Friday, July 16, 2021

फुले का पडती शेजारी



Baby moves on Santoor असा विषय असलेला ई-मेल कित्येक वर्षांनी आज अचानक दिसला आणि त्याने क्षणाचाही वेळ न दवडता, लगेच त्यातल्या YouTube linkवर क्लिक केलं. Look at the bottom left side of the belly, इतकी स्पेसिफिक सूचना पुरेशी होती. लागलीच त्याचे डोळे व्हिडिओतल्या जांभळ्या टँक-टॉपमध्ये फुगलेल्या पोटाकडे वळले. डाव्या दिशेला चाललेली हालचाल तशी स्पष्टच होती. शिवकुमार शर्माचं संतूर जितका आनंद देतं, त्याहीपेक्षा जास्त आनंद त्याला त्या हालचालीने झाला होता.


कथा-कादंबऱ्या-चित्रपटांमधील लेखी प्रेमपत्रांची जागा ई-मेल्सनी घेतलेल्या जमान्यातले ते दोघे. साहजिकच, त्याही ई-मेलला उत्तर देण्यासाठी उजवीकडच्या Replyच्या खुणेवर क्लिक करायची त्याच्या बोटांना सवयच झालेली. पण पुढच्याच क्षणी भानावर आल्यावर,  साहजिकच, ते न करता, बेडरूममध्ये एकटंच झोपलेल्या आपल्या बाळाच्या बाजूला जाऊन, त्याला घट्ट कुशीत घेऊन, त्यानेही डोळे मिटले. मागच्या दहा-बारा वर्षांच्या जगण्याची पुढच्या चार-पाच तासांत उजळणी होणारच होती. ई-मेलमधून, चॅटमधून चालणारे प्रेमसंवाद प्रत्यक्षातल्या हेव्यादाव्यांमध्ये बदलत जाणं, हे सुद्धा स्वप्नांत बघायचंच होतं.


लग्नानंतर बायकोला घेऊन शाळेतल्या आपल्या लाडक्या बाईंचे आशीर्वाद घ्यायला गेला असताना बाई त्याला म्हणाल्या होत्या - स्वतःच्या नावाला नि गोष्टीला साजेशी, अनुरूप नावाचीच बायको केलीस तर! त्यावर ते दोघेही लाजले होते. नावासारखाच स्वतःचा निळाशार स्वभाव घेऊन, so called happily ever afterचं  चित्र रंगवायला बसल्यावर, चित्राची एक बाजू पूर्ण होत गेली. मात्र डोळ्यांत भरेल, असं चित्र तयार व्हायला हवा असणारा ठळक, लाल-पिवळा रंग फक्त तिच्याकडेच होता. दोघांनी एका चित्राची नवीन, हिरवीगार सुरुवात केली. एकदा तो लाल-पिवळ्या, निळ्या-हिरव्या फुलांचा बगीचा बहरला, की घराच्या दिवाणखान्यात भिंतीवर ते मोठं चित्र दर्शनी भागातच सगळ्यांना दिसेल, अशा पद्धतीने लावायचं, हीच आयुष्याची इतिकर्तव्यता, इतपतच दोघांचंही अनुभवविश्व त्यावेळी संकुचित होतं. किंवा कदाचित यापेक्षा इतर कुठली अपेक्षाही नव्हती. पण बागेची गंमत फुलांमुळे आहे, नि फुलांची फुलपाखरांमुळे. त्यामुळे फुललेल्या फुलांची निगा राखणं, फुलपाखरांना बोलावणं, ‘येथे फुले तोडण्यास सक्त मनाई आहे’, असे फलक लावणं, ही सगळी कामंही करावीच लागतात, याचा विसर तिला का पडला असेल, हे मात्र त्याला काही केल्या कळलंच नाही. कदाचित ते तिच्या स्वभावातच नसावं. त्याला भावलेला ठळकपणा, लालपिवळेपणा नंदादीपाच्या तेजाचा नसून, एखाद्या वडवानलाची सुरुवात ठरावी, अशा गतीने दिवस बदलत गेले आणि नंतर बरीचशी फुलपाखरं फक्त त्याच्या स्वप्नांतच बागडू लागली.


