अपार्टमेंट ते डिपार्टमेंट हे अंतर पायी चालत अवघे दहा मिनिटांचे आहे. मात्र मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, या तत्त्वाला जागून ते दहा मिनिटांचे चालणेही समूहात पार पाडायचे हा आमचा अलिखित नियम आहे. समूहात चालण्याचे फायदे म्हणजे रस्त्याने येणाऱ्याजाणाऱ्या गोऱ्या मडमांकडे पाहून आपल्याच भाषेत टीकाटिप्पणी करता येते (हो आता पक्षीनिरीक्षण वगैरे म्हणून आपणच आपली लाज का काढा!) एकट्याने गेल्यास, प्रयत्नपूर्वक आणि धीराने आपण चोरटी नजर भिरभिरवावी, आणि नेमके त्याच क्षणी तिने आपल्याकडे पाहून मधाळ हसू फेकले की आपण हिट विकेट व्हावे, अशी आपली गत होण्याइतकी कच्ची फलंदाजी कोणत्याही भारतीयाकडून चँपिअन्स ट्रॉफी वगळता इतरत्र केली जाऊ नये. समूहात चालण्याचा दुसरा एक फायदा म्हणजे तोंडाने अखंड (मार्गदर्शनयुक्त)बडबड करणारा तो सिनिअर आणि त्याच्या बाजूने आणि मागून चालणारे, मन लावून ऐकणारे, हसणारे-खिदळणारे ज्युनिअर्स असे चित्र फ्रेशर्सच्या मनात पक्के बसते आणि आपल्याविषयीचा आदर दुणावतो. ३:५० चे लेक्चर असेल, आणि घरी तुम्हाला पावणेचारास जाग आली, तर पायी चालण्यात वेळ न घालवता एक तर पुन्हा झोपून लेक्चर बंक करावे किंवा धावतपळत बस पकडून डिपार्टमेंट गाठावे. परीक्षेच्या काळात चित्र जरासे आशावादी दिसते. म्हणजे विद्यार्थी हातात पुस्तके, नोट्स किंवा तत्सम काहीतरी घेऊन डिपार्टमेंटला जाताना दिसतात. लोकांमधल्या सलीम अलींची जागा त्यांच्यात्यांच्यातल्या विद्यार्थ्यांनी घेतलेली असते, हाच काय तो आशादायी फरक.
डिपार्टमेंटची इमारत म्हणजे आमचे महाविद्यालय ही तीन मजली छोटेखानी पण तरीही डौलदार इमारत. लाल विटांचे बांधकाम, रेखीव रचना आणि उत्तम अंतर्सजावट. प्रांगणात निरनिराळी हिरवीगार झाडे, विविधरंगी फुले आणि दूरवर पसरलेली हिरवळ. बासरीवादकांसाठी धूर सोडायच्या खास जागा, कटाक्षाने स्वच्छता पाळणाऱ्या अमेरिकन वृत्तीशी अनुरूप अशी जागोजागी केलेली कचराकुंड्यांची सोय, ज्यांना टॉयलेट्स म्हणण्याची लाज वाटावी अशी स्वच्छ प्रसाधनगृहे, अशा अनेक सोईंनी नटलेली डिपार्टमेंटची इमारत. या इमारतीत इलेक्ट्रिकल व संगणकीय अभियांत्रिकी (Electrical & Computer Engineering किंवा ECE) आणि संगणक विज्ञान (Computer Science किंवा CSC) या दोन डिपार्टमेंट्सचा कारभार चालतो. त्या त्या डिपार्टमेंट्सशी संलग्न असणाऱ्या प्राध्यापक वर्गाची, प्रशासकीय कर्मचारी, विभागप्रमुख यांची कार्यालये, अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशा लहानमोठ्या प्रयोगशाळा नि त्यांत काम करणारे विद्यार्थीमजूर, प्राध्यापकांना संशोधनात तसेच अध्यापनात सहाय्य करणारे मोजके नशीबवान विद्यार्थी असं विश्व हे प्रत्येक डिपार्टमेंटची जान आणि शान आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रत्येक मजल्यावर विस्तीर्ण स्टुडंट्स लाउंज आहे. अभ्यास करताना झोप आली किंवा घरची अर्धवट झोप पूर्ण करायची असेल, तर त्यासाठी आरामशीर सोफासेट्स आहेत. एकाच चवीचे अनेक पदार्थ वेगवेगळ्या नावाने, आणि जवळपास सारख्याच चढ्या दराने विकणारे उपाहारगृह आहे. अभ्यास करताकरता तोंडाला चाळा म्हणून चॉकलेट, बबलगम, झालेच तर वेफर्स, कुकीज नि सोडा विकणारी व्हेंडिंग मशीन्स आहेत. विविध क्षेत्रांतील प्रज्ञावंतांची व्याख्याने आयोजित करण्यासाठी मोठी सभागृहे आहेत. आणि आम्हा विद्यार्थ्यांसाठी काशी-रामेश्वर किंवा मक्का-मदीना या तीर्थक्षेत्रांच्या तोडीच्या असलेल्या लेक्चर रूम्स आहेत.
डिपार्टमेंटमधली लेक्चर्स म्हणजे नुसती लेक्चर्स नसून एक आनंदमेळावा असतो. लेक्चरच्या वेळा या त्या वेळापत्रकाप्रमाणे न पाळता, स्वतःच्या सोईप्रमाणे पाळायच्या, हे येथील शिक्षणव्यवस्थेचे मूलभूत तत्त्व असल्याने ज्या दिवशी एखादा गृहपाठ सुपूर्त करायचा असेल किंवा तपासून मिळणार असेल, प्रॉजेक्ट सुपूर्त करायचे असेल किंवा प्राध्यापकांचे व्याख्यानच तसे अगदी महत्त्वाचे असे, त्यावेळी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे हजेरी लावावी. अन्यथा चारच्या लेक्चरला तुम्ही साडेचार-पावणेपाचाला जरी वर्गात गेलात, तरीही प्राध्यापकांसकट कोणालाही याचे सोयरसुतक नसते. त्यातून मध्येच भूक किंवा तहान लागली, तर बाहेर जाऊन खाणेपिणे वर्गात आणून खाता येते. म्हणजे तहानभूकही भागते आणि व्याख्यानातही अडथळा येत नाही. भारतात शिकताना भर वर्गात करंगळी वर करून लघुशंका उपस्थित करताना, शंभर वेळा केलेल्या विचाराने नकोसा झालेला जीव चेहऱ्यावर लगेच उमटायचा. इकडे तसा बाका प्रसंग येत नाही. सरळ उठून मोकळ्या मनाने मोकळे होण्यासाठी वर्गाबाहेर पडायचे. लेक्चरला बसून याहू किंवा गूगलवर बिनदिक्कत गप्पाही मारता येतात. अर्थात, ज्यांच्या व्याख्यानाच्या वेळेस असे सौभाग़्य लाभावे, अशी मंडळी फाऱ नाहीत पण तरीही कितीही चांगल्या-वाईट, ज्येष्ठ-कनिष्ठ प्राध्यापकांच्या व्याख्यानांना आंतरजालावरील निरोपकांवर नि चावड्यांवर हजेरी लावणारी मंडळी तर बरीच आहेत. आमची एक मैत्रीण तर निरोपकांवर "in lecture" असा फलक लावून गप्पा छाटते. गेलाबाजार मुद्दामहून एखाद्या चायनीज विद्यार्थ्याशी अस्खलित इंग्रजी बोलण्याचा खोडसाळपणा करून मग त्याच्या चेहऱ्यावरचे बावरलेले भाव पाहून सुवर्णपदक मिळवल्याच्या थाटात आमच्याकडे बघते. चायनीज विद्यार्थी तसे मूळचे हुशार; पण बिचारे संवाद साधण्यात भाषेमुळेच कमी पडतात. हिने किंवा इतर कोणीही शुद्ध इंग्रजीतून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरादाखल चायनीज विद्यार्थी डोळे मिटून, आणि सगळेच्या सगळे बत्तीस दात दाखवून जातिवंत हसला, ही खुशाल त्याला काही न समजले असल्याची पोचपावती समजावी. मात्र अमेरिकन असोत किंवा चायनीज किंवा इतर कोणी. सगळे विद्यार्थीवर्ग एककेकांशी सौहार्दपूर्ण वागतात, हे पाहून आनंद होतो आणि आपण परदेशी विद्यार्थी असल्याचा सावधपणा जरा निवळतो.
Engineering is a dry field world over या वाक्याची प्रचिती डिपार्टमेंटमधील मुलींकडे पाहून येते. पण डिपार्टमेंटल सोशल्स, हॅलोविन नि थँक्सगिव्हिंग अशा प्रसंगी आजवर कधीही न दिसलेली फुलपाखरं दिसू लागतात. आपल्याकडे मोठमोठ्या राजकीय पक्षांच्या प्रचारसभांना जशी गाडी भरून माणसं आणतात, तसेच अशा खेळकर आयोजनांना जास्तीत जास्त प्रतिसाद लाभावा, म्हणून विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेमार्फतच अशी 'मार्केटिंग स्ट्रॅटेजी' वापरली जाते की काय, असे वाटते. पण अशा खेळीमेळीच्या प्रसंगी विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय तसेच इतर कर्मचारी वर्ग आणि अर्थातच विद्यार्थी हे सगळे एकत्र येण्याचा आनंदसोहळा आणि त्याचाच एक भाग होणारे आमच्यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समुदाय या गोष्टी सारख्यासारख्या होत नसतात. दिवाळी, होळीसारखे कार्यक्रम स्थानिक भारतीय विद्यार्थी संघटनेमार्फत डिपार्टमेंटच्याच आशीर्वादाने इमारतीच्या मोठ्या प्रांगणातली जागा मिळवून राबवले जातात. त्याचबरोबर विविध कंपन्यांची माहितीसत्रेही डिपार्टमेंटमध्येच आयोजित केली जातात. अशा अनेक माहितीसत्रांना भारतीय विद्यार्थ्यांचा भरघोस पाठिंबा मिळतो. कारण असा पाठिंबा मिळवण्यासाठी 'फ्री फूड' ची खिरापत कंपन्यांनी जाहीर केलेली असते. संगणक विज्ञानाचे आमच्यासारखे विद्यार्थी खास ग्रीक आणि अरेबियन जेवणासाठी कुठल्याशा बांधकाम क्षेत्रातील कंपनीच्या माहितीसत्राला केवळ हजरच राहून नव्हे, तर तिच्या प्रतिनिधिंशी 'अमेरिकेतील सध्या हाती घेतलेले बांधकाम प्रकल्प आणि त्यातील रोजगाराच्या संधी' या विषयावर चर्चा करून आल्याचीही उदाहरणे आहेत. एखादी कंपनी भारतीय जेवण किंवा फुकटचा पापा जॉन्स पिझ्झा देणार असेल, किंवा गो पाक्स उपाहारगृहाच्या रविंदरकाकू दिवाळीनिमित्त सात डॉलरमध्ये अमर्याद बफे घोषित करतील तर ही माहिती समस्त भारतीय विद्यार्थी समुदायाला संघटनेच्या सामाईक ई-पत्राद्वारे कळवण्याचे सत्कार्यसुद्धा सगळ्या डिपार्टमेंट्सचे भारतीय विद्यार्थी इमानेइतबारे करत असतात. क्वचितप्रसंगी जेव्हा दैवाला मानवणार नाही, तेव्हा उलटा अनुभवही येतो. म्हणजे डिपार्टमेंटतर्फेच आयोजित केलेल्या सोशल मध्ये बार्बेक्यू आहे म्हणून उत्साहाने रांगेत उभे रहावे आणि प्रत्यक्षात वाढून घेण्याची पाळी आली, की तिकडे बीफ सोडून काहीही नाही, या सत्याचा साक्षात्कार व्हावा इथवर परिस्थिती ओढवते. अर्थात असे प्रसंग क्वचितच येतात, पण आले की झक मारत घरी जाऊन स्वयंपाक करावा लागतो किंवा जवळच्याच बर्गर किंग, किझनोज किंवा सबवेची वाट धरावी लागते.
अपार्टमेंट ते डिपार्टमेंट नि परत अशा प्रवासातला ऍडवायजरचा टप्पा तसा निरनिराळ्या किश्शांनी परिपूर्ण आणि कधीही चुकवू नये, असा असतो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. डिपार्टमेंटमध्येच बसून हे प्रवासवर्णन लिहीत असल्याचा आसुरी आनंद समस्त मनोगतींशी वाटून घेता येतोय, हेही नसे थोडके ;)
Thursday, November 16, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
ekdam realistic..
good one!
भाग ३ कधी येणार?
hahaha great aahe american shikshan padhti ;)
Post a Comment