Tuesday, April 07, 2009

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा. त्यामुळे अगदी आजतागायत अभ्यास न करणार्‍या नतद्रष्ट लहानग्यांपासून ते अगदी अमेरिकेच्या अध्यक्षमहाशयांपर्यंत कोणालाही 'जोड्याने' हाणले पाहिजे असे कोणी म्हटले की हाणणार्‍या किमान दोन व्यक्ती तरी असाव्यात, असे चित्र आपसूकच उभे राहते. मात्र नजीकच्या भूतकाळात आमचा हा समज एका इराकी पत्रकाराने चुकीचा ठरवला. त्याने बुश महाशयांना चढवलेल्या बुटांच्या प्रसादावरून जोड्याने हाणणे म्हणजे एकाच व्यक्तीने दोन जोडे मारणे हा सुद्धा अर्थ होतो, हे सुद्धा मान्य करावे लागले. एका अर्थाला दुसर्‍या अर्थाची जोड (की जोडा) मिळाला.
काही संस्कृतींमध्ये जोडे फेकून मारणे हे उच्च प्रतीच्या, नीचपणे केलेल्या अपमानाचे व्यवच्छेदक लक्षण कसे काय असू शकते, हे बाकी आम्हांला अजून समजलेले नाही. पुण्यात कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त जोडे हाणायची जी संस्कृती विकसित झाली आहे, तिची लागण या बाकीच्या संस्कृतींना झाली नसावी. बाटा, लखानी किंवा तत्सम सिंधी-गुजराती चप्पल-बूट विक्रेत्यांचे धंदे पुण्यात नीटसे चालत नसल्याचे हेच एक मुख्य कारण असावे की तिथे जोडे हाणायचे असल्यास ते पायात घालावेच लागतात अशातला भाग नाही. तिथला मराठी माणूस जोडे हाणण्यात पटाईत असल्याने वडेवाले जोशी जरी एकमेवाद्वितीय असले, तरी जोडेवाले जोशी बरेच आहेत. चप्पलबुटांची खरी गरज पडते ती मुंबईत. तिथे कफ परेड, नेपिअन्सी रोड सारख्या उच्चभ्रू वस्त्यांमधली कुत्रीमांजरीही अगदी रिबिन् बिबिन् लावलेले डिजाइनर् शूज् घालून हिंडताना आम्ही पाहिली आहेत. वार्धक्याकडे झुकू लागलेल्यांसाठी किंवा नेमाने लाफ्टर् क्लबात, प्रभातफेरीला (मॉर्निंग् वॉक् !) जिम् मध्ये जाणार्‍यांसाठी स्पोर्ट्स शूज् ; कार्यालयात जाताना, लोकलमधून प्रवास करताना घालायचे चप्पल-बूट वेगळे नि मंगल कार्यालयात जातानाचे, प्रवासाला जातानाचे वेगळे; महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी आठवड्याला जो पोशाख घालायचा त्या प्रत्येक पोशाखामागे एक या दराने घालायचे चप्पल-बूट आणि सप्ताहाअंतीच्या स्नेहसंमेलनांसाठी, पार्ट्यांसाठी, ट्रेकिंग-हायकिंग साठीचे, लग्नमुंजीदी समारंभप्रसंगी घालायचे वेगळे बूट; असा सगळा जय्यत जामानिमा असतो. टाकून दिलेल्या चपला-बुटांचे पुनर्नवीकरण करायचे, पुनर्निर्माणाचे जे प्रकल्प धारावीसारख्या उद्योगजगतात आकाराला आले आहेत, त्यांच्या यशामागेही याच बहुरंगी बहुढंगी पादत्राणांचा फार मोठा हातगुण (की 'पाय'गुण) आहे.
पादत्राणे या शब्दांपासून तयार झालेल्या विशिष्ट शब्दचमत्कृतीची मजा बालसुलभवयात सगळ्यांनीच घेतलेली आहे, याबाबत दुमत नसावे. पण नेहमीची बस/ट्रेन पकडण्यासाठी धावताना अथवा ती चुकल्यावरची पायपीट करताना, शेजारी बसलेल्या किंवा उभे असलेल्या सहप्रवाशाच्या जड ब्यागेचा किंवा त्याच्या स्वतःच्या जडत्त्वाचा त्रास सहन करताना, टॅक्सी-रिक्षावाल्यांच्या संपासारख्या बिकट परिस्थितीत तंगडतोड करताना जी पायातले (पादण्यातले नव्हे! काढलेत ना दात लगेच?!) त्राण कायम ठेवतात ती पादत्राणे हा गर्भितार्थ केवळ अनुभवातूनच उलगडत जातो. पूर्वी वधुपित्यांची पादत्राणे त्यांच्यातले त्राण जिवंत ठेवण्याऐवजी काढून घेत असल्याचे ऐकायला मिळे. मात्र हल्ली ऑनलाइन् म्याट्रिमोनीज् चे दिवस आल्यापासून हे चित्र आजकालच्या वधूंसारखेच काहीसे बदलू लागले आहे. पादत्राणांचा उपयोग फोटोत दिसणारी आपली उंची वाढवण्यासाठी, कोणत्या पोशाखावर कोणते चप्पल-बूट म्याच् होतात हा 'ड्रेसिंग् सेन्स्' दाखविण्यासाठी, आणि झालेच तर लग्नानंतर नवरा व बायको यांच्यापैकी कोणाच्या पायात किती त्राण उरणार नि कुणाचे किती संपणार, हे दाखविण्यासाठी केला जाऊ लागला आहे. एकंदरीतच चप्पल-बुटांमधील फ्याशनसंबंधी कमी पर्याय उपलब्ध असल्याने हा प्रकार वरांपेक्षा वधूंच्या बाबतीतच जास्त होतो, असे आमचे निरीक्षण आहे. गर्दीत पर्स किंवा गळ्यातली सोनसाखळी चोरणारा भुरटा चोर, विनाकारण मागे लागणारा रोड् रोमिओ किंवा नवखा, अननुभवी प्रेमवीर यांना प्रसाद म्हणून चढवायलाही आजकालच्या मुली पादत्राणांचा वापर करू लागल्या आहेत. त्यामुळे आता 'जुळले मनामनाचे नाते तुझे नि माझे' या ऐवजी 'जुळले बुटाबुटाचे नाडे तुझे नि माझे'; 'फुलले रे क्षण माऽझे फुलले रे' ऐवजी 'झिजले रे बुट माऽझे झिजले रे' अशी मंगलगीते कधी ऐकायला मिळणार याचीच आम्ही वाट पाहत आहोत. अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते आहे.
आज भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना बूट फेकून आपल्या इराकी मित्राचे अंधानुकरण करण्याचा चावटपणा एका शीख पत्रकाराने केल्याचे पाहण्यात आले. पण मुळातच शीख बाणा हा बुटासारखे तुच्छ हत्यार न वापरता लढवय्या वृत्तीने सीमेवर छातीचे कोट करून बंदुका चालवायचा (किंवा भारतात ट्रक नि अमेरिकेत-क्यानडात टॅक्सी चालवायचा) आहे. त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. आणि सदैव हसतमुख नि शांत असणारे आदरणीय गृहमंत्री सुरुवातीला जरी त्या अनपेक्षित प्रीतीसुमनांनी किंचित गांगरल्यासारखे वाटत असले, तरीसुद्धा पाडगावकरांच्या 'जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा' च्या चालीवर 'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा' असे काहीसे त्यांना सुचले असण्याची शक्यता त्यांच्या मिस्किल हसण्यावरून तरी अगदीच नाकारता यायची नाही.
=====================================================================================

प्रस्तुत लेखनातून निखळ करमणूक हाच एकमेव उद्देश आहे. जाणतेपणे कुणाच्याही धार्मिक, प्रादेशिक वगैरे प्रकारच्या भावना दुखावण्याचा दुष्ट हेतू मुळीच नाही, याची कृपया नोंद घ्यावी. अजाणतेपणे कुणी दुखावेले गेले असेल, तर उदार मनाने हा लेखनापराध पोटात घालावा, ही कळकळीची नम्र विनंती
=====================================================================================

7 comments:

कोहम said...

hahahahaha....very good

Minanath Dhaske said...

Chaan....
http://minanath.blogspot.com/2009/04/blog-post_07.html

माझ्या मना said...

मस्त रे, मज्जा आली, जोड्याबद्दल एवढा विचार करणाऱ्याला खरंच सलाम.
लेख आवडला.!!

प्रशांत said...

:D

Deep said...

Hahaha ;) thodkyaat kaay jodyaane nikhl karmanuk kelee aahe!

Mrs. Asha Joglekar said...

हा लेख ही तुम्ही जोड्याने लिहिला काय ?

Mugdha said...

Jodyana Tod nahi..... he nakki