Monday, December 31, 2018

पेपरकट हास्यांची दुखणी

कॉलेजमध्ये असतानाही अशीच गोड हसायची. खरंतर कॉलेजच्या पहिल्या दिवशी स्टेशनबाहेर बसची वाट बघत उभी होती, तेव्हा आपल्याच वर्गात असेल, असं वाटलंच नव्हतं. पुढे मग चार वर्षं कशी भुर्रकन उडून गेली, कळलंच नाही. वयही तसंच होतं म्हणा; पण ते हसणं सकाळ-संध्याकाळ, खातापिता, उठताबसता सतत आपल्या आसपास वावरत राहील अशी अपेक्षा म्हणा, इच्छा म्हणा, काहीही - गैर वाटलंच नाही. आणि कदाचित त्यामुळेच, अपेक्षाभंगाचं दु:ख आजही सलतं.

एक तपापेक्षा जास्त काळ लोटलाय. पण तिचा पोटावर Best Christmas gift ever असं लिहिलेला हिरवा स्वेटर घालून Christmas Tree समोर उभी असलेला फोटो आज ध्यानीमनी नसताना बघण्यात आला, आणि ओठांवर हसू फुटलंच!

*********************************************************************************

: बोर होतंय
: नेटफ्लिक्स? लॉस्ट?
: चालेल. आणि वाईन पण घेऊन बस.
: परत?
: घे ना
: बरं
: ब्लॅन्केट हवंय
: थंडी नाहीये
: तर काय झालं?!
: आणि थंडी असली तरी फुल स्पीडवर फॅन लावून ब्लॅन्केटमध्ये गुरफटून घेतेस
(हसण्याचा खळखळाट)
: मला सॉयर आवडतो. कसला हॉट आहे नं?!
: जॅक भारी आहे पण. विचार करुन वागतो. आणि he is calm..and..काय गं, काय झालं एकदम?
: goosebumps!
: काय करतेयस?!
: आणि तू करतोयस ते?! तेच!
: तुला काय वाटलं ब्लॅन्केटमध्ये गुरफटून घ्यायला तुला एकटीलाच आवडतं?!
(लाजून हासणे अन हासून ते पहाणे)
: गार झालंय नं?!
: ते बघ!
: काय?
: चंद्र! आठवलं मी पुण्यात असताना काय सांगितलं होतं?
(असंख्य हसऱ्या चांदण्या)

गेली काही वर्षं full moon, supermoon, blood moon नेमाने आले. Although, हसऱ्या चांदण्या seem lost. So does my Kate! पण पुण्यात असल्यापासून ज्याची आतुरतेने वाट बघितली होती, त्या चंद्राने आज हसवलंच!

*********************************************************************************

Weekdaysमध्ये लॉंग रनसाठी वेळ मिळतच नाही. म्हटलं आज २-३ मैलच करू. Alder drive वर VTAचा बसस्टॉप आहे. आणि एक लाकडी बाकडं. तिकडे कधीच कुणीच नसतं; तरी तो स्टॉप का लावून ठेवलाय कळत नाही. Tasmanवरून Alderवर  वळलो,तर समोर बाबा! मी दिलेला NC Stateचा स्वेटशर्ट आणि ती त्यांची ब्राऊन पॅंट. म्हणजे आत तो लायनींचा ऑफ-व्हाईट, क्रीम कलरचा शर्ट पण असणारच! म्हटलं, बाबा इकडे कुठे?! तर म्हणतात, माझा नेहमीचाच route आहे walkingचा. मला वाटलं फेकतायत! मी किती वेळा पळालोय त्या routeवर पण कधीच दिसले नाहीयेत. त्याबद्दल त्यांना confront करण्याआधीच डोळे उघडले!

न धावताही घामेजलो होतो.

२०११ मध्ये इकडे आले होते, तेव्हा सोलकढी भात आणि  पापलेट फ्रायचा बेत केला होता एरंडे family dinnerला येणार म्हणून. नवीनच घेतलेल्या DSLRमधले सुरुवातीचे काही फोटो. सुईत दोरा ओवताना आपण extra carefully ते काम करत असतो; पण आसपास काय चाललंय, कोण काय बोलतंय याचं भान असतंच. तशातच कोणी असं काहीतरी बोलावं, ज्यामुळे नकळत चेहऱ्यावर हसू फुटावं, अशा अवस्थेतला बाबांचा फोटो. अर्थात ते काही सुईत दोराबिरा ओवत नव्हतेच; निखिलची सारा अगदी साभिनय old McDonald had a farm सादर करत होती, ते बघत होते गुंग होऊन,कौतुकमिश्रित हसून! अमर आणि ते एकमेकांची खेचायचे, आणि दोघे मिळून माझी खेचायचे, तेव्हा मात्र खळखळून हसायचे. ते त्यांचं एकच, खळखळणारं हसू आजपर्यंत ओळखीचं होतं माझ्या.

फोटोतलं जास्त स्पेशल आहे पण! फोटो बघताना ते हसणं माझ्याही चेहऱ्यावर आपोआप येतं म्हणून!

*********************************************************************************

कित्येकदा मीच लिहिलेला एक शेर सतत आठवत राहतो -

आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)


दररोजच्या रामरगाड्यातल्या पेपरकट्स सारख्या आठवणी आणि त्यातलं हे हसणं. या पेपरकट्सचे दंश भरून येत नाहीत, त्यांची दुखणी होतात.

*********************************************************************************

Tuesday, January 02, 2018

भिंत

दादरचं आमचं घर ज्या इमारतीत आहे, तिची पुनर्बान्धणी होणार असल्याची बातमी कळली. खरं तर आनंद व्हायला हवा..झालाही; पण त्यापेक्षाही जास्त आनंद झाला तो काही जुन्या आठवणी जाग्या झाल्याचा. जेमेतेम १८० चौरस फुटाच्या त्या जागेत आजच्यासारख्या लिव्हिंग रूम, स्टडी, बेडरूम वगैरे खोल्या एकत्रच एकाच खोलीत आजही नांदत आहेत. नाही म्हणायला स्वयंपाकघर आहे वेगळं; पण गरज पडेल तेव्हा तिथेच डायनिंग रूम असल्यागत, खाली मांडी घालून बसून जेवणं आणि झोपणंही व्हायचं..आजही होतं कधीकधी. तिथेच मोरीही आहे. मी कॉलेजात जायला लागल्यावर तिला बाथरूम म्हणायला लागलो. आयुष्यातली पंधरा-सोळा वर्षं स्वयंकपाकघरातल्या दोन भिंतींपैकी एक अर्धी पांढऱ्या फरश्या घातलेली आणि अर्धी यवनी हिरव्या रंगाची; तर दुसरी पूर्ण हिरव्या रंगाची. बाहेरच्या खोलीतल्या भिंती मात्र पूर्ण त्याच हिरव्या रंगाच्या. दादरसारख्या ब्राह्मणबहुल वस्तीत हा यवनी हिरवा रंग कुठून शिरला, असा प्रश्न नेहमी पडायचा. पण इमारतीचा मालक मुसलमान आहे, हे कळल्यावर त्याचं उत्तर मिळालं. घरात शिरल्याशिरल्या उजवीकडच्या भिंतीवर आत आल्याआल्याच एक खुंटी आणि त्या खुंटीवर कुलपं-किल्ल्या लटकलेल्या. क्वचित प्रसंगी कोणाचातरी शर्ट, कमरेचा पट्टा आणि पट्ट्यापट्टयांची पिशवी. त्यांच्या वर आयताकृती, उभं, टोले देणारं वॉलक्लॉक. त्यासमोरच्या भिंतीवर पप्पाआजोबांची एक तसबीर, 'दाभोळकर' अशी सही असलेल्या चित्रकाराने काढलेलं गणपतीचं चित्र असणारी एक तसबीर, सगळ्यात धाकट्या काकाआजोबांच्या लग्नात काढलेला अख्ख्या चिटणीस वंशावळीचा फोटो, कधी नव्हे तो स्टुडिओत जाऊन काढलेला माझ्या आईबाबांचा तरुणपणीचा फोटो आणि कालनिर्णय याशिवाय फार काही लटकलेलं नसे. या भिंतीवर एक आडवी लोखंडी कांब ठोकलेली आणि तिच्यावर बाहेर घालायचे कपडे आणि साड्या हँगर्सवर शिस्तीत लावलेल्या. तिला लागूनच घरातला एकमेव लोखंडी पलंग आणि त्यावर सगळं बेडींग. पलंगावर एका कोपऱ्यात एकावर एक रचलेले रग, उश्या आणि सतरंज्या. त्याला टेकून आणि भिंतीला पाय लावून चहापान, वामकुक्षी, गप्पाटप्पा, पेपरवाचन वगैरे करणारा कुटुंबातला कर्ता पुरुष पाहिला की कोणीही त्याला अगदी मनातल्या मनातही रिकामा न्हावी म्हणायची हिम्मत करत नसे. त्याला मुख्यत्त्वे पप्पाआजोबांचा धाक हे कारण असावं; कारण ते गेल्यावर त्यांची ती जागा मी आणि बाबांनी घेतली आणि तिथे टेकून अगदी अभ्यास करताकरता जरी डोळा लागला, तरी लगेच रिकामा न्हावी म्हणून उद्धार होई. 'मी आता जे वाचलं त्याचं चिंतन करतोय', हे कारण तेव्हा पुरे पडतच नसे.

खुंटी ठोकलेल्या भिंतीवर माझ्या जन्मानंतरच रंगीत खडू, पाटीवरच्या पेन्सिली आणि शिसपेन्सिलींनी काहीबाही लिहिलं-रंगवलं जाऊ लागलं. किडमिडे पाय आणि मोठ्या डोक्यांची अनेक माणसं मीच काढली आहेत, हे मोठं झाल्यावर कळलं तेव्हा गुहेतल्या भिंतींवर चित्रं काढणाऱ्या आदिमानवाचा वंशज असल्याचा कितीतरी अभिमान वाटला होता. मग त्या माणसांच्या जोडीला मामाच्या वाढदिवसाचा 'आज मामाचा वाढदिवस आहे', असा भल्या मोठ्या अक्षरात कायमस्वरूपी कोरलेला रिमाइंडर; ९०च्या दशकातल्या पूर्वार्धातल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामान्यातला भारताच्या दुसऱ्या डावाचा धावफलक; चार आकडी संख्येला तीन आकडी संख्येने गुणायची अनेक उदाहरणं; १७, १९, २७, २९ वगैरे कठीण पाढे, अशी कायकाय भर पडत गेली. आणखी मोठा झालो तेव्हा विज्ञानाच्या पुस्तकातल्या सूर्यमाला, अमीबा, पेशीविभाजन, झोतभट्टी, हायड्रोजन सल्फाइड तयार करायचा प्रयोग, अंतर्वक्र नि बहिर्वक्र भिंगांतून प्रकाश पडून तयार होणाऱ्या प्रतिमा अशा आकृत्या वेगवेगळ्या कागदांवर हातानी काढून या भींतीवर चिकटत गेल्या. कालनिर्णयवर परीक्षांचं नि अभ्यासाचं 'फेयर' वेळापत्रक तारीखवार मांडण्यापूर्वी ते याच भींतीवर 'रफ' मांडलं जाई. पौगण्डावस्थेत असताना समोरच्या भिंतीवर रवीना टंडन, प्रीती झिंटा, अमिशा पटेल. जोडीलाच श्रीलंकेचा रोमेश कालुविथरणा आणि पाकिस्तानचा एजाझ अहमद यांची षटकार मासिकातून फुकटात मिळालेली पोस्टर्स. खरं तर सचिनचं हवं होतं पण ते स्पोर्ट्सस्टार नावाच्या इंग्रजी मासिकातूनच मिळायचे चान्सेस होते; तेही नशीब भलतंच बलवान असेल तरच. महागडं इंग्रजी मासिक परवडत नसल्याने सचिनच्या पोस्टर्सची महत्त्वाकांक्षा डाऊनग्रेड करावी लागली आणि नशीब षट्कारवर आजमावलं. आयताकृती उभं वॉलक्लॉक जाऊन तिकडे चुलतभावाकडून आणलेलं 'कमांडो' चित्रपटातलं अरनॉल्ड श्वारझानेगरचं पोस्टर आलं. आजच्यासारखे ऍक्सेंट वॉल वगैरे प्रकार तेव्हा प्रचलित नव्हते; नाहीतर या भिंतीला नक्कीच ऍक्सेंट वॉल म्हटलं असतं. आजकालच्या भिंती जश्या सूर्यास्त किंवा सूर्योदयाची, राधाकृष्णाची, राजस्थान किंवा गुजरातेतल्या खेड्यातले बायकापुरुष आणि गायबैल यांची किंवा 'नक्की काय आहे ते सांगता येत नाही' स्वरूपाची चित्रं लावून, वेगवेगळ्या जागांचे, जगातल्या आश्चर्याचे, निसर्गाचे फोटो लावून, किंवा कुटुंब म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय,  आशा म्हणजे काय वगैरे उपदेश करणारे बोर्ड्स लावून सुशोभित केल्या जातात, तसा प्रकार त्या भिंतीच्या बाबतीत नव्हता. पण आजसुद्धा अमेरिकेतल्या राहत्या अपार्टमेंटच्या भिंतीचा एक भाग माझ्या मुलाने असंख्य स्टिकर्स लावून भरून टाकलाय, हे बघतो, तेव्हा भिंत स्वहस्ते सुशोभित केल्याचं समाधान नव्याने मिळतं. किंवा खरं तर पुन्हा स्वतः छोटं झाल्याचं.

माझी दहावीची परीक्षा झाल्यावर दादरच्या जागेच्या नूतनीकरणाचं काम निघालं. दोन्ही खोल्यांत दोन वेगळे रंग काढावेत ही माझीच कल्पना. मग बाहेरच्या खोलीत ज्याला बेज किंवा पीच म्हणतात तो, आणि स्वयंपाकघरात राखाडी असे रंग आले. पप्पाआजोबांचा, चिटणीस वंशावळीचा, आईबाबांच्या तरुणपणीचा फोटो गेला. गणपतीचा राहिला. काही वर्षांनी त्याच्या जोडीला आजीचा फोटो लागला. कालनिर्णय, कपडे लटकवायची लोखंडी कांब, कुलपं लटकवायची खुंटी तशीच राहिली; त्यांच्या जोडीला नव्या पद्धतीचं, टोल्याऐवजी सुमधुर गीत वाजवणारं वॉलक्लॉक आलं. माझ्या मुलाच्या जन्मानंतर बेजवर केशरी आणि राखाडीवर पोपटी असे आणखी थर चढले. नवनवीन रंगांचे तीन-चार थर दोनदा चढून बालपण कोरं झालं. पण खुंटीच्या बाजूला दोन बोटांच्या मापाचा जुना हिरवा रंग अजूनही डोकावतो. तो दिसला, त्याबद्दल बोललं गेलं की आजकालच्या रंगांची किंवा साधारण कशाचीच 'क्वॉलिटी' उरली नाही, असं ऐकायला मिळतं.

कदाचित माणसांचीही क्वॉलिटी उरली नाही, असंही काही जण म्हणतील. पण मला तो निराशावादी सूर पसंत नाही आणि मान्य तर नाहीच नाही. मनात भिंती घातल्या गेल्या आहेत, आणि त्या भिंतींमध्ये माणसाने स्वतःलाच चिणून घेतलंय, हे मात्र खरंय. माणूस स्वतःच अनारकलीही झाला आणि जहॉंपनाह सुद्धा. मंगोल आक्रमकांपासून संरक्षण म्हणून कुणीतरी ग्रेट वॉल ऑफ चायना बांधली म्हणतात. माणसाच्या मनातली चायना वॉल कुणापासून संरक्षण करायला बांधली गेली आहे, हे माहीत नाही. क्षणभंगुर सुख किंवा फायद्यासाठी, जगात वावरायचा मुखवटा म्हणून किंवा स्वतःच्याच भावनिक नग्नतेची, स्वतःला पूर्णपणे ओळखण्याची भीती किंवा लाज जी काही वाटते ती झाकायला, असं काहीतरी असूही शकेल. पण क्वॉलिटेटिव्ह माणूस बनायला आणि तो इतरांना दिसायला विंदा करंदीकरांच्या ओळी खऱ्या व्हायलाच हव्यात :

रक्तारक्तातील
कोसळोत भिंती
मानवाचे अंती
एक गोत्र