त्यातलं एक फुलपाखरू Monarch Grove Wineryच्या टेस्टिंग रूम मधलं. सप्ताहांतीच्या सुटीचा निवांतपणा फिकट, पिवळसर Chardonnayमध्ये विरघळवत दोघे बसले होते. तिचे डोळे Highway Oneच्या पलीकडे, निळ्याशार अथांगतेत. आणि त्याचे तिच्याकडे. पिल्लाचे मात्र समोरच्या दुधाच्या बाटलीकडे नि चीझच्या छोट्या तुकड्यांकडे - आधी काय हातात घ्यावं, या विचारात दोन्हींशी आलटूनपालटून चाळे करत. इतक्यात एक केशरीकाळं फुलपाखरू येऊन त्या चिमुकल्या मुठीवर येऊन बसलं आणि पिल्लू असं काही दचकलं, की समोरची दुधाची बाटली आडवी होऊन तिथल्यातिथे चिकट थारोळं झालं. आता आपली खैर नाही, या भीतीने पिलाची रडारड, साफसफाईसाठी wineryच्याच कर्मचाऱ्याची मदत घेण्यासाठी याची तारांबळ आणि या सगळ्यापासून अलिप्त, वेगळ्याच विश्वात कुठेतरी हरवलेली ती. आपल्याला आलेला राग तिच्या निष्काळजीपणाचा आहे, बेदरकारीचा की रविवारच्या त्या संध्याकाळची माती झाल्याचा, हे त्याला नक्की कळेना.


आणि सत्यघटनेतल्या प्रश्नांची उत्तरं स्वप्नात शोधून मिळत नाहीत, हे सुद्धा.


एका स्वप्नात तो पोचला होता बकिंगहॅम पॅलेससमोरच्या सत्यात अस्तित्त्वात नसलेल्या कुठल्याश्या टेकडीवर. समोरच राणीचा अख्खा राजवाडा एका भल्यामोठ्या तपकिरी पडद्यामागे लपला होता. आणि राणीच्या दर्शनासाठी आलेल्या प्रजेचा धीर खचत चालला होता. अजून कशी आली नाही, कधी येणार, येणार की नाही, या प्रजेच्या चुळबुळीतच, राणीचे दोन द्वारपाल आले. एकही शब्द न बोलता, कोऱ्याकरकरीत चेहऱ्यानं त्यांनी तो पडदा बाजूला करून झटकला आणि लाखो मोनार्क फुलपाखरं आकाशात उधळली. आनंदित प्रजेच्या आरोळ्यांमध्ये, राणीच्या देशात पाहुणा म्हणून आलेल्या याचे डोळे मात्र, आकाशातलं आपल्यासाठीचं फुलपाखरू कोणतं, हे शोधण्यात लागलेले. इतक्यात, मानेवर काहीतरी हुळहुळलं, म्हणून ते झटकायला त्याने हात आणि…


…डोळे उघडले तेव्हा दरदरून घाम फुटलेला. बेडरूममध्ये तो एकटाच. लघवी करून आल्यावर पुन्हा निद्रिस्त व्हायच्या आत WhatsAppवर त्याने अख्ख स्वप्न सविस्तर टाईप केलं आणि आपल्या जिवलग सखीकडे पाठवून दिलं.


Metamorphosis, transformation and the evolution of your soul and spirit. The purpose in this lifetime is to continue to move forward on your spiritual journey. सकाळी सखीचं उत्तर. कोणा निनावी साहित्यिकाने सांगितलेलं फुलपाखरांचं बोटांवर रंग सोडून जाणं वगैरे त्यानेही कुठल्यातरी निबंधात, कधीतरी वापरलेलंच; पण बोटांवर धरलेलं फुलपाखरू तिथेच राहण्यापेक्षा सोडून गेलेलं - आणि तसं झालं नाही, तर सोडून दिलेलं - बरं,  हे त्याला पटलं. You are my totem. त्याने टाईप करून पाठवलं. त्यावर तिकडून घट्ट मिठी मारल्याचा इमोजी.


आजही दिवाणखान्यातल्या दर्शनी भागावरच्या अदृश्य मोठ्या चित्राकडे त्याचे डोळे वळले, की स्वतःचा निळा चेहरा, आणि त्या शेजारीच डोळ्यांची आग होणार भूतकाळ त्याला स्पष्ट दिसतो. पण चेहऱ्यातला तो नावापुरताच असतो. त्याचा आत्मा भिंतीवर आणि चित्राभोवती, इकडेतिकडे यादृच्छिक संथपणे बागडणारं मोनार्क फुलपाखरू होऊन जातो. स्वतःच्याच  चेहऱ्यात तात्पुरती अवतरलेली भामा मग त्याला विचारते - बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी? आणि या फुलपाखराकडे उत्तरासाठी हात पसरते.


“अगं जाऊ दे नं. तुला तो सडा सदैव दिसत राहील, आणि दरवळही सदैव येत राहील. हीच तुला देणगी, हीच तुझी नियती”


भामेच्या तावडीतून सुटून त्याचा चेहरा पूर्ववत होतो. आणि भामेला शिकवलेलं ‘सोडून देण्याचं’ तत्त्वज्ञान जिने सांगितलं, त्या नंदादीपाकडे मग फुलपाखरू झेपावतं.

No comments: