यू एस एस मिडवेच्या धावपट्टीवर एका सरळ रेषेत रचून ठेवलेल्या लढाऊ विमानांच्या मधून वाट काढत, त्या विमानांकडे डोळे विस्फारून पाहत असलेल्या चिमुकल्यांच्या बुटांच्या नाड्यांमधून वाट काढत मी त्यातल्याच एका विमानासारखा वर आकाशात झेपावलो, आणि मागे वळून बघितलं. मिडवेचा एव्हाना ठिपका होत आला होता. ते जहाज, त्या अजस्त्र युध्द्धनौकेवरचं संग्रहालय, ते बघायला आलेले लोक सगळेच जिवाणू, विषाणू म्हणावेत इतके छोटे झाले होते. काही मिनिटांपूर्वीच मी कुणाच्या तरी कोकमधला बुडबुडा झालो होतो; कुणाच्या सॅन्डविचवरचं पातळ कागदी आवरण बेदरकारपणे भिरकावून लावलं होतं; आणि मिडवेवरच्या मिजासखोर अमेरिकन राष्ट्रध्वजासकट इतरही अनेक झेंडे, पताका यांच्या असे काही नाकी नऊ आणले होते, की प्रयत्नपूर्वक एकमेकांना धरून, पाय रोवून उभे राहण्यात त्यांची तारांबळ उडत होती. पण आता मी सॅन डिएगोच्या नेव्ही पिअरपलीकडे. आणि तिथे आता फक्त अथांग पॅसिफिक महासागर.
Friday, December 03, 2021
शून्यात गर्गरे झाड
Saturday, August 28, 2021
डिजिटल बैराग्याचे महानिर्वाण



Friday, July 16, 2021
फुले का पडती शेजारी
कथा-कादंबऱ्या-चित्रपटांमधील लेखी प्रेमपत्रांची जागा ई-मेल्सनी घेतलेल्या जमान्यातले ते दोघे. साहजिकच, त्याही ई-मेलला उत्तर देण्यासाठी उजवीकडच्या Replyच्या खुणेवर क्लिक करायची त्याच्या बोटांना सवयच झालेली. पण पुढच्याच क्षणी भानावर आल्यावर, साहजिकच, ते न करता, बेडरूममध्ये एकटंच झोपलेल्या आपल्या बाळाच्या बाजूला जाऊन, त्याला घट्ट कुशीत घेऊन, त्यानेही डोळे मिटले. मागच्या दहा-बारा वर्षांच्या जगण्याची पुढच्या चार-पाच तासांत उजळणी होणारच होती. ई-मेलमधून, चॅटमधून चालणारे प्रेमसंवाद प्रत्यक्षातल्या हेव्यादाव्यांमध्ये बदलत जाणं, हे सुद्धा स्वप्नांत बघायचंच होतं.
लग्नानंतर बायकोला घेऊन शाळेतल्या आपल्या लाडक्या बाईंचे आशीर्वाद घ्यायला गेला असताना बाई त्याला म्हणाल्या होत्या - स्वतःच्या नावाला नि गोष्टीला साजेशी, अनुरूप नावाचीच बायको केलीस तर! त्यावर ते दोघेही लाजले होते. नावासारखाच स्वतःचा निळाशार स्वभाव घेऊन, so called happily ever afterचं चित्र रंगवायला बसल्यावर, चित्राची एक बाजू पूर्ण होत गेली. मात्र डोळ्यांत भरेल, असं चित्र तयार व्हायला हवा असणारा ठळक, लाल-पिवळा रंग फक्त तिच्याकडेच होता. दोघांनी एका चित्राची नवीन, हिरवीगार सुरुवात केली. एकदा तो लाल-पिवळ्या, निळ्या-हिरव्या फुलांचा बगीचा बहरला, की घराच्या दिवाणखान्यात भिंतीवर ते मोठं चित्र दर्शनी भागातच सगळ्यांना दिसेल, अशा पद्धतीने लावायचं, हीच आयुष्याची इतिकर्तव्यता, इतपतच दोघांचंही अनुभवविश्व त्यावेळी संकुचित होतं. किंवा कदाचित यापेक्षा इतर कुठली अपेक्षाही नव्हती. पण बागेची गंमत फुलांमुळे आहे, नि फुलांची फुलपाखरांमुळे. त्यामुळे फुललेल्या फुलांची निगा राखणं, फुलपाखरांना बोलावणं, ‘येथे फुले तोडण्यास सक्त मनाई आहे’, असे फलक लावणं, ही सगळी कामंही करावीच लागतात, याचा विसर तिला का पडला असेल, हे मात्र त्याला काही केल्या कळलंच नाही. कदाचित ते तिच्या स्वभावातच नसावं. त्याला भावलेला ठळकपणा, लालपिवळेपणा नंदादीपाच्या तेजाचा नसून, एखाद्या वडवानलाची सुरुवात ठरावी, अशा गतीने दिवस बदलत गेले आणि नंतर बरीचशी फुलपाखरं फक्त त्याच्या स्वप्नांतच बागडू लागली.
त्यातलं एक फुलपाखरू Monarch Grove Wineryच्या टेस्टिंग रूम मधलं. सप्ताहांतीच्या सुटीचा निवांतपणा फिकट, पिवळसर Chardonnayमध्ये विरघळवत दोघे बसले होते. तिचे डोळे Highway Oneच्या पलीकडे, निळ्याशार अथांगतेत. आणि त्याचे तिच्याकडे. पिल्लाचे मात्र समोरच्या दुधाच्या बाटलीकडे नि चीझच्या छोट्या तुकड्यांकडे - आधी काय हातात घ्यावं, या विचारात दोन्हींशी आलटूनपालटून चाळे करत. इतक्यात एक केशरीकाळं फुलपाखरू येऊन त्या चिमुकल्या मुठीवर येऊन बसलं आणि पिल्लू असं काही दचकलं, की समोरची दुधाची बाटली आडवी होऊन तिथल्यातिथे चिकट थारोळं झालं. आता आपली खैर नाही, या भीतीने पिलाची रडारड, साफसफाईसाठी wineryच्याच कर्मचाऱ्याची मदत घेण्यासाठी याची तारांबळ आणि या सगळ्यापासून अलिप्त, वेगळ्याच विश्वात कुठेतरी हरवलेली ती. आपल्याला आलेला राग तिच्या निष्काळजीपणाचा आहे, बेदरकारीचा की रविवारच्या त्या संध्याकाळची माती झाल्याचा, हे त्याला नक्की कळेना.
आणि सत्यघटनेतल्या प्रश्नांची उत्तरं स्वप्नात शोधून मिळत नाहीत, हे सुद्धा.
एका स्वप्नात तो पोचला होता बकिंगहॅम पॅलेससमोरच्या सत्यात अस्तित्त्वात नसलेल्या कुठल्याश्या टेकडीवर. समोरच राणीचा अख्खा राजवाडा एका भल्यामोठ्या तपकिरी पडद्यामागे लपला होता. आणि राणीच्या दर्शनासाठी आलेल्या प्रजेचा धीर खचत चालला होता. अजून कशी आली नाही, कधी येणार, येणार की नाही, या प्रजेच्या चुळबुळीतच, राणीचे दोन द्वारपाल आले. एकही शब्द न बोलता, कोऱ्याकरकरीत चेहऱ्यानं त्यांनी तो पडदा बाजूला करून झटकला आणि लाखो मोनार्क फुलपाखरं आकाशात उधळली. आनंदित प्रजेच्या आरोळ्यांमध्ये, राणीच्या देशात पाहुणा म्हणून आलेल्या याचे डोळे मात्र, आकाशातलं आपल्यासाठीचं फुलपाखरू कोणतं, हे शोधण्यात लागलेले. इतक्यात, मानेवर काहीतरी हुळहुळलं, म्हणून ते झटकायला त्याने हात आणि…
…डोळे उघडले तेव्हा दरदरून घाम फुटलेला. बेडरूममध्ये तो एकटाच. लघवी करून आल्यावर पुन्हा निद्रिस्त व्हायच्या आत WhatsAppवर त्याने अख्ख स्वप्न सविस्तर टाईप केलं आणि आपल्या जिवलग सखीकडे पाठवून दिलं.
Metamorphosis, transformation and the evolution of your soul and spirit. The purpose in this lifetime is to continue to move forward on your spiritual journey. सकाळी सखीचं उत्तर. कोणा निनावी साहित्यिकाने सांगितलेलं फुलपाखरांचं बोटांवर रंग सोडून जाणं वगैरे त्यानेही कुठल्यातरी निबंधात, कधीतरी वापरलेलंच; पण बोटांवर धरलेलं फुलपाखरू तिथेच राहण्यापेक्षा सोडून गेलेलं - आणि तसं झालं नाही, तर सोडून दिलेलं - बरं, हे त्याला पटलं. You are my totem. त्याने टाईप करून पाठवलं. त्यावर तिकडून घट्ट मिठी मारल्याचा इमोजी.
आजही दिवाणखान्यातल्या दर्शनी भागावरच्या अदृश्य मोठ्या चित्राकडे त्याचे डोळे वळले, की स्वतःचा निळा चेहरा, आणि त्या शेजारीच डोळ्यांची आग होणार भूतकाळ त्याला स्पष्ट दिसतो. पण चेहऱ्यातला तो नावापुरताच असतो. त्याचा आत्मा भिंतीवर आणि चित्राभोवती, इकडेतिकडे यादृच्छिक संथपणे बागडणारं मोनार्क फुलपाखरू होऊन जातो. स्वतःच्याच चेहऱ्यात तात्पुरती अवतरलेली भामा मग त्याला विचारते - बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी? आणि या फुलपाखराकडे उत्तरासाठी हात पसरते.
“अगं जाऊ दे नं. तुला तो सडा सदैव दिसत राहील, आणि दरवळही सदैव येत राहील. हीच तुला देणगी, हीच तुझी नियती”
भामेच्या तावडीतून सुटून त्याचा चेहरा पूर्ववत होतो. आणि भामेला शिकवलेलं ‘सोडून देण्याचं’ तत्त्वज्ञान जिने सांगितलं, त्या नंदादीपाकडे मग फुलपाखरू झेपावतं.
Saturday, May 08, 2021
शहाण्या वेड्याची गोष्ट
घाटावरच्या गंगारतीच्या झांजा, घंटा, शंख वाजू लागले, तसे वेड्याने मोठ्या कष्टाने डोळे उघडले.
डोळ्यांना समांतर वाहत जाणारी गंगेच्या प्रवाहातील दिव्यांची फुलं बघितली, आणि शंकराच्या देवळाबाहेर उडणाऱ्या
प्रसादासाठीच्या झुंबडीत नंबर लागायची त्याची शक्यता केव्हाच मावळल्याचा साक्षात्कार त्याला झाला.
प्रसादातला डाळभात वेड्याला प्राणप्रिय होता. तो मिळाला, की बाकी काही नको असे. रात्रीच्या अंधारात,
लाखो दिव्यांच्या लखलखाटात, वाळक्या काटकीसारखं स्वतःचं शरीर, मणभराचं पोतं उचलावं इतक्या
कष्टाने, जोर लावून उचललं, आणि वेडा पाय फुटतील तिकडे झोकांड्या खात जाऊ लागला. उजव्या
पायाच्या तळव्याला चिकटलेलं शंकर-पार्वती-गणपतीचा फोटो असलेलं कसलंतरी palmphlet डाव्या
पायाच्या चवड्याने, शेणात पाय पडल्याच्या भावनेने बाजूला केलं. गणपतीचा प्रसन्न चेहरा दिसल्यावर मात्र
त्याला स्वतःचीच शरम वाटली, आणि त्याने तो कागद उचलला. भेळीचा शिळा वास, आठ-दहा अर्धवट ओले
कुरमुरे आणि थोडी शेव चिकटलेल्या त्या कागदावर स्वतःच खरडलेलं काहीतरी किलकिल्या डोळ्यांनी
बघितलं. काही केल्या त्याला ते वाचता येईना. शेवटी कुठलासा एक शब्द लागला, आणि तो कागद चुरगळून
त्याने चड्डीच्या खिशात कोंबला. आता मात्र त्याचे पाय शिस्तबद्ध लयीत घाटाशेजारच्या स्मशानाच्या दिशेने धावू लागले.
.....
तो आणि ती गंगाकिनारी एकुलत्या एक मळकट बाकड्यावर एकदम आरामात बसले होते. गेल्या सहा-आठ महिन्यांत फोटोफिचर्सच्यानिमित्ताने घाटावर भटकताना, हायजिन-फायजीन लाडांना गंगेतंच तिलांजली देऊन, दोघे घाटावरचेच झाले होते. बिस्लरीच्या बाटल्याजाऊन हाती चहाचे कुल्हड, आणि मार्लबोरो जाऊन ओठात गोल्ड-फ्लेक, हा आमूलाग्र बदल दोघांच्या लक्षातही आला नव्हता.वेड्याने मात्र तो बरोबर हेरला होता. बाई सिग्रेट पिते, या चमत्काराचा त्याने इतका धसका घेतला होता, की एकदाच तिच्या कानशिलातलगावून सालीला सरळ केलं पाहिजे, असा विचार वेड्याच्या मनात कैकदा येऊन गेला होता. पण घाट खूप दयाळू आहे, तो सगळ्यांनाआपलंसं करतो, आपल्यात सामावून घेतो आणि मग सगळ्या वेडेपणाचा शेवट घाटावरच होतो, या शहाण्या समजुतीने वेड्याने स्वतःलाआवरलं होतं. तिची सिग्रेटची सवयसुद्धा अशीच तिच्यासोबतच कधीतरी विझेल, हे नक्की.
तो नेहमी दोन्ही हातांच्या चाफेकळी आणि अंगठ्याच्या फ्रेममध्येच तिच्याशी सगळं बोलायचा; आणि तिलाही कधीपासून त्याचीच भुरळपडलेली. एरव्ही ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपायची आणि मग वेड्याच्या डोळ्यांतल्या फ्रेममध्ये ते दोघे चिमणाचिमणी आदर्श क्लिकहोऊन जायचे. ती त्याच्या मांडीवर झोपलेली मात्र वेड्याला काही केल्या आवडायचंच नाही. कारण तेव्हा वेड्याच्या फ्रेममध्ये ती नसायचीच.तेव्हा तोही कधीतरी एखादं मिनिट फ्रेममधून बाकड्यावरच गायब व्हायचा - अगदी एखादंच मिनिट - नि वेड्याच्या पोटात स्वतःचंच किंचितपूर्वायुष्य गलबलून यायचं. स्वतःच्या तिच्यासकट. एक दिवस बाकड्यावरच्या तिने इतकं मोठं व्हावं, की आपल्या फ्रेममध्ये मावूच नये,असं वेड्याला वाटायचं; आणि मावलीच तर फक्त ती, एकटी. दुसरं कोणीच नको. तिने कायम आपल्याच मांडीवर झोपायला हवं,नाहीतर आपण फक्त तिच्याच कुशीत, हे आणि इतकंच वेड्याला हवं होतं. पण तिला हे कोण समजावणार? चालू वर्तमानकाळाला समांतरकुठल्याश्या वेगळ्या काळात, वेगळ्या दुनियेत आपली तिच्याशी जन्मोजन्मीची ओळख आहे, असणार आहे, या शहाणपणावर वेड्याचीकुणीतरी बोळवण केली होती, आणि या चुत्यापणावर पूर्ण विश्वास ठेवून, वेड्याने या जन्मातील ओळख कागदाच्या चिटोऱ्यांवर खरडलेल्याकवितांमध्ये बंदिस्त करून टाकली होती.
इतक्या कविता घाटावर अधूनमधून फडफडत; वाळक्या छोट्या पानांसोबत, काड्यांसोबत मधूनच चक्राकार उडत, की कुणीतरी सगळ्या गोळ्या करून एकत्र शिवल्या असत्या, तर वेड्याची डायरी नाहीतर कवितासंग्रह झाला असता. पण त्यात गाडलेल्या ओळखीमागच्या दोन चेहऱ्यांमागची विसंगती वेड्याच्या नजरेतून सुटली होती. तिचा चेहरा आणि वेड्याच्या पूर्वायुष्यातला चेहरा पूर्णपणे वेगळा होता, इतकंसं मूलभूत शहाणपण वेड्याच्या वाटेला कसं आलं नाही? की आधीच्या चेहऱ्याने नव्या चेहऱ्याचं वेड लागून वेड्याचा वेडा झालेला?
आज मात्र त्या दोघांमध्ये बेबनाव आहे हे नक्की. दोघेही नुसते लांबवर बघत आहेत. त्याची एकही फ्रेम आज काही केल्या सेटच होत नाही. स्वतःच्याच हातांची बोटं एकमेकांत गुंतवून तो गपगुमान बसलाय, तिच्यासारखाच, हे चाणाक्ष वेड्याने हेरलं नसतं तरच नवल. बाकड्याच्या दोन टोकांना दोघे बसलेले; नुसतेच बसलेले. तिच्या backpackने वेगळे केलेले. शेवटी तो उठून चालू पडला, आणि त्याच्यामागोमाग backpack घेऊन ती. आज मात्र गोल्डफ्लेकच्या धुराच्या चिमुकल्या लयकारीऐवजी, पलीकडच्या तीरावर जळणाऱ्या कुणा तिघांच्या चितांच्या धुराचे हे मोठाले ढग.
हा क्लिक करायला वेड्याचं मन धजावेचना. त्याला हव्याश्या क्लिकच्या, हव्याश्या चेहऱ्याच्या शोधात, वेडाही त्यांच्या मागोमाग चालू लागला.
.......
शंकराच्या देवळाबाहेरच्या पटांगणातल्या अन्नछत्रात वेडा त्या क्लिकच्या भुकेची चुळबुळ घेऊन बसला होता. सवयीप्रमाणे ती दोघं वाढायला आली. एरव्ही भाताची भली, जड परात लीलया पेलणारी ती आज विमुख होऊन भात सारत होती, आणि तिच्यामागे तो तसाच विमुख, यांत्रिकपणे डाळीची बादली घेऊन पळीने वाढत येत होता. वेड्याच्या पेपरप्लेट समोर वाकून त्याला भात वाढताना तिची वेड्याशी नजरानजर झाली. आपण ओळख दाखवावी का, असा वेडा विचार वेड्याच्या मनात होता, इतक्यात तिने शेजारी उभ्या असलेल्या त्याच्याकडे काकुळतीने बघितलं. आपण तिला ओळखतच नाही, अशा थाटात तो वेड्याच्या पेपरप्लेटमध्ये, इस्त्री केलेल्या चेहऱ्याने, मख्ख बघत राहिला. नाईलाजाने उठताना डाव्या खांद्यावरून तिची लाल, मलमली ओढणी वेड्याच्या प्लेटमध्ये जराशी सरकली काय, वेड्याची नजर तिच्या पिवळ्या टॉपमागच्या गोऱ्यापान छातीपर्यंत पोचली काय, त्याच्या हातातली बादली तिथेच पडली काय, वेड्याची बखोट धरून त्याने वेड्याला कानफटवायला सुरुवात केली काय...अनावर झालेल्या शंभरएक भुकांचा आगडोंब तिकडेच लाथाबुक्क्यांत उसळला आणि वेड्याला पळता भुई थोडी झाली.
.......
दुपारच्या त्या आठवणींचा ठणका वेड्याला आता अंगाखांद्यावर असह्य झाला होता. स्मशानाबाहेरच्या चबुतऱ्याच्या शेवाळल्या, करड्या, हिरवट, दगडी खांबाची भेग वर्षानुवर्षे रुंदावत गेलेली. वेड्याने आज दुपारपासूनची क्लिकची भूक, पोटातली भूक, तिची मलमली, लाल ओढणी, अन्नछत्रातल्या दुपारच्या आठवणी आणि घाटावरच्या सगळ्या आठवणी त्या किंचित भगदाडात कुठल्यातरी ऐवजासारख्या खुपसून ठेवल्या होत्या. दुपार संपतासंपता आपण देवळातून इकडे कधी कसे पोचलो आणि इकडून मागे घाटावर कसे कधी, हे त्याला काही केल्या आठवेना. स्मशानात शिरताना अंधारातही त्या ओढणीचा लालेलालपणा उठून दिसत होता. वेड्याला खुणावत होता. अशीच लाल ओढणी आपल्या पूर्वायुष्यातही कधीतरी येऊन, खूप काहीतरी देऊन गेली होती; त्याची परतफेड करायचीच आठवण ही आणि ही जिची आहे, ती घाटावरची ती, आपल्याला करून देत आहेत की काय, असं वेड्याला वाटलं. भगदाडापाशी वळलेले त्याचे पाय निमूट माघारी फिरले. चबुतऱ्याच्या पायथ्याशी बसताबसता त्याने मघाचं शंकर-पार्वती-गणपतीचा फोटो असलेलं ते कसलंतरी चुरगळलेलं palmphlet चड्डीच्या खिशातून बाहेर काढलं. त्याला लागलेला मघाचा शब्द होता गुलमोहर. अस्वस्थ होऊनच त्याने चड्डीच्या खिशात, इकडेतिकडे चाचपून बघितलं; पण तुटकं पेन - की पेन्सिलचा बोटभर तुकडा - काहीतरी मागे घाटावरच हरवलं होतं. मनातल्या मनातच वेड्याने उरलेल्या ओळी पूर्ण करून टाकल्या -
मोहरला गुलमोहर, भरली वाट पाकळ्यांनी
धग खेळवली त्याची, या अरभाट पाकळ्यांनी
ऋतुचक्र तुझ्या स्मरणांचे, येते, गोठुन जाते
धुगधुगीचि नेमुन द्यावी, वहिवाट पाकळ्यांनी
पूर्ण झालेल्या या ओळी चुरगळून तो बोळा आतल्या कुठल्याश्या अनोळखी चितेत भिरकावून द्यावा, अशी इच्छा वेड्याला झाली. पण हा
दुपारचा ठणकाच अजून थांबला नसताना, नव्या लाथाबुक्क्यांच्या ओलाव्याचा झवता गाढव अंगावर कशाला घ्या, हा शहाणपणा सुदैवाने, वेळीच सुचला आणि वेडा स्मशानातून दुपारपासूनची भूक घेऊन बाहेर पडला.
कवितेचा पिंड ठेवला
की कवीचा पटकन
कावळा होतो*
या ओळींना जागून मग मी त्या palmphletला चिकटलेल्या शेवकुरमुऱ्यांवर तुटून पडलो.
.......
*श्रेयअव्हेर -
कवीला कवितेचा पिंड द्यावा
म्हणजे तो आपली
धिंड काढीत नाही
अन् डोहांत पडलेल्या चंद्राची
खिंडही अडवीत नाही…
कवितेचा पिंड ठेवला
की कवीचा पटकन्
कावळा होतो
सदानंद रेगे
Friday, April 16, 2021
केसर
“Mom, how about I take Kesar tonight with me for trick or treat?!” गेविनच्या डोक्यात संध्याकाळ चालू झाली होती.
“Are you kidding me?” स्टेला जराशी अवाक होऊनच म्हणाली
“Why? what’s wrong? She’s already in her costume!” गेविन खो खो हसत म्हणाला
“Now that’s mean! You must apologize!” केसर आवडावीशी नसली, तरी जितके दिवस, महिने ती राहत होती, त्यामुळे, नाही म्हटलं तरी स्टेलाला तिचा लळा लागलाच होता.
“I am so sorry Kesar. Didn't mean it that way; I was just kidding!” केसरच्या गालावरून हात फिरवत गेविन म्हणाला.
केसर नेहमीसारखीच हसली. काय बोलावं तिला कळेना. पण काहीतरी सांगायचंय, या स्थितीपर्यंत डोक्यातले विचार येईतोवर, गेविन दप्तर घेऊन स्कुलबससाठी घराबाहेर पडलाही होता. अर्थात केसरला काहीही सांगता आलं असतं का, हा प्रश्न मला पडलाच.
...
केसर कधीच काहीच बोलायची नाही. इंग्रजी येत नाही, हा भाग अलाहिदा; त्यामुळे स्टेला आणि गेविनशी संवाद खाणाखुणांतूनच चालायचा. पण वसईला असताना सुद्धा ती फारशी बोलायची नाहीच. आपण बरे, आपलं काम बरं. दोन वेळचं जेवण, अंगावर घालायला चार पातळं यातच तिने समाधानी असावं, याची काळजी मी घेत असे. चहा मात्र तिला प्राणप्रिय. मनात येईल तेव्हा, मनाला येईल तेव्हढा चहा बनवून, तो हवा तेव्हा प्यायची मुभा मी तिला दिली होती. खडेमीठ टाकलेला चहा खिरीच्या चवीने पिणारी, मी पाहिलेली केसर पहिलीच! चहा फुंकून घोट घेताना, तिच्या रापलेल्या चेहऱ्यावरच्या, डोळ्यांच्या कडेच्या सुरकुत्या बघून, कुणी म्हटलं नसतं ती गेरूच्याच वयाची आहे. अर्थात गेरू आणि केसर एकमेकांचे कोण, केसर आणि दुलबा एकमेकांचे कोण, याविषयीच्या गजाल्या गावकरी करत नसत, असं नाही; पण दुलबा भंडाऱ्याचा दराराच असा होता, की त्या चावडीवरच्या गप्पा तिथेच धगधगत आणि तिथेच विझून जात.
कांताबेन अनपेक्षितरित्याच गेली आणि तिचे अंत्यसंस्कार करायला दुलबा सीमेवरून परतला, तो केसरला घेऊनच. तोवर केसर माझ्याबरोबर आणि मी केसरबरोबर असे फरफटत होतो. दोघांचीही इच्छा नसताना. झुंजूमुंजू झाल्यावर बापाच्या साथीला केसर मिठागरात शिरली, की ती नेईल तिथे मी तिच्याबरोबर. पन्नास अंश तापमानात ही बया यंत्रमानवाच्या सफाईने सगळी कामं करे. गट्र्रर्रगट्र्रर्रगट्र्रर्रगट्र्रर्र पंप जो सकाळी चालू होई, तो थेट संध्याकाळीच थांबे. त्याने उपसलेलं खारं पाणी कित्येक मीटर पसरलेल्या खाजणवाफ्यात समतल पसरलं, की मीठ तयार होऊन, ते उपसायची वेळ होईतोवर, केसर आणि मी, पंजाबपासून मुंबईपर्यंत सगळीकडे भटकून येत असू. मुळात, कच्छच्या रणाबाहेर असेही देश आहेत, हे आम्हाला विविधभारतीमुळे अपघातानेच कळलं. केसरीया बालमा ऐकून तर केसर इतकी खूष व्हायची, की सतत तेच एक गाणं विविधभारतीने वाजवलं असतं, तर केसर त्या कार्यक्रमाच्या निर्मात्याची आजन्म दासी होऊन राहायलाही तयार झाली असती.
दुलबाने तिला कधी दासीसारखं वागवलं नाही हे, खरं. पण स्वतःच्या आयुष्यातली कांताबेनची जागा इतर कुणाला मिळणार नाही, हेसुद्धा त्याने ठरवून टाकलंच होतं. त्याच्या दगडी अस्तित्त्वावर, पिळदार बाहूंवर आणि मिल्ट्री खाक्यावर केसर भाळली होती खरी, पण अडनिड्या वयातला तो मोह मीच तिला आंदण म्हणून दिला होता, हेही तितकंच खरं. मिठागरात मरेतोवर काम केल्यावर तिला उजवली, की आपलं काम झालं; मग ती दुसऱ्या कुणाचीतरी नमकहलाल, हे तिच्या बापानं ठरवलेलंच होतं. दुलबाच्या डोक्यात मी हे वेळीच शिरू दिलं, आणि त्या रांगड्या गड्यातल्या बापाला जागं केलं, हे एका अर्थी बरंच झालं. तरी केसरच्या बापानं पाचशेच्या खाली घेतले नाहीतच! काही का होईना, रणातून बाहेर पडून ती वसईत रुजली, हे काही कमी नाही.
ही बया कोण, असा प्रश्न गेरुला न पडता, तरच नवल. पण वडिलांपुढे साक्षात ब्रह्म्याचंही काही चाललं नसतं, गेरू तर मर्त्य मानव! यदाकदाचित दुसरी आई म्हणून केसर डोक्यावर बसायची पाळी आलीच, तर थेट पळून जाऊन पणजी गाठायची आणि मग इकडे मरेतोवर परत यायचं नाही, हे त्याने कधीच ठरवून टाकलं होतं. तसंही आपला जन्म या पाड्यात सडण्यासाठी झालाच आहे कुठे?! आपलं नशीब उघडणार गोव्यात, हे सुद्धा त्यानेच ठरवलं होतं. आणि तिकडून मग थेट हॉलिवूड! मग आपण आणि गिटार बस्स! दुसरं कोणी नाही! दुलबाला सांगायची छाती नव्हती, म्हणून केसरकडे बोलून दाखवायचा. पण बोलेल तर ती केसर कसली? असं मस्त हसायची, की गेरू आश्वस्त होऊन जायचा. गोव्यातल्या स्वप्नांनी. त्याच्या स्वप्नांमधला चतकोर तुकडा आपल्यासाठीसुद्धा आहे, हे ठरवण्याचं धैर्य केसरकडे कुठून आलं, हे मात्र मला आजतागायत कळलेलं नाही. पण त्या धाडसाच्या जोरावर, कधीही न बोलणारी केसर, गेरूच्या गिटारच्या तारांवर गुणगुणू लागे, तेव्हा गेरूचा आत्मविश्वास थेट पणजीत पोचलेला असायचा. आणि त्याच्या साथीने केसरसुद्धा मिरामारच्या सोनपिवळ्या वाळूत.
सगळ्यांचीच सगळीच स्वप्नं पूर्ण होत असती, तर केसर आणि मी कधीच एकमेकांपासून वेगळे झाले असतो. किरिस्ताव पोरांच्या घोळक्यात गिटार वाजवत बसलेल्या गेरूला दुलबाने लाथा घालत घरी आणला, तिथेच त्याच्या कपाळावरचा केसर नावाचा शिलालेख लिहिला जायला सुरुवात झाली.
गेरूने केसरला सॅन फ्रान्सिस्कोला घेऊन येणं, हा त्या लेखातला क्षुल्लक परिच्छेद.
खानदानातलं पहिलं पोर इंजिनिअर होतं काय, अमेरिकेला पोचतं काय, दुलबासाठी आयुष्याचं सार्थक झाल्याचा क्षण! दंतकथाच जणू! अख्ख्या पाड्यात आठवडाभर जेवणावळी उठतील, याची व्यवस्था त्याने केली. पाड्याचे दुवे घेऊन गेरूचा सॅन फ्रान्सिस्कोत गॅरी झाला. तिकडचीच एक मड्डम त्याच्या प्रेमात पडली आणि तिकडेच त्याचा संसार चालू झाला.
कितीही म्हणा, नवीन आयुष्य वगैरे; पण सगळ्या भाकडकथा. कितीही ठरवलं वसईला परतायचं नाही, तरी ‘आता येऊन गेलास, की परत बोलावणार नाही, हा माझा शब्द’, या दुलबाच्या एका ओळीच्या तारेखातर, गेरू दोन आठवड्याच्या सुटीवर म्हणून पाड्यावर आलाच. एका रात्री जेवणं आटोपल्यावर, दुलबाने त्याचा वानप्रस्थानाचा निर्णय सांगितला,आणि केसरच्या पोटात खड्डा पडला. मिरामारच्या वाळूसारखा गेरूसुद्धा बोटाच्या फटींमधून कधी कसा निसटला, हे तिला कधीच कळलं नव्हतं. कच्छशी जोडणारे कुठलेच दोर अस्तित्त्वात नव्हते. दुलबाचा आधारसुद्धा संपला की आपण परत कुठल्यातरी मिठागरात नाहीतर आश्रमशाळेत, नाहीतर कुठल्यातरी टाकलेल्या बायांसोबत, हा विचार डोक्यात आला आणि बोलता येत नसूनही तिने मला शिव्यांची लाखोली वाहिली. मिठागरातली पडतील ती कामं आणि भंडाऱ्याच्या घरकामाशिवाय तिसरी काही गोष्ट तिला माहीतच नव्हती. मी कोण, माझं अस्तित्त्व काय, पुढे काय, असे प्रश्न केसरला पहिल्यांदाच पडले असावेत. दुलबाने ते याआधी पडणारच नाहीत, याची सोय लावली होती. कांताबेनची जागा नसली, तरी दुलबाने आपणहून तिला जी जागा दिली, त्याची जाणीव अर्थात तिच्यापेक्षा दुलबालाच जास्त होती. आणि गेरु जेव्हा जसा डोळ्यासमोर वाढला, तेव्हा केसरही आजूबाजूला सारखी दिसतच तर होती.
रविवारी रात्री गेरू परत जायचा होता. शनिवार दुपारच्या जेवणानंतर दुलबाने त्याला आपल्याजवळ बसवलं. कट्ट्यावर नेमाने बसणाऱ्या मित्रासारखा त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाला, ‘केसरला घेऊन गेलास, की मगच मी इकडचं सगळं आवरायला घेईन’. हे कुठेतरी निघून जाणं, राहत्या घरात पाय न राहणं, भंडाऱ्यांचा वारसाहक्क म्हणून आपल्याकडे आलंय की काय, असं गेरुला वाटलं. मग दोघांनीही आता परत न येण्यासाठीच जायचंय, तर हे केसर नावाचं लचांड काय मागे लागतंय? अर्थात, त्याच्या कुठल्याही बंडाळीचा कणा उभा राहण्याआधीच मोडला जाईल, याची काळजी दुलबातल्या सैनिकाने नेहमीच पुरेपूर घेतली होती. गेरूने सवयीने होकारार्थी मान हलवली, आणि दुलबा सवयीनुसार खूष झाला.
“एक फोटो काढ गे आमचा केसर” दुलबाच्या दवंडीने केसर भानावर आली. गेरूने निर्विकारपणे कॅमेरा तिच्या हातात देऊन खुणेनेच बटन दाबायचं शिकवलं. कॅमेऱ्याच्या चौकटीत दुलबा आणि गेरू. कोचावर गेरूच्या शेजारी जागा असती, आणि मी तिथे बसले असते, तर आमचा फोटो कोणी काढला असता? त्या स्वार्थी क्षणात रमलेल्या केसरला, तरीही कांताबेनची आडवी पडलेली तसबीर खुपलीच. किमान ती तरी सरळ हवी होती, या विचारात असतानाच कॅमेऱ्याचं बटन दाबलं गेलं.
…
डायनिंग टेबलच्या बाजूच्या भिंतीवरचा तो फोटो पाहून केसर किती महिने, किती वर्षं मागे गेली कुणास ठाऊक! गॅरी तिचा नाही, तो फक्त बार्बीडॉल सारख्या देखण्या स्टेलाचा. आणि गेविन त्या दोघांचाच! दुलबा कुठे गेला? सीमेवर? हिमालयात? माहीत नाही. गेरुला तरी कुठे माहीत आहे?! त्याला गिटार वाजवता येतं अजून? आहे त्याच्याकडे? एव्हढ्या मोठ्या महालात शोधू तरी कुठे गिटार?
…
“Mom, Mom...quick, it’s..” गेविन पुढचं काही बोलायच्या आत, त्याची बोंब ऐकून, स्टेला आणि गेरु धावतच पोर्चकडे पोचले होते. गेविन जे सांगत होता, त्याहीपेक्षा गेरूचे डोळे लागले होते मागून लंगडत येणाऱ्या केसरकडे.
“Oh?! God! Is she hurt? Kesar,...?” केसर लंगडत असली, तरी 911 लेव्हलची इमर्जन्सी नसल्याने स्टेलाची कळकळ तशी निवळलीच.
“I’m not sure but I think she just sprained her ankle or something’” गेविन म्हणाला “But she wouldn’t let me take a look at her feet”
पोर्चमधल्या बाकड्यावर येऊन केसर टेकली आणि गेरूने केसरचा तळवा हातात घेतला. स्टेलाने गेविनला दाबून धरून ठेवलं होतं.
चवडा फुटला होता. पण गेरुने आपल्याला हात लावला, याचा थंडावाच केसरचं मलम झालं होतं.
“Goodness me! Look at her feet..her legs..”
“Gavin, please stop being rude. Come on, let’s get you cleaned up first” स्टेला गेविनला घेऊन गेली.
“काय गे तू? हातात घेऊन चालतीस डोले?” गेरु जरा नाखूषच होता. प्रथमोपचाराचे सोपस्कार पार पडले आणि सगळे आपापल्या खोलीत गेले.
...
डिनरनंतर गॅरी गेविनला आगरियांबद्दल सांगत होता. मिठागरं, तिकडे राबणारे आगरिया, त्यांचं खडतर आयुष्य, दहनाच्या वेळी पाय वेगळे काढून जाळणं…
“Are you kiddin’ me?” That’s awful!”
“Can’t help it buddy. Since they are standing continuously in salt fields, their feet get wounded and salt gets absorbed in the feet. So the feet would not burn easily in the funeral pyre” दुलबाच्या तुलनेत गेरू फारच प्रेमळ, समंजस बाप असावा, असं मला वाटलं.
केसरला कुठे कसं जाळतील, माहीत नाही. खडेमिठाचा चहा ती इकडे आल्यापासून मी तिच्यापासून हिरावून घेतलाच आहे. त्याची खंत मला आतून जाळतच असते पदोपदी. त्यात आणि आता हे नकोसे प्रश्न पडायलाच नकोत. गेरूच्या कपाळावर केसरचा शिलालेख लिहिला की तिच्या कपाळी याचा, हे सुद्धा कळत नाही. एक मात्र खरं; केसर माझ्याबरोबर आणि मी केसरबरोबर अजूनही फरफटतच आहोत. दोघांचीही इच्छा नसताना.
Sunday, February 14, 2021
अडगळीतल्या व्हॅलेंटाईनचं वार्षिक
फेब्रुवारी ७ :
सकाळ झाली. मी झोपेतून उठलो तरच आणि तेव्हाच सकाळ होते. आजही झालीच. रात्री सगळेच झोपतात, असा दुनियेचा समज कोणी, का करून दिला आहे, माहीत नाही. उलट रात्रदरबारी चालणारे एकतर्फी खटले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडणारे विवस्त्र आरोपी बघून, खटल्यांचा निकाल पूर्वनियोजित असल्याची माझी खात्रीच पटते. त्यांनी त्यांची धडपड थांबवावी, निकालातील मोक्ष त्यांना मिळावा, आणि तोच त्यांच्यासाठी खरा न्याय आहे, हे कोणीतरी त्यांना समजावून सांगावं, हे मात्र मला प्रामाणिकपणे वाटतं. किमान त्यामुळे तरी सकाळी सलज्जतेची वस्त्रं चढवून दैनंदिन व्यवहार रेटता येतात, हे त्यांना कधी कळणार?
मला हे कळलं आहे, कारण मी रात्रीच्या कचाट्यात सापडलोच नाही कधी. बिनशर्त माफीनाम्यावर स्वाक्षरी करून, स्वतःविरुद्धच माफीचा साक्षीदार म्हणून उभं राहण्याचं वचन रात्रीला दिल्यापासून आम्ही एकमेकांचे व्हॅलेंटाईन झालो. त्याला बरीच वर्षं लोटली. अर्थात, दुनियेतल्या कित्येक निशाचरांपासून काडीमोड घेऊन फक्त माझीच होणं, तिला शक्य नसल्याने, उत्तररात्रीचा किमान एक प्रहर तिने मला द्यावा, आणि मी जे बोलेन, ते फक्त ऐकावं, इतकी एकच मागणी माझ्या बाजूने असल्याने, आमचं नातं अद्याप टिकून आहे. तिच्यासाठी जो करार आहे, तोच माझ्यासाठी प्रणय आहे, अशी खात्री पटल्यापासून, आमचं एकमेकांसाठीचं व्हॅलेंटाईनत्त्व आम्ही मान्य केलं.
सगळ्या गुजगोष्टी करून झाल्यावर डोळे उघडावेत, आणि समोर सकाळ असावी, हे पहिल्यांदा जेव्हा झालं, तेव्हा मात्र आमच्या व्हॅलेंटाईनत्त्वावरचा माझा विश्वास उडाला, तो कायमचाच.
मी तेव्हापासून कायमचा अडगळीत आहे. आमच्या करारावर एक्स्पायरी डेट नसल्याने, तिला आजही माझ्याकडे यावंच लागतं. व्हॅलेंटाईनत्त्वाची जन्मठेप मला एकट्यालाच नाही, हाच माझा विजय.
इथे राहून माझा रेड रोज मधला राजेश खन्नाचा बाप होऊ नये, इतकंच फक्त.
चमकून चाचपणी केली, तर कुशीत माझा पोर डाराडूर. तो सुपरस्टार आहे, पण राजेश खन्ना नाही, याची खात्री करून घेतली. मग कराग्रे वसणाऱ्या लक्ष्मीची वस्त्रं चढवून दात घासायला गेलो.
फेब्रुवारी ८:
आणला इंद्रधनुचा गोफ तुझ्यासाठी,
पण टपोर्या आषाढी थेंबांचा सर
घातलाय पावसाने
आधीच तुझ्या गळ्यात
ओल्या मातीच्या ठिपक्यांचे
घातलेस मेंदीसारखे पैंजण
तुझे तूच पायात
डोळ्यांत बघून विचारेन म्हटलं,
ढग वाजवून सांगेन म्हटलं,
वार्याने गुदगुल्या करून ऐकवेन म्हटलं,
तर स्वत:भवतीच गिरक्या घेत
डोळे चिंब मिटून
तू पावसाच्या मिठीत
आणि माझे शब्द, सूर सगळे
चुरगळलेत त्याच्या झिम्मडसरीत
या भिजल्या-थिजल्या कवितेचं
प्रपोजल् व्हायची वाट बघत
हे मी लिहिलंय? कधी? १५ जुलै २००९ म्हणे! So naive! पण naive म्हणजे? नैसर्गिक, निरागस सुद्धा; आणि अननुभवी, बिनडोक सुद्धा. मग नक्की कोणत्या अर्थाचा स्वीकार करावा? नैसर्गिक, निरागस प्रस्तावांवरचा विश्वास वयाने आणि अनुभवाने उडवल्यापासून, प्रत्येक प्रस्ताव विश्लेषकाच्या चष्म्यातून बघायला लागणं, ही naivete? की त्या चष्म्यातून जे जे बघायला मिळतं, ते गेलं भोसड्यात, असं म्हणून परत एखादी मस्त, निरागस, नैसर्गिक कविता सुचणं, ती व्हॅलेन्टाईनला ऐकवणं, तिने काही न बोलता फक्त घट्ट मिठी मारणं, ही?! आमच्यातलं नक्की naive काय आणि कोण मग?
मला खूपच प्रश्न पडतात, नं? त्यांच्यापासून सुटका करण्याचा प्रस्तावसुद्धा मीच मांडला होता मागे एकदा.
एरव्ही संततधार बरसणारा मी
झिरपू लागतो जेव्हा
असंख्य प्रश्नचिन्हांची ओल बनून
माझ्याच एरव्हीच्या एकटाकी आयुष्यात
स्वल्पविरामासारखा(,)
उत्तरं बनून तेव्हा
माझ्या वाटणीचं, माझ्याऐवजीचं
बरसणं होऊन तेव्हा
पूर्णविराम देशील ना
या झिरपण्याला(?)
यावरची तारीख सुद्धा १५ जुलै. २०१४. पण तो निव्वळ योगायोग! Or is it?!
आता परत वाचतो, तेव्हा वाटतं this is not naive. This, in fact, is anachronistic! Whether it’s the poem itself, or us, that’s anachronism, is for you to answer, babe!
शब्दार्थाचा, naiveteचा, anachronismचा पुनर्विचार करण्यासाठी जनहित याचिका दाखल करावी, असा प्रस्ताव मांडायला हवा. ते करता येत नसेल, तर ते कृपया तसं करता येऊ देत, असा! त्यातून आज प्रपोज डे; म्हणजे प्रस्ताव मांडणं क्रमप्राप्त आहे.
फेब्रुवारी ९:
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला पासून ते लिंड्ट डार्क विथ चिली पर्यंतच्या प्रवासात, बदलत गेले ते आजूबाजूचे चेहरे; जे चेहरे बदलले नाहीत, त्यांची वयं; ज्यांची वयं बदलली नाहीत त्यांचं अस्तित्त्व; आणि ज्यांचं अस्तित्त्व बदललं नाही, त्यांची नियती, किंवा नियत, किंवा दोन्ही.
लिंड्ट डार्कच्या कामोत्तेजक गुणधर्मात बदल होणार नाहीच. त्या स्वादाची कॉफीही मिळायला हवी खरं तर. लिंड्टचा मोठा चौकोनी तुकडा कॉफीत हळुवार वितळत जावा. आणि त्याबरोबर Philz Coffeeबाहेरची संध्याकाळ डोळ्यात. आणि डोक्यात.
पण आज वाटतं, तेव्हढं जरा मिरचीचं प्रमाण वाढवायला हवं होतं. कडवटपणा आणि त्याचबरोबर तिखटपणा वाढायची गरज आज जितकी जास्त आहे, तितकी आधी कधीच नव्हती.
फेब्रुवारी १०:
विनी द पू असो, किंवा बलू किंवा अजून कोणी. कुशीत घेऊन झोपावं, इतके आवडते आहेत आपले. ममा बेअर, पपा बेअर, बेबी बेअरसुद्धा त्यांना येऊन मिळालेत. हवाय कशाला मग टेडी डे?! नको ती मार्केटिंग थेरं, दुसरं काय?!
द रेव्हनंट मध्ये एका अस्वलाने डि’कॅप्रिओला उभाआडवा फाडला होता, हे कसं विसरतात लोक? डि’कॅप्रिओ नेहमीच रोझसाठी आणि रोझमध्ये बुडालेला जॅक! तोच त्याचा रोझ डे, टायटॅनिकवरच्या कार्गोमधली रात्र, हीच त्याची रोझ नाईट. रोझचं त्याने चितारलेलं पेंटिंग म्हणजे खरा व्हॅलेन्टाईन डे. त्याला फाडणाऱ्या अस्वलाला व्हॅलेन्टाईनशी कसं काय जोडू शकतं कोणी?!
काल म्हटलं तसं, काळाबरोबर अस्वलंसुद्धा बदलली असावीत बहुतेक.
फेब्रुवारी ११:
Because I am a quintessential Gemini, रात्रीची जन्मठेप रद्द झाली, तरी चालेल, असं अधूनमधून वाटतं. त्यामुळे होईल काय, तर सुटका. आमची एकमेकांपासून. माझी माझ्यापासून नाहीच. आपल्यातल्या वेडसर जुळ्या भावाची कुरघोडी आपल्यावर झालेली चालेल, तिच्यावर नको, म्हणून मी आमच्यात एका समांतर विश्वाचं एक रिंगण तयार करेन म्हणतो. जेणेकरून त्याच्या परिघावरून हवा तेव्हढा वेळ, पाहिजे तेव्हढ्या चकरा मारत बसलं, की झालं. हा माझ्यातला जुळा, त्या विश्वात, रात्रीकडे तिच्याच रिंगणात सोडून दिला, की दोन गोष्टी साध्य होतील. एक, माझं शहाणपण वास्तवात कायम राहतं तसंच राहील. तिचंसुद्धा. फक्त त्यासाठी विशेष मेहनत करावी लागणार नाही. दुसरं, तो जुळासुद्धा माणसाळायला हवा नं थोडातरी. थोडातरी कसला, चांगलाच माणसाळायला हवा. मग कुठला लगाम न घालताही स्वतःसोबत कुठेही चौखूर उधळत नेता येईल. वास्तवातल्या माझ्यासोबत वास्तवातल्या तिच्याकडे.
आणि खरं सांगायचं तर, तिलाही त्याचा लळा लागलाच आहे की!
ठरलं मग! स्वतःची सत्यातील झुंज स्वतः, आणि समांतर विश्वातील जुळ्याची झुंज त्याला खेळू देईन. हेच प्रॉमिस डे च्या दिवशीचं प्रॉमिस!
शिवाय, इतर वेळी फार आवडत नसला, तरी संदीप खरे (!) म्हणून गेलाय -
कितीक हळवे, कितीक सुंदर
किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी, माझ्यानंतर
फक्त हे नामंजूरऐवजी मौनाची भाषांतरे मध्ये जास्त सुटेबल झालं असतं, असं तो वेडा जुळा मला सांगतोय. रिंगण मानवतंय की काय वेड्याला?!
फेब्रुवारी १२:
तेरवाच्या वितळण्यात डोळे आणि डोक्याबरोबर मिठी राहूनच गेली. ती ऍड नाही केली, तर आज माझा व्हॅलेंटाईनत्त्वाचा फाऊल होईल.
आणि हे त्या चॉकलेटच्या तुकड्याबद्दल नसून आपापल्या व्हॅलेंटाईनबद्दल आहे, हे तिला कळलं नाही, तर तिचा.
फेब्रुवारी १३:
हे वार्षिक एका जपमाळेसारखं झालंय. तिच्यात सातच मणी आहेत, हे एक बरं झालं. माळ चुंबून उशाशी ठेवली, की वर्ष पवित्र झालं समजायचं. एकशे आठ मणी असते तर जीवच गेला असता.
पण नुकताच लागलेला शोध असा, की जप पूर्ण झाल्यावर माळेचं चुंबन घ्यायचं. आणि मी मात्र एकेक मणी मागे ओढण्याआधी ओठांना लावत आलोय.
कुणीही, कितीही तांत्रिक चुका काढल्या, तरी मला माझीच पद्धत हवीहवीशी आणि मान्य आहे.
Saturday, January 30, 2021
दिखाई दिये यूं
Wednesday, January 06, 2021
टिंकरबेलच्या आठव्या प्रहराच्या शोधात
‘Sup टिंकरबेल?!