कल्पनाशक्तीस वाव द्यावा म्हणून तूर्तास फुल्याच!), झेरॉक्स मशीनचा आणि प्रिंटरचा लयबद्ध आवाज़, दर आठवड्याच्या बैठका, त्यातली मला अजिबात न कळणारी चर्चा, काम करताकरता अधूनमधून डोळ्यांवर ऐकायला येणारे 'सोजा राजकुमारी सोजा' (आणि तसे झाल्यावर लगेच कॉफ़ीमेकरकडे घेतलेली धाव!), दिवसातून एकदातरी व्हेंडिंग मशीनमध्ये ज़ाणारे काही क्वार्टर्स (स्थानिक २५ पैसे) आणि बाहेर येणारा सोडा अगर चिप्स आणि या सगळ्यात दडलेले कष्टाचे काम यांमुळे माझे नऊ ते पाच स्थिरस्थावर झाल्यासारखे वाटू लागले. दररोज़चे काम करतानाच कॅरोलायना हरिकेन्सच्या हॉकी गेमबद्दलची चर्चा होते. वीकेंडला काय केले आणि येत्या वीकेंडला काय करायचे आहे, याचे वेळापत्रक व्हेरिफ़िकेशनच्या वेळापत्रकाइतकेच सूत्रबद्धपणे बनवले ज़ाते. तसे झाले की येणाऱ्या शुक्रवारच्या संध्याकाळच्या प्रतीक्षेत आठवड्याचे बाकीचे दिवस सुसह्य होऊन गेल्याचे ज़ाणवतही नाही. संध्याकाळी बसमधून घरी येताना काढलेल्या तासभर झोपेला आता सकाळी कार्यालयात ज़ातानाच्या बसमधील चाळीस मिनिटांच्या झोपेची साथ मिळू लागली, एव्हढाच काय तो ठरवलेल्या वेळापत्रकातला छोटासा (?) बदल.

डिसेंबरात भारतात ज़ायचा बेत आहे. त्यासाठीचे तिकीट आतापासूनच आरक्षित केले नाही, तर लवकरच किमती गगनाला भिडणार हे अटळ सत्य डोळ्यांसमोर दिसते आहे. फ़ीचे पैसे, देणेकऱ्यांची देणी हा सांसारिक स्वरुपाचा खर्च विद्यार्थीदशेतच झेलायला लागतोय. पण अज़ून आतापर्यंत काम केलेल्या तीन आठवड्यांचा सोडा, तीन दिवसांचाही पगार मिळालेला नाही. ते सुद्धा आम्ही तासाच्या बोलीवर काम करणारे वेठबिगार असताना. बरे आतापर्यंत एकही खाडा केलेला नाही. पण आमच्या हक्काच्या साडेअठरा डॉलर प्रतिताससाठी झगडणारा कोणी शरद रावांसारखा कैवारी (! हाहाहा... पगार नसला झाला की काय काय (वाट्टेल ते!) आठवेल/सुचेल काही सांगता येत नाही, हे मला आता पुरेपूर पटले हो!) इकडे नाही आणि इकडे संप बिंप पुकारता येण्याचा अनुभव आणि कौशल्य दोन्ही नाही ः( कौशल्य आहे ते सॉफ़्टवेअरच्या तंत्राचे, ज्ञानाचे, त्यामधील पायाभूत संकल्पना आणि त्यांच्या उपयोजनाचे. अनुभव आहे तो कष्ट करण्याचा आणि नीट काम करण्याचा.

गिरणगावातल्या बंद पडलेल्या गिरण्यांचे भोंगे कधी काळी वाज़लेले ऐकले आहेत माझ्या कानांनी. तिथला मुंबईकर साडेअठरा 'रुपये' प्रतितासापेक्षा कमी पगारावर आयुष्य काढत आला आणि भोंग्यांच्याच गजरावर त्याला ज़ाग येत असे. त्यामानाने मी बराच सुखवस्तू परिस्थितीत दिवस ढकलतोय (?) याची ज़ाणीव झाल्यावर पुढच्या पहाटे गजर झाला रे झाला की दात घासायला बेसिनसमोर उभे राहण्याची अनामिक प्रेरणा मिळते. अशा वेळी माझे 'नऊ ते पाच' मला पगारापासून बरेच दूर कुठेतरी घेऊन गेलेले असते.

नऊ ते पाच - १

गजराच्या घड्याळाचा गजर कसा वाज़तो, हे ऐकायची कधी पाळी न आल्याने (गरज़च न पडल्याने) 'गजर झाल्यावर झोपेतून उठणे' या प्रकाराशी माझा आज़तागायत संबंध नव्हता. माझ्यासाठी "अरे मेल्या, ऊठ आता. साडेआठ वाज़ले. ऐद्यासारखं खायचं आणि लोळायचं, बास्! बाकी काही नाही", अशी आईने चालू केलेली आरती हाच खरा गजर. झालंच तर या मुख्य आरतीला ज़ोडूनच, "कामात काडीची मदत नाही","अभ्यासाच्या नावानेही शून्य", इत्यादी आरत्या गाऊन झाल्यावर, अगदीच निरुपाय झाला, की "चिटणिसांचा गुण लागलाय, दुसरं काही नाही", अशी मंत्रपुष्पांजली! पूर्वजांवरच (आणि त्यांच्या कर्तृत्त्वावरच!)असे खळबळजनक आरोप झाले, की नंतर मात्र प्रसाद वाटायला बाबा हज़र!!! मग तो प्रसाद भक्षण करून अस्मादिकांची स्वारी बिछान्यातून बेसिनवर. गॅलरीत तोंडात ब्रश धरून पुढची उरलीसुरली झोप काढायची (म्हणजे तसा प्रयत्न करायचा) आणि काकडआरती सुरू झाल्यावर दूध, अंघोळीसाठी पुन्हा घरात पाऊल टाकायचे हा दिनक्रम. पण इकडे यायच्या दिवशी विमानतळावर "अमेरिकेत कसा रे उठणार तू स्वतःचा स्वतः आणि कसं सगळं वेळेवर आवरणार भराभ्भर!" या वाक्यातली आईच्या जिवाची तगमग, ती दिनचर्या अंगवळणी पडलेल्या माझ्यासारख्या(निगरगट्टा)लाही क्षणभर भावूक (!) करून गेली ः(

चालू उन्हाळ्यात सहाय्यक अभियंता म्हणून एके ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळाली, आणि (नाईलाज़ाने) गजरावर उठणे(ही) आले. आज़पावेतो हे पद फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोऱीबंदर येथील मुख्य कार्यालयातच अस्तित्त्वात आहे, असे मला वाटत होते. आणि त्या कार्यालयातला त्या अभियंता साहेबाचा कारभार पाहून अशी नोकरी मिळणे खरंच भाग्याचे आहे, असेही वाटायचे ;) त्यामुळे सदर कंपनीकडून मला 'सहाय्यक अभियंता' पदासाठीचा प्रस्ताव आल्यावर मी त्याचा हसतमुखाने स्वीकार केला. तासाचे साडेअठरा डॉलर्स मिळत असतील, तर म्या गरीबाची घड्याळाच्या गजरावर उठण्याचीही तयारी आहे (वावा! काय पण पराक्रम!) नोकरीचा हा प्रस्ताव स्वीकारण्यामागे अमेरिकेतील शिक्षणाच्या आगामी सत्राची फी, अगदी पूर्ण नसली तरी बव्हंशी ज़मवणे आणि आज़वरच्या तांत्रिक ज्ञानाचा संगणक आणि दूरसंचार क्षेत्रात उद्योगधंद्याच्या तसेच अर्थार्जनाच्या दृष्टीने कसा फ़ायदा होतो हे पाहणे असा दुहेरी उद्देश होता (अर्थात "फ़र्स्ट थिंग्ज़ फ़र्स्ट"च्या तत्त्वानुसार, येथेसुद्धा, पहिला उद्देश पहिला आणि दुसरा उद्देश दुसरा!)

नोकरीच्या पहिल्याच दिवशी मी ठरल्या वेळी कार्यालयात न पोचल्याने, कंपनीच्या आवारातच माझ्या निरोप समारंभाची तयारी पहायला मिळेल, या विचाराने पाचावर धारण बसली होती. अर्थात, गजरावर उठण्याच्या नेट प्रॅक्टिसचाही तो पहिलाच दिवस असल्याने, मी स्वतःला उदार मनाने माफ़ केलेच होते म्हणा. ज़ोडीला बस चुकल्याचे सबळ कारणसुद्धा तयार ठेवले होते. मात्र कामाचा पहिलाच दिवस असल्याने कंपनी आपल्या नादान कर्मचाऱ्याची पहिलीच (आणि शेवटचीच) चूक पोटात घालेल असा दृढ विश्वास, आणि कार्यालयात (उशीरा) पोचलेले इतर काही समदुःखी सहकारी पाहून जिवात जीव आला. मनुष्यबळ व्यवस्थापिका (हुश्श! एच आऱ मॅनेजर किती सुलभ सुटसुटीत आहे, नाही का?!) बाईंनी स्वागत करून एका स्वतंत्र कक्षात नेले. तेथे नवीन कर्मचाऱ्यांसाठी कंपनीतर्फ़ेच एक माहितीसत्र आयोजित करण्यात आले होते. कंपनीची संरचना, काम, व्यापार, सुरक्षा, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि ज़बाबदाऱ्या यांसंबंधी आवश्यक ती माहिती दिली गेली. माहिती देणारी मनुष्यबळ खात्याची ती कर्मचारी एखाद्या हवाईसुंदरीसारखी असल्याने हे सत्र मुळीच कंटाळवाणे झाले नाही ः) आवश्यक कागदपत्रांसंबंधीची सगळी औपचारीकता आटोपून झाल्यावर मला आणि माझ्याच चमूत माझ्याबरोबर काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या माझ्या विद्यार्थीमित्रांना आमच्या चमूनायकाने (खरे तर चम्या नायकाने! पण इकडे यांना आदराने ओ एल् म्हणायचे. ओ एल् = ऑब्जेक्ट लीड!) वरच्या मज़ल्यावरील आमच्या नियोजित विभागात नेले. दरम्यान, जेवणाच्या वेळेत (कंपनीच्याच खर्चात = फुकटात) सुग्रास भोजनाचा लाभ झाला आणि गजर लावून मेहनतपूर्वक उठल्याच्या कष्टांचे फळ मिळाल्याच्या भावनेने अगदी कृतकृत्य व्हायला झाले. मग चमूतील इतर सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर ओळख करून देण्याघेण्यासाठी पाचदहा मिनिटांची 'ओळखपरेड' झाली. खरे तर तेव्हाच बारा आठवड्यांच्या या 'कैद-ए-बामुशक्कत'ची पुसटशी कल्पना यायला हवी होती. पण पुत्रप्रेमाने अंध झालेल्या (की डोळे दिपलेल्या?) धृतराष्ट्रासारखेच 'साडेअठरा डॉलर प्रतितास' पाहून माझे डोळे दिपले होते. पहिल्या दिवशीचे पाच वाज़ले आणि कोंडवाड्यातल्या ज़नावरासारखा मी बससाठी मोकाट धावलो. खरं सांगू का? माणसाने आयुष्यभर कॉलेजातला नि शाळेतला विद्यार्थीच रहावे, कधी मोठेबिठे होऊ नये, आणि नोकरीबिकरीच्या मायाजालात अडकू नये, असे त्यावेळी वाटले होते. 'आय ऍम नॉट मेड फ़ॉर धिस नाइन टु फ़ाइव्ह स्टफ़' अशी पक्की खात्री झाली होती हो मनाची!

दुसऱ्या दिवशीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मी भ्रमणध्वनी (मोबाइल फोन!) मध्ये ज़े सॉफ़्टवेअर वापरले ज़ाते, त्याचे कार्य अपेक्षेप्रमाणे चालते की नाही, हे सॉफ़्टवेअर कंपनीच्या प्रमाणभूत पद्धतीनुसार लिहिले गेले आहे की नाही, त्याचा दर्जा काय आहे, गुणवत्ता किती आहे, ते निकषांबरहुकूम आहेत की नाही, ग्राहकांना दिलेल्या वचननाम्यातली वचने सॉफ़्टवेअर पूर्ण करेल की नाही (निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष कसे आपापला जाहीरनामा प्रसिद्ध करून आपल्याला गंडवतात, तसे तर काही या सॉटवेअरमुळे होणार नाही ना?!), इत्यादी इत्यादी तपासण्या करण्याचे काम करतो. या सगळ्याला एक छान सोपा शब्द आहे, 'सॉफ़्टवेअर व्हेरिफ़िकेशन'. आता, जे लोक हे सॉफ़्टवेअर लिहितात (त्यांना 'डेव्हलपर्स' म्हणतात), ते या कामाला आणि हे काम करणाऱ्या आमच्यासारख्या पामरांना तुच्छ नज़रेने पाहतात आणि या सगळ्या धर्मकार्याची फक्त 'टेस्टिंग' अशी संभावना करतात. वास्तविक पडताळा (व्हेरिफ़िकेशन) हे तपासणी/चाचणी (टेस्टिंग) बरोबरच आणखीही काही अशा विस्तृत स्वरुपाचे काम आहे. आणि महत्त्वाचेसुद्धा आहे (तुम्ही भले कितीही काही सॉफ़्टवेअर लिहाल हो! पण ते चालायला हवे ना आणि प्रमाणबरहुकूम असले पाहिज़े ना!) त्यामुळे डेव्हलपर्सनी केलेल्या कोणत्याही हेटाळणीकडे दुर्लक्ष करून 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'च्या तत्त्वाने प्रामाणिकपणे, सचोटीने हे धर्मकार्य सिद्धीस न्यायचे हे आमच्या व्यवस्थापक साहेबांनी या पदासाठी मुलाखत घेतानाच माझ्या मनावर पक्के बिंबवण्याची खबरदारी घेतली होती. 'व्हेरिफ़ायर' किंवा 'टेस्टर' हे डेव्हलपरच्या अस्तित्त्वाला धोका असल्याची भीती डेव्हलपरच्या मनात बसली, की त्यांची मुज़ोरी बरीचशी निवळते, वगैरे कानमंत्र दिले गेले आणि माझे 'नऊ ते पाच' चालू झाले.

Wednesday, June 07, 2006

जगाच्या राजधानीतून - शेवटपरतीच्या छोटेखानी प्रवासात न्यूयॉर्क दर्शनातील एकूण उत्सुकता ज़रा कमी झाल्यासारखे वाटले. असे का होते आहे याची चाचपणी केली असता पोटातल्या कोकलणाऱ्या कावळ्यांनी त्याचे उत्तर दिले. काहीतरी खायलाच पाहिज़े, हे तर कळत होते पण उरलेसुरले न्यूयॉर्कसुद्धा बघायचे होते. बोट पुन्हा बॅटरी पार्कला (न्यूयॉर्कमधला भाऊचा धक्का ;)) आल्यावर तेथे खाण्यापिण्याचे बरेचसे (चांगले पण महाग) पर्याय खुले होते. ज़वळच एक हौशी कलाकार अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेसारखा पोशाख करून आणि चेहऱ्याची तशी रंगरंगोटी करून अमेरिकेचा राष्ट्रध्वज हातात घेऊन उभा होता आणि येणाज़ाणाऱ्या चिल्ल्यापिल्ल्यांशी हस्तांदोलन करून त्यांना आकर्षित करत होता. मग त्यांचे आपापल्या पालकांकडे त्याच्याबरोबर फ़ोटो काढून घेण्यासाठी सुरू झालेले हट्ट पाहून मला त्या सगळ्या प्रकारामागील 'बिझनेस स्ट्रॅटिजी' कळली. तशीच काहीशी मोर्चेबांधणी बाज़ूलाच बसलेल्या एका कृष्णवर्णीय भिकाऱ्याने केली होती. आपल्या मनात आज़वर 'भिकारी' या व्यक्तिरेखेचे ज़े चित्र कायम झाले आहे, ते लक्षात घेता, अमेरिकेतील या व्यक्तिरेखांना भिकारी म्हणणे मला खरोखरच जिवावर येते. या महाशयांनी छान युक्ती केली होती. येणाज़ाणारे पर्यटक कोणत्या देशाचे आहेत हे अचूक हेरून त्या देशाचे राष्ट्रगीत तो आपल्या व्हायोलीनवर वाज़वत होता. अर्थात, त्याने 'जन-गण-मन' सुद्धा वाज़वले. पण आम्ही भारतीय आणि त्यातून मराठी माणूस. राष्ट्रगीत संपेस्तोवर आम्ही ताठ मानेने 'सावधान' स्थितीत उभे होतो (म्हणजे काय, तर खिशातून पैसे काढून भीक दिली नाही. भारतात असताना चार आणे, आठ आणे अगदी क्वचित प्रसंगी बाहेर निघालेही असतील, पण डॉलर? छे! कधीकधी मला माझ्या अशा वागण्याचे हसूही येते. हे योग्य की अयोग्य असा प्रश्नही पडतो. पण उत्तर मात्र कधीच मिळत नाही ः( )
बॅटरी पार्कबाहेरील एका फेरीवालीकडून न्यूयॉर्कची आठवण म्हणून दोन टी शर्टस् घेतले (ते सुद्धा पाच डॉलरमध्ये दोन! अमेरिकेत असे 'गुड् डील' मिळण्याला आणि अर्थातच मिळवण्याला फार महत्त्व आहे) निदान पोलीस तरी अपेक्षाभंग करणार नाही या आशेपोटी पुढचा पत्ता ज़वळच उभ्या असलेल्या पोलिसालाच विचारला. त्याच्या सुचवणीनुसार त्याने सांगितलेल्या ठिकाणी बसची वाट पाहत उभे राहिलो. आता आम्हांला एंपायर स्टेट ही जगप्रसिद्ध गगनचुंबी इमारत बघायला ज़ायचे होते.
बसमधून बघायला मिळालेले न्यूयॉर्कही तितकेच सुंदर आणि अमेरिकेतील इतर काही शहरांच्या तुलनेने बरेच वेगळे वाटले. बसमधून बाहेरची वर्दळ आणि चिरकालीन आनंद नि समाधानाचे चेहरे रंगवलेली माणसे बघायला मजा येत होती. हा न्यूयॉर्कमधला 'सामान्य'(?!) माणूस. सोमवार ते शुक्रवार काम आणि शनिवार-रविवार कामाच्या दुप्पट आराम. रस्त्याच्या दुतर्फ़ा छोटीमोठी दुकाने, उपाहारगृहे, मध्येच न्यूयॉर्क विद्यापीठ, मॅरिअट फ़ायनॅन्शिअल सेंटर हॉटेल, बसथांबे असे सगळे बघत बस पुढे चालत होती. इच्छित स्थळी उतरल्यानंतर उजवीकडचा रस्ता पकडून पन्नास-एक पावले गेलो आणि १०३ मज़ली एंपायर स्टेटचे पहिले दर्शन झाले.
इमारतीत पाऊल टाकण्याआधी पोटोबाची पूजा करायची ठरली. ज़वळच उभ्या असलेल्या गाडीवरून सीग कबाबचा सुगंध जीभ चाळवत होता. त्याच्या बाज़ूच्या गाडीवर खारे दाणे, चणे, मसालेदा काज़ू वगैरेची गाडी होती (अमेरिकेतही चणेवाल्याचे दर्शन झाले आणि मी भरून पावलो;मात्र त्याच्याकडे मुंबईचा चनाछोर काही मिळाला नाही ः() सीग कबाब आणि मसालेदार काज़ू हे आमचे त्या दिवशीचे जेवण आटोपले आणि एंपायरमध्ये प्रवेश केला. अपेक्षेप्रमाणे याही ठिकाणी विमानतळसदृश सुरक्षाव्यवस्था होतीच. तिच्यातून यथासांग पार पडून, तिकिटे काढून दूरनियंत्रित लिफ़्टमध्ये चढलो. आत उभे राहून ज़ाणवणारही नाही अशा वेगाने ज़ाणाऱ्या त्या लिफ़्टने आम्ही ज़वळज़वळ एका मिनिटातच ८६व्या मज़ल्यावरील सज्ज्यात पोचलो.

ही इमारत न्यूयॉर्कचे आणखी एक भूषण. वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ज़ुळे मनोरे उभे राहिस्तोवर ही न्यूयॉर्कमधली सर्वात उंच इमारत होती. आणि अर्थात आता त्या मनोऱ्यांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर ही सर्वात उंच इमारत आहे. हिचे बांधकाम विल्यम लँब या स्थापत्यशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली १७ मार्च १९३० रोजी चालू झाले. एक वर्ष ४५ दिवसांच्या अथक परिश्रमांनंतर ही पूर्ण उभी राहिली. हिच्या उभारणीस न्यूयॉर्कचे तत्कालीन राज्यपाल आणि त्यांचे सहकारी यांचा आर्थिक तसेच राजकीय मार्गाने वरदहस्त लाभल्याचे समज़ते. इमारतीचा इतिहास, काही दुर्मिळ छायाचित्रे, सद्यस्थिती आणि पर्यटकांसाठी उपयुक्त माहिती याबद्दल उत्सुकता असणाऱ्यांनी http://www.esbnyc.com/index2.cfm या इमारतीच्या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी. आज़ही ही इमारत 'न्यूयॉकची राजदूत' म्हणून अभिमानाने मिरवते.

इमारतीचे मुख्य आकर्षण म्हणजे ८६व्या मज़ल्यावरून चहूबाज़ूंनी दिसणारे 'अख्खे' न्यूयॉर्क. तेथील निरीक्षण सज्ज्यात उभे राहून आपण जगाच्या डोक्यावर उभे असल्याचा भास झाल्यावाचून राहत नाही. हडसन नदी, ब्रूकलिन पूल, एलिस आणि लिबर्टी बेटे असा नज़ारा एका बाज़ूला आणि दुसरीकडे न्यूयॉर्क बंदर, मेटलाइफ़ इन्शुरन्स बिल्डिंग आणि इतर अनेक गगनचुंबी इमारती. एंपायर स्टेटच्या उंचीपुढे त्या खुज्याच वाटत होत्या. कदाचित हेच या एंपायर नामक एंपरर चे एंपायर ः) रस्त्यावरच्या गाड्या तर अक्षरशः मुंग्यांप्रमाणे भासत होत्या. आणि साहजिकच, माणसे तर दिसतही नव्हती.

घोंघावणारा वारा, सहपर्यटकांचे हसणेखिदळणे आणि छायाचित्रे काढणे आणि सूर्यास्त यांनी गज़बज़लेली एंपायर स्टेट मनसोक्त भटकून झाल्यावर बाहेर पडलो. पुढचा मुक्काम होता टाइम स्क्वेअर (याला टाइम 'चौक' म्हणणे मला खरेच आवडणार नाही. चौक असावा तर तो म्हणजे अप्पा बळवंत चौक, हुतात्मा चौक असा काहीतरी. यांना 'चौक' म्हणण्यातला जिव्हाळा आणि शान टाइम स्क्वेअरला चौक म्हणण्यात नाही and vice versa)

टाइम स्क्वेअर म्हणजे फ़क्त रोषणाई आणि नुसती रोषणाई. टाइम स्क्वेअर म्हणजे जाहिराती आणि रहदारी. टाइम स्क्वेअर म्हणजे निळे, लाल, हिरवे, गुलाबी सगळ्या रंगांचे दिवे. येथील विद्युत जाहिरातफलकांवर आपली जाहिरात लावण्याचा दर प्रतिसेकंद काही दशलक्ष डॉलर्सच्या घरात असल्याचे समज़ते. त्यामुळे कोकाकोला, एच एस् बी सी, सॅमसंग यांसारख्यांचे लाड हा टाइम स्क्वेअर इमानेइतबारे पुरवतो. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध 'हार्ड रॉक कॅफ़े' येथेच. बँक ऑफ़ अमेरिकेचे कार्यालय, 'व्हर्जिन' हे गाण्यांच्या कॅसेट्स, सीडीज़, डीव्हीडीज़ चे प्रसिद्ध दुकान, एक मोट्ठे खेळण्यांचे दुकान सारे काही येथे होते. आणि नुसतेच उभे नव्हते तर रोषणाईने ओसंडून वाहत होते. न्यूयॉर्क पोलीस खात्याची इमारत तर विद्युत रोषणाईने इतकी झगमगून गेली होती, की लालबागचा राजा किंवा गणेश गल्लीचा गणपती अगर चेंबूरच्या टिळकनगरचा छोटा राजनचा गणपती यांचे वैभव त्या झगमगाटापुढे फिके पडावे. आमच्याकडच्या काही पोलीस ठाण्यामध्ये आज़ही मेणबत्तीच्या प्रकाशात कारभार चालतो, याचे त्यावेळी खूप वाईट वाटले. "टाइम स्क्वेअरमधील एक शतांश टक्के वीज़ महाराष्ट्राला दिली तर देव अमेरिकेचे (थोडेतरी) भले करो", अशी प्रार्थना करण्याचा मोह मी त्यावेळी मुळीच आवरला नाही (आणि एन्रॉनच्या करंटेपणाच्या नावाने बोटे मोडायलाही विसरलो नाही) जाहिरातींबरोबरच दोन तीन विशाल विद्युतपटलांवर बातम्या चालू होत्या. दिवसाचे हवामान आणि आठवडाभराच्या हवामानाचे अंदाज़ वर्तवणे चालू होते. शेअर निर्देशांक दाखवला ज़ात होता. ज्ञानविज्ञान, राजकारण, मौज़मजा सगळे येथे हातात हात घालून, गुण्यागोविंदाने नांदत होते.

टाइम स्क्वेअरच्या प्रकाशात मनसोक्त न्हाऊन निघाल्यावर ज़वळच्याच एका उपाहारगृहात रात्रीचे जेवण घेतले. खरे तर आम्हांला न्यूयॉर्क मध्ये भेळपुरी, पाणीपुरी असे चाटवर्गीय पदार्थ नि तिथल्या वडापावची चव घ्यायची होती. पण फारच उशीर झाल्याने तो संकल्प सिद्धीस नेता आला नाही. एका भारतीय चायनीज़ (म्हणजे जेथील चायनीज़ जेवणाला आपल्या पुण्यामुंबईतल्या 'गाडीवरच्या चायनीज़'ची चव असते) उपाहारगृहात हादडायचा बेतही पाण्यात गेला. फार फार वाईट वाटले ः(
रात्रीच्या साडेबारा वाज़ताही या भागात तुळशीबागेत असते तशी (किंबहुना त्याहून जास्त) गर्दी होती. सारे न्यूयॉर्क शनिवारच्या रात्रीत झिंगले होते. जेवून झाल्यावर तडक घरी आलो आणि मुकाट्याने झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी अंमळ लवकरच (सकाळचे ११ म्हणजे तसे लवकरच नाही का!) परतीची बस पकडायची होती. टाइम स्क्वेअरचा लखलखाट इतका भिनला होता अंगात, की डोळे मिटूनही झोप येत नव्हती. झोपायलासुद्धा प्रयत्न करावे लागतील असे काही बरेवाईट प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात. टाइम स्क्वेअर भेट हा त्यांपैकीच एक म्हणावा लागेल.
आदल्या दिवशीच्या चकचकीत न्यूयॉर्क भेटीमुळे आलेला थकवा आणि न्यूयॉर्क दौरा संपल्याचे दुःख यांचा परिणाम म्हणून परतीची बस पकडताना मन (आणि अंग!) थोडे ज़ड झाले होते. मावशीचा निरोप घेऊन बसमध्ये बसलो. सुदैवाने या प्रवासात लक्कू कमी होते त्यामुळे प्रवास सुखाचा होणार होता. आमच्या अंगात न्यूयॉर्कला घेतलेले 'आय लव्ह न्यूयॉर्क'वाले टी शर्टस् पाहून काही सहप्रवासी आमच्याकडे ज़रा हेटाळणीपूर्ण नज़रेने पाहत आहेत ('कुठल्या गावाहून आलेत' अशी काहीशी नज़र!) हे आमच्या नज़रेतून सुटले नव्हते. तरीही न्यूयॉर्क भेटीचा अपार आनंद यत्किंचितही कमी होऊ न देता मी उरलीसुरली झोप बसमध्येच काढली. ज़ाग आली, तेव्हा माझे 'गाव' आले होते. बसमधून उतरलो आणि घराकडे रवाना झालो.

उण्यापुऱ्या दोन दिवसांच्या सहलीतला हा दोन तपांचा आनंद उपभोगून मी स्वगृही परतलो होतो. खूप मजा केली. माझ्यातला प्रवासी सुखावला होता आणि विद्यार्थी आपल्या सामान्यज्ञानात आणि अनुभवात भर टाकून आला होता. जगाच्या राजधानीत फिरण्याचे आणि ती अनुभवण्याचे भाग्य काहीसे लवकरच लाभल्याचे समाधान चेहऱ्यावर झळकत होते. या सहलीने मला काही ताणतणावाचे प्रसंग, दुःखे या सगळ्यांपासून दूर दूर नेऊन प्रकाशाच्या, आनंदाच्या राज्यात, सुखवर्षावात न्हाऊ घातले होते. आतापर्यंतची मरगळ झटकून नव्या ज़ोमाने कामाला लागायची प्रेरणा या प्रवासातून मिळाली. अशा तरतरीत करणाऱ्या सहली तुमच्याआमच्या सगळ्यांच्याच वाट्याला येवोत हीच सदिच्छा. पंधरा दिवसांपूर्वीच्या त्या सहलीची ही कहाणी आता या भागात सुफळ संपूर्ण होते आहे. कोणा अनामिक कवीमनातून उमटलेल्या मला अज़ूनही स्मरत आहेत -

हासत दुःखाचा केला मी स्वीकार
वर्षिले चांदणे पिऊन अंधार
प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री!

Tuesday, June 06, 2006

जगाच्या राजधानीतून - ३डुलतडुलत मिस न्यू जर्सी समुद्राच्या रँपवर कॅटवॉक करत होती आणि आम्ही आसपासचे सौंदर्य न्याहाळण्यात रंगून गेलो होतो. न्यूयॉर्कच्या किनाऱ्यापासून दूर ज़ाताना मॅनहॅटन स्कायलाइन, जगप्रसिद्ध ब्रूकलिन पूल, डाव्या हातास न्यू जर्सी आणि उजवीकडे न्यूयॉर्क असे विहंगम दृश्य दिसत होते. ज़ोडीला भुर्ऱकन ज़ाणारी अमेरिकन तटरक्षक दलाची एखादी नौका आणि आकाशातून न्यूयॉर्क दर्शन घडवण्याची ज़बाबदारी पेलणारे एखादे हेलिकॉप्टर (अमेरिकेत या वाहनाला चॉपर म्हणायचे बरे का! ;)) होतेच. पहिला थांबा होता एलिस बेटाचा ज़े लिबर्टी बेटाच्या बाज़ूलाच आहे. पण एलिस बेटावर एक संग्रहालय आणि छान हवा या यतिरिक्त दुसरे काही नसल्याचे मावशीबाईंनी सांगितल्याने आम्ही तेथे उतरलो नाही. पाचच मिनिटात मिस न्यू जर्सी लिबर्टी बेटाकडे सरकल्या आणि 'हाऽऽ', 'ओऽऽ' च्या गजरात जनतेने आपापले कॅमेरे सरसावले. मिस न्यू जर्सींची स्वातंत्र्यदेवतेला हळुवार प्रदक्षिणा चालू झाली आणि वेगवेगळ्या कोनांमधून त्या देवीला कॅमेऱ्यांच्या क्लिकक्लिकाटांचे दंडवत लाभले.
आता देवी आली म्हणजे तिची कथाही आलीच! हा अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा फ़्रान्सने अमेरिकेला आंदण म्हणून दिला. त्यावेळी तो तांब्याचा की ब्राँझचा होता. त्याला छान झळाळी होती. कालांतराने त्यातील तांब्याचे ऑक्सिडेशन होऊन हिरव्या रंगाचा तांब्याच्या ऑक्साइडचा थर तयार होऊन पुतळ्यावर ज़मा झाला आणि आता हा पुतळा हिरवट पिस्ता रंगाचा झाला आहे. न्यूयॉर्कमधील अनेक टोलेजंग इमारतींच्या छतांचा रंग हिरवा असण्याचीही हीच हकीकत आहे. आणि ती इत्थंभूत सांगणारा माहितीफलक पुतळ्याच्या चरणी समर्पित आहे, हे वेगळे सांगायलाच नको. मी मात्र अगदी अलीकडेपर्यंत हा पुतळा ताजमहालाच्या रंगासारख्या पांढऱ्याशुभ्र रंगाचा आहे, असेच समज़त होतो आणि सगळी माहिती वाचून झाल्यावर, ऑक्साइडचा थर खरवडून काढून पुतळ्याला पूर्वीची झळाळी प्राप्त करून देण्यासाठी हा धनवान देश काहीच का करत नाही, असा प्रश्न माझ्या बालमनाला पडल्यावाचून राहिला नाही.
पुतळा ज्या चबुतऱ्यावर उभा आहे, तेथे पुतळ्याच्या पायथ्याशी असलेल्या सज्ज्यातून दूरस्थ न्यूयॉर्कचे सुंदर दर्शन घडते. तसेच पुतळ्याच्या मुकुटातूनही शहराचे अतिसुंदर दृश्य दिसते. दुर्दैवाने आम्हांला या दोन्ही ठिकाणी ज़ाता आले नाही. अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांसाठी हे स्थळ बंद करण्यात आले होते. अलीकडेच ते पुन्हा खुले करण्यात आले आहे. पुतळ्याच्या उज़व्या हातात उंचावलेली मशाल असून तिची ज्योत सोन्याची आहे. डाव्या हातात एक पुस्तक असून त्यावर ४ जुलै १७७६ लिहिले आहे. हा नक्कीच अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा असणार ज़ो थॉमस जेफ़रसनने तयार केला होता (तारखेवरून आठवले. अन्यथा माझे इतिहासज्ञान फ़ारसे स्पृहणीय नाही!) पुतळ्याचा डावा पाय खंबीरपणे रोवला असून उज़वा पाय पुढचे पाऊल टाकण्यासाठी किंचितसा उचलला आहे. खंबीरपणे रोवलेले पाऊल हे अमेरिकन सामर्थ्याचे प्रतीक आहे. या देशाने आर्थिक आणि राजकीय क्षितिजांवर लावलेले प्रगतीचे झेंडे, विज्ञान-तंत्रज्ञानात केलेली प्रगती, शिस्तबद्ध जीवनमान आणि पायाभूत सोईसुविधांचा विकास यांद्वारे जगात पक्के केलेले स्थान म्हणजे या स्वातंत्रदेवतेचे खंबीर पाऊल. उचललेले उज़वे पाऊल म्हणजे सतत प्रगतीशील आणि गतीशील असल्याची निशाणी. नवी क्षितिजे पादाक्रांत करण्याची महत्त्वाकांक्षा (ज़से मध्यपूर्वेतील इराक, सिरीया वगैरे ;)) आणि अवघ्या जगाचे नेतृत्त्व करण्याच्या क्षमतेचे प्रतीक. उंचावलेली मशाल म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, प्रगतीकडे ज़ाण्याची दिशा दाखवणारा दिशादर्शक (म्हणजे आम्ही नायक आणि तुम्ही अनुयायी. "आमच्या मागून यायचे हं बाळांनो, मस्ती करायची नाऽही!" असा भावार्थ ः)) (हे सगळे स्थलकालोत्पन्न विचार असून त्यांच्याशी या भटकंतीचा वाटाड्या या नात्याने माझ्यातला लेखक सहमत असेलच असे नाही ः)), बुशसाहेब मात्र नक्कीच असतील)
हल्ली ही देवता ज़राशी काळवंडली आहे. तो वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे की अमेरीका नावाच्या आपल्या लेकराची वाटचाल याचि देही याचि डोळां पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे, हे तीच सांगू शकेल ;)
या ठिकाणी सगळ्याच पर्यटकांनी भरभरून फ़ोटो काढले. मूर्तीची भव्यता एकाच दृष्टिक्षेपाच्या आवाक्यापलीकडची आहे खरी. भालचंद्र नेमाड्यांनी 'कोसला' मध्ये अजिंठा लेण्यांचे वर्णन करताना म्हटल्याप्रमाणे याही ठिकाणी मूर्तीवर वारंवार डोळे फिरवावे लागतात. मूर्ती पाहणे इतकेच आपण करू शकतो (ती 'समज़ते' फक्त अमेरिकेलाच बहुतेक!) तिच्या कपड्यांवरील चुण्यांपासून ते सुबक बांध्यापर्यंत, हातातील पुस्तकापासून ते रेखीव मुकुटापर्यंत सगळेच वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. पहावे आणि नक्कीच पहावे यासारखे काहीतरी.
या बेटावर पर्यटकांच्या सोईसाठी एक उपाहारगृह कम विश्रांतीगृह आहे. पर्यटनस्थळ असले तरी शिस्त, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था लक्षणीय आहे. मूर्तीवर किंवा चबुतऱ्यावर तर सोडाच, पण तेथील साध्या भिंतींवरसुद्धा 'विजू लव्ह्ज़ मुक्या'सारखी किंवा इतर ('भ'/'म' कारी) मुक्ताफळे कोणीही उधळलेली नाहीत. कोणाच्या घराण्याचा उद्धार केलेला नाही, की कोणाचा दूरध्वनी क्रमांक लिहिलेला नाही. शिवाजीमहाराजांनासुद्धा त्यांचे गडकिल्ले या ज़ागेइतके स्वच्छ आणि त्यामुळेच सर्वार्थाने पवित्र राहिलेले नक्कीच आवडले असते.
आणखी खूप वेळ तिथल्या सदैव ताज्या वाटणाऱ्या पिवळ्यापोपटी हिरवळीवर बसून मूर्तिचिंतन करण्याचा विचार होता, पण एका सुरक्षा रक्षकाने सायंकाळी पाच वाज़ता नम्रपणे 'आता घरी ज़ाण्याची वेळ झाली' असे सांगितले (दंडुका आपटत 'चलो चलो चलो' केले नाही, त्यामुळे थोडे चुकचुकल्यासारखे झाले खरे!) त्यामुळे पुन्हा बेटावरील धक्क्याकडे पावले वळली. 'मिस न्यू जर्सी'चा कॅटवॉक पुन्हा अनुभवायचा होता ः)

जगाच्या राजधानीतून - २


पण तो सूर्योदय उजाडलेला पहायलाच मिळाला नाही. पहायला मिळाले ते टळटळीत ऊन आणि घड्याळात वाज़लेला 'दुपारचा' एक! म्हणजे यावेळीही न्यू यॉर्क बोंबलले म्हणायचे ः( पण सुदैवाने देविकामावशी म्हणाली की अज़ून वेळ गेलेली नाही. स्टॅच्यू ऑफ़ लिबर्टी मात्र सायंकाळी पाचला पर्यटकांसाठी बंद होतो. त्यामुळे पटापट आवरून न्यू यॉर्कला ज़ाणारी गाडी पकडणे क्रमप्राप्त होते. सकाळच्या न्याहारीला तिने केलेली थालिपिठे कोंबून आणि अक्षरशः कावळ्याची अंघोळ आटोपून आम्ही घराबाहेर पडलो आणि धावतच गाडी पकडली.
न्यूअर्कला गाडी बदलायची होती. न्यू जर्सी ट्रान्झिटमधून आता आम्ही 'पाथ'मध्ये आलो होतो. ही न्यू यॉर्क मधली मेट्रो रेल. ट्रान्झिटपेक्षा देखणी आणि आपल्या मध्य नि पश्चिम रेल्वेसारखी गज़बज़लेली. ज़रा मुंबईत आल्यासारखे वाटले. गप्पाटप्पा करत मुक्कामी उतरलो. मुक्काम होता 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'. साडेचार वर्षांपूर्वी जेथे ते दोन प्रसिद्ध जुळे मनोरे (ट्विन टॉवर्स) उभे होते आणि लादेनने त्यांवर विमाने आपटवून अनेक निष्पाप जिवांचे बळी आणि असंख्य शिव्याशाप घेतले तेच. सध्या तिकडे फ़क्त शून्य आहे (ग्राउंड ज़ीरो) आणि आधीच्या मनोऱ्यांपेक्षाही जास्त उंचीचे स्मारक उभारण्याचे काम चालू आहे. त्याचबरोबर त्या वास्तूबाबत माहिती देणारे, हल्ल्याबाबत माहिती देणारे नि न्यू यॉर्क शहराने घडवलेल्या माणुसकी व जिद्दीचे गोडवे गाणारे फलक आहेत.
वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ते ज़ुळे मनोरे उध्वस्त करून लादेनने अमेरिकेच्या 'कानाखाली आवाज़ काढला' असे म्हणतात. अमेरिकी आर्थिक स्वायत्तता आणि सार्वभौमत्त्व यांचे प्रतीक, अमेरिका ही जागतिक महासत्ता असल्याची ती निशाणी, प्रत्येक अमेरिकी नागरिकाच्या अस्मितेचा मानबिंदू असे सगळे त्या मनोऱ्यांबरोबरच जेव्हा धुळीला मिळाले त्यावेळी रस्त्यावरचा फाटका अमेरिकनसुद्धा कोट्याधिशाइतकाच हळहळला असेल. आज़ही न्यू जर्सीला मित्रासोबत मॅनहॅटनची आकाशरेषा (स्कायलाइन!) न्याहाळताना त्या मनोऱ्यांची अनुपस्थिती ज़ाणवत होती. आज़वर चित्रातच त्यांना पाहिले होते. प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नव्हता. आणि जेव्हा तो आला, तेव्हा ते तेथे नव्हते (दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत). "दे आर मिसिंग" असे ज़वळच उभा असलेला एक अमेरिकन खेदपूर्वक म्हणाला. मला मात्र तेथे फिरताना खंत लागून राहिली होती, ती जगातल्या अनेक प्रेक्षणीय स्थळांपैकी नि वास्तुशिल्पांपैकी एक नष्ट झाल्याची. तेथे फिरताना ज़वळज़वळ प्रत्येक फलकावर ते ज़ुळे मनोरे माझे लक्ष वेधून घेत होते. आज़ ज़र ते तेथे असते तर कसे दिसले असते, याचाच विचार मी करत होतो. आणि त्याचबरोबर एक विचित्र आंतरीक आनंद झाला होता, तो मुंबईत (आणि भारतात) असे कोणतेही टोलेजंग वास्तुशिल्प नसल्याचा, जे तमाम भारतीयांच्या अस्मितेचे नि भारताच्या राजकीय,आर्थिक वगैरे वगैरे अस्मितेचे प्रतीक आहे (ये मेल्या लादेन! कुठे आपटवणार आहेस विमान? असा तो वन रूम किचन मराठमोळा मध्यमवर्गीय आनंद ः))
वर्ल्ड ट्रेड सेंटरसमोरून सरळ आतल्या बाज़ूस ज़ाणारा रस्ता भटकंतीसाठी निवडला आणि आमच्या पायगाडीला किक मारली. अमेरिकेत आल्यापासून प्रथमच मी 'फेरीवाले' पाहत होतो. हा रस्ता मुंबईच्या फॅशन स्ट्रीटची आठवण करून देत होता. रस्त्यावर बसून खाण्यापिण्याचे जिन्नस, कपडे, अत्तरे, पायताणे इत्यादींची विक्री चालली होती. पर्यटक तसेच स्थानिक इतरेजन खरेदीत रमले होते. आमचा आपला दृष्टीक्रय (विंडो शॉपिंग!) चालू होता. न्यूयॉर्क इतकी रहदारी मी आज़वर अमेरिकेत फिरलेल्या ठिकाणी कुठेच बघितलेली नाही. तो ट्रॅफ़िक डोळेभरून पाहिल्यावर, मी जेथे राहतो त्याला आमच्या स्थानिक मित्रमंडळात 'खेडेगाव' का म्हणतात, ते पटले. आनंदाची गोष्ट म्हणजे आसपासच्या दुकानांमध्ये तसेच रस्त्यावर बरीचशी आशियाई (प्रामुख्याने भारतीय) तोंडे दिसत होती. त्यामुळे परदेशात राहत आहोत ही ज़ाणीव काही काळ पुसली गेली. खूप बरे वाटले. पुढे ज़ातोय तोच फेरीवाल्यांची पळापळ चालू झाली आणि कळले की पोलिसांची धाड पडली आहे. छान! म्हणजे दादर(पश्चिम) स्थानकाबाहेर जशी 'गाडी आली गाडी आली' अशी वर्दी येते आणि सगळे फेरीवाले आपले चंबूगबाळे आवरून पळ काढतात, तसाच काहीसा हा प्रकार. मन सुखावले. पण इथले मामा लोक बहुदा हप्ता घेत नसावेत. कारण दोनच मिनिटात रस्ता पादचाऱ्यांसाठी मोकळा झाला होता ः) अमेरिकेतील ती दादरकर समस्या पाहून माझ्यातल्या दादरकराची छाती अभिमानाने फुलून आली. अमेरिकेतील दहा महिन्यांच्या वास्तव्यानंतर पहायच्या राहून गेलेल्या गज़बज़ाट, रहदारी, आवाज़ या सगळ्या गोष्टी मला 'याचि देही याचि डोळा' अनुभवायला मिळत होत्या.
फिरत फिरत, इकडेतिकडे वाट विचारत आम्ही न्यूयॉर्क शेअर बाज़ाराज़वळ पोचलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेत तुम्ही कोणाला पत्ता विचारला तर ती व्यक्ती गडबडून ज़ाते. घरटी किमान दोन गाड्या घेऊन भटकणाऱ्या अमेरिकन मंडळींना रस्ते नि पत्ते कसे माहीत नसतात, याचे राहून राहून आश्चर्य वाटायचे. मात्र या प्रश्नाला मॅपक्वेस्ट, गूगल मॅप्स, रोड ऍटलस् अशी उत्तरे मिळाली. जिथे जायचे आहे ते ठिकाण, आणि जिथून जायचे आहे ते ठिकाण हे दोन्ही अंत्यबिंदू नोंदवायचे आणि इंटरनेटवरून रस्ते व पत्ते शोधायचे, याची या मंडळींना इतकी सवय आहे, की उद्या त्यांच्यापैकी कोणाला पुण्यात वाडिया कॉलेजच्या आसपास सोडले आणि बुधवार पेठेतल्या पोस्टात ज़ायचे आहे असे सांगितले, तर बिचारा उद्विग्न होऊन आत्महत्या बित्महत्या करायचा. आमच्याकडे अमुक रस्त्यावरचा तमुक पानवाला कुठे आहे, हे कोणीही लीलया सांगतो. त्यासाठी आम्हांला नकाशे गुगलून काढायला लागत नाहीत. येथे मात्र न्यूयॉर्क शेअर बाज़ाराकडे ज़ाणारा रस्ता कुठे आहे, या आमच्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात "दॅट्स ऍक्च्युअली अ गुड क्वेश्चन" अशी होत होती. अमेरिकन माणसाच्या स्थल-दिशा ज्ञानाची कीर्ती ऐकून होतोच, आज़ ती अनुभवायला मिळत होती.

शनिवार असल्याने बरेच पर्यटक होते. हास्यविनोद, छायाचित्रण आणि खाण्यापिण्याची रेलचेल होती. न्यूयॉर्क शेअर बाज़ार आणि तेथील वातावरण पाहून तरी १९२९ च्या जागतिक मंदीत हा बाज़ार रसातळाला पोचला होता आणि अवघी अमेरिका दिवाळखोरीत निघाली होती, हे सांगूनही खरे वाटले नसते. त्याच्या बरोबर समोरच अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग़्टन यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. याच ठिकाणी त्यांनी ३० एप्रिल १७८९ रोजी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती. मग जॉर्जसाहेबांबरोबर एक छायाचित्र काढले. शेज़ारच्या गोऱ्याचा अस्वलसदृश (!) बलदंड कुत्रा आणि ज़वळून चाललेल्या मडमेचे शेंबडे फ़्रेंच पूडल यांच्या प्रेमळ संवादांना कंटाळून आम्ही तिकडून काढता पाय घेतला.
हे सगळे आटोपेस्तोवर दुपारचे ३ वाज़ले. दुपारच्या जेवणाला बुट्टी मारायचे ठरले कारण आता अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेच्या दर्शनास ज़ायचे होते. वैष्णोदेवीस ज़ाताना, एकवीरेच्या दर्शनास ज़ाताना कष्ट करून ज़ायचे असते. पायऱ्या चढत, नागव्या पायाने नि दगडधोंड्यांची पर्वा न करता, मुखी देवीनामाचा जप करत ('तूने मुझे बुलाया शेरावालिये' स्टाइलमध्ये) आणि श्रद्धायुक्त, निर्मळ अंतःकरणाने; पण या देवतेच्या दर्शनासाठी खास बोटींची सोय आहे (आपल्याकडे घारापुरीची लेणी पाहण्यासाठी भाऊच्या धक्क्यावरून लाँच पकडतात तसे). कारण हिचे देवालय खुद्द न्यूयॉर्कमध्ये नसून ज़वळच्याच लिबर्टी बेटावर आहे. आपल्याकडे कश सागरकन्या, मरमेड, मत्स्यगंधा वगैरे असतात, तशी आमच्याकडे कोणा मिस न्यू जर्सी नामक बोटीचे तिकीट होते. आणि ते तिकीट मिळवण्यासाठी आम्हांला, वानखेडेवरच्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे तिकीट मिळवायला जितकी रांग असेल, त्यापेक्षा मोठ्या रांगेत पाऊण तास ताटकळायला लागले. अर्थात मिस न्यू जर्सी म्हणण्याइतके तिच्याकडे काही नव्हते म्हणा (तिच्यापेक्षा आपल्या मिस केशवजी नाईक चाळ छाप अंबेसेडर्स किंवा भाऊचा धक्क्यावरची 'मुंबईची देखणी' सुद्धा देखण्या वाटाव्यात), पण ११सप्टेंबरच्या त्या हल्ल्याचा अमेरिकेने इतका धसका घेतलाय, की बोटीत चढण्यापूर्वी अक्षरशः विमानतळावर असते तशा सुरक्षेव्यवस्थेतून पार पडावे लागले. अखेर बोटीत चढलो आणि महासत्तेच्या स्वातंत्र्यदेवतेचे पहिले दर्शन झाले.
लिबर्टी बेटावर पोचून आम्ही या स्वातंत्र्यदेवतेची, १० महिन्यांची प्रतीक्षा, ग्रे हाउंडच्या प्रवासातले जागरण आणि अर्थातच खर्ची घातलेले शंभर-एक डॉलर्स, या सगळ्याच्या खणानारळाने ओटी भरण्यासाठी आता आणखी अर्धा तास वाट बघायची होती.

जगाच्या राजधानीतून - १

सयाजी शिंदे, रेणुका शहाणे, वर्षा उसगांवकर अभिनित 'अबोली' या चित्रपटातले 'बंबई मोठी बाबा बंबई मोठी, पैशाची दाटी समिंदराकाठी' हे गाणे त्या दिवशी अचानकच आठवले. अमेरिकेत येण्यापूर्वी अवघा जन्म मुंबईत गेलेला. त्यामुळे समुद्राकाठी असणाऱ्या पैशाच्या दाटीबरोबरच, मुंबईतील बी बी दादरचे (दादर पश्चिमचे!!) किर्तीकर मार्केट (त्याचे आधुनिक नाव वीर सावरकर मंडई आहे), शिवाजी पार्क नि लगतची चौपाटी, कुलाब्याचे बडे मियां नि दादरचे प्रकाश नि सायबिणी, रिगलपासून ते थेट प्रबोधनकार ठाकरेपर्यंतची नाट्य-चित्रपटगृहे, लोकलगाड्या नि 'बेस्ट' (खरोखर!), या सगळ्यासगळ्यातली मौज़ अनुभवलेली. तिसरीच्या भूगोलात महाराष्ट्राची राजधानी मुंबई असे घोकले होते. गेल्या बावीसएक वर्षांत त्याची पुरेपूर प्रचिती आली. राज्याचे प्रशासन, देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या आर्थिक नाड्या, अठरापगड ज़ातीधर्मांचे लोक, सगळे आमच्या चिमुकल्या मुंबईतच अडकलेले. त्यामुळे हे छोटेसे शहर 'राज'धानी म्हटल्यावर 'गर्व से कहो हम हिंदू हैं'सारखी 'गर्व से कहो हम मुंबईकर हैं'ची गर्जना मनात घुमायची.
जगाच्या राजधानीबाबत नुसतेच ऐकून होतो. प्रत्यक्ष पाहण्याचा योग मात्र इतक्या लवकर येईल असे वाटले नव्हते. वास्तविक डिसेंबरात फ़िलाडेल्फ़ियाला गेलो होतो, तेव्हाच दोन दिवसाचा न्यू यॉर्क दौरा आखला होता, पण काही अडेलतट्टू मंडळींनी न्यू यॉर्कला ज़ाण्याऐवजी 'न्यू यॉर्क'नावाच्या क्लबमध्ये जगाच्या राजधानीची सफ़र घडवली तेव्हा हसावे की रडावे कळेनासे होऊन गेले होते. यावेळी मात्र संधी सोडायची नव्हती. नाही म्हणायला विद्यापिठातले एक प्रशासकीय काम आड येत होते, पण तिथल्या 'दयाळू'(!?) बाईंना 'वीकेंडला घरी बोलावून भारतीय जेवण करून घालतो'चा नवस बोलल्यावर गाडी सुटायला तीनच तास बाकी असताना ते काम तडीस नेले (आता तर नवस फेडायलाच हवा!)
त्या तीन तासात कपडे घालण्यापासून (बॅगेत!!!!!) ते प्रवासातले खाणेपिणे, औषधे, कॅमेरा, इतर साधनसामुग्री यांच्या ज़मवाज़मवीत वेळ कसा ज़ात होता कळलेच नाही. हे सगळे चालू असतानाच एका हितचिंतकाने 'ग्रे हाउंडका ओव्हरनाइट जर्नी इतना सेफ़ नही है' सांगून बॅगेत घातलेले आमचे लॅपटॉप्स बाहेर काढायला लावले आणि त्याचबरोबर पाकिटातली काही रक्कमसुद्धा घरच्याच कपाटात बंद झाली. त्याचे सूचना देणे चालू असतानाच अस्मादिकांची स्वारी केव्हाच न्यू यॉर्कला पोचली होती. धावतपळत स्थानिक बस पकडून ग्रे हाउंड बस स्थानकावर गेलो. ग्रे हाउंड ही अमेरिकेच्या पूर्व किनारा आणि लगतच्या ठिकाणांना ज़ोडणारी बससेवा आहे. आमच्या गावातल्या त्या स्थानकावर गेल्यावर मुंबई सेंट्रलच्या एस टी स्थानकाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात, ग्रे हाउंड ही अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील एस टी आहे. 'अलिबाग अलिबाग' करणाऱ्या मुंबई सेंट्रलच्या गणवेशधाऱ्यांप्रमाणेच येथेही 'रिचमंड, बॉल्टीमोर, न्यू यॉर्क' अशी (उंची) नावे कोकलणारे सिनेमातल्या जल्लादांप्रमाणे भासणारे ग्रे हाउंडचे चालक असतात. 'कोमॉन कोमॉन मॅऽऽन' म्हणत एका जल्लादाने आमचे स्वागत केले. हातातली बॅग आणि तिकिटे छातीशी घट्ट आवळून भेदरलेल्या कोकरांसारखे आम्ही बसमध्ये शिरलो. बसमध्ये मी आणि माझा मित्र असे दोनच भारतीय आणि बाकीचे लक्कू! अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना 'निग्रो' किंवा 'ब्लॅक' म्हणणे म्हणजे ज़ातीवाचक शिवी देण्यासारखे आहे. त्यांना प्रेमाने 'आफ़्रिकन अमेरिकन' असे म्हणायचे (त्यांच्याबरोबर 'ब्लॅकजॅक' खेळताना लाडेलाडे 'आफ़्रिकन अमेरिकन जॅक' खेळतोय असे म्हणायचे ;) ) इकडच्या देसी जनतेने काळ्यांना कल्लू केले आणि त्यांची बलदंड शरीरयष्टी, निर्विकार पण तरीही ज़ुलमी नि एखाद्या खुन्यासारखा भासणारा चेहरा बघून त्यांना 'कल्लू' म्हणजे काय ते कळेल या (महाराष्ट्रीय) भीतीने 'कल्लू'चे 'लक्कू' केले.
बसमधल्या त्या लक्कूंच्या भीतीने आमची अख्खी रात्र आळीपाळीने सामानावर पहारा करण्यात (आणि रिचमंडच्या थांब्यावर आळीपाळीने अनावर विधी उरकण्यात) गेली. त्यांचे विचित्र इंग्रजीतील हास्यविनोद, गाणी आणि बसभर एअर फ़्रेशनरसारखा पसरलेला सिगार आणि मद्याचा (सु?)गंध यांनी आम्ही गुरखे आमच्या ड्युटीवर न झोपण्याची खबरदारी घेतली. चाळीस मिनिटे उशीराने धावत असलेली आमची बस चालकाने नियोजित स्थळी चाळीस मिनिटे आधीच कशी काय पोचवली, याचे उत्तर मात्र आम्हांला अज़ूनही मिळालेले नाही. वाटेत वॉशिंग़्टन डीसी ला (ही अमेरिकेची राजधानी) मेमोरिअल बिल्डिंग, बुश साहेबांचे निवासस्थान आणि वॉशिंग़्टनचा तो प्रसिद्ध मनोरा यांना निळ्यापांढऱ्या, दुधाळ प्रकाशात न्हाऊन निघाल्ले पाहिले. दुर्दैवाने त्यांना कॅमेऱ्यात बंद करता आले नाही.
नियोजित स्थळी म्हणजे न्यूअर्कला पोचलो तेव्हा सकाळचे साडेसहा झाले होते. मित्राची मावशी आम्हांला उतरवून घ्यायला यायची होती. पण ठरल्या वेळेचा चाळीस मिनिटे अगोदरच पोचल्याने आम्हीच तिला बस स्थानकावरून फ़ोन करून झोपेतून जागे केले. थोड्या काळजीयुक्त स्वरातच तिने 'मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही या' सांगितल्यावर तिच्यापेक्षा आमची काळजी वाढली (या क्षणी माझी आई असती तर कदाचित पुढच्याच बसने मला परत रालेला घेऊन आली असती!) पण न्यू यॉर्क मोहिमेवर निघालेल्या आम्ही मावळ्यांनी स्थानिक आगगाडीची तिकिटे काढून मावशीबाईंच्या घरची गाडी पकडली. 'न्यू जर्सी ट्रान्झिट' ही ती 'लोकल'. पण रुबाब, व्यवस्था सगळे आपल्या इंद्रायणी एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणीसारखे. ते पाहून नक्की 'लोकल' कशी असते असा प्रश्न मला पडला.

तिकडच्या तिकीट तपासनिसांची पद्धतही अजबच. तुमच्याकडचे तिकीट घेऊन कुठे जायचे हे पाहून आपल्याज़वळच्या तिकीटसदृश एका कागदी पट्टीवर ठराविक वेळा 'टाक् टाक्' करून ज़वळच्या टोच्याने भोके पाडणार आणि तुमच्या आसनावर एका पट्टीत ते खोवणार. त्या पट्टीवर पाडलेली भोके आणि तुम्हाला जेथे जायचे आहे ते ठिकाण यांचा काहीतरी परस्परसंबंध आहे. तो काय आहे ह ज़ाणून घ्यायचा प्रयत्न केला असता तपासनीस मामा मनापासून हसले ("काय तू! च्यायला इतके पण कळत नाही?! ज़ाऊ दे, सोड" अशी काहीशी भावना!) आणि पुढच्या प्रवाशाकडे गेले.
आम्हांला 'रावे' नावाच्या स्थानकावर उतरायचे होते. त्यामुळे मावशीबाईंनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून (डोळ्यांत तेल (आतापर्यंत पाणी आले होते, बदल म्हणून थोडे तेल घालायला लागले!) घालून स्थानकांची नावे वाचत आणि हे स्थानक कुठले आहे हे सांगणाऱ्या गाडीतील ध्वनिक्षेपकावरील गोड आवाज़ाकडे कान लावून) न्यूअर्क नंतरची एअरपोर्ट, नॉर्थ एलिझाबेथ, एलिझाबेथ आणि लिंडन ही स्थानके सोडली आणि रावेला उतरलो.

मित्राच्या मावशीकडे गरमागरम पोहे, आदल्या रात्रीचा खिमापाव, पावभाजी, संत्र्याचे सरबत असा जंगी बेत होता. त्यावर आडवा हात मारला, अंघोळ आटोपली, टीव्हीवर 'ब्लू स्ट्रीक' हा धमाल चित्रपट लावला आणि तो बघून झाल्यावर मस्तपैकी ताणून दिली. साडेनऊ तासांच्या प्रवासाचा इतका शीण ज़ाणवत होता, की सोफ़्यावर पडल्यापडल्या झोप कधी लागली कळलेसुद्धा नाही. संध्याकाळी मित्राने उठवले तेव्हा आठ वाज़ून गेले होते (आज़काल म्हणजे उन्हाळ्यात अमेरिकेत 'रात्री'(!) नऊला वगैरे सूर्यास्त होतो. हिवाळ्यात मात्र 'संध्याकाळी'(!) पाचालाच रात्रीच्या साडेआठसारखा काळोख होतो) भराभर आवरून घेतले कारण 'दा विंची कोड' बघायला ज़ायचे होते. चित्रपट बघायला ज़ाण्यापूर्वी तेथील 'ओक ट्री रोड' वर ज़रा भटकलो. हा रस्ता म्हणाजे पुण्यातला लक्ष्मी रोड किंवा दादरचा कबुतरखान्याज़वळचा परिसर आहे. बिस्मिल्ला नि ए वन चिकन शॉपपासून घसीटामल हलवाई, कंगन ज्युवेलर्स, शगुन सारीज़्, अमेरिकेतील प्रसिद्ध 'पटेल ब्रदर्स' (भारतीय वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू भांडार या प्रकारात मोडणारी अमेरिकेतील दुकानांची प्रसिद्ध साखळी... त्यावरूनच 'पटेल' आडनावाच्या लोकांना अमेरिकेचा व्हिज़ा मिळायला इतके कष्ट का पडत असावेत, याची थोडीशी कल्पनाही आली. अमेरिकेत आलेला पटेल इथेच राहून असा फळला-फुलला नसता, तर आज़ ओक ट्री रोड आहे तसा दिसला नसता... रामसेंप्रमाणेच हे पटेल बंधू किती असा प्रश्न पडायला हरकत नाही) असे सगळे भटकल्यावर एका केरळी उपाहारगृहात जेवलो. बऱ्याच दिवसांनी अस्सल केरळी मसाले आणि ओल्या नारळाचा चव असलेले, खोबरे असलेले जेवण पोटात गेले. ते सुद्धा हळदीच्या पानाच्या मंद, प्रसन्न सुगंधासह!कृतकृत्य झालो. तृप्त मनाने ढेकर देऊन बाज़ूच्याच चित्रपटगृहात गेलो आणि 'द विंची कोड' पाहिला. फ़र्स्ट डे लास्ट शो. मजा आली.
आटोपल्यावर टॅक्सी पकडून घरी आलो आणि पुन्हा ताणून दिली. दुसऱ्या दिवशीची सकाळ कधी उजाडतेय याची वाट पाहतच झोपलो. न्यू यॉर्क आता एका सूर्योदयावर येऊन ठेपले होते.