एक भ्रमणध्वनी संच आणि इतर भ्रमणध्वनी संच, संगणक, पीडीए अशा अनेक उपकरणांमधील '(सु)संवाद' ज्याद्वारे साधला ज़ातो, ते 'ब्लू टूथ' तंत्रज्ञान राबवणारे सॉफ़्टवेअर तपासणे या खास कामावर माझी नियुक्ती झाली. या तंत्रज्ञानाच्या नावावरून त्याचा आणि दातांचा (किंवा दातांच्या रंगाचा ... मोत्यासारखे शुभ्र, पिवळट, (निळे!) आणि क्लोज़ अपच्या त्या प्रसिद्ध जाहिरातीत शिशुवर्गातील मुलांनी सांगितलेले आपल्या शिक्षिकेच्या दातांचे काही रंग) काही संबंध असतो की नाही, याबद्दल मी अज़ूनही माहिती मिळवण्याच्या खटपटीत आहे. तो चिंतनाचा स्वतंत्र विषय आहे. पहिल्याच दिवशी एकदम 'ढासू' दिसणारे काही भ्रमणध्वनी संच तपासणीसाठी हातात पडले आणि मी त्यांच्या प्रेमात. त्यामुळे तपासणीच्या सगळ्या पायऱ्या वाचून, त्या समज़ावून घेऊन तदनुसार ते संच तपासणे हे सगळे मी इमानेइतबारे केले. ज़े काही निकाल हाती आले, त्यांची नीट नोंद केली आणि त्याबद्दल ओ एल् ची शाबासकीसुद्धा मिळवली. मला खूप आनंद झाला त्या दिवशी. झालेला सगळा आनंद घरी येईस्तोवरच्या तासाभराच्या प्रवासात, कुणाबरोबर तरी वाटून घेण्यापूर्वीच पूर्ण हरवून गेला. सकाळाची अपुरी झोप येताना बसमध्ये काढली (कार्यालयात नव्हे!) आणि घरी आल्यावर मस्तपैकी ताणून दिली. दररोज़चे नऊ ते पाचचे हे वेळापत्रक असेच, तंतोतंत, प्रामाणिकपणे राबवायचे (अगदी बसमधल्या झोपेसकट!) हा विचार तेव्हाच पक्का केला.
पण नव्याचे नऊ दिवस या न्यायाने हळूहळू कामातील नाविन्य संपले. सगळे कसे 'यांत्रिक' होऊन गेले. सकाळी नऊपासून सायंकाळी पाचपर्यंत एका ठराविक साचेबद्ध कामाचा कंटाळा येऊ लागला आणि मग मुख्य कामाबरोबरच 'ज़ोडधंदे' शोधायला सुरुवात झाली. सहकाऱ्यांबरोबरचे हास्यविनोद हा त्यांपैकीच एक. अमेरिकेत एक बरे (आणि विचित्र) आहे. तुमच्या दुप्पट-तिप्पट वयाच्या माणसालाही अगदी नावाने हाक मारता येते. आमचा व्यवस्थापकसाहेब 'आज़ोबा' म्हणण्याइतका मोठा नसला तरी सामान्यपणे आपण ज्यांना अहोज़ाहो करतो, तेव्हढा 'काका'छाप मोठा नक्कीच आहे. पण तरीही त्याला आपल्या लंगोटीमित्रासारखे "हे स्टीव्ह, व्हॉट्सप" ('क्या रे भिडू स्टीव्ह, कैसा है'छापाचे!) म्हणणे सुखावून ज़ाते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी ज़रा जास्तीच खेळीमेळीचे वातावरण असते. पण मला दिसणारी नाण्याची दुसरी बाज़ू अशी आहे, की यामुळे इकडच्या 'काका', 'आज़ोबा' यांच्याज़वळ ज़ाणाऱ्या व्यक्तिरेखांबद्दलचा आदरभाव निर्माण व्हायला आणि तो रुज़ला की चिरकाल कायम रहायला तुलनेने जास्त वेळ लागतो. साहेबापासून ते थेट कंपनीच्या उपाहारगृहातील आचाऱ्याबरोबर थट्टामस्करी चालू झाल्याने कामाचा कंटाळा थोडातरी निवळला आणि नवीन ज़ोम आला. त्याचबरोबर क्युबिकलसमोरून पॉला, ज्युडी, एमी, XXXचे खळखळणे (माझ्या मित्रपरिवारात सध्या या फुल्या फारच प्रिय असून प्रकरण मुलीच्या फोटोपर्यंत (तो तर केव्हाच मिळालाय!) गेले असून आता ते कुंडलीपर्यंत (ती आहे की नाही हे मलाच माहीत नसणे, हे माझे अहोभाग़्य!) आणि त्याच्याही पुढे नेण्याचा कट शिज़ायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सदर पाककृती लवकरात लवकर पूर्ण न होण्याच्या खबरदारीस्तव आणि वाचकांच्या कल्पनाशक्तीस वाव द्यावा म्हणून तूर्तास फुल्याच!), झेरॉक्स मशीनचा आणि प्रिंटरचा लयबद्ध आवाज़, दर आठवड्याच्या बैठका, त्यातली मला अजिबात न कळणारी चर्चा, काम करताकरता अधूनमधून डोळ्यांवर ऐकायला येणारे 'सोजा राजकुमारी सोजा' (आणि तसे झाल्यावर लगेच कॉफ़ीमेकरकडे घेतलेली धाव!), दिवसातून एकदातरी व्हेंडिंग मशीनमध्ये ज़ाणारे काही क्वार्टर्स (स्थानिक २५ पैसे) आणि बाहेर येणारा सोडा अगर चिप्स आणि या सगळ्यात दडलेले कष्टाचे काम यांमुळे माझे नऊ ते पाच स्थिरस्थावर झाल्यासारखे वाटू लागले. दररोज़चे काम करतानाच कॅरोलायना हरिकेन्सच्या हॉकी गेमबद्दलची चर्चा होते. वीकेंडला काय केले आणि येत्या वीकेंडला काय करायचे आहे, याचे वेळापत्रक व्हेरिफ़िकेशनच्या वेळापत्रकाइतकेच सूत्रबद्धपणे बनवले ज़ाते. तसे झाले की येणाऱ्या शुक्रवारच्या संध्याकाळच्या प्रतीक्षेत आठवड्याचे बाकीचे दिवस सुसह्य होऊन गेल्याचे ज़ाणवतही नाही. संध्याकाळी बसमधून घरी येताना काढलेल्या तासभर झोपेला आता सकाळी कार्यालयात ज़ातानाच्या बसमधील चाळीस मिनिटांच्या झोपेची साथ मिळू लागली, एव्हढाच काय तो ठरवलेल्या वेळापत्रकातला छोटासा (?) बदल.
डिसेंबरात भारतात ज़ायचा बेत आहे. त्यासाठीचे तिकीट आतापासूनच आरक्षित केले नाही, तर लवकरच किमती गगनाला भिडणार हे अटळ सत्य डोळ्यांसमोर दिसते आहे. फ़ीचे पैसे, देणेकऱ्यांची देणी हा सांसारिक स्वरुपाचा खर्च विद्यार्थीदशेतच झेलायला लागतोय. पण अज़ून आतापर्यंत काम केलेल्या तीन आठवड्यांचा सोडा, तीन दिवसांचाही पगार मिळालेला नाही. ते सुद्धा आम्ही तासाच्या बोलीवर काम करणारे वेठबिगार असताना. बरे आतापर्यंत एकही खाडा केलेला नाही. पण आमच्या हक्काच्या साडेअठरा डॉलर प्रतिताससाठी झगडणारा कोणी शरद रावांसारखा कैवारी (! हाहाहा... पगार नसला झाला की काय काय (वाट्टेल ते!) आठवेल/सुचेल काही सांगता येत नाही, हे मला आता पुरेपूर पटले हो!) इकडे नाही आणि इकडे संप बिंप पुकारता येण्याचा अनुभव आणि कौशल्य दोन्ही नाही ः( कौशल्य आहे ते सॉफ़्टवेअरच्या तंत्राचे, ज्ञानाचे, त्यामधील पायाभूत संकल्पना आणि त्यांच्या उपयोजनाचे. अनुभव आहे तो कष्ट करण्याचा आणि नीट काम करण्याचा.
गिरणगावातल्या बंद पडलेल्या गिरण्यांचे भोंगे कधी काळी वाज़लेले ऐकले आहेत माझ्या कानांनी. तिथला मुंबईकर साडेअठरा 'रुपये' प्रतितासापेक्षा कमी पगारावर आयुष्य काढत आला आणि भोंग्यांच्याच गजरावर त्याला ज़ाग येत असे. त्यामानाने मी बराच सुखवस्तू परिस्थितीत दिवस ढकलतोय (?) याची ज़ाणीव झाल्यावर पुढच्या पहाटे गजर झाला रे झाला की दात घासायला बेसिनसमोर उभे राहण्याची अनामिक प्रेरणा मिळते. अशा वेळी माझे 'नऊ ते पाच' मला पगारापासून बरेच दूर कुठेतरी घेऊन गेलेले असते.
7 comments:
wa majja aaali.mala ataa marathitun blog karayla shikaycha aahe. 'too' mhanle tar chalel ka? sanskaar pusala jaat nahi na? are ture he aaie.raaja,dev ani mitra yanna mhanayla vyakranachi parvangi aahe.kundali karaychya agodar maze 'yanda kartavya aahe he pustak kinwa jyotishakade janyapurvee he pustak waach. tula tikde kuthe milnaar mhana? punya mumbait milel.
sahebanchya deshat sahebaala kay mhantat
घाट्पांडे साहेब,
तुम्हाला हे पोस्ट आवडले हे वाचून आनंद झाला. मला तुम्ही "अरे तुरे"च केलेत तर मला आवडेल.आणि मी ज्या कुंडलीबद्दल बोलतोय तिकडे,ती माझी नसून त्या फुल्यांच्या कुंडलीबद्दल बोलतोय, हाहाहा. लेखातच नमूद केल्याप्रमाणे येथे साहेबाला त्याच्या नावानेच हाक मारतात :)
श्री. चक्रपाणी साहेब,
नमस्कार.
आपण लिहीलेला Blog फारच आवडला.
परप्रांतात असुन देखील आपली भाषा अत्यंतिक शुद्ध आहे ह्याचा आनन्द अधिक झाला.
तसेच, आपल्या लिहिण्याची शैली देखील भावली.
असेच छान छान लिहीत रहा.
हे वाचून मला देखील काहितरी लिहीण्याची स्फुर्ती मिळाली आहे.
प्रयत्न करून पहातो, काही जमतय का तें.....
धन्यवाद!!
चक्रपाणि,
खरं आहे. माणसानं आयुष्यभर शाळा किंवा कॉलेजातच राहावं. दोन वर्षं नोकरी करुन मला त्याचा चांगलाच प्रत्यय आलाय. पण थोड्या दिवसांनी ना कॉलेजाचा पण कंटाळा येऊ लागतो. ते काय म्हणतात ना.. grass is green on the other side..का काय ते. तशातला प्रकार आहे हा. असो.
न्यूयॉर्क प्रवासवर्णन आणि हा लेख दोन्ही छान!
चक्रपाणि,
खरं आहे. माणसानं आयुष्यभर शाळा किंवा कॉलेजातच राहावं. दोन वर्षं नोकरी करुन मला त्याचा चांगलाच प्रत्यय आलाय. पण थोड्या दिवसांनी ना कॉलेजाचा पण कंटाळा येऊ लागतो. ते काय म्हणतात ना.. grass is green on the other side..का काय ते. तशातला प्रकार आहे हा. असो.
न्यूयॉर्क प्रवासवर्णन आणि हा लेख दोन्ही छान!
Narayan Survenchi Kavita aathavali
Surve Mhanatat---
Ghanashyam Sundara Sridhara
Giranodaya jhala
tasa tu 9.00 te 5.00 madhye adaklela distos
ani *** desi ki videsi
navin sfurtisthan ka?
are baba Shard rav ithe basun phaar kaahi gor gareebancha udhaar kart naahiyet! te ulat HR chya dokyala taap vaadhvtaat! [Asmadik hr madhye aahet aani ajun nokreechya shodhaat aahet] bakki zakaas!!!
Post a Comment