Friday, July 13, 2007

रॅट-अ-टुइ



आपल्याकडे संजीव कपूरच्या पुस्तकांमधून पाककृती वाचून नानाविध प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या यादीत रेमी नावाचा एखादा उंदीरसुद्धा सामील झाला, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? जास्त विचार करू नकात. तुमच्यासमोर हे कल्पनाविश्व 'रॅट-अ-टुइ' नावाच्या एका दे-धमाल चित्रपटातून वॉल्ट डिस्ने पिक्चर्स-पिक्सार यांच्या संयुक्त विद्यमाने उभे करण्यात आले आहे. अकादमी पुरस्कार विजेते दिग्दर्शक ब्रॅड बर्ड आणि 'कार्स','फ़ाइंडिंग निमो' सारख्या चलतचित्रपटांचे निर्माते पिक्सार ऍनिमेशन्स हे या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र काअम करताना दिसणार आहेत.
गुस्तॉव्ह नावाच्या फ़्रान्समधील संजीव कपूरचे दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि त्याच्या पाककृतींचे पुस्तक यांवरून पदार्थ 'चवीने' खाण्यात आणि बनवण्यात रुची निर्माण झालेला रेमी नावाचा उंदीर पाकशास्त्राचा अभ्यास करतो. 'एनीवन कॅन कुक' हा गुस्तॉव्हचा मंत्र हा रेमीच्या आयुष्याचा मंत्र बनलाय. गुस्तॉव्हनेच रेमीला वेगवेगळ्या चवी 'शिकवल्या' आहेत. त्यामुळे समस्त उंदीर ज़मातीत रेमी एक क्रांतिकारी बनलाय. लाडका भाऊ एमिल आणि वडील, मित्रपरिवार यांच्याशी एका अपघाती विरहानंतर रेमी गुस्तॉव्हच्याच बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या पूर्वप्रसिद्ध रेस्तराँ मध्ये शिरतो. पारंपारिक प्रसिद्ध खाद्यपदार्थांची वाट न चोखाळता चायनीज़, मेक्सिकन अशा पदार्थांतून रेस्तराँचा कायापालट करणाचे गुस्तॉव्हचा उज़वा हात असलेल्या स्किनरचे बेत दिवंगत गुस्तॉव्हचा मुलगा लिंग्विनीच्या अनपेक्षित आगमनामुळे उधळले ज़ाण्याच्या बेतात आहेत. आधी पोऱ्या म्हणून भटारखान्यात रुज़ू झालेला लिंग्विनी रेमीच्या करामतींमुळे कोणतेही पाककौशल्य नसतानाही एक अप्रतिम, चवदार सूप बनवतो आणि अल्पावधीतच एक कुशल आचारी म्हणून ओळखला ज़ाऊ लागतो. लिंग्विनीमुळे आपले बेत उधळले ज़ाणार असल्याची तसेच लिंग्विनीकडे कोणतेही पाककौशल्य नसून कोणाच्यातरी 'छुप्या' मदतीने निरनिराळे पदार्थ बनवले ज़ात आहेत, याची ज़ाणीव झाल्यावर स्किनरने या प्रकरणाचा छडा लावायचा निश्चय केलाय; ज्याने लिहिलेल्या प्रतिकूल समीक्षेच्या धक्क्याने गुस्तॉव्ह मरण पावला, तो एगो नामक पाकसमीक्षक लिंग्विनीवरही डोळा ठेवून आहे; एकीकडे भाऊ, वडील, मित्रपरिवार आणि दुसरीकडे गुस्तॉव्हचा मूलमंत्र आणि सदैव बरोबर असलेले त्याचे आभासी अस्तित्त्व (त्याला 'भूत' म्हणवत नाही) अशा द्विधा मन:स्थितीत रेमी सापडलाय; भटारखान्यातलीच एक उत्तम आचारी असलेल्या कॉलेटच्या प्रेमात लिंग्विनी अडकलाय, हे रेमीला कळलंय, त्याला ते प्रेम सफल व्हावंसं वाटतंय पण त्याला एगो आणि स्किनर दोघांशी भिडायचंयसुद्धा! तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही, इतक्या विविधांगी कल्पना आणि मानवी भावनांचे चित्रण रेमी, एमिल,लिंग्विनी,कॉलेट, स्किनर, एगो यांच्यापासून रेस्तराँमधील ग्राहक, भटारखान्यातील इतर कर्मचारीवर्ग, रस्त्यावरचे लोक, पशुपक्षी यासारख्या बारीकसारीक गोष्टी या सगळ्यांमधून करण्यात आले आहे. रेमी आणि लिंग्विनीची अपघातानेच झालेली मैत्री, रेमीच्या वडिलांचे त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न, एमिल आणि रेमीचे अपघाती पुनर्मिलन, स्किनरशी दुष्मनी, कॉलेट आणि लिंग्विनीचं प्रेम, रेमीने बाबांना ऐकवलेलं 'चेन्ज इज़ नेचर' हे वाक्य, समस्त उंदीरमित्रांनी स्किनरची खाद्यपदार्थांच्या गोदामात बांधलेली मुटकुळी हे सगळंच प्रेक्षणीय आणि कौतुकास्पद! मनापासून दाद देण्याज़ोगं! रेमीच्या साथीने आणि प्रमुख सहभागाने बनवलेली 'रॅट-अ-टुइ' खाऊन एगोला आठवलेली स्वत:च्या आईच्या हातची चव आणि त्याच्या डोळ्यांत तरळलेलं पाणी हा चित्रपटाचा 'डिफ़ायनिंग सीन'!
भिवया आणि डोळ्यांच्या कल्पक हालचाली आणि त्यातून जिवंत झालेली पात्रं हे डिस्नेच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य या चित्रपटातही ठळकपणे ज़ाणवतं. आनंदित रेमी, रात्रीचे झगमगीत पॅरीस पाहून भारावलेला रेमी, घाबरलेला रेमी जितक्या कल्पकतेने रंगवलाय, तितक्याच कल्पकतेने त्याचे टवटवीत, उभारलेले कान गळपटवून आणि भिवया कपाळाच्या मध्यभागी एकवटवून 'तो निराश आहे' हे दाखवलंय. आळशी, बावळट लिंग्विनी, कॉलेटचे चुंबन घेऊन चक्रावलेला लिंग्विनी, 'टॉमबॉय' कॉलेट आणि लिंग्विनीवर रागावून मग रडणारी कॉलेट - एकूण एक पात्रे प्रेमात पडावीत अशी आहेत. चित्रपटाचा नायक रेमी हा तर टॉम ऍंन्ड जेरीमधल्या जेरीनंतर नंबर दोनचा 'क्यूट' उंदीर असावा; कदाचित मिकी माउसपेक्षाही जास्त. एक 'काहीच्या बाही', 'इमॅजन व्हॉटेवर' प्रकारची गोष्ट असली, तरीही तर्कसुसंगत आहे. कोठेही विस्कळीत झालेली नाही. 'लिंक तुटली' हा प्रकार कोठेही बघायला मिळत नाही. प्रसंगानुरूप श्रवणीय पार्श्वसंगीत आणि त्याला अनुकूल असा रंगीबेरंगी बॅकड्रॉप ही डिस्नेची खासियत प्रत्येक फ़्रेममधून ज़ाणवते. रंगसंगतीही प्रसंगानुरूप आणि भावानुरूप. पात्रांना त्यांचे वय, स्वभाव आणि कथानकातील भूमिका यांच्या अनुसारच आवाज़ देण्यात आले आहेत; आणि ते देताना फ़्रेंच उच्चारांकडे कटाक्षाने लक्ष पुरवण्यात आले आहे. अंधाऱ्या गोदामाचा दरवाज़ा उघडल्यानंतर आत येणाऱ्या प्रकाशाचा मार्ग, त्यानुसार होणारी सावल्यांची हालचाल, विविध प्रकारच्या भाज्या ठराविक पद्धतीने कापण्याचे आचाऱ्यांचे कौशल्य हे बारकावेही अचूकपणे टिपण्यात आले आहेत. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स (आपण पात्राकडे/वस्तूकडे/दृश्याकडे वरच्या दिशेने तिरकस पाहत आहोत, असे मानून त्या वस्तू/पात्राचे/दृश्याचे केलेले चित्रण), 'ओवर द शोल्डर्स' शॉट्स (मुख्य पात्रावर एखाद्या दुय्यम वस्तू अगर पात्राच्या आडून केंद्रित केलेला कॅमेरा आणि टिपलेल्या हालचाली) अशा उत्कृष्ट चित्रणकौशल्याची ज़ोड मिळाल्यानंतर चित्रपट प्रेक्षणीय आणि खासम् खास झाला नाही तरच नवल. आणि चित्रपट आणखी छान करायचा म्हटला तर तो फ़ोर-डी करता येईल (तो 'छोटा चेतन' बघताना लावलेला काळा गॉगल म्हणजे थ्री-डी आणि त्याच्या ज़ोडीला तुमची सीट हादरवणारे, तिची उंची अलगद कमीजास्त करून नि कार्पेट सळसळवून किंवा तत्सम पद्धतीने तुम्ही स्वत: पडद्यावरील घटनांमध्ये सामील आहात, असा भास निर्माण करणे म्हणजे फ़ोर-डी) पण दोन-एक तासांच्या चित्रपटासाठी असे आभास निर्माण करणे आव्हानात्मक आणि कदाचित आर्थिक तसेच तांत्रिकदृष्ट्या, कथानकाच्या दृष्टिकोनातून 'फ़िज़ीबल' (मराठी प्रतिशब्द? नकोच!) नसावे.
भारतात हा चित्रपट आहे त्या स्वरूपात पहायला मिळाल्यास उत्तम! नाहीतर रेमीचे 'रामू' करून नि हास्यास्पद भाषांतरे करून उत्तम चित्रपटांना गालबोट लावण्याची परंपरा कायम राखली ज़ाण्याचीच शक्यता जास्त. मात्र असा उत्तम चित्रपट प्रत्येक लहान मुलापर्यंत सर्वदूर पोचवण्याचे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे चित्रपट वितरकांचे प्रामाणिक प्रयत्न असतील, तर निदान पात्रांच्या नावांशी आणि संवादांशी झालेली तडज़ोड सहन करण्याचीही तयारी ठेवणे श्रेयस्कर.
एकुणातच, लहानांबरोबरच मोठ्यांनीही मनमोकळेपणाने आनंद लुटावा, असा मस्त चित्रपट!

अधिक माहितीसाठी: रॅट-अ-टुइ

2 comments:

Ajit said...

इथे भारतात कधी येतोय हा सिनेमा असं झालंय खरं!

Mints! said...
This comment has been removed by the author.