Sunday, November 08, 2020

'भोसडीवाले चाचा'चा रैवार

रोज सकाळी सातला उठून, ठरलेली लोकल पकडण्यापर्यंतची एक तास एकोणीस मिनिटे गुड्डूला आता सवयीची झाली होती. कानावर जानवे लावून अर्धवट झोपेत, सामायिक शौचगृहाबाहेर, दुसऱ्याच कोणाच्या तरी प्रातर्विधीच्या पूर्ततेची वाट पाहण्यासारखा मानसिक क्लेष इतर कोणता खचितच नाही. आणि नेमक्या त्या अर्धोन्मीलित नेत्रावस्थेत, त्याला आठवीच्या भूमितीच्या पेपरात चुकवलेल्या कोनदुभाजकाच्या सिद्धांतामुळे गेलेल्या अर्ध्या गुणापासून, ते कालीन भैयाच्या वीर्यतपासणी अहवालातल्या आकड्यांपर्यंतचे सगळे आकडे, शकुंतलादेवींपेक्षा जलद गतीने आठवत. त्यामुळे स्वतःच्या मलविसर्जनातल्या निवांतपणाचे सुख गुड्डूच्या नशिबी तसे कधीच नव्हते. किंबहुना, या सततच्या अस्वस्थपणापोटीच, काही काळापुरता का होईना, तो स्वतःला गुड्डू चिटणीस ऐवजी गुड्डू पंडित समजू लागे. गुड्डू पंडितांच्या डोक्यातली सूडभावना आणि गुड्डू चिटणीसच्या पोटातली भावना यांच्यातल्या सीमारेषा फ्लश होऊन जात. फरक इतकाच, की त्याची बॉडी, दाढी आणि गाडीची स्वप्ने मिरझापूरच्या एकेका भागासोबत जन्म घेत आणि तो संपल्यावर लगेच संपूनही जात.


अपवाद फक्त रविवारचा. रविवारी मात्र, त्रिपाठी कुटुंबाच्या मुदपाकखान्यात शिजवल्या जाणाऱ्या मटणापेक्षा, आपल्या घरचे मटण जास्त चवदार व्हावे, या एकमेव हेतूने, गरज नसतानाही तो सकाळी सातला उठे. बोकडाचे ताजे मटण मिळणाऱ्या लायनीत मिळवलेल्या पहिल्या नंबराचा आनंद, सहामाही परीक्षेतल्या पहिल्या नंबरापेक्षा मोलाचा वाटे. बरं दुग्धशर्करा योग असा, की ते मटण शेजारीपाजारी, किंवा नातेवाईकांकडे, किंवा तिसऱ्याच कोणा वकील-कारकुनाच्या, पोलिसांच्या वगैरे घरी पोचवण्याची गरज नसल्याने, नळीवर आणि त्यातल्या लुसलुशीत, चवदार मांसावर, फक्त गुड्डूचाच हक्क! अगदी मिरझापूरच्या गादीसारखा! कधीतरी त्याचा दहा वर्षांचा पोर नळीसाठी हट्ट करे; पण त्यासाठी तो इतक्यातच पात्र नाहीये, हे त्याला कालीन भैया आणि मुन्ना त्रिपाठींच्या नात्यातून कळलेच होते. जमेची बाब अशी, की नळी नाकारल्यावरही, आपले पोर, आपल्या किंवा दुसऱ्या कुणाच्या छाताडावर बंदूक रोखणार नाही, किंवा त्याने त्याची कितीही मित्रमंडळी जमा केली, तरी त्यांचेत्यांचे मम्मी नि बाऊजी आपल्याच गोटातले असल्याने, आपल्या नळीला तसा काहीच धोका नाही. गुड्डूने ते बरोब्बर ओळखले होते. आज मटण घेऊन येताना, या स्वकर्तृत्त्वाने त्याचा ऊर भरून आला होता.


घरात शिरल्याशिरल्या ओट्यावर मटणाची काळी पिशवी ठेवून, गुड्डू दाढीच्या तयारीला लागणार होता; पण धुण्याचा पहिलाच लॉट, मशिनमधून बादलीत काढून,हातातल्या काठीवर आईची साडी चढवून, वरच्या दांडीवर वाळत घालायच्या तयारीत असलेली, आपली बायको त्याला दिसली. कडक इस्त्रीची साडी नेसलेल्या ३६-२४-३६ आकृतीला मागून गपकन धरणारा तो गुड्डू, की जे पी यादव, हे त्याला काही केल्या आठवेना! एका क्षणी स्वीटी गुप्ता आणि दुसऱ्याच क्षणी शबनम, असा दुर्मिळ सर्वधर्मसमभाव जाणवल्यावर, आपणही गुड्डू पंडित नाही, गुड्डू चिटणीस आहोत, हे वन-रूम-किचन मराठी मध्यमवर्गीय वास्तव, खाडकन डोळ्यांसमोर उभे राहिले आणि गुड्डू भानावर आला. सकाळीसकाळी - त्यातही रैवार सकाळी- बायकोची साडी आणि स्वतःची दाढी, दोन्ही जागच्या जागी ठेवण्यातच शहाणपण आहे, या सत्याचा स्वीकार काहीश्या असमाधानाने करून गुड्डू अंघोळीच्या तयारीला लागणार होता. तेवढ्यात फोन खणखणला. इतक्या सकाळी कोण, असा विचार करेतोवर, आईने बाहेरच्या खोलीत फोन घेतलाही होता. पुण्याच्या आपल्या चुलतभावाचा फोन आहे, हे कळल्यावर गुड्डूला इतका आनंद झाला, काय विचारू नका! तसा लहानपणापासूनच तो त्याचा सगळ्यात लाडका दादा होता. आणि WhatsApp ग्रुप वर कितीही फॉरवर्ड्स आणि पुणेरी जोक टाकले, तरी प्रत्यक्ष फोनवर बोलण्यातली मज्जा वेगळीच! आता दादाशी गप्पा मारायला मिळणार, या आशेने गुड्डू बाहेर जाणारच होता, तितक्यात आईने परस्पर ‘गुड्डू अंघोळीला गेलाय’, असं सांगूनही टाकलं! त्यात आणि वर ‘छकुल्याशी बोल पाच मिनिटं, येईलच गुड्डू इतक्यात’, असं म्हणून पोराच्या हातात फोन देऊन टाकला. पोरालाही काय हुक्की आली होती काय माहीत?! ‘कैसे हो चाचा?’, अशा खास मुन्ना त्रिपाठीय शैलीतल्या त्याच्या बालसुलभ निरागस प्रश्नाने गुड्डू आनंदला एक सेकंद. पण एकविसाव्या शतकात, फाईव्ह-जी, वाय-फाय सिक्स वगैरे आलेले असले, तरी एम टी एन एल ची शिंची लॅण्डलाईन अजून सुधारली नाही, याचा प्रत्ययही तितक्याच लवकर आला. पुण्याचा आवाज सेकंदभरापुरताच बंद झाला असावा; पण तो तसा झालाय, हे गुड्डूला कळलं, ते त्याच्या पोराने विचारलेल्या - ‘चाचा?! ओ भोसडीवाले चाचा?!’ या प्रश्नाने!


गुड्डूने काही ऍक्शन घेण्याआधीच, बाहेर आजीने नातवाला एक धपाटा घालून झालेला. जोडीलाच, ‘तरी सांगत असते, नको ते मिरझापूर’चा धोशा. म्हणजे आईलाही माहितीये मिरझापूर?! गुड्डूची जरा तंतरलीच! त्यात सासवांच्या बोलण्यात लेकी बोले सुने लागे पेक्षा, सुने बोले आणि सुनेच लागे असतं, हे न कळण्याइतक्या, आजच्या सुना बथ्थड डोक्याच्या नसल्याने, गुड्डूची बायको बाहेर न धावती तरच नवल! त्यात आणि तिच्या हातात काठी. हत्यार म्हणजे बंदूक - एक हातातली आणि दुसरी पायजम्यातली - या शस्त्रसाठ्याच्या मर्यादित मिरझापुरीय आकलनावर गुड्डू पोट धरून हसला होता. कारण कपडे वाळत घालायची काठी, लाटणे, पट्टी, कमरेचा पट्टा, चप्पल, या मराठयांच्या शस्त्रागारातल्या रामबाण हत्यारांचा उत्तर भारतीयांना पत्ता असल्याचे गुड्डूच्या नजरेत कधीच आले नव्हते. मिरझापूरच्या गादीसारखाच हा शस्त्रसाठाही मराठी कुटुंबांमध्ये - त्यातही कुटुंबातल्या स्त्रीवर्गाकडे - पिढ्यानुपिढ्या, स्वयंपाकघरातल्या मिसळणीच्या डब्यासारखाच हस्तांतरीत होत आलाय, हे उत्तर भारतीयांच्या गावीच कधी नसते. आज बायकोच आपल्या पोराचा परस्पर समाचार घेणार, म्हणजे आपल्याला वाईटपण नको, या विचाराने गुड्डूने क्षणभर सुखावला खरा; पण राहून राहून एक गोष्ट त्याला समजात नव्हती, पोराच्या कानावर हे पडलंच कसं?! खरं तर तो रात्री झोपला, की मगच गुड्डू नि बायको लॅपटॉपवर एपिसोड लावत. ते सुद्धा एकच इअरफोन शेअरिंगमध्ये वापरत. दिवसभरात किमान तीच एक गोष्ट एकत्र करता येते, तर त्यातलं शेअरिंग ‘मॅक्स’ असावं, हा बायकोचाच आग्रह, म्हणून खरी ती व्यवस्था! दुसरा फायदा असा, की स्वीटी-गुड्डूचे रोम्यांटिक सीन्स, मुन्ना-माधुरीचे सीन्स रिवाइंड करून बघताना इअरफोनपासून ते पांघरुणापर्यंतच्या सगळ्याच शेअरिंगची मजा मॅक्स होते, हा लाभ आहेच! आणि रात्री एपिसोड बघून झाला, कि दुसऱ्या रात्रीपर्यंत घरात त्याची वाच्यता व्हायचे काही कारणच नाही. नाष्ट्या-जेवणाला घरातल्या गप्पा या मोदी आणि उद्धव ठाकरेंना करोना हाताळणीवरून आळीपाळीने शिव्या घालणे; सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू हा खून कि आत्महत्या; जेवणानंतरच्या वाफ घेणे कार्यक्रमाची तयारी; स्वयंपाकाव्यतिरिक्त आईंची काही मदत न होणे, ही बायकोची ओळखीची तक्रार; पोराच्या ऑनलाईन स्कुलिंगचा उडत असलेला बोजवारा, वगैरे नेहमीच्याच वळणाने जात असल्याने पोराच्या कानावर असलं काही अभद्र, अर्वाच्य, अश्लील वगैरे पडायची तशी शक्यताच नाही. मग आमच्या या पठ्ठ्याने हे ऐकलंच कसं आणि कुठे?!


गुड्डू या विचारात असतानाच बायको आत येऊन परत आपल्या कामाला लागलीसुद्धा. म्हणजे बाहेर सगळं सेटल झालं असावं. कारण काही क्षणांपूर्वीचा रडण्या-विव्हळण्याचा, मुसमुसण्याचा आवाज आता बंद झालेला. म्हणजे पोरगं झालंगेलं सगळं विसरून बाहेर खेळायला गेलं असावं. पुण्याचा फोनही बंदच झाला असावा. कारण आता जो काही पुढचा फोन येईल, तो दादाचा आपल्या मोबाईलवर, नि वहिनीचा बायकोच्या मोबाईलवर, हे गुड्डूने कधीच ओळखलं होतं. आणि तो तसा आल्यावर, त्याला काय उत्तर द्यायचं; मूळ मुद्द्याला बगल देऊन, नव्याने ऐकलेले पुणेरी जोक्स WhatsAppवर न टाकता आधी फोनवरच ऐकवून दादाला खुश कसं करायची, याची सुनियोजित मोर्चेबांधणी, गुड्डूने मनोमन केली होती. पण पोराच्या कानावर जे पडलं, ते कसं आणि ते त्याच्या तोंडून बाहेर आलंच तरी कसं, या प्रश्नाने गुड्डूची पाठ सोडली नाही ती नाहीच.


बॉईज ओन्ली स्कुलमधल्या सहा वर्षांत खऱ्या अर्थाने गुड्डूची शिव्यांशी ओळख झाली. त्यातही मित्रांविषयीचा सात्त्विक संताप आणि त्याहूनही जास्त सात्त्विक प्रेम बरेचदा एकाच शिवीत व्यक्त करता येत असल्याने, भ आणि म वरून चालू होणाऱ्या बेसिक शिव्यांची शब्दसंपदा खूप काळ पुरेशी पडली होती. कॉलेजात आणि ऑफिसमध्ये मग अमराठी व्यक्तींचा गोतावळा अवतीभवती जमू लागल्यावर, हॉलीवूडमधल्या मालिका आणि चित्रपटांशी ओळख झाल्यावर, शिव्यांची संपदा वाढीस लागली. त्यातूनच सेक्स, हिंसा, ड्रग्स यांचं एक्स्पोजर मिळत गेलं असलं, तरी त्याची उपलब्धता आजच्याइतकी सहज नव्हतीच. आणि ती तशी असती, तरीही आजीआजोबांपासून ते नातवंडांपर्यंतच्या पिढीतले सगळे लोक एकत्र टीव्ही बघतात, त्या प्राईम टाइममध्ये ती उपलबद्धता नव्हतीच. एका भारत-पाक सामन्यादरम्यान सचिनने विकेट फेकल्यावर ‘चुत्या साला’ हे जेव्हा गुड्डूने बाबांच्या तोंडून पहिल्यांदा ऐकलं होतं, त्यानंतरचं बाबांचं काही दिवस नजर चुकवणं गुड्डूच्या चांगलंच लक्षात राहिलं होतं. गुड्डू स्वतः बाप होईतोवरचा जमाना मात्र वेगाने बदलला. स्वल्पविराम नि पूर्णविरामासारख्या वापरल्या जाणाऱ्या शिव्यांसारखाच, प्रत्येकाचा प्राईम टाइम सोईस्करपणे कस्टमाइझेबल झाला. आणि ते OTP का काय ते प्लॅटफॉर्म्स आल्यावर तर काय विचारुच नकात! त्यामुळे कितीही आर रेटेड वगैरे एपिसोड्स आले, आणि पोरांना स्वतःहुन बघू दिले नाहीत, तरी समाजशिक्षणातुन पोरांपर्यंत या गोष्टी पोचत आहेतच. मग या प्रकरणावर कंट्रोल कुणाचा हवा? पालकांचा? या मालिका आणि सिनेमे बनवणाऱ्यांचा? काय दाखवलं जावं नि काय नाही, हे ठरवणाऱ्या कुठल्याशा सेन्सॉर बोर्डाचा? की काय बघावं-बघू नये, दाखवावं-दाखवू नये, हे अलिखितपणे पिढ्यानुपिढ्या मनावर बिंबवणाऱ्या कुठल्याशा संस्कृतीचा?! ती संस्कृती अद्याप बदलली नाहीये, कि जे बदललंय, ते संस्कृतीत विलीन होऊन पुढच्या पिढीकडे जाण्याइतपत प्रगल्भ झालं नाहीये अजून?!


वाटीतल्या रश्श्यात घोळवत असलेल्या पोळीच्या तुकड्याचा लगदाही बोटांना लागेनासा झाल्यावर गुड्डूच्या डोक्यात काय आलं काय माहित! त्याने आपल्या वाटीतली नळी आणि एक एक्स्ट्रा पीस शेजारी बसलेल्या पोराच्या ताटात ठेवले आणि मुकाट पुढचा पोळीचा तुकडा रश्श्यात बुडवला.

No comments: