Sunday, November 08, 2020

तिनकोंके नशेमन तक

माझ्यासाठी घर ही कधीच एक ‘वास्तू’ नव्हती. मुळात चार खोल्यांमध्ये बंदिस्त असलेलं आयुष्य कधी अनुभवलंच नाही. म्हणजे आयुष्य बंदिस्त नव्हतंच तसं. तरी दिवसभराचं ‘जगणं’ या संज्ञेत सामावेल, असं सगळं करून झाल्यावर, अंग टाकायला जिथे परत येता येईल, अशा चार खोल्या नव्हत्याच! होत्या फक्त दोन. आणि स्वतःचे दोनाचे चार झाल्यावरही, मुंबई-पुण्यातील लौकिकार्थानं ज्याला घर म्हणता येईल, अशा काही खोल्या मागे सुटल्या त्या सुटल्याच! अमेरिकेसारख्या मोठ्या देशातल्या, एका मोठ्या राज्यात, छोटंसं अपार्टमेंट राहायला असलं, तरी त्याला घर म्हणवत नाही. मुळात, हे माझं अमेरिकेतील पाचवं-सहावं अपार्टमेंट असेल. आणि बे एरियातील वेगवेगळ्या जागा वेगवेगळ्या कारणांसाठी आवडत असल्याने कुठेतरी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे राहण्यासाठी एक कायमस्वरूपी खोका बांधून ठेवावा, असं कधी वाटलंच नाही. 

 

शाळा-कॉलेजात असताना स्वतःच्या घरात जितका वेळ घालवायचो, तितकाच मित्रांच्या घरातही घालवला असेल. किंबहुना इंजिनिअरिंगला असताना तर मरिन ड्राईव्ह, बॅंड स्टँड, गिरगाव चौपाटी, अशा ठिकाणी घरापेक्षाही जास्त वेळ घालवला. शालेय आयुष्यातील दिवाळीची आणि उन्हाळ्याची प्रत्येक सुटी पुण्यात चुलतभावंडांकडे घालवलेली. त्यामुळे ‘घर’ म्हणता येईल, अशा छोट्यामोठ्या कित्येक जागा अनुभवल्या. कोणत्याही ‘वास्तू’पेक्षा, किंवा ‘ठिकाणा’पेक्षा, महत्त्वाची होती तिथली माणसं आणि आठवणी! जिथे जन्मलो आणि वाढलो, तिथे आईबाबा, काका, आजी यांच्यासोबतच शेजारचे असंख्य काकाकाकू, आजीआजोबा, पोरंटोरं होती. आणि त्या सगळ्यांच्या घराचे दरवाजे, खिडक्या आपल्यासाठीच उघड्या आहेत, अशा तोऱ्यात वावर असायचा. दूरदर्शनवरच्या रामायण, महाभारत, चंद्रकांता वगैरे मालिका, क्वचितच बघायला मिळणारे क्रिकेटचे सामने, एकमेकांच्या घरी केलेली फराळाची आणि इतर काहीही पदार्थांची देवाणघेवाण, कोणाच्याही घरची लग्नमुंज वगैरे कार्ये आपल्याच घरातील असल्यासारखं मिरवणं, आपण मेरिटमध्ये आल्याचं आपल्या नातेवाईकांना शेजाऱ्याच्या फोनवरून कळवणे, घरी राहायला आलेल्या पाहुण्यांना नि मित्रांना गच्चीत झोपायला घेऊन जाणे, अशा कितीतरी आठवणी जन्माला घातलेलं दादर, मुंबई-१४ हे कदाचित माझं पहिलं किंवा एकमेव घर म्हणता येईल.


अमेरिकेतील माझ्या पहिल्या दोन-तीन अपार्टमेंट्सनी काही काळापुरता हा समज किंचित खोटा ठरवला. चार पैसे हातात यायला लागल्यापासून, कमवायचे किती नि कसे, आणि उडवायचे किती नि कसे, याची नीटशी अक्कल नसलेल्या वयात, दर शुक्रवारी अपार्टेमेंटमध्ये रंगणाऱ्या पोकर नाईट्स, ऑफिसातच रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत थांबून, कामं संपलेली असताना उगाच टेबलटेनिस वगैरे खेळण्यात वेळ घालवणे, मग अगदी उशीरा डेनीज किंवा इन अँड आऊट मधून काहीतरी पोटात ढकलणे, नि फक्त ऑफिसात डेस्कवर झोपता येत नाही, म्हणून अपार्टमेंटच्या बेडरूमचा रस्ता धरणे, इतक्यापुरतंच ‘घर’ ही वास्तू मर्यादित राहिलेली. मग कुणाचा तरी बर्थ डे असला, की केक कटिंग, दारूपार्टी, मग सगळे घरी गेल्यावर कार्पेटवरचे डाग, रिकामे पिझा बॉक्सेस, पेपरप्लेट्स वगैरेची योग्य विल्हेवाट लावणे, आणि दोन-चार वर्षे या आठवणींचं आणि कृतींचं लूप. अर्थात हे फार नवीन नव्हतंच; थोड्याफार फरकाने मास्टर्स करतानाही हाच प्रकार असायचा; फक्त त्यावेळी पोकरची जागा होमवर्क नि प्रोजेक्ट्स, आणि ऑफिसची जागा लॅबने घेतलेली असायची, इतकाच काय तो फरक! घर या वास्तूचं अस्तित्त्व धर्मशाळेसारखं अंग टाकण्यापुरतं मर्यादित!


पुढे मग गृहस्थाश्रमात प्रवेश झाल्यावर आजूबाजूची माणसं, वस्तू, वास्तू बदलत गेल्या; बदलत आहेत. बदलत न गेलेल्या फक्त दोन गोष्टी- स्वतःला एका विशिष्ट ठिकाणाशी नि वास्तूशी बांधून न घेणं, आणि चांगल्या-वाईट आठवणींपाशी रेंगाळत राहणं.


हे लिहीत असताना, मला चित्रपटांमध्ये कालांतर दाखवण्यासाठी केला जाणारा special effect हमखास आठवतो. तुम्ही नायक/नायिका म्हणून पडद्याच्या मध्यभागी उभे असता; आणि आजूबाजूच्या वस्तू, जागा, माणसं, परिस्थिती, इतक्या वेगाने बदलत असतात, की तुम्हाला त्याचा पत्ताही लागत नसतो. तुम्ही निर्विकारपणे उभे असता, किंवा त्रयस्थपणे त्या सगळ्याचा आढावा घेत असता. तुम्हाला सुखदु:ख नसतं, मोह-माया नसते, रुसवेफुगवे नसतात. असले, तरी ते एखाद्या ठराविक प्रसंगापुरते, ठराविक मायक्रो किंवा नॅनो सेकंदापुरते. अमर्याद काळाच्या पटलावर या तुमच्या पाऊलखुणा असतात. पण एकेक पाऊल भिंगाखाली घेऊन बघू लागलात, तर तुमची तुम्हीच बांधलेली घरटी तुम्हाला दिसू लागतात. घरटी नाहीच खरं तर; पक्षी घरटी सोडून गेल्यावर, तिथे घरटं होतं, हे सांगणाऱ्या वाळक्या काटक्याकुटक्या, पानं, पिसं यांचा कचरा. अशा घरट्यापाशी आलेला ठहराव अनुभवला, की पुढच्या उड्डाणाची तयारी. त्या ठहरावात ऐकू येणारा किलबिलाट, चिवचिवाट कधीकधी कोलाहलातसुद्धा रूपांतरित होतो; पण त्यावरची तुमची प्रतिक्रिया एका ‘ट्विट’पेक्षा जास्त नसावी. आणि ती प्रतिक्रिया देऊन झाली, की आपण कर्तव्यभावनेने आकाशी झेप घ्यावी, सोन्याचे हे पिंजरे सोडावेत, हेच आपल्याला कितीतरी विभूती शिकवून गेलेत, नाही का?!


No comments: