Sunday, February 14, 2021

अडगळीतल्या व्हॅलेंटाईनचं वार्षिक

फेब्रुवारी ७ :

सकाळ झाली. मी झोपेतून उठलो तरच आणि तेव्हाच सकाळ होते. आजही झालीच. रात्री सगळेच झोपतात, असा दुनियेचा समज कोणी, का करून दिला आहे, माहीत नाही. उलट रात्रदरबारी चालणारे एकतर्फी खटले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडणारे विवस्त्र आरोपी बघून, खटल्यांचा निकाल पूर्वनियोजित असल्याची माझी खात्रीच पटते. त्यांनी त्यांची धडपड थांबवावी, निकालातील मोक्ष त्यांना मिळावा, आणि तोच त्यांच्यासाठी खरा न्याय आहे, हे कोणीतरी त्यांना समजावून सांगावं, हे मात्र मला प्रामाणिकपणे वाटतं. किमान त्यामुळे तरी सकाळी सलज्जतेची वस्त्रं चढवून दैनंदिन व्यवहार रेटता येतात, हे त्यांना कधी कळणार?

मला हे कळलं आहे, कारण मी रात्रीच्या कचाट्यात सापडलोच नाही कधी. बिनशर्त माफीनाम्यावर स्वाक्षरी करून, स्वतःविरुद्धच माफीचा साक्षीदार म्हणून उभं राहण्याचं वचन रात्रीला दिल्यापासून आम्ही एकमेकांचे व्हॅलेंटाईन झालो. त्याला बरीच वर्षं लोटली. अर्थात, दुनियेतल्या कित्येक निशाचरांपासून काडीमोड घेऊन फक्त माझीच होणं, तिला शक्य नसल्याने, उत्तररात्रीचा किमान एक प्रहर तिने मला द्यावा, आणि मी जे बोलेन, ते फक्त ऐकावं, इतकी एकच मागणी माझ्या बाजूने असल्याने, आमचं नातं अद्याप टिकून आहे. तिच्यासाठी जो करार आहे, तोच माझ्यासाठी प्रणय आहे, अशी खात्री पटल्यापासून, आमचं एकमेकांसाठीचं व्हॅलेंटाईनत्त्व आम्ही मान्य केलं.

सगळ्या गुजगोष्टी करून झाल्यावर डोळे उघडावेत, आणि समोर सकाळ असावी, हे पहिल्यांदा जेव्हा झालं, तेव्हा मात्र आमच्या व्हॅलेंटाईनत्त्वावरचा माझा विश्वास उडाला, तो कायमचाच.

मी तेव्हापासून कायमचा अडगळीत आहे. आमच्या करारावर एक्स्पायरी डेट नसल्याने, तिला आजही माझ्याकडे यावंच लागतं. व्हॅलेंटाईनत्त्वाची जन्मठेप मला एकट्यालाच नाही, हाच माझा विजय.

इथे राहून माझा रेड रोज मधला राजेश खन्नाचा बाप होऊ नये, इतकंच फक्त.

चमकून चाचपणी केली, तर कुशीत माझा पोर डाराडूर. तो सुपरस्टार आहे, पण राजेश खन्ना नाही, याची खात्री करून घेतली. मग कराग्रे वसणाऱ्या लक्ष्मीची वस्त्रं चढवून दात घासायला गेलो.

फेब्रुवारी ८:

आणला इंद्रधनुचा गोफ तुझ्यासाठी,
पण टपोर्‍या आषाढी थेंबांचा सर
घातलाय पावसाने
आधीच तुझ्या गळ्यात
ओल्या मातीच्या ठिपक्यांचे
घातलेस मेंदीसारखे पैंजण
तुझे तूच पायात
डोळ्यांत बघून विचारेन म्हटलं,
ढग वाजवून सांगेन म्हटलं,
वार्‍याने गुदगुल्या करून ऐकवेन म्हटलं,
तर स्वत:भवतीच गिरक्या घेत
डोळे चिंब मिटून
तू पावसाच्या मिठीत
आणि माझे शब्द, सूर सगळे
चुरगळलेत त्याच्या झिम्मडसरीत
या भिजल्या-थिजल्या कवितेचं
प्रपोजल् व्हायची वाट बघत

हे मी लिहिलंय? कधी? १५ जुलै २००९ म्हणे! So naive! पण naive म्हणजे? नैसर्गिक, निरागस सुद्धा; आणि अननुभवी, बिनडोक सुद्धा. मग नक्की कोणत्या अर्थाचा स्वीकार करावा? नैसर्गिक, निरागस प्रस्तावांवरचा विश्वास वयाने आणि अनुभवाने उडवल्यापासून, प्रत्येक प्रस्ताव विश्लेषकाच्या चष्म्यातून बघायला लागणं, ही naivete? की  त्या चष्म्यातून जे जे बघायला मिळतं, ते गेलं भोसड्यात, असं म्हणून परत एखादी मस्त, निरागस, नैसर्गिक कविता सुचणं, ती व्हॅलेन्टाईनला ऐकवणं, तिने काही न बोलता फक्त घट्ट मिठी मारणं, ही?! आमच्यातलं नक्की naive काय आणि कोण मग?

मला खूपच प्रश्न पडतात, नं? त्यांच्यापासून सुटका करण्याचा प्रस्तावसुद्धा मीच मांडला होता मागे एकदा.

एरव्ही संततधार बरसणारा मी
झिरपू लागतो जेव्हा
असंख्य प्रश्नचिन्हांची ओल बनून
माझ्याच एरव्हीच्या एकटाकी आयुष्यात
स्वल्पविरामासारखा(,)
उत्तरं बनून तेव्हा
माझ्या वाटणीचं, माझ्याऐवजीचं
बरसणं होऊन तेव्हा
पूर्णविराम देशील ना
या झिरपण्याला(?)

यावरची तारीख सुद्धा १५ जुलै. २०१४. पण तो निव्वळ योगायोग! Or is it?!

आता परत वाचतो, तेव्हा वाटतं this is not naive. This, in fact, is anachronistic! Whether it’s the poem itself, or us, that’s anachronism, is for you to answer, babe!

शब्दार्थाचा, naiveteचा, anachronismचा पुनर्विचार करण्यासाठी जनहित याचिका दाखल करावी, असा प्रस्ताव मांडायला हवा. ते करता येत नसेल, तर ते कृपया तसं करता येऊ देत, असा! त्यातून आज प्रपोज डे; म्हणजे प्रस्ताव मांडणं क्रमप्राप्त आहे.

फेब्रुवारी ९:

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला पासून ते लिंड्ट डार्क विथ चिली पर्यंतच्या प्रवासात, बदलत गेले ते आजूबाजूचे चेहरे; जे चेहरे बदलले नाहीत, त्यांची वयं; ज्यांची वयं बदलली नाहीत त्यांचं अस्तित्त्व; आणि ज्यांचं अस्तित्त्व बदललं नाही, त्यांची नियती, किंवा नियत, किंवा दोन्ही. 

लिंड्ट डार्कच्या कामोत्तेजक गुणधर्मात बदल होणार नाहीच. त्या स्वादाची कॉफीही मिळायला हवी खरं तर. लिंड्टचा मोठा चौकोनी तुकडा कॉफीत हळुवार वितळत जावा. आणि त्याबरोबर Philz Coffeeबाहेरची संध्याकाळ डोळ्यात. आणि डोक्यात.

पण आज वाटतं, तेव्हढं जरा मिरचीचं प्रमाण वाढवायला हवं होतं. कडवटपणा आणि त्याचबरोबर तिखटपणा वाढायची गरज आज जितकी जास्त आहे, तितकी आधी कधीच नव्हती.

फेब्रुवारी १०:

विनी द पू असो, किंवा बलू किंवा अजून कोणी. कुशीत घेऊन झोपावं, इतके आवडते आहेत आपले. ममा बेअर, पपा बेअर, बेबी बेअरसुद्धा त्यांना येऊन मिळालेत. हवाय कशाला मग टेडी डे?! नको ती मार्केटिंग थेरं, दुसरं काय?!

द रेव्हनंट मध्ये एका अस्वलाने डि’कॅप्रिओला उभाआडवा फाडला होता, हे कसं विसरतात लोक? डि’कॅप्रिओ नेहमीच रोझसाठी आणि रोझमध्ये बुडालेला जॅक! तोच त्याचा रोझ डे, टायटॅनिकवरच्या कार्गोमधली रात्र, हीच त्याची रोझ नाईट. रोझचं त्याने चितारलेलं पेंटिंग म्हणजे खरा व्हॅलेन्टाईन डे. त्याला फाडणाऱ्या अस्वलाला व्हॅलेन्टाईनशी कसं काय जोडू शकतं कोणी?!

काल म्हटलं तसं, काळाबरोबर अस्वलंसुद्धा बदलली असावीत बहुतेक.

फेब्रुवारी ११:

Because I am a quintessential Gemini, रात्रीची जन्मठेप रद्द झाली, तरी चालेल, असं अधूनमधून वाटतं. त्यामुळे होईल काय, तर सुटका. आमची एकमेकांपासून. माझी माझ्यापासून नाहीच. आपल्यातल्या वेडसर जुळ्या भावाची कुरघोडी आपल्यावर झालेली चालेल, तिच्यावर नको, म्हणून मी आमच्यात एका समांतर विश्वाचं एक रिंगण तयार करेन म्हणतो. जेणेकरून त्याच्या परिघावरून हवा तेव्हढा वेळ, पाहिजे तेव्हढ्या चकरा मारत बसलं, की झालं. हा माझ्यातला जुळा, त्या विश्वात, रात्रीकडे तिच्याच रिंगणात सोडून दिला, की दोन गोष्टी साध्य होतील. एक, माझं शहाणपण वास्तवात कायम राहतं तसंच राहील. तिचंसुद्धा. फक्त त्यासाठी विशेष मेहनत करावी लागणार नाही. दुसरं, तो जुळासुद्धा माणसाळायला हवा नं थोडातरी. थोडातरी कसला, चांगलाच माणसाळायला हवा. मग कुठला लगाम न घालताही स्वतःसोबत कुठेही चौखूर उधळत नेता येईल. वास्तवातल्या माझ्यासोबत वास्तवातल्या तिच्याकडे.

आणि खरं सांगायचं तर, तिलाही त्याचा लळा लागलाच आहे की!

ठरलं मग! स्वतःची सत्यातील झुंज स्वतः, आणि समांतर विश्वातील जुळ्याची झुंज त्याला खेळू देईन. हेच प्रॉमिस डे च्या दिवशीचं प्रॉमिस!

शिवाय, इतर वेळी फार आवडत नसला, तरी संदीप खरे (!) म्हणून गेलाय - 

कितीक हळवे, कितीक सुंदर
किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी, माझ्यानंतर

फक्त हे नामंजूरऐवजी मौनाची भाषांतरे मध्ये जास्त सुटेबल झालं असतं, असं तो वेडा जुळा मला सांगतोय. रिंगण मानवतंय की काय वेड्याला?!

फेब्रुवारी १२:

तेरवाच्या वितळण्यात डोळे आणि डोक्याबरोबर मिठी राहूनच गेली. ती ऍड नाही केली, तर आज माझा व्हॅलेंटाईनत्त्वाचा फाऊल होईल.

आणि हे त्या चॉकलेटच्या तुकड्याबद्दल नसून आपापल्या व्हॅलेंटाईनबद्दल आहे, हे तिला कळलं नाही, तर तिचा.

फेब्रुवारी १३:

हे वार्षिक एका जपमाळेसारखं झालंय. तिच्यात सातच मणी आहेत, हे एक बरं झालं. माळ चुंबून उशाशी ठेवली, की वर्ष पवित्र झालं समजायचं. एकशे आठ मणी असते तर जीवच गेला असता.

पण नुकताच लागलेला शोध असा, की जप पूर्ण झाल्यावर माळेचं चुंबन घ्यायचं. आणि मी मात्र एकेक मणी मागे ओढण्याआधी ओठांना लावत आलोय.

कुणीही, कितीही तांत्रिक चुका काढल्या, तरी मला माझीच पद्धत हवीहवीशी आणि मान्य आहे.

No comments: