Monday, February 28, 2022

समाधिस्थ कवितांच्या हिंदोळ्यावर



 “तुला आजकाल कविता होतच नाहीत का?”

असं ती जेव्हा मला विचारते, तेव्हा माझ्याकडे उत्तर नसतं. ते सुचण्याची प्रक्रिया चालू व्हावी, असं वाटत असतं; तेव्हा ही मात्र डोळ्यांत कुतूहल नि अपेक्षा साठवून, स्वतःच्याच तळहातावर स्वतःचं डोकं धरून, माझ्या मांडीवर रेलून, अधाशासारखी माझ्याकडे बघत असते. मला नि:शब्द, निरुत्तर करण्यात तिला काय मजा वाटते, किंवा कशाचा अभिमान वाटतो, हे तिचं तिलाच माहीत. पण माझ्याकडे एकटक बघत बसणाऱ्या तिच्या रुपड्यातली समाधिस्थ अस्वस्था संपून जायला नको, म्हणून मीच उत्तर शोधायचं - किंवा सापडलेलं उत्तर द्यायचं टाळतो की काय - असंही कधीकधी वाटून जातं.


बहारों फूल बरसाओ मधली फुलांच्या झोपाळ्यावर झुलणारी वैजयंतीमाला ही नाही. तसवीर बनाये क्या कोई, क्या कोई लिखे तुझपे कविता, म्हणावीशी शर्मिलासुद्धा ही नाही. झोपाळ्यावाचून झुलायचे, फुलायचे तिचे आणि माझेही दिवस मागे पडले. आताच्या खऱ्या जगण्यातला करडेपणा त्याच जगण्यातल्या खोटेपणाला स्वप्नांमध्येसुद्धा बहरू देत नाही. तरीसुद्धा तिच्यातल्या गृहिणीपणातलं, तिच्यातल्या मैत्रिणीतलं नि प्रेयसीतलं सोज्वळ बाईपण मी उरात का पेरतो, आणि त्या मागून होणाऱ्या माझ्या गर्भधारणेपासून ते बाळंतवेणांपर्यंतचा प्रवास एकट्यानेच का करतो, हे मलाही पडलेलं कोडंच आहे. हा प्रवास कधीकधी काही तासांचा, कधीकधी काही दिवसांचा तर कधी अनंतापर्यंतचा. सुट्यासुट्या ओळींच्या, एखाददोन कडव्यांच्या अशा कितीतरी अनाम कविता मी पाळण्यापासून ते झोपाळ्यापर्यंत झुलवल्या असतील, अंगाखांद्यावर खेळवल्या असतील; घट्ट कुशीत घेऊन झोपवल्या असतील किंवा मिठीत स्वतःसोबत जागवल्या असतील; किंवा कुणी माझ्यापासून हिरावू नयेत, म्हणून लपवल्याही असतील. इतकं करूनही, झोपाळ्यावर बसलेली एखादी कधीतरी ‘जाते मी’ म्हणून पाखरू होऊन मलाच झुलवत ठेवत उडून जाते. मिठीत घेतलेली एखादी ‘काळजी घे’ इतकंच म्हणून सोडून जाते. एखादीला सर्वस्व अर्पण करुन टाकण्यासाठी शब्दांच्या, ओळींच्या प्रदक्षिणा घालाव्यात, तर प्रत्येक शब्दासोबत, ओळीसोबत ती मूर्ती होण्याऐवजी दगडच होऊन जाते - नि माझ्या ठिकऱ्या उडवून जाते. अशा सगळ्या एकेक करून उडून गेल्या, सोडून गेल्या, दगड होऊन गेल्या, सजीव समाधिस्थ झाल्या, तर जिच्या जन्मासाठी ताटकळत बसलो आहे, ती जन्माला यावी तरी कशी? मुळात, ती जन्माला येईल का?!


आणि म्हणूनच “तुला आजकाल कविता होतच नाहीत का?” ऐवजी “तुला कविता होईल का?” हे तिने विचारणं जास्त सयुक्तिक ठरेल का?


तिने तेच, त्याच शब्दांत विचारावं, असं मीच तिला सुचवू का?


अर्थात हे मी तिला सुचवलं, तर तिचं कुतूहल काळजीत बदलेल. तिची अपेक्षा अगतिकतेत बदलेल. माझ्याऐवजी तीच नि:शब्द, निरुत्तर होईल, ज्याची तिला सवयच नाही. आणि ते मलाच सोसणार नाही.


म्हणूनच “तुला आजकाल कविता होतच नाहीत का?” या तिच्या प्रश्नाला मी क्षणिक परंतु संपूर्ण विचाराअंती एकच उत्तर देतो - “No!”


काळजी, अगतिकता, निरुत्तरता या सगळ्याचा परिपाक म्हणून चिडून ती माझ्या मुस्कटात मारेल, या भीतीने, मी माझ्या उत्तराचा उत्तरार्धसुद्धा तयार ठेवलेला असतो -


“कारण मला तू होतेस!”


आणि त्यातच माझ्या Noमधले असंख्य हो उजळून निघत असतात.

Sunday, January 02, 2022

रांगोळी

दिवाळी जवळ आली की ठिपक्यांचा कागद, रंग, रांगोळी, गेरू, रांगोळ्यांचे पुस्तक या सगळ्या गोष्टी माळ्यावरून काढून तयार ठेवणे; गॅलरीत रांगोळी काढायचा कोपरा झाडून, पुसून तयार करणे वगैरे कामे करण्यात मला खूप मजा येई. फराळानंतर कंदिलापेक्षाही जास्त आकर्षण रांगोळीचे. दादरच्या घरी केवळ आमच्याच नव्हे, तर शेजारपाजारच्या गॅलऱ्यांमधूनही अशा स्वच्छ, कोऱ्याकरकरीत कोपऱ्यांची रांग तयार होई. संध्याकाळी आई रांगोळी काढायला बसली, की मी तिच्या बाजूला बसे. पुस्तकातील कोणती रांगोळी आज काढायची, याची निवड माझीच. मुक्तहस्त रांगोळीपेक्षा, ठिपक्यांच्या रांगोळीचे प्रेम मला जास्त. मुख्य म्हणजे ठिपक्यांच्या रांगोळीमधील सममिती, बांधीवपणा, आटोपशीरपणा; छोट्यातील छोटी रांगोळीही किमान तासभर बसून काढणे, रंगवणे यातील आईची निगुती, आत्ममग्नता प्रत्यक्ष अनुभवली नसाली, तरी तिच्या बाजूला बसून ती नुसती बघत बसणे; हे सगळेसुद्धा किती आनंददायक असे, हे आज फार उशिरानेच कळते. आजसुद्धा प्रशस्त प्रांगणांमध्ये काढलेल्या मोठमोठ्या रांगोळ्या, रांगोळ्यांच्या स्पर्धा वगैरे प्रकारांचे कौतुक वाटतच नाही; उलट त्यांची कसलीतरी कीवच येते.

पुस्तकात दिलेल्या रंगसंगतीशी फारकत घेऊन, स्वतःच्या मनाची रंगसंगतीची निवडण्याची बंडखोरी आईला मी शिकवली. अमेरिकेत गेरूने जमीन सारवणे वगैरे शक्य नसल्याने, नुसत्याच राखाडी जमिनीवरच्या किंवा पाटावरच्या रांगोळीचा सोपा पर्याय उपलब्ध झाला. पण लहानपणीच्या रांगोळीचे आकर्षण, कुतूहल - प्रेम - कायम राहिले, असे अजिबात म्हणता येणार नाही. मुळात, दिवाळीच्या वेळी आई अमेरिकेत असलीच, तर चकली, शेव-चिवडा आणि बेसनलाडू, यापलीकडे तिने काहीही केले नाही, तरी काहीच फरक पडणार नाही, इथवर मन येऊन पोचले. तरीही आईचे रांगोळी काढणे सुटले नाही. ठराविक संस्कार आणि संस्कृतीच्या आधुनिकीकरणाची - किंवा त्यांना सोईस्कर फाटा देण्याची - बंडखोरी तिला शिकवणे मला काही जमले नाही.
नेटाने काढलेली रांगोळी पूर्ण झाली, आणि तिच्या डोक्याशी पणती लावून तिचा उजेड रांगोळीवर पडला की आपसूकच एक प्रसन्नता येई. मग कंदील आणि दिव्यांचे तोरण लागले, की अख्खी गॅलरी उजळून निघे. आजच्यासारखे खिशाखिशातले स्मार्टफोन तेव्हा उपलब्ध नसल्याने त्या कित्येक उजळण्यांचे रंगीबेरंगी फोटो निघालेच नाहीत. फटाके उडवताना किंवा खेळताना इकडून तिकडे पळणाऱ्या पोराटोरांच्या पायाने रांगोळी जराशी जरी पुसली गेली, तरी त्या पोराचे बखोट धरून त्याला धू धू धुवून काढावे, असा राग येई. संध्याकाळी काढलेली रांगोळी सकाळी गॅलरी झाडायला येणारा गडी झाडून टाके आणि सगळ्यांच्या गॅलऱ्या पुन्हा कोऱ्या होत. त्या झाडून काढण्याला मात्र नाईलाज होता.
इकडे अशी झाडलोट करायला गडी नाही. आणि सुबकशी छोटेखानी रांगोळी झाडून टाकायची निर्दयता अजून तरी माझ्यात आलेली नाही. त्यामुळे दिवाळीचे सगळे दिवस एकचएक रांगोळी राहिली, तरी काय विशेष बिघडले, हा विचार आपसूक मनात येतोच. त्याउलट नवीन रांगोळी हवी असेल, तर जुनी झाडून टाकावीच लागणार आहे, हे सुद्धा माहीत असतेच. मग, इतकी सुंदर कलाकृती स्वतःच पुसून टाकावी, की ती जबाबदारी कळतनकळत इतर कुणावर तरी ढकलून द्यावी, जेणेकरून आपल्या माथी आपल्यालाच नकोश्या वाटणाऱ्या निर्दयतेचा शिक्का नको, अशा कात्रीत मन सापडते. नवीन रांगोळी आधीइतकीच सुंदर होईल का, व्हावी का, की ती तिच्याजागी सुंदर असेलच, वगैरे वांझोटे विचार असतातच जोडीला.
‘पूर्वीचं’ आपण फारच जपत असतो बहुतेक. थंड डोक्याने विचार केला, तर ते का, याची असंख्य, तार्किकदृष्ट्या योग्य कारणं सापडतीलाही. तसेच, ते का जपू नये याचीही. मग हे जपणे व्यक्तीसापेक्ष असते की काय, असे वाटून जाते.
पण जपण्याची गरज आहे? खरे तर आपण सगळेच, आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर गरजेनुसार एक resetचं बटन शोधत आहोत की काय? रांगोळी resetकरूनच किंवा तिची राखरांगोळी करूनच नवीन रांगोळी रंगवता येते का? संगणकशास्त्रात soft reset आणि hard reset असे दोन प्रकार आहेत. नावानुसारच, त्यांचे अर्थही समजायला तसे सोपेच आहेत. राखरांगोळी हा शब्द कुठून आला आणि तो रांगोळीच्या संदर्भात soft reset आहे की hard? Soft reset असता, तर तीच, तशीच रांगोळी, तिच्या त्याच सुबकतेसह आणि रंगसंगतीसह पुनरुज्जीवित झाली असती, तिची राख झालीच नसती. म्हणजे रांगोळीच्या संदर्भात बोलायचे झाले, तर राखरांगोळी hard reset म्हणावे लागेल. मग काहीतरी नष्ट झालेल्याला, राख झालेल्याला रांगोळी म्हणावेच कशाला, हे काही कळत नाही.
त्याचे उत्तर कदाचित फिनिक्सच्या जन्मात असावे. राख नसताना फिनिक्स जन्म घेईलच कसा? फिनिक्सचे अश्रू कित्येक जालीम जखमांवरचे रामबाण औषध मानतात. म्हणजे कित्येकांच्या आयुष्यातील दुखणी दूर होण्यासाठी फिनिक्सने अश्रू ढाळणे गरजेचे आहे. आणि ते होण्यासाठी रांगोळीची राखरांगोळी होणेही.