Monday, February 28, 2022

समाधिस्थ कवितांच्या हिंदोळ्यावर



 “तुला आजकाल कविता होतच नाहीत का?”

असं ती जेव्हा मला विचारते, तेव्हा माझ्याकडे उत्तर नसतं. ते सुचण्याची प्रक्रिया चालू व्हावी, असं वाटत असतं; तेव्हा ही मात्र डोळ्यांत कुतूहल नि अपेक्षा साठवून, स्वतःच्याच तळहातावर स्वतःचं डोकं धरून, माझ्या मांडीवर रेलून, अधाशासारखी माझ्याकडे बघत असते. मला नि:शब्द, निरुत्तर करण्यात तिला काय मजा वाटते, किंवा कशाचा अभिमान वाटतो, हे तिचं तिलाच माहीत. पण माझ्याकडे एकटक बघत बसणाऱ्या तिच्या रुपड्यातली समाधिस्थ अस्वस्था संपून जायला नको, म्हणून मीच उत्तर शोधायचं - किंवा सापडलेलं उत्तर द्यायचं टाळतो की काय - असंही कधीकधी वाटून जातं.


बहारों फूल बरसाओ मधली फुलांच्या झोपाळ्यावर झुलणारी वैजयंतीमाला ही नाही. तसवीर बनाये क्या कोई, क्या कोई लिखे तुझपे कविता, म्हणावीशी शर्मिलासुद्धा ही नाही. झोपाळ्यावाचून झुलायचे, फुलायचे तिचे आणि माझेही दिवस मागे पडले. आताच्या खऱ्या जगण्यातला करडेपणा त्याच जगण्यातल्या खोटेपणाला स्वप्नांमध्येसुद्धा बहरू देत नाही. तरीसुद्धा तिच्यातल्या गृहिणीपणातलं, तिच्यातल्या मैत्रिणीतलं नि प्रेयसीतलं सोज्वळ बाईपण मी उरात का पेरतो, आणि त्या मागून होणाऱ्या माझ्या गर्भधारणेपासून ते बाळंतवेणांपर्यंतचा प्रवास एकट्यानेच का करतो, हे मलाही पडलेलं कोडंच आहे. हा प्रवास कधीकधी काही तासांचा, कधीकधी काही दिवसांचा तर कधी अनंतापर्यंतचा. सुट्यासुट्या ओळींच्या, एखाददोन कडव्यांच्या अशा कितीतरी अनाम कविता मी पाळण्यापासून ते झोपाळ्यापर्यंत झुलवल्या असतील, अंगाखांद्यावर खेळवल्या असतील; घट्ट कुशीत घेऊन झोपवल्या असतील किंवा मिठीत स्वतःसोबत जागवल्या असतील; किंवा कुणी माझ्यापासून हिरावू नयेत, म्हणून लपवल्याही असतील. इतकं करूनही, झोपाळ्यावर बसलेली एखादी कधीतरी ‘जाते मी’ म्हणून पाखरू होऊन मलाच झुलवत ठेवत उडून जाते. मिठीत घेतलेली एखादी ‘काळजी घे’ इतकंच म्हणून सोडून जाते. एखादीला सर्वस्व अर्पण करुन टाकण्यासाठी शब्दांच्या, ओळींच्या प्रदक्षिणा घालाव्यात, तर प्रत्येक शब्दासोबत, ओळीसोबत ती मूर्ती होण्याऐवजी दगडच होऊन जाते - नि माझ्या ठिकऱ्या उडवून जाते. अशा सगळ्या एकेक करून उडून गेल्या, सोडून गेल्या, दगड होऊन गेल्या, सजीव समाधिस्थ झाल्या, तर जिच्या जन्मासाठी ताटकळत बसलो आहे, ती जन्माला यावी तरी कशी? मुळात, ती जन्माला येईल का?!


आणि म्हणूनच “तुला आजकाल कविता होतच नाहीत का?” ऐवजी “तुला कविता होईल का?” हे तिने विचारणं जास्त सयुक्तिक ठरेल का?


तिने तेच, त्याच शब्दांत विचारावं, असं मीच तिला सुचवू का?


अर्थात हे मी तिला सुचवलं, तर तिचं कुतूहल काळजीत बदलेल. तिची अपेक्षा अगतिकतेत बदलेल. माझ्याऐवजी तीच नि:शब्द, निरुत्तर होईल, ज्याची तिला सवयच नाही. आणि ते मलाच सोसणार नाही.


म्हणूनच “तुला आजकाल कविता होतच नाहीत का?” या तिच्या प्रश्नाला मी क्षणिक परंतु संपूर्ण विचाराअंती एकच उत्तर देतो - “No!”


काळजी, अगतिकता, निरुत्तरता या सगळ्याचा परिपाक म्हणून चिडून ती माझ्या मुस्कटात मारेल, या भीतीने, मी माझ्या उत्तराचा उत्तरार्धसुद्धा तयार ठेवलेला असतो -


“कारण मला तू होतेस!”


आणि त्यातच माझ्या Noमधले असंख्य हो उजळून निघत असतात.

No comments: