Wednesday, April 04, 2007

शब्दसाधना

मनोगत या संकेतस्थळावर श्री. द्वारकानाथ कलंत्री यांनी शब्दसाधना नावाचा एक चांगला प्रयोग चालवला आहे. व्यवहारातील, शास्त्रीय शिक्षणातील अनेक प्रचलित बिगर-मराठी शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द शोधणे/तयार करणे असे या प्रयोगाचे स्वरूप आहे. प्रस्तुत शब्दसाधना एक 'प्रयोग' म्हणून निश्चितच स्तुत्य आहे. प्रयोगातून काय साध्य होणार आहे, माहीत नाही. पण 'करून पहायला काय हरकत आहे' या भूमिकेतून करण्यास हरकत नसावी. एडिसनच्या बाबतीत असे ऐकले आहे की फ़िलामेंट म्हणून १२०० विविध वस्तू अयशस्वीपणे वापरून झाल्यानंतर तो म्हणाला की "या १२०० वस्तू फ़िलामेंट म्हणून वापरता येणार नाही, हे तरी मी आता १००% खात्रीने सांगू शकतो". शब्दसाधनेचेही असेच काहीसे असावे असे वाटते. मुद्दा हा आहे, की एडिसनकडे १२०० वस्तू वापरण्याइतकी चिकाटी होती, ती या प्रयोगात असावी. प्रयोगाअंती ज़े गवसेल, त्याचा उपयोग काय आणि/किंवा कसा, ही चर्चा काहीतरी गवसल्यानंतरच करता येईल. प्रस्तुत प्रयोगामागील प्रयोगशीलता, जिज्ञासू वृत्ती आणि धडपड याला सक्रीय पाठिंबा द्यायला निश्चितच आवडेल.
प्रयोगाच्या संभाव्य निकालांचा किंवा त्याच्या अधिक्षेत्राचा सखोल विचार केल्यावर, शास्त्रीय लेखन, संशोधन आणि अभ्यास या क्षेत्राकडून या प्रयोगाला तसेच त्याच्या निकालाला मिळणारी मान्यता याबाबत मी पूर्णपणे साशंक आहे. नवनवीन आणि कदाचित शुद्ध मराठी शब्दांमुळे प्रचलित सोप्या आणि कदाचित अमराठी शब्दांद्वारे चालू असलेल्या अभ्यासाला,संशोधनाला प्राप्त होणारे अतिक्लिष्ट रूप निश्चितच मान्यताप्राप्त आणि उपयुक्त नाही. ऑपरेटिंग सिस्टमचा अभ्यास करताना थ्रेडसना 'धागा', प्रोसेसेसना 'प्रक्रिया' असे संभाव्य शब्द योजणे (मराठीच्या दुराग्रहापायी हे आणि असे शब्द इतरत्र पाहण्यात आले आहेत) हे त्यांच्यातला 'शास्त्रीय'पणा किंवा त्यांमागे दडलेला शास्त्रीय अर्थ यांसाठी निश्चितच मारक आहे. त्यातून ज़वळपास सारखेच भासणारे शास्त्रीय शब्द त्यांच्या अंगभूत गुणधर्मांमुळे शास्त्रीय संदर्भांत वेगळे असतात. ही सूक्ष्म अर्थभिन्नता (subtle differences) पर्यायी मराठी शब्दांच्या माध्यमातून समाविष्ट केली ज़ाईलच असे नाही. उदाहरणार्थ डेटाबेस आणि डेटा वेअरहाउस. डेटाबेस म्हणजे विदागार. मग डेटा वेअरहाउस म्हणजे काय? डेटाबेस क्रॅश झाला म्हणजे विदागार कोसळले. पण 'कोसळणे' या क्रियापदाला अपेक्षित असलेला 'डोलारा', 'उत्तुंग बहुमज़ली इमारत', आशाअपेक्षा, स्वप्नांचे बंगले यांपैकी त्या बिचाऱ्या विदागारात काहीच नाही. त्यातून शास्त्रीय संशोधन हे केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरतेच अर्यादित नाही; ते जगभर चालू असते. शास्त्रीय ज्ञानाची वैश्विक देवाणघेवाण होत असते. उद्या अशाच एका जागतिक परिसंवादात अमेरिकन, चिनी, जपानी, युरोपीय संशोधकांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना डेटाबेससाठी 'विदागार'चा हट्ट धरणे यात काही समंजसपणा दिसत नाही. शास्त्रीय शिक्षणाच्या क्षेत्रात तरी शब्दसाधनेच्या संभाव्य निकालांचा आवाका इयत्ता दहावीच्य पठ्यपुस्तकांच्या पुढे ज़ाईलसे दिसत नाही, आणि तसा ज़ाऊही नये! मूलभूत शास्त्रीय शिक्षणातून अशा योग्य शब्दांची ओळख होणे स्पृहणीय आहे, पण या पायाभूत शिक्षणाद्वारे एकदा उच्च शिक्षणाचे दरवाज़े खुले खाले, की मराठमोळ्या शास्त्रीय शब्दांचे महत्त्व 'अँटिक पीस'पेक्षा फार वेगळे असेल, असे मला वाटत नाही. विमान आकाशात उडवायलाच आणि उडायला लागेपर्यंतच लाँचपॅड आवश्यक असते ऍट्रिअम आणि व्हेंट्रिकलसाठी अलिंद आणि नीलय माहीत असावे; पण माहीतच असावे.
प्रादेशिक संपर्क आणि प्रसार माध्यमे, दृक् श्राव्य माध्यमे (ज़से बातम्या इ.), व्यासपिठावरील मराठी या क्षेत्रांमध्ये शब्दसाधनेच्या माध्यमातून अपेक्षित सुधारणा निश्चितच घडवता येतील. मात्र चित्रपट, मालिका इत्यादींमध्ये - जे साहित्यिक किंवा लिखित मराठीपेक्षा दैनंदिन जीवन, व्यापारउदीम, शास्त्रीय/राजकीय/सर्वसामान्य आणि सर्वमान्य सामाजिक कल्पना यांचे प्रतिबिंब आहेत; ज्यातून 'बोलले' ज़ाते, संवाद साधला ज़ातो - या साधनेच्या निकालाबरहुकूम नवीन (योग्य?) शब्दांचा भरणा झाला, तर त्याला मान्यता मिळणे नाही. साधेसोपे शब्द सापडले, ते ज़र सद्य शब्दांची क्लिष्टता कमी करत असतील, तरच त्यांना मान्यता मिळावी. पण बोली मराठी, शास्त्रीय शिक्षण या क्षेत्रामधील डेटाबेससारख्या शब्दांमधला सोपेपणा विदागारसारख्या शब्दांतून आणखी सुधारेल, असे म्हणणे मला पटत नाही. किंबहुना त्यामुळे क्लिष्टता वाढते. उद्या माझ्या बंगाली मैत्रिणीला 'चल चित्रपट देखने जाते है' म्हटले (चित्रपट हा हिंदी शब्दही आहे आणि आम्हा दोघांची संवाद साधण्याची सामाईक भाषा हिंदी किंवा इंग्रजी आहे, हे गृहीत धरून), तर संपलेच! भिन्न संस्कृती, भाषा, आचारविचार यांची सरमिसळ आपल्याच समृद्धीसाठी उपयुक्त ठरत असेल, तर आपलेच पाय ओढण्याचा पारंपारीक मराठी बाणा काय कामाचा? मराठी भाषा प्राचीन काळापासून आज़तागायत कित्येक अमराठी शब्दांच्या समावेशातूनही समृद्धच होत आली आहे, आणि राहीलही. त्यामुळे अमराठी शब्दांच्या समावेशातून तिच्या अस्तित्त्वाबाबत चिंता करण्याचे काहीच कारण नाही. त्याचबरोबर शब्दसाधनेच्या प्रयोगाला तात्त्विक विरोध असणाऱ्यांच्या मराठिविषयीच्या प्रेमाबाबत शंका घेण्याचेही कारण नाही. इंग्रज़ाळलेली व्यापारी मराठी वर्तमानपत्रे, बातमीपत्रे, सरकारी दप्तरे, लिखित साहित्य इत्यादींमधील अपेक्षित सुधारणा हे या साधेनेचे उद्दिष्ट असलेच पाहिज़े, त्याबाबत हट्ट ज़रूर असावा; पण दैनंदिन व्यवहार आणि शास्त्रीय शिक्षण या क्षेत्रांमध्ये अशा शब्दांचा प्रवेश ही घुसखोरी किंवा अतिक्रमण ठरू शकेल आणि हट्टाला दुराग्रहाचे किंवा अतिरेकाचे स्वरूप प्राप्त होईल, ज़े निश्चितच अपेक्षित नसावे. प्रयोगाचे अपेक्षित अधिक्षेत्र निश्चित करून ही धडपड पुढे रेटली, तर उत्तम!
तेव्हा हा प्रयोग यापुढे या निश्चित मर्यादित उद्दिष्टांसह पुढे नेल्यास आनंद होईल. शब्दसधनेत याआधीही काही वेळा सहभागी होतो, पुढेही राहीन. पण त्याचबरोबर मराठीतीलच एक ख्यातनाम साहित्यिक दत्तो वामन पोतदार यांचा 'बहुभाषक व्हा' हा संदेश येथे उधृत करायचा मोह आवरत नाही.

3 comments:

Meghana Bhuskute said...

sampoornataha sahamat.

MilindB said...

चक्रपाणि,

मनोगतावर ह्याविषयी गरमागरम चर्चा झालीच आहे. पण ज्यांचे मत मला अत्यंत महात्वाचे वाटते, त्या शैलेश खांडेकरांनी http://vidagdha.wordpress.com/2007/04/04/navprayojan/ येतहे त्यांचा ह्या विषयी लेख प्रकाशित केलाय. तो कृपया वाचावा ही विनंती.

- मिलिंद

Chakrapani said...

उपरोक्त दुव्यावरील शैलेश खांडेकरांच्या लेखातील ठराविक मुद्द्यांशी सहमत आहे. या प्रयोगात मी स्वत:सुद्धा अनेकदा सक्रीय सहभाग घेतला आहे. एक प्रयोग आणि धडपड या दृष्टीने या उपक्रमाला पाठिंबाही आहेच. पण त्याचवेळी नव्शब्दशोधाच्या प्रयोगाचे निकाल हे त्यांचे अधिक्षेत्र आणि आवाका (domain and scope) यांचे भान न ठेवताच चिकित्सेखाली आणले ज़ाऊ नयेत, तसेच या प्रयोगाची स्वरूप आणि अल्पकालीन उद्दिष्टे आणि दीर्घकालीन उद्दिष्टे सुस्पष्ट आणि सर्वमान्य होणे हे प्रयोगाच्या यशस्वितेसाठी परिणामकारक ठरणार आहे, हे माझे ठाम मत येथे पुनरुधृत करू इच्छितो.