Friday, December 03, 2021

शून्यात गर्गरे झाड


यू एस एस मिडवेच्या धावपट्टीवर एका सरळ रेषेत रचून ठेवलेल्या लढाऊ विमानांच्या मधून वाट काढत, त्या विमानांकडे डोळे विस्फारून पाहत असलेल्या चिमुकल्यांच्या बुटांच्या नाड्यांमधून वाट काढत मी त्यातल्याच एका विमानासारखा वर आकाशात झेपावलो, आणि मागे वळून बघितलं. मिडवेचा एव्हाना ठिपका होत आला होता. ते जहाज, त्या अजस्त्र युध्द्धनौकेवरचं संग्रहालय, ते बघायला आलेले लोक सगळेच जिवाणू, विषाणू म्हणावेत इतके छोटे झाले होते. काही मिनिटांपूर्वीच मी कुणाच्या तरी कोकमधला बुडबुडा झालो होतो; कुणाच्या सॅन्डविचवरचं पातळ कागदी आवरण बेदरकारपणे भिरकावून लावलं होतं; आणि मिडवेवरच्या मिजासखोर अमेरिकन राष्ट्रध्वजासकट इतरही अनेक झेंडे, पताका यांच्या असे काही नाकी नऊ आणले होते, की प्रयत्नपूर्वक एकमेकांना धरून, पाय रोवून उभे राहण्यात त्यांची तारांबळ उडत होती. पण आता मी सॅन डिएगोच्या नेव्ही पिअरपलीकडे. आणि तिथे आता फक्त अथांग पॅसिफिक महासागर.

पॅसिफिकसोबत, किंबहुना त्याच्यासारखं आडवंआडवं वाहत जाणं इतकं सोयीचं आणि सवयीचं झालं होतं, की त्यात आता मजा येईनाशी झाली. मर्त्य मानवजातीनं दलांबर की आयनांबर असं काहीसं नाव दिलेल्या आकाशातील थरापलीकडे माझं अस्तित्त्वच नसल्याचा शोध लावल्यापासून मी शक्यतो उभं आणि उंच उडायच्या फंदात पडत नाही. आंबा की संत्र समजून सूर्य खायला झेपावलेल्या मारुतीने हनुवटी फोडून घेतल्यापासून, ‘झेपत नाही तर पोरं जन्माला कशाला घालावीत’, या भावनेने बघणाऱ्या नजरांचा पाठलाग मी पुराणकाळापासून कसा चुकवत आलोय माझं मलाच माहित! आज सुद्धा मिडवेवरून निघाल्यावर, जेमतेम तपांबर की ओझोन असल्या कुठल्यातरी थराला शिवून मी माघारी फिरलो.
परतीच्या वाटेवर कुणा हौशी वैमानिकाने विमानाच्या धुराचं हृदय आखून ठेवलेलं पाहिलं. शेजारीच धुराने गिरमिटलेली काही अक्षरं. ‘वाचता येईना अक्षर वाकडे’! त्यातून कुणाची तरी प्रेमपत्रं चोरून वाचल्याचं पाप आपल्या माथी कशाला?! म्हणून किमान त्या अनाम प्रेमवीराला त्याचं हृदय भेदून जाणारा बाण चितारण्यात तरी हातभार लावावा, या उदात्त विचाराने मी त्याच्या विमानाच्या शेपटीला हात घालणार, इतक्यात मिडवेशेजारच्या चिंचोळ्या गल्लीत चाललेली वाळक्या पानांची मस्ती दिसली. तिकडे वळलो.
वाळकी पानं बिचारी असतात. तशीच ही. मुजोरी करायचा मक्ता फक्त माझ्याकडे आहे. शक्यतो रिंग अराउंड द रोझी पासून ते ऑल फॉल डाऊन यापलीकडे त्यांची मजल जात नाही. पण मी मनात आणायचा अवकाश; मग मात्र स्वतःची वावटळ करायलासुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. सकाळपासून माझा मूड चांगला असल्याने त्यांना दुरूनच टाटा-बायबाय करून शेवटी नेहमीसारखा पॅसिफिकला समांतर झालो.
हॉलिवूड, लॉस एंजेलिसच्या आसपासच्या टेकड्यांकडे पोचलो, तेव्हा संध्याकाळ होत आली होती. या टेकड्यांमधला बराच भाग आता काँक्रीटचं जंगल झालाय खरा; पण उतरणीवर काही ठिकाणी अजूनही हिरवळ आणि रंग टिकून आहेत. रंगीबेरंगी रानफुलांचे रंग. तिथे अंग टेकायला आवडतं मला.
सूर्य बुडेपर्यंत तिथे बसावं; फुलांगवतावरून हात फिरवावा, आणि तळव्याला गुदगुल्या झाल्या की आपलाच आपल्यावर शहारा यावा; त्यामुळे आपलं घोंघावणं क्षणार्धात बंद व्हावं नि तिथे झुळकेची शीळ फुटावी. सुख सुख म्हणतात ते हेच की काय, या भावनेने आपण कृतकृत्य होऊन जावं. आणि या ठिकाणालाच आपण आपली हॅपी प्लेस, हॅपी स्पेस समजावं. आणि अशाप्रकारे स्थिरस्थावर झालो, की वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे वगैरे चालू करावं.
या ची ही आता स व य झालेली!
सवयीचं नसलेलं आज पाहिलेलं एक अनोळखी डँडेलॉइन. मी शीळ घालावी आणि डँडेलॉइन्सच्या शेतातून असंख्य हारतुरे, पुष्पगुच्छ, टाळ्या नि शिट्यांचा वर्षाव व्हावा, इतकं कौतुक आहे इथल्या फुलापानांना माझं! मग या अनोळखी डँडेलॉइनकडून एखादं फूल तरी का भिरकावलं जाऊ नये?! मुजोरी करायचा मक्ता फक्त माझ्याकडे आहे, हे बहुतेक याला माहीत नसावं. किंवा कदाचित आपली नीटशी ओळख झाली नसावी. आपण स्वतःच ओळख करून दिली तरच ती नीट - आणि कायमची - लक्षात राहील की काय, असं वाटून मी उठलो, तसं ते शेत किंचितसं गहिवरलं. मी त्या अनोळखी डँडेलॉइनसमोर येऊन उभा ठाकलो आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्याचे निर्विकार डोळे मला भिडले. जणू माझीच वाट पाहत असल्यासारखे.
आजवर माझ्या डोळ्याला डोळा द्यायचा माजोरडेपणा कोणी केला नव्हता. पण या डँडेलॉइनच्या डोळ्यात माज नव्हता. किंबहुना काहीच नव्हतं. एखाद्या तपस्वीसारखी त्याची नजर स्थिर होती. इच्छा नसतानाही, मी खाली वाकून - मी..खाली वाकून..! - वसुली करावी अशा थाटात माझा हात पुढे केला. डँडेलॉइनला माझं म्हणणं कळलं असावं. तरीही त्याची नजर तशीच स्थिर. तशीच निर्विकार. कळलेलं म्हणणं वळलं कसं नाही, या माझ्या नजरेने केलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून त्यानं आपली छाती उघडी केली.
त्या निधड्या छातीवर फक्त एकच तंतुपुष्प उरलं होतं. आणि त्याच्या मुळाशी कायमस्वरूपी चिकटलेलं काचत असलेलं चंद्ररूपी कुणीतरी, काहीतरी, कितीतरी. मला द्यावं तर ते डँडेलॉइन संपून जाणार. नाही दिलं, तर मी ते संपवणार. स्वतः संपावं, की अजस्त्र कुणीतरी संपवावं, या यक्षप्रश्नाचं सोपं उत्तर डँडेलॉइनने छाती खुली करून स्वतःच स्वत:ला दिलं होतं. हे संपून जाणं, हीच याची हॅपी प्लेस आणि हॅपी स्पेस असेल का? की ग्रेस म्हणतो तसं छातीवर वैऱ्यासारखा गोंदला गेलेला चंद्र? याला संपवावं का मी? हा स्वतः का संपत नाही?
याच्यासारखीच किती डँडेलॉइन्स आधी संपून गेली किंवा संपवली गेली, हा प्रश्न मला तिथे पहिल्यांदाच पडला. कधी नव्हे तो स्वतःचीच कसलीतरी वाटत असलेली शरम घेऊन मी सुसाट माघारी फिरलो. न राहवून मागे पाहिलं.
त्याच स्थिर, निर्विकार नजरेनं शून्यात कुठेतरी बघत डँडेलॉइन घुमत होतं. ते संपलं नव्हतं; कुणी संपवलं नव्हतं. छातीवरचं एकमेव, शेवटचं तंतुपुष्प मिरवत उंचच उंच माड झालं होतं.

अतिरिक्त अंतस्थ प्रेरणा: वाऱ्याने हलते रान (कवी: ग्रेस)