Saturday, May 08, 2021

शहाण्या वेड्याची गोष्ट

 

घाटावरच्या गंगारतीच्या झांजा, घंटा, शंख वाजू लागले, तसे वेड्याने मोठ्या कष्टाने डोळे उघडले.

डोळ्यांना समांतर वाहत जाणारी गंगेच्या प्रवाहातील दिव्यांची फुलं बघितली, आणि शंकराच्या देवळाबाहेर उडणाऱ्या

प्रसादासाठीच्या झुंबडीत नंबर लागायची त्याची शक्यता केव्हाच मावळल्याचा साक्षात्कार त्याला झाला.

प्रसादातला डाळभात वेड्याला प्राणप्रिय होता. तो मिळाला, की बाकी काही नको असे. रात्रीच्या अंधारात,

लाखो दिव्यांच्या लखलखाटात, वाळक्या काटकीसारखं स्वतःचं शरीर, मणभराचं पोतं उचलावं इतक्या

कष्टाने, जोर लावून उचललं, आणि वेडा पाय फुटतील तिकडे झोकांड्या खात जाऊ लागला. उजव्या

पायाच्या तळव्याला चिकटलेलं शंकर-पार्वती-गणपतीचा फोटो असलेलं कसलंतरी palmphlet डाव्या

पायाच्या चवड्याने, शेणात पाय पडल्याच्या भावनेने बाजूला केलं. गणपतीचा प्रसन्न चेहरा दिसल्यावर मात्र

त्याला स्वतःचीच शरम वाटली, आणि त्याने तो कागद उचलला. भेळीचा शिळा वास, आठ-दहा अर्धवट ओले

कुरमुरे आणि थोडी शेव चिकटलेल्या त्या कागदावर स्वतःच खरडलेलं काहीतरी किलकिल्या डोळ्यांनी

बघितलं. काही केल्या त्याला ते वाचता येईना. शेवटी कुठलासा एक शब्द लागला, आणि तो कागद चुरगळून

त्याने चड्डीच्या खिशात कोंबला. आता मात्र त्याचे पाय शिस्तबद्ध लयीत घाटाशेजारच्या स्मशानाच्या दिशेने धावू लागले.

.....

तो आणि ती गंगाकिनारी एकुलत्या एक मळकट बाकड्यावर एकदम आरामात बसले होते. गेल्या सहा-आठ महिन्यांत फोटोफिचर्सच्यानिमित्ताने घाटावर भटकताना, हायजिन-फायजीन लाडांना गंगेतंच तिलांजली देऊन, दोघे घाटावरचेच झाले होते. बिस्लरीच्या बाटल्याजाऊन हाती चहाचे कुल्हड, आणि मार्लबोरो जाऊन ओठात गोल्ड-फ्लेक, हा आमूलाग्र बदल दोघांच्या लक्षातही आला नव्हता.वेड्याने मात्र तो बरोबर हेरला होता. बाई सिग्रेट पिते, या चमत्काराचा त्याने इतका धसका घेतला होता, की एकदाच तिच्या कानशिलातलगावून सालीला सरळ केलं पाहिजे, असा विचार वेड्याच्या मनात कैकदा येऊन गेला होता. पण घाट खूप दयाळू आहे, तो सगळ्यांनाआपलंसं करतो, आपल्यात सामावून घेतो आणि मग सगळ्या वेडेपणाचा शेवट घाटावरच होतो, या शहाण्या समजुतीने वेड्याने स्वतःलाआवरलं होतं. तिची सिग्रेटची सवयसुद्धा अशीच तिच्यासोबतच कधीतरी विझेल, हे नक्की.

तो नेहमी दोन्ही हातांच्या चाफेकळी आणि अंगठ्याच्या फ्रेममध्येच तिच्याशी सगळं बोलायचा; आणि तिलाही कधीपासून त्याचीच भुरळपडलेली. एरव्ही ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपायची आणि मग वेड्याच्या डोळ्यांतल्या फ्रेममध्ये ते दोघे चिमणाचिमणी आदर्श क्लिकहोऊन जायचे. ती त्याच्या मांडीवर झोपलेली मात्र वेड्याला काही केल्या आवडायचंच नाही. कारण तेव्हा वेड्याच्या फ्रेममध्ये ती नसायचीच.तेव्हा तोही कधीतरी एखादं मिनिट फ्रेममधून बाकड्यावरच गायब व्हायचा - अगदी एखादंच मिनिट - नि वेड्याच्या पोटात स्वतःचंच किंचितपूर्वायुष्य गलबलून यायचं. स्वतःच्या तिच्यासकट. एक दिवस बाकड्यावरच्या तिने इतकं मोठं व्हावं, की आपल्या फ्रेममध्ये मावूच नये,असं वेड्याला वाटायचं; आणि मावलीच तर फक्त ती, एकटी. दुसरं कोणीच नको. तिने कायम आपल्याच मांडीवर झोपायला हवं,नाहीतर आपण फक्त तिच्याच कुशीत, हे आणि इतकंच वेड्याला हवं होतं. पण तिला हे कोण समजावणार? चालू वर्तमानकाळाला समांतरकुठल्याश्या वेगळ्या काळात, वेगळ्या दुनियेत आपली तिच्याशी जन्मोजन्मीची ओळख आहे, असणार आहे, या शहाणपणावर वेड्याचीकुणीतरी बोळवण केली होती, आणि या चुत्यापणावर पूर्ण विश्वास ठेवून, वेड्याने या जन्मातील ओळख कागदाच्या चिटोऱ्यांवर खरडलेल्याकवितांमध्ये बंदिस्त करून टाकली होती.

इतक्या कविता घाटावर अधूनमधून फडफडत; वाळक्या छोट्या पानांसोबत, काड्यांसोबत मधूनच चक्राकार उडत, की कुणीतरी सगळ्या गोळ्या करून एकत्र शिवल्या असत्या, तर वेड्याची डायरी नाहीतर कवितासंग्रह झाला असता. पण त्यात गाडलेल्या ओळखीमागच्या दोन चेहऱ्यांमागची विसंगती वेड्याच्या नजरेतून सुटली होती. तिचा चेहरा आणि वेड्याच्या पूर्वायुष्यातला चेहरा पूर्णपणे वेगळा होता, इतकंसं मूलभूत शहाणपण वेड्याच्या वाटेला कसं आलं नाही? की आधीच्या चेहऱ्याने नव्या चेहऱ्याचं वेड लागून वेड्याचा वेडा झालेला?


आज मात्र त्या दोघांमध्ये बेबनाव आहे हे नक्की. दोघेही नुसते लांबवर बघत आहेत. त्याची एकही फ्रेम आज काही केल्या सेटच होत नाही. स्वतःच्याच हातांची बोटं एकमेकांत गुंतवून तो गपगुमान बसलाय, तिच्यासारखाच, हे चाणाक्ष वेड्याने हेरलं नसतं तरच नवल. बाकड्याच्या दोन टोकांना दोघे बसलेले; नुसतेच बसलेले. तिच्या backpackने  वेगळे केलेले. शेवटी तो उठून चालू पडला, आणि त्याच्यामागोमाग backpack घेऊन ती. आज मात्र गोल्डफ्लेकच्या धुराच्या चिमुकल्या लयकारीऐवजी, पलीकडच्या तीरावर जळणाऱ्या कुणा तिघांच्या चितांच्या धुराचे हे मोठाले ढग.


हा क्लिक करायला वेड्याचं मन धजावेचना. त्याला हव्याश्या क्लिकच्या, हव्याश्या चेहऱ्याच्या शोधात, वेडाही त्यांच्या मागोमाग चालू लागला.


.......


शंकराच्या देवळाबाहेरच्या पटांगणातल्या अन्नछत्रात वेडा त्या क्लिकच्या भुकेची चुळबुळ घेऊन बसला होता. सवयीप्रमाणे ती दोघं वाढायला आली. एरव्ही भाताची भली, जड परात लीलया पेलणारी ती आज विमुख होऊन भात सारत होती, आणि तिच्यामागे तो तसाच विमुख, यांत्रिकपणे डाळीची बादली घेऊन पळीने वाढत येत होता. वेड्याच्या पेपरप्लेट समोर वाकून त्याला भात वाढताना तिची वेड्याशी नजरानजर झाली. आपण ओळख दाखवावी का, असा वेडा विचार वेड्याच्या मनात होता, इतक्यात तिने शेजारी उभ्या असलेल्या त्याच्याकडे काकुळतीने बघितलं. आपण तिला ओळखतच नाही, अशा थाटात तो वेड्याच्या पेपरप्लेटमध्ये, इस्त्री केलेल्या चेहऱ्याने, मख्ख बघत राहिला. नाईलाजाने उठताना डाव्या खांद्यावरून तिची लाल, मलमली ओढणी वेड्याच्या प्लेटमध्ये जराशी सरकली काय, वेड्याची नजर तिच्या पिवळ्या टॉपमागच्या गोऱ्यापान छातीपर्यंत पोचली काय, त्याच्या हातातली बादली तिथेच पडली काय, वेड्याची बखोट धरून त्याने वेड्याला कानफटवायला सुरुवात केली काय...अनावर झालेल्या शंभरएक भुकांचा आगडोंब तिकडेच लाथाबुक्क्यांत उसळला आणि वेड्याला पळता भुई थोडी झाली.


.......


दुपारच्या त्या आठवणींचा ठणका वेड्याला आता अंगाखांद्यावर असह्य झाला होता. स्मशानाबाहेरच्या चबुतऱ्याच्या शेवाळल्या, करड्या, हिरवट, दगडी खांबाची भेग वर्षानुवर्षे रुंदावत गेलेली. वेड्याने आज दुपारपासूनची क्लिकची भूक, पोटातली भूक, तिची मलमली, लाल ओढणी, अन्नछत्रातल्या दुपारच्या आठवणी आणि घाटावरच्या सगळ्या आठवणी त्या किंचित भगदाडात कुठल्यातरी ऐवजासारख्या खुपसून ठेवल्या होत्या. दुपार संपतासंपता आपण देवळातून इकडे कधी कसे पोचलो आणि इकडून मागे घाटावर कसे कधी, हे त्याला काही केल्या आठवेना. स्मशानात शिरताना अंधारातही त्या ओढणीचा लालेलालपणा उठून दिसत होता. वेड्याला खुणावत होता. अशीच लाल ओढणी आपल्या पूर्वायुष्यातही कधीतरी येऊन, खूप काहीतरी देऊन गेली होती; त्याची परतफेड करायचीच आठवण ही आणि ही जिची आहे, ती घाटावरची ती, आपल्याला करून देत आहेत की काय, असं वेड्याला वाटलं. भगदाडापाशी वळलेले त्याचे पाय निमूट माघारी फिरले. चबुतऱ्याच्या पायथ्याशी बसताबसता त्याने मघाचं शंकर-पार्वती-गणपतीचा फोटो असलेलं ते कसलंतरी चुरगळलेलं palmphlet चड्डीच्या खिशातून बाहेर काढलं. त्याला लागलेला मघाचा शब्द होता गुलमोहर. अस्वस्थ होऊनच त्याने चड्डीच्या खिशात, इकडेतिकडे चाचपून बघितलं; पण तुटकं पेन - की पेन्सिलचा बोटभर तुकडा - काहीतरी मागे घाटावरच हरवलं होतं. मनातल्या मनातच वेड्याने उरलेल्या ओळी पूर्ण करून टाकल्या -


मोहरला गुलमोहर, भरली वाट पाकळ्यांनी

धग खेळवली त्याची, या अरभाट पाकळ्यांनी

ऋतुचक्र तुझ्या स्मरणांचे, येते, गोठुन जाते

धुगधुगीचि नेमुन द्यावी, वहिवाट पाकळ्यांनी


पूर्ण झालेल्या या ओळी चुरगळून तो बोळा आतल्या कुठल्याश्या अनोळखी चितेत भिरकावून द्यावा, अशी इच्छा वेड्याला झाली. पण हा

दुपारचा ठणकाच अजून थांबला नसताना, नव्या लाथाबुक्क्यांच्या ओलाव्याचा झवता गाढव अंगावर कशाला घ्या, हा शहाणपणा सुदैवाने, वेळीच सुचला आणि वेडा स्मशानातून दुपारपासूनची भूक घेऊन बाहेर पडला. 


कवितेचा पिंड ठेवला

की कवीचा पटकन

कावळा होतो*


या ओळींना जागून मग मी त्या palmphletला चिकटलेल्या शेवकुरमुऱ्यांवर तुटून पडलो.

....... 

*श्रेयअव्हेर -

कवीला कवितेचा पिंड द्यावा
म्हणजे तो आपली
धिंड काढीत नाही
अन् डोहांत पडलेल्या चंद्राची
खिंडही अडवीत नाही…
कवितेचा पिंड ठेवला
की कवीचा पटकन्
कावळा होतो

  • सदानंद रेगे

Friday, April 16, 2021

केसर

 “Mom, how about I take Kesar tonight with me for trick or treat?!” गेविनच्या डोक्यात संध्याकाळ चालू झाली होती.

“Are you kidding me?” स्टेला जराशी अवाक होऊनच म्हणाली

“Why? what’s wrong? She’s already in her costume!” गेविन खो खो हसत म्हणाला

“Now that’s mean! You must apologize!” केसर आवडावीशी नसली, तरी जितके दिवस, महिने ती राहत होती, त्यामुळे, नाही म्हटलं तरी स्टेलाला तिचा लळा लागलाच होता.

“I am so sorry Kesar. Didn't mean it that way; I was just kidding!” केसरच्या गालावरून हात फिरवत गेविन म्हणाला.


केसर नेहमीसारखीच हसली. काय बोलावं तिला कळेना. पण काहीतरी सांगायचंय, या स्थितीपर्यंत डोक्यातले विचार येईतोवर, गेविन दप्तर घेऊन स्कुलबससाठी घराबाहेर पडलाही होता. अर्थात केसरला काहीही सांगता आलं असतं का, हा प्रश्न मला पडलाच.


...


केसर कधीच काहीच बोलायची नाही. इंग्रजी येत नाही, हा भाग अलाहिदा; त्यामुळे स्टेला आणि गेविनशी संवाद खाणाखुणांतूनच चालायचा. पण वसईला असताना सुद्धा ती फारशी बोलायची नाहीच. आपण बरे, आपलं काम बरं. दोन वेळचं जेवण, अंगावर घालायला चार पातळं यातच तिने समाधानी असावं, याची काळजी मी घेत असे. चहा मात्र तिला प्राणप्रिय. मनात येईल तेव्हा, मनाला येईल तेव्हढा चहा बनवून, तो हवा तेव्हा प्यायची मुभा मी तिला दिली होती. खडेमीठ टाकलेला चहा खिरीच्या चवीने पिणारी, मी पाहिलेली केसर पहिलीच! चहा फुंकून घोट घेताना, तिच्या रापलेल्या चेहऱ्यावरच्या, डोळ्यांच्या कडेच्या सुरकुत्या बघून, कुणी म्हटलं नसतं ती गेरूच्याच वयाची आहे. अर्थात गेरू आणि केसर एकमेकांचे कोण, केसर आणि दुलबा एकमेकांचे कोण, याविषयीच्या गजाल्या गावकरी करत नसत, असं नाही; पण दुलबा भंडाऱ्याचा दराराच असा होता, की त्या चावडीवरच्या गप्पा तिथेच धगधगत आणि तिथेच विझून जात.


कांताबेन अनपेक्षितरित्याच गेली आणि तिचे अंत्यसंस्कार करायला दुलबा सीमेवरून परतला, तो केसरला घेऊनच. तोवर केसर माझ्याबरोबर आणि मी केसरबरोबर असे फरफटत होतो. दोघांचीही इच्छा नसताना. झुंजूमुंजू झाल्यावर बापाच्या साथीला केसर मिठागरात शिरली, की ती नेईल तिथे मी तिच्याबरोबर. पन्नास अंश तापमानात ही बया यंत्रमानवाच्या सफाईने सगळी कामं करे. गट्र्रर्रगट्र्रर्रगट्र्रर्रगट्र्रर्र पंप जो सकाळी चालू होई, तो थेट संध्याकाळीच थांबे. त्याने उपसलेलं खारं पाणी कित्येक मीटर पसरलेल्या खाजणवाफ्यात समतल पसरलं, की मीठ तयार होऊन, ते उपसायची वेळ होईतोवर, केसर आणि मी, पंजाबपासून मुंबईपर्यंत सगळीकडे भटकून येत असू. मुळात, कच्छच्या रणाबाहेर असेही देश आहेत, हे आम्हाला विविधभारतीमुळे अपघातानेच कळलं. केसरीया बालमा ऐकून तर केसर इतकी खूष व्हायची, की सतत तेच एक गाणं विविधभारतीने वाजवलं असतं, तर केसर त्या कार्यक्रमाच्या निर्मात्याची आजन्म दासी होऊन राहायलाही तयार झाली असती.


दुलबाने तिला कधी दासीसारखं वागवलं नाही हे, खरं. पण स्वतःच्या आयुष्यातली कांताबेनची जागा इतर कुणाला मिळणार नाही, हेसुद्धा त्याने ठरवून टाकलंच होतं. त्याच्या दगडी अस्तित्त्वावर, पिळदार बाहूंवर आणि मिल्ट्री खाक्यावर केसर भाळली होती खरी, पण अडनिड्या वयातला तो मोह मीच तिला आंदण म्हणून दिला होता, हेही तितकंच खरं. मिठागरात मरेतोवर काम केल्यावर तिला उजवली, की आपलं काम झालं; मग ती दुसऱ्या कुणाचीतरी नमकहलाल, हे तिच्या बापानं ठरवलेलंच होतं. दुलबाच्या डोक्यात मी हे वेळीच शिरू दिलं, आणि त्या रांगड्या गड्यातल्या बापाला जागं केलं, हे एका अर्थी बरंच झालं. तरी केसरच्या बापानं पाचशेच्या खाली घेतले नाहीतच! काही का होईना, रणातून बाहेर पडून ती वसईत रुजली, हे काही कमी नाही.


ही बया कोण, असा प्रश्न गेरुला न पडता, तरच नवल. पण वडिलांपुढे साक्षात ब्रह्म्याचंही काही चाललं नसतं, गेरू तर मर्त्य मानव! यदाकदाचित दुसरी आई म्हणून केसर डोक्यावर बसायची पाळी आलीच, तर थेट पळून जाऊन पणजी गाठायची आणि मग इकडे मरेतोवर परत यायचं नाही, हे त्याने कधीच ठरवून टाकलं होतं. तसंही आपला जन्म या पाड्यात सडण्यासाठी झालाच आहे कुठे?! आपलं नशीब उघडणार गोव्यात, हे सुद्धा त्यानेच ठरवलं होतं. आणि तिकडून मग थेट हॉलिवूड! मग आपण आणि गिटार बस्स! दुसरं कोणी नाही! दुलबाला सांगायची छाती नव्हती, म्हणून केसरकडे बोलून दाखवायचा. पण बोलेल तर ती केसर कसली? असं मस्त हसायची, की गेरू आश्वस्त होऊन जायचा. गोव्यातल्या स्वप्नांनी. त्याच्या स्वप्नांमधला चतकोर तुकडा आपल्यासाठीसुद्धा आहे, हे ठरवण्याचं धैर्य केसरकडे कुठून आलं, हे मात्र मला आजतागायत कळलेलं नाही. पण त्या धाडसाच्या जोरावर, कधीही न बोलणारी केसर, गेरूच्या गिटारच्या तारांवर गुणगुणू लागे, तेव्हा गेरूचा आत्मविश्वास थेट पणजीत पोचलेला असायचा. आणि त्याच्या साथीने केसरसुद्धा मिरामारच्या सोनपिवळ्या वाळूत.


सगळ्यांचीच सगळीच स्वप्नं पूर्ण होत असती, तर केसर आणि मी कधीच एकमेकांपासून वेगळे झाले असतो. किरिस्ताव पोरांच्या घोळक्यात गिटार वाजवत बसलेल्या गेरूला दुलबाने लाथा घालत घरी आणला, तिथेच त्याच्या कपाळावरचा केसर नावाचा शिलालेख लिहिला जायला सुरुवात झाली.


गेरूने केसरला सॅन फ्रान्सिस्कोला घेऊन येणं, हा त्या लेखातला क्षुल्लक परिच्छेद.


खानदानातलं पहिलं पोर इंजिनिअर होतं काय, अमेरिकेला पोचतं काय, दुलबासाठी आयुष्याचं सार्थक झाल्याचा क्षण! दंतकथाच जणू! अख्ख्या पाड्यात आठवडाभर जेवणावळी उठतील, याची व्यवस्था त्याने केली. पाड्याचे दुवे घेऊन गेरूचा सॅन फ्रान्सिस्कोत गॅरी झाला. तिकडचीच एक मड्डम त्याच्या प्रेमात पडली आणि तिकडेच त्याचा संसार चालू झाला.


कितीही म्हणा, नवीन आयुष्य वगैरे; पण सगळ्या भाकडकथा. कितीही ठरवलं वसईला परतायचं नाही, तरी ‘आता येऊन गेलास, की परत बोलावणार नाही, हा माझा शब्द’, या दुलबाच्या एका ओळीच्या तारेखातर, गेरू दोन आठवड्याच्या सुटीवर म्हणून पाड्यावर आलाच. एका रात्री जेवणं आटोपल्यावर, दुलबाने त्याचा वानप्रस्थानाचा निर्णय सांगितला,आणि केसरच्या पोटात खड्डा पडला. मिरामारच्या वाळूसारखा गेरूसुद्धा बोटाच्या फटींमधून कधी कसा निसटला, हे तिला कधीच कळलं नव्हतं. कच्छशी जोडणारे कुठलेच दोर अस्तित्त्वात नव्हते. दुलबाचा आधारसुद्धा संपला की आपण परत कुठल्यातरी मिठागरात नाहीतर आश्रमशाळेत, नाहीतर कुठल्यातरी टाकलेल्या बायांसोबत, हा विचार डोक्यात आला आणि बोलता येत नसूनही तिने मला शिव्यांची लाखोली वाहिली. मिठागरातली पडतील ती कामं आणि भंडाऱ्याच्या घरकामाशिवाय तिसरी काही गोष्ट तिला माहीतच नव्हती. मी कोण, माझं अस्तित्त्व काय, पुढे काय, असे प्रश्न केसरला पहिल्यांदाच पडले असावेत. दुलबाने ते याआधी पडणारच नाहीत, याची सोय लावली होती. कांताबेनची जागा नसली, तरी दुलबाने आपणहून तिला जी जागा दिली, त्याची जाणीव अर्थात तिच्यापेक्षा दुलबालाच जास्त होती. आणि गेरु जेव्हा जसा डोळ्यासमोर वाढला, तेव्हा केसरही आजूबाजूला सारखी दिसतच तर होती.


रविवारी रात्री गेरू परत जायचा होता. शनिवार दुपारच्या जेवणानंतर दुलबाने त्याला आपल्याजवळ बसवलं. कट्ट्यावर नेमाने बसणाऱ्या मित्रासारखा त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाला, ‘केसरला घेऊन गेलास, की मगच मी इकडचं सगळं आवरायला घेईन’. हे कुठेतरी निघून जाणं, राहत्या घरात पाय न राहणं, भंडाऱ्यांचा वारसाहक्क म्हणून आपल्याकडे आलंय की काय, असं गेरुला वाटलं. मग दोघांनीही आता परत न येण्यासाठीच जायचंय, तर हे केसर नावाचं लचांड काय मागे लागतंय? अर्थात, त्याच्या कुठल्याही बंडाळीचा कणा उभा राहण्याआधीच मोडला जाईल, याची काळजी दुलबातल्या सैनिकाने नेहमीच पुरेपूर घेतली होती. गेरूने सवयीने होकारार्थी मान हलवली, आणि दुलबा सवयीनुसार खूष झाला.


“एक फोटो काढ गे आमचा केसर” दुलबाच्या दवंडीने केसर भानावर आली. गेरूने निर्विकारपणे कॅमेरा तिच्या हातात देऊन खुणेनेच बटन दाबायचं शिकवलं. कॅमेऱ्याच्या चौकटीत दुलबा आणि गेरू. कोचावर गेरूच्या शेजारी जागा असती, आणि मी तिथे बसले असते, तर आमचा फोटो कोणी काढला असता? त्या स्वार्थी क्षणात रमलेल्या केसरला, तरीही कांताबेनची आडवी पडलेली तसबीर खुपलीच. किमान ती तरी सरळ हवी होती, या विचारात असतानाच कॅमेऱ्याचं बटन दाबलं गेलं.


डायनिंग टेबलच्या बाजूच्या भिंतीवरचा तो फोटो पाहून केसर किती महिने, किती वर्षं मागे गेली कुणास ठाऊक! गॅरी तिचा नाही, तो फक्त बार्बीडॉल सारख्या देखण्या स्टेलाचा. आणि गेविन त्या दोघांचाच! दुलबा कुठे गेला? सीमेवर? हिमालयात? माहीत नाही. गेरुला तरी कुठे माहीत आहे?! त्याला गिटार वाजवता येतं अजून? आहे त्याच्याकडे? एव्हढ्या मोठ्या महालात शोधू तरी कुठे गिटार?



“Mom, Mom...quick, it’s..” गेविन पुढचं काही बोलायच्या आत, त्याची बोंब ऐकून, स्टेला आणि गेरु धावतच पोर्चकडे पोचले होते. गेविन जे सांगत होता, त्याहीपेक्षा गेरूचे डोळे लागले होते मागून लंगडत येणाऱ्या केसरकडे.


“Oh?! God! Is she hurt? Kesar,...?” केसर लंगडत असली, तरी 911 लेव्हलची इमर्जन्सी नसल्याने स्टेलाची कळकळ तशी निवळलीच.


“I’m not sure but I think she just sprained her ankle or something’” गेविन म्हणाला “But she wouldn’t let me take a look at her feet”


पोर्चमधल्या बाकड्यावर येऊन केसर टेकली आणि गेरूने केसरचा तळवा हातात घेतला. स्टेलाने गेविनला दाबून धरून ठेवलं होतं.


चवडा फुटला होता. पण गेरुने आपल्याला हात लावला, याचा थंडावाच केसरचं मलम झालं होतं.


“Goodness me! Look at her feet..her legs..”


“Gavin, please stop being rude. Come on, let’s get you cleaned up first” स्टेला गेविनला घेऊन गेली.


“काय गे तू? हातात घेऊन चालतीस डोले?” गेरु जरा नाखूषच होता. प्रथमोपचाराचे सोपस्कार पार पडले आणि सगळे आपापल्या खोलीत गेले.


... 


डिनरनंतर गॅरी गेविनला आगरियांबद्दल सांगत होता. मिठागरं, तिकडे राबणारे आगरिया, त्यांचं खडतर आयुष्य, दहनाच्या वेळी पाय वेगळे काढून जाळणं…


“Are you kiddin’ me?” That’s awful!”


“Can’t help it buddy. Since they are standing continuously in salt fields, their feet get wounded and salt gets absorbed in the feet. So the feet would not burn easily in the funeral pyre” दुलबाच्या तुलनेत  गेरू फारच प्रेमळ, समंजस बाप असावा, असं मला वाटलं.


केसरला कुठे कसं जाळतील, माहीत नाही. खडेमिठाचा चहा ती इकडे आल्यापासून मी तिच्यापासून हिरावून घेतलाच आहे. त्याची खंत मला आतून जाळतच असते पदोपदी. त्यात आणि आता हे नकोसे प्रश्न पडायलाच नकोत. गेरूच्या कपाळावर केसरचा शिलालेख लिहिला की तिच्या कपाळी याचा, हे सुद्धा कळत नाही. एक मात्र खरं; केसर माझ्याबरोबर आणि मी केसरबरोबर अजूनही फरफटतच आहोत. दोघांचीही इच्छा नसताना.





Sunday, February 14, 2021

अडगळीतल्या व्हॅलेंटाईनचं वार्षिक

फेब्रुवारी ७ :

सकाळ झाली. मी झोपेतून उठलो तरच आणि तेव्हाच सकाळ होते. आजही झालीच. रात्री सगळेच झोपतात, असा दुनियेचा समज कोणी, का करून दिला आहे, माहीत नाही. उलट रात्रदरबारी चालणारे एकतर्फी खटले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडणारे विवस्त्र आरोपी बघून, खटल्यांचा निकाल पूर्वनियोजित असल्याची माझी खात्रीच पटते. त्यांनी त्यांची धडपड थांबवावी, निकालातील मोक्ष त्यांना मिळावा, आणि तोच त्यांच्यासाठी खरा न्याय आहे, हे कोणीतरी त्यांना समजावून सांगावं, हे मात्र मला प्रामाणिकपणे वाटतं. किमान त्यामुळे तरी सकाळी सलज्जतेची वस्त्रं चढवून दैनंदिन व्यवहार रेटता येतात, हे त्यांना कधी कळणार?

मला हे कळलं आहे, कारण मी रात्रीच्या कचाट्यात सापडलोच नाही कधी. बिनशर्त माफीनाम्यावर स्वाक्षरी करून, स्वतःविरुद्धच माफीचा साक्षीदार म्हणून उभं राहण्याचं वचन रात्रीला दिल्यापासून आम्ही एकमेकांचे व्हॅलेंटाईन झालो. त्याला बरीच वर्षं लोटली. अर्थात, दुनियेतल्या कित्येक निशाचरांपासून काडीमोड घेऊन फक्त माझीच होणं, तिला शक्य नसल्याने, उत्तररात्रीचा किमान एक प्रहर तिने मला द्यावा, आणि मी जे बोलेन, ते फक्त ऐकावं, इतकी एकच मागणी माझ्या बाजूने असल्याने, आमचं नातं अद्याप टिकून आहे. तिच्यासाठी जो करार आहे, तोच माझ्यासाठी प्रणय आहे, अशी खात्री पटल्यापासून, आमचं एकमेकांसाठीचं व्हॅलेंटाईनत्त्व आम्ही मान्य केलं.

सगळ्या गुजगोष्टी करून झाल्यावर डोळे उघडावेत, आणि समोर सकाळ असावी, हे पहिल्यांदा जेव्हा झालं, तेव्हा मात्र आमच्या व्हॅलेंटाईनत्त्वावरचा माझा विश्वास उडाला, तो कायमचाच.

मी तेव्हापासून कायमचा अडगळीत आहे. आमच्या करारावर एक्स्पायरी डेट नसल्याने, तिला आजही माझ्याकडे यावंच लागतं. व्हॅलेंटाईनत्त्वाची जन्मठेप मला एकट्यालाच नाही, हाच माझा विजय.

इथे राहून माझा रेड रोज मधला राजेश खन्नाचा बाप होऊ नये, इतकंच फक्त.

चमकून चाचपणी केली, तर कुशीत माझा पोर डाराडूर. तो सुपरस्टार आहे, पण राजेश खन्ना नाही, याची खात्री करून घेतली. मग कराग्रे वसणाऱ्या लक्ष्मीची वस्त्रं चढवून दात घासायला गेलो.

फेब्रुवारी ८:

आणला इंद्रधनुचा गोफ तुझ्यासाठी,
पण टपोर्‍या आषाढी थेंबांचा सर
घातलाय पावसाने
आधीच तुझ्या गळ्यात
ओल्या मातीच्या ठिपक्यांचे
घातलेस मेंदीसारखे पैंजण
तुझे तूच पायात
डोळ्यांत बघून विचारेन म्हटलं,
ढग वाजवून सांगेन म्हटलं,
वार्‍याने गुदगुल्या करून ऐकवेन म्हटलं,
तर स्वत:भवतीच गिरक्या घेत
डोळे चिंब मिटून
तू पावसाच्या मिठीत
आणि माझे शब्द, सूर सगळे
चुरगळलेत त्याच्या झिम्मडसरीत
या भिजल्या-थिजल्या कवितेचं
प्रपोजल् व्हायची वाट बघत

हे मी लिहिलंय? कधी? १५ जुलै २००९ म्हणे! So naive! पण naive म्हणजे? नैसर्गिक, निरागस सुद्धा; आणि अननुभवी, बिनडोक सुद्धा. मग नक्की कोणत्या अर्थाचा स्वीकार करावा? नैसर्गिक, निरागस प्रस्तावांवरचा विश्वास वयाने आणि अनुभवाने उडवल्यापासून, प्रत्येक प्रस्ताव विश्लेषकाच्या चष्म्यातून बघायला लागणं, ही naivete? की  त्या चष्म्यातून जे जे बघायला मिळतं, ते गेलं भोसड्यात, असं म्हणून परत एखादी मस्त, निरागस, नैसर्गिक कविता सुचणं, ती व्हॅलेन्टाईनला ऐकवणं, तिने काही न बोलता फक्त घट्ट मिठी मारणं, ही?! आमच्यातलं नक्की naive काय आणि कोण मग?

मला खूपच प्रश्न पडतात, नं? त्यांच्यापासून सुटका करण्याचा प्रस्तावसुद्धा मीच मांडला होता मागे एकदा.

एरव्ही संततधार बरसणारा मी
झिरपू लागतो जेव्हा
असंख्य प्रश्नचिन्हांची ओल बनून
माझ्याच एरव्हीच्या एकटाकी आयुष्यात
स्वल्पविरामासारखा(,)
उत्तरं बनून तेव्हा
माझ्या वाटणीचं, माझ्याऐवजीचं
बरसणं होऊन तेव्हा
पूर्णविराम देशील ना
या झिरपण्याला(?)

यावरची तारीख सुद्धा १५ जुलै. २०१४. पण तो निव्वळ योगायोग! Or is it?!

आता परत वाचतो, तेव्हा वाटतं this is not naive. This, in fact, is anachronistic! Whether it’s the poem itself, or us, that’s anachronism, is for you to answer, babe!

शब्दार्थाचा, naiveteचा, anachronismचा पुनर्विचार करण्यासाठी जनहित याचिका दाखल करावी, असा प्रस्ताव मांडायला हवा. ते करता येत नसेल, तर ते कृपया तसं करता येऊ देत, असा! त्यातून आज प्रपोज डे; म्हणजे प्रस्ताव मांडणं क्रमप्राप्त आहे.

फेब्रुवारी ९:

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला पासून ते लिंड्ट डार्क विथ चिली पर्यंतच्या प्रवासात, बदलत गेले ते आजूबाजूचे चेहरे; जे चेहरे बदलले नाहीत, त्यांची वयं; ज्यांची वयं बदलली नाहीत त्यांचं अस्तित्त्व; आणि ज्यांचं अस्तित्त्व बदललं नाही, त्यांची नियती, किंवा नियत, किंवा दोन्ही. 

लिंड्ट डार्कच्या कामोत्तेजक गुणधर्मात बदल होणार नाहीच. त्या स्वादाची कॉफीही मिळायला हवी खरं तर. लिंड्टचा मोठा चौकोनी तुकडा कॉफीत हळुवार वितळत जावा. आणि त्याबरोबर Philz Coffeeबाहेरची संध्याकाळ डोळ्यात. आणि डोक्यात.

पण आज वाटतं, तेव्हढं जरा मिरचीचं प्रमाण वाढवायला हवं होतं. कडवटपणा आणि त्याचबरोबर तिखटपणा वाढायची गरज आज जितकी जास्त आहे, तितकी आधी कधीच नव्हती.

फेब्रुवारी १०:

विनी द पू असो, किंवा बलू किंवा अजून कोणी. कुशीत घेऊन झोपावं, इतके आवडते आहेत आपले. ममा बेअर, पपा बेअर, बेबी बेअरसुद्धा त्यांना येऊन मिळालेत. हवाय कशाला मग टेडी डे?! नको ती मार्केटिंग थेरं, दुसरं काय?!

द रेव्हनंट मध्ये एका अस्वलाने डि’कॅप्रिओला उभाआडवा फाडला होता, हे कसं विसरतात लोक? डि’कॅप्रिओ नेहमीच रोझसाठी आणि रोझमध्ये बुडालेला जॅक! तोच त्याचा रोझ डे, टायटॅनिकवरच्या कार्गोमधली रात्र, हीच त्याची रोझ नाईट. रोझचं त्याने चितारलेलं पेंटिंग म्हणजे खरा व्हॅलेन्टाईन डे. त्याला फाडणाऱ्या अस्वलाला व्हॅलेन्टाईनशी कसं काय जोडू शकतं कोणी?!

काल म्हटलं तसं, काळाबरोबर अस्वलंसुद्धा बदलली असावीत बहुतेक.

फेब्रुवारी ११:

Because I am a quintessential Gemini, रात्रीची जन्मठेप रद्द झाली, तरी चालेल, असं अधूनमधून वाटतं. त्यामुळे होईल काय, तर सुटका. आमची एकमेकांपासून. माझी माझ्यापासून नाहीच. आपल्यातल्या वेडसर जुळ्या भावाची कुरघोडी आपल्यावर झालेली चालेल, तिच्यावर नको, म्हणून मी आमच्यात एका समांतर विश्वाचं एक रिंगण तयार करेन म्हणतो. जेणेकरून त्याच्या परिघावरून हवा तेव्हढा वेळ, पाहिजे तेव्हढ्या चकरा मारत बसलं, की झालं. हा माझ्यातला जुळा, त्या विश्वात, रात्रीकडे तिच्याच रिंगणात सोडून दिला, की दोन गोष्टी साध्य होतील. एक, माझं शहाणपण वास्तवात कायम राहतं तसंच राहील. तिचंसुद्धा. फक्त त्यासाठी विशेष मेहनत करावी लागणार नाही. दुसरं, तो जुळासुद्धा माणसाळायला हवा नं थोडातरी. थोडातरी कसला, चांगलाच माणसाळायला हवा. मग कुठला लगाम न घालताही स्वतःसोबत कुठेही चौखूर उधळत नेता येईल. वास्तवातल्या माझ्यासोबत वास्तवातल्या तिच्याकडे.

आणि खरं सांगायचं तर, तिलाही त्याचा लळा लागलाच आहे की!

ठरलं मग! स्वतःची सत्यातील झुंज स्वतः, आणि समांतर विश्वातील जुळ्याची झुंज त्याला खेळू देईन. हेच प्रॉमिस डे च्या दिवशीचं प्रॉमिस!

शिवाय, इतर वेळी फार आवडत नसला, तरी संदीप खरे (!) म्हणून गेलाय - 

कितीक हळवे, कितीक सुंदर
किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी, माझ्यानंतर

फक्त हे नामंजूरऐवजी मौनाची भाषांतरे मध्ये जास्त सुटेबल झालं असतं, असं तो वेडा जुळा मला सांगतोय. रिंगण मानवतंय की काय वेड्याला?!

फेब्रुवारी १२:

तेरवाच्या वितळण्यात डोळे आणि डोक्याबरोबर मिठी राहूनच गेली. ती ऍड नाही केली, तर आज माझा व्हॅलेंटाईनत्त्वाचा फाऊल होईल.

आणि हे त्या चॉकलेटच्या तुकड्याबद्दल नसून आपापल्या व्हॅलेंटाईनबद्दल आहे, हे तिला कळलं नाही, तर तिचा.

फेब्रुवारी १३:

हे वार्षिक एका जपमाळेसारखं झालंय. तिच्यात सातच मणी आहेत, हे एक बरं झालं. माळ चुंबून उशाशी ठेवली, की वर्ष पवित्र झालं समजायचं. एकशे आठ मणी असते तर जीवच गेला असता.

पण नुकताच लागलेला शोध असा, की जप पूर्ण झाल्यावर माळेचं चुंबन घ्यायचं. आणि मी मात्र एकेक मणी मागे ओढण्याआधी ओठांना लावत आलोय.

कुणीही, कितीही तांत्रिक चुका काढल्या, तरी मला माझीच पद्धत हवीहवीशी आणि मान्य आहे.

Saturday, January 30, 2021

दिखाई दिये यूं

 


गाडी काढून, निरुद्देश भटकंती करुन, आता जमाना झालाय. डोंगरात जाऊन तर त्याहून जास्त. पण आजच्यासारखं नुसतं आभाळ जरी भरून आलं, तरी मग कुठेतरी घरात, आत, स्वस्थ बसवतच नाही. दुचाकीवर डबलसीट बसून पावसात भटकणं, हा माझ्या मते वेडेपणा आहे; नव्हे, मूर्खपणाच म्हणूयात! त्यापेक्षा सरळ चारचाकी काढावी; मून रूफ, सन रूफ काय म्हणशील ते उघडावं; आणि कानात दडे बसवणाऱ्या, घूं घूं करणाऱ्या वाऱ्याशी शर्यत लावावी. आता तू म्हणशील, मग मला तुला घट्ट आवळून, डोळे गच्च मिटून बसताच येत नाही. तिकडेच तू चुकतेस. समोर, आजूबाजूला दिसणारं दोघांनी एकमेकांच्या डोळ्यांनी बघायला नको?! हेच तुला समजावण्यासाठी, आज शेवटी मनाचा हिय्या करून मुसळधार पावसातही गाडी काढलीच! पण दुचाकीच्या स्वप्नांची झापडं फेकून द्यायची तयारीच नसेल, तर या खटर्र-खट् करणाऱ्या वायपर्सची हयातच फुकट गेली म्हटलं पाहिजे.
दोन आणि दोनाचे चार, या दोन्हीचं आपण जरा जास्तच स्तोम माजवून ठेवलंय. चालताचालता ठेच लागणं किती स्वाभाविक, किती हवंहवंसं. पण ते झालं, की ‘काय रे डोळे हातात घेऊन चाललायस का?’, असा दरडावणीयुक्त शेरा ऐकून माझे कान किटलेले. ज्या शास्त्रज्ञानं, देवदत्त दोन डोळ्यांवर आणखी दोन चढवून शेवटी दोनाचे चार केलेच, त्याच्याही बाबतीत कधीतरी हेच झालं असेल. पण त्या शास्त्रज्ञापेक्षा माझी सहनशीलता आणि इच्छाशक्ती जबर दांडगी आहे. त्यामुळे चाळीशीच्या आत चेहऱ्यावरच्या दोनाचे चार होऊ द्यायचे नाहीत, हा निग्रह मी आजवर मोडलेला नाही. अपवाद फक्त तुझा.
ग्रेसच्या नायकासारखं मी तुला नदीच्या किनारी पाहिलं नाही. तुझ्या पाठीवरच्या मोकळ्या केसांची मी कधी कल्पना तरी केली का, हे सुद्धा आठवत नाही. किंबहुना तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा सभोवार मिट्ट काळोख सोडून काहीच नव्हतं. कदाचित तू मला दिपवून टाकण्याची तीच सुरुवात. एक मात्र खरं, की जे मला दिसायचं नाही, दिसत नाही, ते सगळं तू बघत गेलीस, दाखवत गेलीस. तुझ्या डोळ्यांनी बघायची सवय लागायलाही खरं तर दिवस, महिने वगैरे नाही; काही क्षणच पुरेसे पडले. मी जे बघतोय, त्यापेक्षा ते तुझ्या डोळ्यांनी बघतोय, यातच मला जास्त मजा येते. याला कुणी स्वप्न म्हणतं, कुणी दृष्टीकोन. काही लोक या बाबतीत मला गर्दुल्ल्यांच्या पंगतीलाही बसवतील. माझ्यापुरतं बोलायचं झालं, तर मी याला मर्मभेद म्हणतो. तो सुद्धा स्वेच्छेने करून घेतलेला. आत्मभानाला दिलेली ऐच्छिक तिलांजली. या बाबतीत मात्र मीरने मला रंगेहात पकडलंय. तो नाही का म्हणत-
दिखाई दिये यूं कि बेखुद किया
हमें आप से भी जुदा कर चले
नाही म्हणायला जे बघतोय, ते किंचित धूसर होऊ लागलं, की डोळे पुसावेच लागतात. माझ्या डोळ्यांवरचे तुझे दोन पुसले, की लक्षात येतं, कुठल्यातरी देखाव्याचं एक आवर्तन संपलं. मग पुन्हा ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः स्वतःचा असह्य झालेला छळ विष्णूला डेलिगेट करायची कमाल सोय शोधून काढली आहे कोणीतरी! तिच्या कुबड्या घेऊन का होईना, तुझ्या अस्तित्त्वाची झापडं पुन्हा लावून मी पुढच्या आवर्तनाला बसतोच.
हे सगळं तुला सांगून तू खळखळून हसशील, की कावरीबावरी होऊन कसनुसं हसशील, हे एकदा बघायचंच होतं, म्हणून हा लेखनप्रपंच. शिवाय मीर म्हणालाच आहे-
बहुत आरजू थी गली की तेरी
सो यास-ए-लहू में नहाकर चले
तरीही खरं वाटतच नसेल, तर या तडतडणाऱ्या पावसाची शपथ-
I don’t mind spending every day
Out on your corner in the pouring rain
Look for the girl with a broken smile
Ask her if she wants to stay a while
She will be loved

Wednesday, January 06, 2021

टिंकरबेलच्या आठव्या प्रहराच्या शोधात


 

‘Sup टिंकरबेल?!

‘प्रिय टिंकरबेल’ लिहिणार होतो खरं तर. पण तू सगळ्यांनाच इतकी प्रिय; आणि आपण सगळ्यांनाच प्रिय असावं, हे तुला नेहमीच वाटतं. तिथेच माझ्यासाठीचा ‘प्रिय’ संपतो. कदाचित चालूच होत नसेल. ‘माझी’ टिंकरबेल ‘इतरांना’ प्रिय असली, तर ‘प्रिय’ माय फूट! मग हा हिरव्याकंच पानांचा वेल होऊन जातो माझी टिंकरबेल.
बॅरीच्या टिंकरबेलपेक्षा केव्हढीतरी वेगळी आहेस तू. तिला एकावेळी एकापेक्षा जास्त भावना झेपायच्याच नाहीत. तू मात्र अगदी उलट. निमिषापासून प्रहरापर्यंत असंख्य भावनांची किणकिण. सतत कानाशी गुणगुणणारी. प्रहराच्या पानावर तुझ्या इंद्रधनुष्याचा जादूचा चुरा उधळून झाला, की तू उडून बसणार पुढच्या पानावर; आणि कितीतरी पोचे पडलेला मी तुझ्या मागोमाग आपसूकच येणार. केवळ तू ठोकून काढावसं नि घडवावंसं वाटतं म्हणून. Oh, and how you oblige! Barrie always said you were kind to me.
सातवा प्रहर संपल्यावर मात्र तू दिसेनाशी होतेस. सप्तपदी म्हणजे सातच पावलं चालली पाहिजेत, सातच पानं उलटली पाहिजेत, हे तुला आणि कोणी सांगितलं?! अगं ते फार सिम्बॉलिक असतं सगळं. त्यात आणि पावलागणिक, पानागणिक तू मला वर वर वर घेऊन जाणार; गायबही होणार; आणि समोर असणार खूप सारी वाळकी पानं, काडीकचरा. बरं तो सुद्धा इतर कुणाला न दिसणाऱ्या, आणि फक्त मला दिसणाऱ्या, DANGER! NO TRESSPASSING! चा बोर्ड असणाऱ्या जाळीपलीकडे. प्राजक्त, मोगरा, बकुळी, गेलाबाजार रातराणी, असं काय काय नाही तर नाही, पण पाचोळाही अप्राप्य करून ठेवणं is so not fair!
पण मी बावळट नाही आहे. मी एक युक्ती शोधून काढली आहे. आठव्या प्रहरात, मी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करतो. सातही पानं आहेत ना तिथल्यातिथे, याची खात्री करून घेतो. ती एकेक करून चढतो आणि पुन्हा जाळीपाशी येऊन थांबतो. तू गायब झाली आहेस, होणार आहेस, हे माहीत असून सुद्धा! हे करण्यातला ‘हाय’ अनुभवला, की प्रहराचं आणखी एक सोनेरी पान तयार होतं.
मग मी स्वतःचीच पाठ थोपटतो आणि मागे वळतो. पुन्हा पहिल्या पानाकडे. या वेलाला समांतर अशा दुसऱ्या अदृश्य वेलावरून.
राहून राहून एका प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नाही. सातव्या पानानंतर, सातव्या प्रहरानंतर कुठे गायब होतेस तू? कारण नवीन दिवस उजाडला, की पुन्हा सुरुवात होतेच आपली. नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ विचारू नये म्हणतात; पण सात ही मूळ संख्या आणि पडलेल्या या एका प्रश्नाचा वेताळ पाठीवर घेऊन आठव्या प्रहराचा शोध कसा संपवून टाकलाय, हे सांगितलंच मी तुला. “राजा, या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस, तर तुझ्या मस्तकाची शंभर शकलं होतील”, अशी warning द्यायच्या आत प्रामाणिकपणे कबूल करतो. खरा प्रश्न पाठीवरचा नाहीच! खरा प्रश्न हा आहे -
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है
अब तो हर वख्त यही बात सताती है हमें
जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें
बॅरीची टिंकरबेल पीटर नेव्हरलॅण्ड सोडून गेल्यावर वर्षभरात वारली (तो म्हणतो मेली; मी वारली म्हणतो. माझ्यासाठी कोणी कधी मरत नसतं!) एव्हढंच काय, तो पीटर तर तिला विसरूनही गेला होता म्हणे तोवर.
आपल्या बाबतीत roles reverse तर होणार नाहीत नं?!
आता हा वेताळ मात्र तुझ्या पाठीवर.
तुझा,
पीटर पॅन

Monday, December 21, 2020

सनी साईड अप

 शनिवार नि रविवार सकाळी कितीही उशीरा उठायचं ठरवलं, तरी शक्य होतंच असं नाही. मुळात, उशीरापर्यंत लोळत पडणे, ही शिकरण नि मटार उसळीच्या पुढच्या लेव्हलची चैन आहे, हे आमच्यासारख्याना कधी कळणार, हा प्रश्नच आहे. बाकी काही असो वा नसो, पोटच्या पोरासाठी त्याच्या आवडीचं 'सनी साईड अप' आणि 'बेकन बाय द साईड' नाश्त्याला करणं, हे एकमेव 'मोटिव्हेशन' सकाळी लवकर किंवा 'वेळेवर' उठण्यासाठी पुरेसं असलं पाहिजे, हे आमच्या आईवडिलांनी आमच्यातल्या आईवडिलांना लहानपणापासूनच नीट शिकवून ठेवलंय. पोहे, उपमा, थालीपीठ, सकाळचा चहा, कॉफी, दूध यांच्या जोडीलाच स्वतःचा, नवऱ्याचा, पोरांचा डबा करणाऱ्या, आणि तरीही आठ एकोणीसची वगैरे लोकल सराईतपणे पकडणाऱ्या आया बघत मोठे झालेले आम्ही आईबाप, एकवेळ स्वतः कमी खाऊन, पोरांचं पोट भरण्याच्या आयुष्यातल्या परमकर्तव्याच्या कसोटीत नापास होऊन कसं चालेल?! इतकं मोटिव्हेशनसुद्धा बिछान्यात लोळत पडायची दिवास्वप्नं पाहणाऱ्या आमच्यासारख्याना पुरेसं पडत नसेल, तर मग त्या 'सनी साईड अप'वरच्या अंड्याच्या बलकातून दिवसाची मंगल सुरुवात करणारा सूर्यनारायणाच तुमच्याकडे पाहत हसतोय, किंवा तुमच्या पोटच्या पोराचाच हसरा, आनंदी चेहराच तुम्हाला त्या अंड्यात दिसतोय, अशी भिकारचोट मार्केटिंग गिमिक्स हुशार कंपन्यांनी करून ठेवलीच आहेत. त्यामुळे कोणत्याही दिवसाची सुरुवात स्वतःसाठी नंतर, पण दुसऱ्या कुणासाठी तरी आधी करायची, ही त्यागभावना रक्तात कुठेतरी इतकी खोल रुजली आहे, की पालकत्त्व, ममत्त्व वगैरे अनेक तत्त्वे त्यातूनच उगवली असावीत.

तरी पालक किंवा बाप ही आयुष्यात त्यातल्या त्यात उशीरानेच वाट्याला आलेली भूमिका. त्याच्या बरंच आधी मुलगा-भाचा-पुतण्या-भाऊ, विद्यार्थी, प्रियकर, नवरा आणि अशा अनेक भूमिका वठवायला लागल्याच. आणि या सगळ्या भूमिकांची एक दुपदरी गंमत आहे. एक म्हणजे, यातल्या कित्येक भूमिका एकाच वेळी वठवायला लागणे; आणि त्यातल्या काही भूमिकांमधली एंट्री काही अंशी तुमच्या हातात असली, तरी एक्झिट तुमच्या हातात नसणे. आणि दुसरे म्हणजे, या भूमिकांमध्ये कित्येक प्रसंगी तुम्हाला खलनायक व्हावेसे वाटले, तरी होता न येणे. मुळात कोणतेही नाट्य रंगतदार होण्यासाठी नायक-नायिकेप्रमाणेच खलनायकही तितकाच आवश्यक आहे, हे लोकांना का कळत नाही, हे मला कळत नाही. राजपुत्र-राजकन्या म्हटली, की राक्षस हवाच; अनिल कपूर-माधुरी दीक्षित म्हटले, की अमरीश पुरी हवाच, हे सुद्धा आपल्याला कळत नसेल, तर आपल्या बॉलिवूड प्रेमाची आणि दुराभिमानाची आपणच लाज वाटून घेतली पाहिजे. पण लहानपणापासूनच खलनायकी वृत्ती आणि व्यक्तींपासून सगळ्यांनी आम्हाला इतकं लांब ठेवलंय, की खलनायकी बागुलबुवा आम्हाला कितीही मोठे झालो, तरी समर्थपणे घाबरवू शकतो. नाटकात काम करताना सुद्धा सगळ्यांना हिरो, हिरोईन करायचे असतात; व्हिलन शक्यतो कुणाला करायचाच नसतो. 'वेड्यासारखा वागू नकोस' किंवा 'शहाण्यासारखा वाग' हा एककलमी कार्यक्रम जो आमच्या बाबतीत लहानपणापासून राबवण्यात आलाय, त्याला असलेली, पण कुणालाच न दिसणारी किनार हीच, की you have to be a hero. Always! आणि आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी झुंज, सगळ्यात मोठं कोल्ड वॉर जे तेव्हापासून चालू झालंय, ते आजतागायत संपलेलंच नाही.

मुळात प्रॉब्लेम असा आहे, की ही झुंज आहे स्वतःची स्वत:शीच. त्यातून ती आम्ही लावून दिलेली नाहीच, ती बहुतेक आमच्यावर आमच्या मनाविरुद्ध थोपवण्यात आली आहे, किंवा पुर्खोंकी जायदाद में मिळाली आहे. त्यामुळे हार, जीत वगैरे अंतिम परिणाम असायची शक्यताच नाही. ते तसे असलेच तर कदाचित परवडण्यासारखे नाहीत. त्यातल्या त्यात acceptable परिणाम आहे 'तह'. या तहाची कलमं दोनच. एक म्हणजे, हे युद्ध सवडीनुसार मुख्य रंगमंचावर आणि इतर वेळी विंगेत चालू रा हि लं च पाहिजे. आणि दुसरं म्हणजे, वारसाहक्काने ही झुंज पुढच्या पिढीकडे सुपूर्त करता आली पाहिजे. प्रत्येक कुटुंबाचा एक गणपती जसा पिढ्यानुपिढ्या बसत आलेला असतो, तशी ही झुंज हस्तांतरीत झाली पाहिजे. 'शहाण्यासारखं वागणं' किंवा 'वेड्यासारखं न वागणं', हे या युद्धाचं सर्वसमावेशक वर्णन असलं, तरी त्यात परंपरा, नीतीनियम, संस्कृती, धर्म, सद्वर्तन, कायदेपालन इथपासून ते अरे ला का रे न करणं, वडिलधाऱ्यांशी वाद न घालणं, कुणाला न दुखावणं, नाकात बोट न घालणं, नखं न खाणं इथपर्यंत इतक्या झुंजी लागल्या आहेत, काही विचारूच नकात!

फ्रिजमधून बेकनचं पॅकेट काढून बघितल्यावर लक्षात येतं, दोनच स्ट्रिप्स उरल्यात. त्यातली एक स्वतःसाठी बाजूला काढावी म्हटली तर पोराचा हिसमुसला चेहरा डोळ्यासमोर येतो. मग ती झुंज जिंकायला मी एका सकाळपुरतं माझं ब्राह्मण्य ढाल म्हणून वापरतो नि चुपचाप चेहऱ्यावर स्मितहास्य आणून तव्यावर एक सनी साईड अप घालतो.

Sunday, November 08, 2020

'भोसडीवाले चाचा'चा रैवार

रोज सकाळी सातला उठून, ठरलेली लोकल पकडण्यापर्यंतची एक तास एकोणीस मिनिटे गुड्डूला आता सवयीची झाली होती. कानावर जानवे लावून अर्धवट झोपेत, सामायिक शौचगृहाबाहेर, दुसऱ्याच कोणाच्या तरी प्रातर्विधीच्या पूर्ततेची वाट पाहण्यासारखा मानसिक क्लेष इतर कोणता खचितच नाही. आणि नेमक्या त्या अर्धोन्मीलित नेत्रावस्थेत, त्याला आठवीच्या भूमितीच्या पेपरात चुकवलेल्या कोनदुभाजकाच्या सिद्धांतामुळे गेलेल्या अर्ध्या गुणापासून, ते कालीन भैयाच्या वीर्यतपासणी अहवालातल्या आकड्यांपर्यंतचे सगळे आकडे, शकुंतलादेवींपेक्षा जलद गतीने आठवत. त्यामुळे स्वतःच्या मलविसर्जनातल्या निवांतपणाचे सुख गुड्डूच्या नशिबी तसे कधीच नव्हते. किंबहुना, या सततच्या अस्वस्थपणापोटीच, काही काळापुरता का होईना, तो स्वतःला गुड्डू चिटणीस ऐवजी गुड्डू पंडित समजू लागे. गुड्डू पंडितांच्या डोक्यातली सूडभावना आणि गुड्डू चिटणीसच्या पोटातली भावना यांच्यातल्या सीमारेषा फ्लश होऊन जात. फरक इतकाच, की त्याची बॉडी, दाढी आणि गाडीची स्वप्ने मिरझापूरच्या एकेका भागासोबत जन्म घेत आणि तो संपल्यावर लगेच संपूनही जात.


अपवाद फक्त रविवारचा. रविवारी मात्र, त्रिपाठी कुटुंबाच्या मुदपाकखान्यात शिजवल्या जाणाऱ्या मटणापेक्षा, आपल्या घरचे मटण जास्त चवदार व्हावे, या एकमेव हेतूने, गरज नसतानाही तो सकाळी सातला उठे. बोकडाचे ताजे मटण मिळणाऱ्या लायनीत मिळवलेल्या पहिल्या नंबराचा आनंद, सहामाही परीक्षेतल्या पहिल्या नंबरापेक्षा मोलाचा वाटे. बरं दुग्धशर्करा योग असा, की ते मटण शेजारीपाजारी, किंवा नातेवाईकांकडे, किंवा तिसऱ्याच कोणा वकील-कारकुनाच्या, पोलिसांच्या वगैरे घरी पोचवण्याची गरज नसल्याने, नळीवर आणि त्यातल्या लुसलुशीत, चवदार मांसावर, फक्त गुड्डूचाच हक्क! अगदी मिरझापूरच्या गादीसारखा! कधीतरी त्याचा दहा वर्षांचा पोर नळीसाठी हट्ट करे; पण त्यासाठी तो इतक्यातच पात्र नाहीये, हे त्याला कालीन भैया आणि मुन्ना त्रिपाठींच्या नात्यातून कळलेच होते. जमेची बाब अशी, की नळी नाकारल्यावरही, आपले पोर, आपल्या किंवा दुसऱ्या कुणाच्या छाताडावर बंदूक रोखणार नाही, किंवा त्याने त्याची कितीही मित्रमंडळी जमा केली, तरी त्यांचेत्यांचे मम्मी नि बाऊजी आपल्याच गोटातले असल्याने, आपल्या नळीला तसा काहीच धोका नाही. गुड्डूने ते बरोब्बर ओळखले होते. आज मटण घेऊन येताना, या स्वकर्तृत्त्वाने त्याचा ऊर भरून आला होता.


घरात शिरल्याशिरल्या ओट्यावर मटणाची काळी पिशवी ठेवून, गुड्डू दाढीच्या तयारीला लागणार होता; पण धुण्याचा पहिलाच लॉट, मशिनमधून बादलीत काढून,हातातल्या काठीवर आईची साडी चढवून, वरच्या दांडीवर वाळत घालायच्या तयारीत असलेली, आपली बायको त्याला दिसली. कडक इस्त्रीची साडी नेसलेल्या ३६-२४-३६ आकृतीला मागून गपकन धरणारा तो गुड्डू, की जे पी यादव, हे त्याला काही केल्या आठवेना! एका क्षणी स्वीटी गुप्ता आणि दुसऱ्याच क्षणी शबनम, असा दुर्मिळ सर्वधर्मसमभाव जाणवल्यावर, आपणही गुड्डू पंडित नाही, गुड्डू चिटणीस आहोत, हे वन-रूम-किचन मराठी मध्यमवर्गीय वास्तव, खाडकन डोळ्यांसमोर उभे राहिले आणि गुड्डू भानावर आला. सकाळीसकाळी - त्यातही रैवार सकाळी- बायकोची साडी आणि स्वतःची दाढी, दोन्ही जागच्या जागी ठेवण्यातच शहाणपण आहे, या सत्याचा स्वीकार काहीश्या असमाधानाने करून गुड्डू अंघोळीच्या तयारीला लागणार होता. तेवढ्यात फोन खणखणला. इतक्या सकाळी कोण, असा विचार करेतोवर, आईने बाहेरच्या खोलीत फोन घेतलाही होता. पुण्याच्या आपल्या चुलतभावाचा फोन आहे, हे कळल्यावर गुड्डूला इतका आनंद झाला, काय विचारू नका! तसा लहानपणापासूनच तो त्याचा सगळ्यात लाडका दादा होता. आणि WhatsApp ग्रुप वर कितीही फॉरवर्ड्स आणि पुणेरी जोक टाकले, तरी प्रत्यक्ष फोनवर बोलण्यातली मज्जा वेगळीच! आता दादाशी गप्पा मारायला मिळणार, या आशेने गुड्डू बाहेर जाणारच होता, तितक्यात आईने परस्पर ‘गुड्डू अंघोळीला गेलाय’, असं सांगूनही टाकलं! त्यात आणि वर ‘छकुल्याशी बोल पाच मिनिटं, येईलच गुड्डू इतक्यात’, असं म्हणून पोराच्या हातात फोन देऊन टाकला. पोरालाही काय हुक्की आली होती काय माहीत?! ‘कैसे हो चाचा?’, अशा खास मुन्ना त्रिपाठीय शैलीतल्या त्याच्या बालसुलभ निरागस प्रश्नाने गुड्डू आनंदला एक सेकंद. पण एकविसाव्या शतकात, फाईव्ह-जी, वाय-फाय सिक्स वगैरे आलेले असले, तरी एम टी एन एल ची शिंची लॅण्डलाईन अजून सुधारली नाही, याचा प्रत्ययही तितक्याच लवकर आला. पुण्याचा आवाज सेकंदभरापुरताच बंद झाला असावा; पण तो तसा झालाय, हे गुड्डूला कळलं, ते त्याच्या पोराने विचारलेल्या - ‘चाचा?! ओ भोसडीवाले चाचा?!’ या प्रश्नाने!


गुड्डूने काही ऍक्शन घेण्याआधीच, बाहेर आजीने नातवाला एक धपाटा घालून झालेला. जोडीलाच, ‘तरी सांगत असते, नको ते मिरझापूर’चा धोशा. म्हणजे आईलाही माहितीये मिरझापूर?! गुड्डूची जरा तंतरलीच! त्यात सासवांच्या बोलण्यात लेकी बोले सुने लागे पेक्षा, सुने बोले आणि सुनेच लागे असतं, हे न कळण्याइतक्या, आजच्या सुना बथ्थड डोक्याच्या नसल्याने, गुड्डूची बायको बाहेर न धावती तरच नवल! त्यात आणि तिच्या हातात काठी. हत्यार म्हणजे बंदूक - एक हातातली आणि दुसरी पायजम्यातली - या शस्त्रसाठ्याच्या मर्यादित मिरझापुरीय आकलनावर गुड्डू पोट धरून हसला होता. कारण कपडे वाळत घालायची काठी, लाटणे, पट्टी, कमरेचा पट्टा, चप्पल, या मराठयांच्या शस्त्रागारातल्या रामबाण हत्यारांचा उत्तर भारतीयांना पत्ता असल्याचे गुड्डूच्या नजरेत कधीच आले नव्हते. मिरझापूरच्या गादीसारखाच हा शस्त्रसाठाही मराठी कुटुंबांमध्ये - त्यातही कुटुंबातल्या स्त्रीवर्गाकडे - पिढ्यानुपिढ्या, स्वयंपाकघरातल्या मिसळणीच्या डब्यासारखाच हस्तांतरीत होत आलाय, हे उत्तर भारतीयांच्या गावीच कधी नसते. आज बायकोच आपल्या पोराचा परस्पर समाचार घेणार, म्हणजे आपल्याला वाईटपण नको, या विचाराने गुड्डूने क्षणभर सुखावला खरा; पण राहून राहून एक गोष्ट त्याला समजात नव्हती, पोराच्या कानावर हे पडलंच कसं?! खरं तर तो रात्री झोपला, की मगच गुड्डू नि बायको लॅपटॉपवर एपिसोड लावत. ते सुद्धा एकच इअरफोन शेअरिंगमध्ये वापरत. दिवसभरात किमान तीच एक गोष्ट एकत्र करता येते, तर त्यातलं शेअरिंग ‘मॅक्स’ असावं, हा बायकोचाच आग्रह, म्हणून खरी ती व्यवस्था! दुसरा फायदा असा, की स्वीटी-गुड्डूचे रोम्यांटिक सीन्स, मुन्ना-माधुरीचे सीन्स रिवाइंड करून बघताना इअरफोनपासून ते पांघरुणापर्यंतच्या सगळ्याच शेअरिंगची मजा मॅक्स होते, हा लाभ आहेच! आणि रात्री एपिसोड बघून झाला, कि दुसऱ्या रात्रीपर्यंत घरात त्याची वाच्यता व्हायचे काही कारणच नाही. नाष्ट्या-जेवणाला घरातल्या गप्पा या मोदी आणि उद्धव ठाकरेंना करोना हाताळणीवरून आळीपाळीने शिव्या घालणे; सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू हा खून कि आत्महत्या; जेवणानंतरच्या वाफ घेणे कार्यक्रमाची तयारी; स्वयंपाकाव्यतिरिक्त आईंची काही मदत न होणे, ही बायकोची ओळखीची तक्रार; पोराच्या ऑनलाईन स्कुलिंगचा उडत असलेला बोजवारा, वगैरे नेहमीच्याच वळणाने जात असल्याने पोराच्या कानावर असलं काही अभद्र, अर्वाच्य, अश्लील वगैरे पडायची तशी शक्यताच नाही. मग आमच्या या पठ्ठ्याने हे ऐकलंच कसं आणि कुठे?!


गुड्डू या विचारात असतानाच बायको आत येऊन परत आपल्या कामाला लागलीसुद्धा. म्हणजे बाहेर सगळं सेटल झालं असावं. कारण काही क्षणांपूर्वीचा रडण्या-विव्हळण्याचा, मुसमुसण्याचा आवाज आता बंद झालेला. म्हणजे पोरगं झालंगेलं सगळं विसरून बाहेर खेळायला गेलं असावं. पुण्याचा फोनही बंदच झाला असावा. कारण आता जो काही पुढचा फोन येईल, तो दादाचा आपल्या मोबाईलवर, नि वहिनीचा बायकोच्या मोबाईलवर, हे गुड्डूने कधीच ओळखलं होतं. आणि तो तसा आल्यावर, त्याला काय उत्तर द्यायचं; मूळ मुद्द्याला बगल देऊन, नव्याने ऐकलेले पुणेरी जोक्स WhatsAppवर न टाकता आधी फोनवरच ऐकवून दादाला खुश कसं करायची, याची सुनियोजित मोर्चेबांधणी, गुड्डूने मनोमन केली होती. पण पोराच्या कानावर जे पडलं, ते कसं आणि ते त्याच्या तोंडून बाहेर आलंच तरी कसं, या प्रश्नाने गुड्डूची पाठ सोडली नाही ती नाहीच.


बॉईज ओन्ली स्कुलमधल्या सहा वर्षांत खऱ्या अर्थाने गुड्डूची शिव्यांशी ओळख झाली. त्यातही मित्रांविषयीचा सात्त्विक संताप आणि त्याहूनही जास्त सात्त्विक प्रेम बरेचदा एकाच शिवीत व्यक्त करता येत असल्याने, भ आणि म वरून चालू होणाऱ्या बेसिक शिव्यांची शब्दसंपदा खूप काळ पुरेशी पडली होती. कॉलेजात आणि ऑफिसमध्ये मग अमराठी व्यक्तींचा गोतावळा अवतीभवती जमू लागल्यावर, हॉलीवूडमधल्या मालिका आणि चित्रपटांशी ओळख झाल्यावर, शिव्यांची संपदा वाढीस लागली. त्यातूनच सेक्स, हिंसा, ड्रग्स यांचं एक्स्पोजर मिळत गेलं असलं, तरी त्याची उपलब्धता आजच्याइतकी सहज नव्हतीच. आणि ती तशी असती, तरीही आजीआजोबांपासून ते नातवंडांपर्यंतच्या पिढीतले सगळे लोक एकत्र टीव्ही बघतात, त्या प्राईम टाइममध्ये ती उपलबद्धता नव्हतीच. एका भारत-पाक सामन्यादरम्यान सचिनने विकेट फेकल्यावर ‘चुत्या साला’ हे जेव्हा गुड्डूने बाबांच्या तोंडून पहिल्यांदा ऐकलं होतं, त्यानंतरचं बाबांचं काही दिवस नजर चुकवणं गुड्डूच्या चांगलंच लक्षात राहिलं होतं. गुड्डू स्वतः बाप होईतोवरचा जमाना मात्र वेगाने बदलला. स्वल्पविराम नि पूर्णविरामासारख्या वापरल्या जाणाऱ्या शिव्यांसारखाच, प्रत्येकाचा प्राईम टाइम सोईस्करपणे कस्टमाइझेबल झाला. आणि ते OTP का काय ते प्लॅटफॉर्म्स आल्यावर तर काय विचारुच नकात! त्यामुळे कितीही आर रेटेड वगैरे एपिसोड्स आले, आणि पोरांना स्वतःहुन बघू दिले नाहीत, तरी समाजशिक्षणातुन पोरांपर्यंत या गोष्टी पोचत आहेतच. मग या प्रकरणावर कंट्रोल कुणाचा हवा? पालकांचा? या मालिका आणि सिनेमे बनवणाऱ्यांचा? काय दाखवलं जावं नि काय नाही, हे ठरवणाऱ्या कुठल्याशा सेन्सॉर बोर्डाचा? की काय बघावं-बघू नये, दाखवावं-दाखवू नये, हे अलिखितपणे पिढ्यानुपिढ्या मनावर बिंबवणाऱ्या कुठल्याशा संस्कृतीचा?! ती संस्कृती अद्याप बदलली नाहीये, कि जे बदललंय, ते संस्कृतीत विलीन होऊन पुढच्या पिढीकडे जाण्याइतपत प्रगल्भ झालं नाहीये अजून?!


वाटीतल्या रश्श्यात घोळवत असलेल्या पोळीच्या तुकड्याचा लगदाही बोटांना लागेनासा झाल्यावर गुड्डूच्या डोक्यात काय आलं काय माहित! त्याने आपल्या वाटीतली नळी आणि एक एक्स्ट्रा पीस शेजारी बसलेल्या पोराच्या ताटात ठेवले आणि मुकाट पुढचा पोळीचा तुकडा रश्श्यात बुडवला.

तिनकोंके नशेमन तक

माझ्यासाठी घर ही कधीच एक ‘वास्तू’ नव्हती. मुळात चार खोल्यांमध्ये बंदिस्त असलेलं आयुष्य कधी अनुभवलंच नाही. म्हणजे आयुष्य बंदिस्त नव्हतंच तसं. तरी दिवसभराचं ‘जगणं’ या संज्ञेत सामावेल, असं सगळं करून झाल्यावर, अंग टाकायला जिथे परत येता येईल, अशा चार खोल्या नव्हत्याच! होत्या फक्त दोन. आणि स्वतःचे दोनाचे चार झाल्यावरही, मुंबई-पुण्यातील लौकिकार्थानं ज्याला घर म्हणता येईल, अशा काही खोल्या मागे सुटल्या त्या सुटल्याच! अमेरिकेसारख्या मोठ्या देशातल्या, एका मोठ्या राज्यात, छोटंसं अपार्टमेंट राहायला असलं, तरी त्याला घर म्हणवत नाही. मुळात, हे माझं अमेरिकेतील पाचवं-सहावं अपार्टमेंट असेल. आणि बे एरियातील वेगवेगळ्या जागा वेगवेगळ्या कारणांसाठी आवडत असल्याने कुठेतरी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे राहण्यासाठी एक कायमस्वरूपी खोका बांधून ठेवावा, असं कधी वाटलंच नाही. 

 

शाळा-कॉलेजात असताना स्वतःच्या घरात जितका वेळ घालवायचो, तितकाच मित्रांच्या घरातही घालवला असेल. किंबहुना इंजिनिअरिंगला असताना तर मरिन ड्राईव्ह, बॅंड स्टँड, गिरगाव चौपाटी, अशा ठिकाणी घरापेक्षाही जास्त वेळ घालवला. शालेय आयुष्यातील दिवाळीची आणि उन्हाळ्याची प्रत्येक सुटी पुण्यात चुलतभावंडांकडे घालवलेली. त्यामुळे ‘घर’ म्हणता येईल, अशा छोट्यामोठ्या कित्येक जागा अनुभवल्या. कोणत्याही ‘वास्तू’पेक्षा, किंवा ‘ठिकाणा’पेक्षा, महत्त्वाची होती तिथली माणसं आणि आठवणी! जिथे जन्मलो आणि वाढलो, तिथे आईबाबा, काका, आजी यांच्यासोबतच शेजारचे असंख्य काकाकाकू, आजीआजोबा, पोरंटोरं होती. आणि त्या सगळ्यांच्या घराचे दरवाजे, खिडक्या आपल्यासाठीच उघड्या आहेत, अशा तोऱ्यात वावर असायचा. दूरदर्शनवरच्या रामायण, महाभारत, चंद्रकांता वगैरे मालिका, क्वचितच बघायला मिळणारे क्रिकेटचे सामने, एकमेकांच्या घरी केलेली फराळाची आणि इतर काहीही पदार्थांची देवाणघेवाण, कोणाच्याही घरची लग्नमुंज वगैरे कार्ये आपल्याच घरातील असल्यासारखं मिरवणं, आपण मेरिटमध्ये आल्याचं आपल्या नातेवाईकांना शेजाऱ्याच्या फोनवरून कळवणे, घरी राहायला आलेल्या पाहुण्यांना नि मित्रांना गच्चीत झोपायला घेऊन जाणे, अशा कितीतरी आठवणी जन्माला घातलेलं दादर, मुंबई-१४ हे कदाचित माझं पहिलं किंवा एकमेव घर म्हणता येईल.


अमेरिकेतील माझ्या पहिल्या दोन-तीन अपार्टमेंट्सनी काही काळापुरता हा समज किंचित खोटा ठरवला. चार पैसे हातात यायला लागल्यापासून, कमवायचे किती नि कसे, आणि उडवायचे किती नि कसे, याची नीटशी अक्कल नसलेल्या वयात, दर शुक्रवारी अपार्टेमेंटमध्ये रंगणाऱ्या पोकर नाईट्स, ऑफिसातच रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत थांबून, कामं संपलेली असताना उगाच टेबलटेनिस वगैरे खेळण्यात वेळ घालवणे, मग अगदी उशीरा डेनीज किंवा इन अँड आऊट मधून काहीतरी पोटात ढकलणे, नि फक्त ऑफिसात डेस्कवर झोपता येत नाही, म्हणून अपार्टमेंटच्या बेडरूमचा रस्ता धरणे, इतक्यापुरतंच ‘घर’ ही वास्तू मर्यादित राहिलेली. मग कुणाचा तरी बर्थ डे असला, की केक कटिंग, दारूपार्टी, मग सगळे घरी गेल्यावर कार्पेटवरचे डाग, रिकामे पिझा बॉक्सेस, पेपरप्लेट्स वगैरेची योग्य विल्हेवाट लावणे, आणि दोन-चार वर्षे या आठवणींचं आणि कृतींचं लूप. अर्थात हे फार नवीन नव्हतंच; थोड्याफार फरकाने मास्टर्स करतानाही हाच प्रकार असायचा; फक्त त्यावेळी पोकरची जागा होमवर्क नि प्रोजेक्ट्स, आणि ऑफिसची जागा लॅबने घेतलेली असायची, इतकाच काय तो फरक! घर या वास्तूचं अस्तित्त्व धर्मशाळेसारखं अंग टाकण्यापुरतं मर्यादित!


पुढे मग गृहस्थाश्रमात प्रवेश झाल्यावर आजूबाजूची माणसं, वस्तू, वास्तू बदलत गेल्या; बदलत आहेत. बदलत न गेलेल्या फक्त दोन गोष्टी- स्वतःला एका विशिष्ट ठिकाणाशी नि वास्तूशी बांधून न घेणं, आणि चांगल्या-वाईट आठवणींपाशी रेंगाळत राहणं.


हे लिहीत असताना, मला चित्रपटांमध्ये कालांतर दाखवण्यासाठी केला जाणारा special effect हमखास आठवतो. तुम्ही नायक/नायिका म्हणून पडद्याच्या मध्यभागी उभे असता; आणि आजूबाजूच्या वस्तू, जागा, माणसं, परिस्थिती, इतक्या वेगाने बदलत असतात, की तुम्हाला त्याचा पत्ताही लागत नसतो. तुम्ही निर्विकारपणे उभे असता, किंवा त्रयस्थपणे त्या सगळ्याचा आढावा घेत असता. तुम्हाला सुखदु:ख नसतं, मोह-माया नसते, रुसवेफुगवे नसतात. असले, तरी ते एखाद्या ठराविक प्रसंगापुरते, ठराविक मायक्रो किंवा नॅनो सेकंदापुरते. अमर्याद काळाच्या पटलावर या तुमच्या पाऊलखुणा असतात. पण एकेक पाऊल भिंगाखाली घेऊन बघू लागलात, तर तुमची तुम्हीच बांधलेली घरटी तुम्हाला दिसू लागतात. घरटी नाहीच खरं तर; पक्षी घरटी सोडून गेल्यावर, तिथे घरटं होतं, हे सांगणाऱ्या वाळक्या काटक्याकुटक्या, पानं, पिसं यांचा कचरा. अशा घरट्यापाशी आलेला ठहराव अनुभवला, की पुढच्या उड्डाणाची तयारी. त्या ठहरावात ऐकू येणारा किलबिलाट, चिवचिवाट कधीकधी कोलाहलातसुद्धा रूपांतरित होतो; पण त्यावरची तुमची प्रतिक्रिया एका ‘ट्विट’पेक्षा जास्त नसावी. आणि ती प्रतिक्रिया देऊन झाली, की आपण कर्तव्यभावनेने आकाशी झेप घ्यावी, सोन्याचे हे पिंजरे सोडावेत, हेच आपल्याला कितीतरी विभूती शिकवून गेलेत, नाही का?!


Monday, December 31, 2018

पेपरकट हास्यांची दुखणी

कॉलेजमध्ये असतानाही अशीच गोड हसायची. खरंतर कॉलेजच्या पहिल्या दिवशी स्टेशनबाहेर बसची वाट बघत उभी होती, तेव्हा आपल्याच वर्गात असेल, असं वाटलंच नव्हतं. पुढे मग चार वर्षं कशी भुर्रकन उडून गेली, कळलंच नाही. वयही तसंच होतं म्हणा; पण ते हसणं सकाळ-संध्याकाळ, खातापिता, उठताबसता सतत आपल्या आसपास वावरत राहील अशी अपेक्षा म्हणा, इच्छा म्हणा, काहीही - गैर वाटलंच नाही. आणि कदाचित त्यामुळेच, अपेक्षाभंगाचं दु:ख आजही सलतं.

एक तपापेक्षा जास्त काळ लोटलाय. पण तिचा पोटावर Best Christmas gift ever असं लिहिलेला हिरवा स्वेटर घालून Christmas Tree समोर उभी असलेला फोटो आज ध्यानीमनी नसताना बघण्यात आला, आणि ओठांवर हसू फुटलंच!

*********************************************************************************

: बोर होतंय
: नेटफ्लिक्स? लॉस्ट?
: चालेल. आणि वाईन पण घेऊन बस.
: परत?
: घे ना
: बरं
: ब्लॅन्केट हवंय
: थंडी नाहीये
: तर काय झालं?!
: आणि थंडी असली तरी फुल स्पीडवर फॅन लावून ब्लॅन्केटमध्ये गुरफटून घेतेस
(हसण्याचा खळखळाट)
: मला सॉयर आवडतो. कसला हॉट आहे नं?!
: जॅक भारी आहे पण. विचार करुन वागतो. आणि he is calm..and..काय गं, काय झालं एकदम?
: goosebumps!
: काय करतेयस?!
: आणि तू करतोयस ते?! तेच!
: तुला काय वाटलं ब्लॅन्केटमध्ये गुरफटून घ्यायला तुला एकटीलाच आवडतं?!
(लाजून हासणे अन हासून ते पहाणे)
: गार झालंय नं?!
: ते बघ!
: काय?
: चंद्र! आठवलं मी पुण्यात असताना काय सांगितलं होतं?
(असंख्य हसऱ्या चांदण्या)

गेली काही वर्षं full moon, supermoon, blood moon नेमाने आले. Although, हसऱ्या चांदण्या seem lost. So does my Kate! पण पुण्यात असल्यापासून ज्याची आतुरतेने वाट बघितली होती, त्या चंद्राने आज हसवलंच!

*********************************************************************************

Weekdaysमध्ये लॉंग रनसाठी वेळ मिळतच नाही. म्हटलं आज २-३ मैलच करू. Alder drive वर VTAचा बसस्टॉप आहे. आणि एक लाकडी बाकडं. तिकडे कधीच कुणीच नसतं; तरी तो स्टॉप का लावून ठेवलाय कळत नाही. Tasmanवरून Alderवर  वळलो,तर समोर बाबा! मी दिलेला NC Stateचा स्वेटशर्ट आणि ती त्यांची ब्राऊन पॅंट. म्हणजे आत तो लायनींचा ऑफ-व्हाईट, क्रीम कलरचा शर्ट पण असणारच! म्हटलं, बाबा इकडे कुठे?! तर म्हणतात, माझा नेहमीचाच route आहे walkingचा. मला वाटलं फेकतायत! मी किती वेळा पळालोय त्या routeवर पण कधीच दिसले नाहीयेत. त्याबद्दल त्यांना confront करण्याआधीच डोळे उघडले!

न धावताही घामेजलो होतो.

२०११ मध्ये इकडे आले होते, तेव्हा सोलकढी भात आणि  पापलेट फ्रायचा बेत केला होता एरंडे family dinnerला येणार म्हणून. नवीनच घेतलेल्या DSLRमधले सुरुवातीचे काही फोटो. सुईत दोरा ओवताना आपण extra carefully ते काम करत असतो; पण आसपास काय चाललंय, कोण काय बोलतंय याचं भान असतंच. तशातच कोणी असं काहीतरी बोलावं, ज्यामुळे नकळत चेहऱ्यावर हसू फुटावं, अशा अवस्थेतला बाबांचा फोटो. अर्थात ते काही सुईत दोराबिरा ओवत नव्हतेच; निखिलची सारा अगदी साभिनय old McDonald had a farm सादर करत होती, ते बघत होते गुंग होऊन,कौतुकमिश्रित हसून! अमर आणि ते एकमेकांची खेचायचे, आणि दोघे मिळून माझी खेचायचे, तेव्हा मात्र खळखळून हसायचे. ते त्यांचं एकच, खळखळणारं हसू आजपर्यंत ओळखीचं होतं माझ्या.

फोटोतलं जास्त स्पेशल आहे पण! फोटो बघताना ते हसणं माझ्याही चेहऱ्यावर आपोआप येतं म्हणून!

*********************************************************************************

कित्येकदा मीच लिहिलेला एक शेर सतत आठवत राहतो -

आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)


दररोजच्या रामरगाड्यातल्या पेपरकट्स सारख्या आठवणी आणि त्यातलं हे हसणं. या पेपरकट्सचे दंश भरून येत नाहीत, त्यांची दुखणी होतात.

*********************************************************************************

Tuesday, January 02, 2018

भिंत

दादरचं आमचं घर ज्या इमारतीत आहे, तिची पुनर्बान्धणी होणार असल्याची बातमी कळली. खरं तर आनंद व्हायला हवा..झालाही; पण त्यापेक्षाही जास्त आनंद झाला तो काही जुन्या आठवणी जाग्या झाल्याचा. जेमेतेम १८० चौरस फुटाच्या त्या जागेत आजच्यासारख्या लिव्हिंग रूम, स्टडी, बेडरूम वगैरे खोल्या एकत्रच एकाच खोलीत आजही नांदत आहेत. नाही म्हणायला स्वयंपाकघर आहे वेगळं; पण गरज पडेल तेव्हा तिथेच डायनिंग रूम असल्यागत, खाली मांडी घालून बसून जेवणं आणि झोपणंही व्हायचं..आजही होतं कधीकधी. तिथेच मोरीही आहे. मी कॉलेजात जायला लागल्यावर तिला बाथरूम म्हणायला लागलो. आयुष्यातली पंधरा-सोळा वर्षं स्वयंकपाकघरातल्या दोन भिंतींपैकी एक अर्धी पांढऱ्या फरश्या घातलेली आणि अर्धी यवनी हिरव्या रंगाची; तर दुसरी पूर्ण हिरव्या रंगाची. बाहेरच्या खोलीतल्या भिंती मात्र पूर्ण त्याच हिरव्या रंगाच्या. दादरसारख्या ब्राह्मणबहुल वस्तीत हा यवनी हिरवा रंग कुठून शिरला, असा प्रश्न नेहमी पडायचा. पण इमारतीचा मालक मुसलमान आहे, हे कळल्यावर त्याचं उत्तर मिळालं. घरात शिरल्याशिरल्या उजवीकडच्या भिंतीवर आत आल्याआल्याच एक खुंटी आणि त्या खुंटीवर कुलपं-किल्ल्या लटकलेल्या. क्वचित प्रसंगी कोणाचातरी शर्ट, कमरेचा पट्टा आणि पट्ट्यापट्टयांची पिशवी. त्यांच्या वर आयताकृती, उभं, टोले देणारं वॉलक्लॉक. त्यासमोरच्या भिंतीवर पप्पाआजोबांची एक तसबीर, 'दाभोळकर' अशी सही असलेल्या चित्रकाराने काढलेलं गणपतीचं चित्र असणारी एक तसबीर, सगळ्यात धाकट्या काकाआजोबांच्या लग्नात काढलेला अख्ख्या चिटणीस वंशावळीचा फोटो, कधी नव्हे तो स्टुडिओत जाऊन काढलेला माझ्या आईबाबांचा तरुणपणीचा फोटो आणि कालनिर्णय याशिवाय फार काही लटकलेलं नसे. या भिंतीवर एक आडवी लोखंडी कांब ठोकलेली आणि तिच्यावर बाहेर घालायचे कपडे आणि साड्या हँगर्सवर शिस्तीत लावलेल्या. तिला लागूनच घरातला एकमेव लोखंडी पलंग आणि त्यावर सगळं बेडींग. पलंगावर एका कोपऱ्यात एकावर एक रचलेले रग, उश्या आणि सतरंज्या. त्याला टेकून आणि भिंतीला पाय लावून चहापान, वामकुक्षी, गप्पाटप्पा, पेपरवाचन वगैरे करणारा कुटुंबातला कर्ता पुरुष पाहिला की कोणीही त्याला अगदी मनातल्या मनातही रिकामा न्हावी म्हणायची हिम्मत करत नसे. त्याला मुख्यत्त्वे पप्पाआजोबांचा धाक हे कारण असावं; कारण ते गेल्यावर त्यांची ती जागा मी आणि बाबांनी घेतली आणि तिथे टेकून अगदी अभ्यास करताकरता जरी डोळा लागला, तरी लगेच रिकामा न्हावी म्हणून उद्धार होई. 'मी आता जे वाचलं त्याचं चिंतन करतोय', हे कारण तेव्हा पुरे पडतच नसे.

खुंटी ठोकलेल्या भिंतीवर माझ्या जन्मानंतरच रंगीत खडू, पाटीवरच्या पेन्सिली आणि शिसपेन्सिलींनी काहीबाही लिहिलं-रंगवलं जाऊ लागलं. किडमिडे पाय आणि मोठ्या डोक्यांची अनेक माणसं मीच काढली आहेत, हे मोठं झाल्यावर कळलं तेव्हा गुहेतल्या भिंतींवर चित्रं काढणाऱ्या आदिमानवाचा वंशज असल्याचा कितीतरी अभिमान वाटला होता. मग त्या माणसांच्या जोडीला मामाच्या वाढदिवसाचा 'आज मामाचा वाढदिवस आहे', असा भल्या मोठ्या अक्षरात कायमस्वरूपी कोरलेला रिमाइंडर; ९०च्या दशकातल्या पूर्वार्धातल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामान्यातला भारताच्या दुसऱ्या डावाचा धावफलक; चार आकडी संख्येला तीन आकडी संख्येने गुणायची अनेक उदाहरणं; १७, १९, २७, २९ वगैरे कठीण पाढे, अशी कायकाय भर पडत गेली. आणखी मोठा झालो तेव्हा विज्ञानाच्या पुस्तकातल्या सूर्यमाला, अमीबा, पेशीविभाजन, झोतभट्टी, हायड्रोजन सल्फाइड तयार करायचा प्रयोग, अंतर्वक्र नि बहिर्वक्र भिंगांतून प्रकाश पडून तयार होणाऱ्या प्रतिमा अशा आकृत्या वेगवेगळ्या कागदांवर हातानी काढून या भींतीवर चिकटत गेल्या. कालनिर्णयवर परीक्षांचं नि अभ्यासाचं 'फेयर' वेळापत्रक तारीखवार मांडण्यापूर्वी ते याच भींतीवर 'रफ' मांडलं जाई. पौगण्डावस्थेत असताना समोरच्या भिंतीवर रवीना टंडन, प्रीती झिंटा, अमिशा पटेल. जोडीलाच श्रीलंकेचा रोमेश कालुविथरणा आणि पाकिस्तानचा एजाझ अहमद यांची षटकार मासिकातून फुकटात मिळालेली पोस्टर्स. खरं तर सचिनचं हवं होतं पण ते स्पोर्ट्सस्टार नावाच्या इंग्रजी मासिकातूनच मिळायचे चान्सेस होते; तेही नशीब भलतंच बलवान असेल तरच. महागडं इंग्रजी मासिक परवडत नसल्याने सचिनच्या पोस्टर्सची महत्त्वाकांक्षा डाऊनग्रेड करावी लागली आणि नशीब षट्कारवर आजमावलं. आयताकृती उभं वॉलक्लॉक जाऊन तिकडे चुलतभावाकडून आणलेलं 'कमांडो' चित्रपटातलं अरनॉल्ड श्वारझानेगरचं पोस्टर आलं. आजच्यासारखे ऍक्सेंट वॉल वगैरे प्रकार तेव्हा प्रचलित नव्हते; नाहीतर या भिंतीला नक्कीच ऍक्सेंट वॉल म्हटलं असतं. आजकालच्या भिंती जश्या सूर्यास्त किंवा सूर्योदयाची, राधाकृष्णाची, राजस्थान किंवा गुजरातेतल्या खेड्यातले बायकापुरुष आणि गायबैल यांची किंवा 'नक्की काय आहे ते सांगता येत नाही' स्वरूपाची चित्रं लावून, वेगवेगळ्या जागांचे, जगातल्या आश्चर्याचे, निसर्गाचे फोटो लावून, किंवा कुटुंब म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय,  आशा म्हणजे काय वगैरे उपदेश करणारे बोर्ड्स लावून सुशोभित केल्या जातात, तसा प्रकार त्या भिंतीच्या बाबतीत नव्हता. पण आजसुद्धा अमेरिकेतल्या राहत्या अपार्टमेंटच्या भिंतीचा एक भाग माझ्या मुलाने असंख्य स्टिकर्स लावून भरून टाकलाय, हे बघतो, तेव्हा भिंत स्वहस्ते सुशोभित केल्याचं समाधान नव्याने मिळतं. किंवा खरं तर पुन्हा स्वतः छोटं झाल्याचं.

माझी दहावीची परीक्षा झाल्यावर दादरच्या जागेच्या नूतनीकरणाचं काम निघालं. दोन्ही खोल्यांत दोन वेगळे रंग काढावेत ही माझीच कल्पना. मग बाहेरच्या खोलीत ज्याला बेज किंवा पीच म्हणतात तो, आणि स्वयंपाकघरात राखाडी असे रंग आले. पप्पाआजोबांचा, चिटणीस वंशावळीचा, आईबाबांच्या तरुणपणीचा फोटो गेला. गणपतीचा राहिला. काही वर्षांनी त्याच्या जोडीला आजीचा फोटो लागला. कालनिर्णय, कपडे लटकवायची लोखंडी कांब, कुलपं लटकवायची खुंटी तशीच राहिली; त्यांच्या जोडीला नव्या पद्धतीचं, टोल्याऐवजी सुमधुर गीत वाजवणारं वॉलक्लॉक आलं. माझ्या मुलाच्या जन्मानंतर बेजवर केशरी आणि राखाडीवर पोपटी असे आणखी थर चढले. नवनवीन रंगांचे तीन-चार थर दोनदा चढून बालपण कोरं झालं. पण खुंटीच्या बाजूला दोन बोटांच्या मापाचा जुना हिरवा रंग अजूनही डोकावतो. तो दिसला, त्याबद्दल बोललं गेलं की आजकालच्या रंगांची किंवा साधारण कशाचीच 'क्वॉलिटी' उरली नाही, असं ऐकायला मिळतं.

कदाचित माणसांचीही क्वॉलिटी उरली नाही, असंही काही जण म्हणतील. पण मला तो निराशावादी सूर पसंत नाही आणि मान्य तर नाहीच नाही. मनात भिंती घातल्या गेल्या आहेत, आणि त्या भिंतींमध्ये माणसाने स्वतःलाच चिणून घेतलंय, हे मात्र खरंय. माणूस स्वतःच अनारकलीही झाला आणि जहॉंपनाह सुद्धा. मंगोल आक्रमकांपासून संरक्षण म्हणून कुणीतरी ग्रेट वॉल ऑफ चायना बांधली म्हणतात. माणसाच्या मनातली चायना वॉल कुणापासून संरक्षण करायला बांधली गेली आहे, हे माहीत नाही. क्षणभंगुर सुख किंवा फायद्यासाठी, जगात वावरायचा मुखवटा म्हणून किंवा स्वतःच्याच भावनिक नग्नतेची, स्वतःला पूर्णपणे ओळखण्याची भीती किंवा लाज जी काही वाटते ती झाकायला, असं काहीतरी असूही शकेल. पण क्वॉलिटेटिव्ह माणूस बनायला आणि तो इतरांना दिसायला विंदा करंदीकरांच्या ओळी खऱ्या व्हायलाच हव्यात :

रक्तारक्तातील
कोसळोत भिंती
मानवाचे अंती
एक गोत्र

Tuesday, December 19, 2017

दाढी - एक वाढवणे

देशाच्या राजकारणात, समाजकारणात सध्या मुस्लिमांचे स्थान काहीही असो; पण शीरकुर्मा, कबाब, बिर्याणी वगैरे बनवावी त्यांनीच. आणि आपण मस्त चापावी! या यादीत दाढीसुद्धा समाविष्ट केली, तर त्याचे नवल नाही. म्हणजे लांब दाढीचा पिढीजात (आणि धर्मादाय?!) वारसा सांभाळणाऱ्या कुणी गालावर साबण चोळून, वस्तऱ्यातलं ब्लेड बदलून तो गालावर मोरपिसागत फिरवल्याचा जो काही आनंद बिल्डिंगखालच्या मुहम्मदाचा वस्तरा फिरल्यावर व्हायचा, तसा बायकोच्या षठीसामाशी फिरणाऱ्या मखमली (नवागतांना मार्गदर्शन - हे असंच म्हणायचं आणि लिहायचं, ग्राउंड रियालिटी काहीही असो!) हातातूनही कधी जाणवला नाही. मुळातच स्वतःची दाढी स्वतःच करण्याइतकं कंटाळवाणं काम आपल्याच नशिबी का यावं, या विचाराचीच खंत इतकी मोठी असायची, की कॉलेजात असताना अर्ध्याधिक पॉकेटमनी सलूनमध्ये खर्ची घालायला कधी फारसा विचार करावाच लागला नाही. अमेरिकेत आल्यावर विद्यार्थीदशेत आणि नंतरही बाहेरून दाढी करून घेणं बजेटमध्ये बसत नसल्याने झक मारत ते काम स्वतःच करावं लागे. मुळात ते काम वाटणं यातच सगळं आलं. त्यातून इंजिनिअर म्हटल्यावर तो क्लीन शेवन किंवा किमान आखीव दाढी राखणारा असावा, हा समजच अमेरिकेने हाणून पाडला. कामाव्यतिरिक्त तुमची - आणि त्याहूनही महत्त्वाचं, तुमच्या दाढीची - कुणालाच पडलेली नसल्याने, एक काळजी कायमची मिटली. किंबहुना दाढी वाढलीये म्हणजे ऑफिसात दिवसरात्र, अतिमहत्त्वाचं, लय ब्येक्कार काम चाललं आहे, अशीच प्रतिमा सगळ्यांच्या मनात उभी करता यायची. मग मुली बघणे वगैरे कार्यक्रम चालू झाल्यावर, आपली नाही तरी घरच्यांची इज्जत जास्त प्रिय झाल्याने दाढी करावी लागायचीच; पण एकदा लग्न झाल्यावर तो प्रश्नही निकालात निघाला. अधूनमधून फ्रेंच दाढी, गोटी वगैरे प्रकार चालूच असायचे; पण त्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत त्यांच्या आकाराच्या व्यस्त प्रमाणात असल्याने दाढी करायचा कंटाळा एक्स्पोनेनशली वाढायचा. त्यातच केस, दाढी आणि पोट ज्या वेगाने वाढायचं वरदान चिटणीस घराण्यातल्या पुरुषांना लाभलंय, ते देशाच्या विकासदराला लाभतं, तर आज मोदीसरांना जरा कमीच शिव्या खाव्या लागल्या असत्या. पण ते असो. गेल्या वर्षभरात विराट कोहलीपासून रवींद्र जडेजापर्यंत अख्ख्या भारतीय क्रिकेट टीमने दाढी राखली आणि त्यांचं सोशल मीडिया (फिमेल फॅन)फॉलोइंग वाढलं; शाहिद कपूर आणि रणवीर सिंगने दाढी राखली आणि आमच्या हिचं उडता पंजाब, पद्मावती वगैरे नॉन्सेन्स गोष्टींवरचं प्रेम उतू जाऊ लागलं, हे माझ्यासारख्या चाणाक्षांच्या नजरेतून सुटतं, तरच नवल! थोडक्यात दाढी वाढवणं, राखणं आउटराईट 'इन' झालंय, याचा साक्षात्कार झाला. दसरा संपून दिवाळीचे वेध लागतात, तसे नो शेव्ह नोव्हेंबरचे वेध सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच लागले. आणि तो नो शेव्ह नोव्हेंबर वर्षाखेरीपर्यंत लांबवून नववर्षाच्या मुहूर्तावर १ जानेवारीलाच दाढी करायची, असा संकल्प सोडला. हाच तो क्षण - सप्टेंबर ९, २०१७. यावेळी डोके आणि चेहरा दोन्ही ठिकाणे पेरणीसाठी अनुकूल होती:
मग वाढतावाढता वाढे असणाऱ्या बलभीमाप्रमाणे दाढी वाढू लागली. यापूर्वीही दोन-तीन आठवडे, अगदी एक महिनाही दाढी न करता आपण कसे दिसू शकतो, हे बघितल्याने साधारण ऑकटोबरच्या मध्यापर्यंत  विशेष बदल जाणवलाच नाही. ऑकटोबर १४, २०१७ रोजी ही स्थिती होती:
नाही म्हणायला, 'जरा तरी बरी' दिसावी म्हणून थोडाफार आखिवरेखीवपणा आणायचा प्रयत्न चालू ठेवला होता. ओठ आणि हनुवटीमधल्या जागेत, आणि गाल आणि कल्ल्यांच्यामधल्या मोकळ्या जागेत थोडंफार कोरीवकाम चालू होतं. ऑकटोबरच्या शेवटपर्यंत फार काही बदललं होतं अशातला भाग नाही. ऑकटोबर २६/२७, २०१७ कडे ही परिस्थिती होती:
शेवटी नो शेव्ह नोव्हेंबर उजाडला आणि हनुवटीवरचं कोरीवकाम बंद करायचा निर्णय घेतला. पोराला सुद्धा आता सवय झाली असल्याने उम्मा घेतानाच्या सुरुवातीसुरुवातीच्या "बाबा, दाढी टोचते"च्या कंप्लेंटी मागे पडत चालल्या होत्या. काही मित्रमैत्रिणींनी "काय रे, बायकोला चालते का?" हे ठेवणीतले पण तसे बऱ्यापैकी बोथट झालेले हत्यार उपसलेच; पण बायकोच जवळ नसल्याने, आणि मी ती संधी "ट्रम्पच्या इमिग्रेशन पॉलिसीज किती चुत्त्या आहेत! माझ्या बायकोसारख्या हायली क्वालीफाईड कॅलिफोर्नियन टॅक्सपेअरला सुद्धा केवळ H4-EADच्या घोटाळ्यामुळे काही काळ भारतात जावं लागतंय" असं ठणकावून सांगत, सामाजिक सहानुभूती मिळवून वाया न दवडल्याने, त्या घिस्यापिट्या, पांचट विनोदापासून कायमची मुक्ती मिळाली. तरी नोव्हेंबरात बायको दोन आठवड्यांसाठी का होईना अमेरिकेत काही कामानिमित्त आलीच. तिला रिसीव्ह करायला विमानतळावर गेलो, तर मला "दादा/मामा/काका, दोन मोठ्या आणि दोन छोट्या बॅगा आहेत, किती घेणार ते एकदाच फायनल सांगा" असं तर ती ऐकवणार नाही ना, याचीच धाकधूक होती. पण दिवाळीच्या आसपास मित्रपरिवारात झालेल्या पार्ट्यान्चे फोटोज बघून तिने जरी "बाबा, यू आर लुकिंग सो स्केरी" असे म्हटले असले, तरी किमान 'नवरा' ही ओळख टिकून राहील, याची कुठेतरी आशावाजा खात्री होतीच. तिला ओळख पटली, रिसीव्ह करणे वगैरे पार पाडून घरी आलो. नो शेव्ह नोव्हेंबराचे सबळ कारण पुढे केल्याने बिचारीच्या नल-दमयंती स्वप्नांना गालबोट लागले, अशी तक्रार स्वतःच करून this growth will help you grow in experience, as a human, असा माफीनामाही स्वतःच पदरात पाडून घेतला. प्रेमभंगाचे दु:ख बिअरमध्ये बुडवायची संधी साधायला दहा दिवस लागले. नोव्हेम्बर १८, २०१७ रोजी शेवटी तो सुवर्णयोग आलाच:
मध्यंतरीच्या काळात दाढी वाढवण्याचे प्रयोग करून त्याचे सामाजिक पडसाद काय उमटतात, याचा अनुभव घेतलेल्या काहीजणांशी गप्पा झाल्या. मिडल-ईस्टर्न दुकानात गेल्यावर "हे ब्रदर" संबोधले जाणे, किंवा स्थानिक टॅक्सीचालकांकडून नि ट्रकचालकांकडून 'सतश्री अकाल' ऐकायला मिळणे, वगैरे अनुभव ऐकायला मिळाले. नजीकच्या भूतकाळातला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड वगैरे ठिकाणचा वर्णद्वेषाचा आणि वंशद्वेषाचा इतिहास लक्षात घेता आपल्या 'अशा' दिसण्याने देव न करो पण जीवावर बेतणार नाही ना, याची मनात कुठेतरी खोलवर दडलेली भीती अधूनमधून डोकं वर काढायची; पण स्काईपवर आईशी बोलताना "काय घाणेरडा दिसतोयस, कधी करणार दाढी" असं विचारलं गेलं की आणखी चेव यायचा. मायला, स्वप्नील जोशी, वैभव तत्त्ववादी, इतकंच काय तो कोण कुठला अभिजित खांडकेकर सुद्धा दाढी ठेवतो, तर आम्ही का नाय?! कॅलिफोर्नियाचा कोकण समजल्या जाणाऱ्या सॅन होजे, सांता क्लारा, सनीव्हेलसह झालेल्या संयुक्त महाराष्ट्रात वर्णद्वेषाचा बळी जाण्याइतके आपण कमनशिबी नाही, याचा दिलासा अनेकांनी दिला. त्या बळावर प्रवास चालू ठेवला. अतिप्रेम आणि अतिकोप अशा भावनिक आंदोलनातून जेव्हा पाच वर्षांचं पोर जातं आणि तुमची दाढी हातात धरून सारख्याच भावनावेगानं गदागदा हलवतं, तेव्हा खरं तर मरणप्राय वेदना होऊन बोंब ठोकायची वेळ आलेली असते; पण आदल्याच रात्री तुमच्या मांडीवर बसून एकत्र पिक्चर बघताना, अंगचटीला येऊन अंग घासणाऱ्या मांजरासारखं, त्याने आपलं डोकं नि मान प्रेमाने तुमच्या दाढीवर किमान पाचेक मिनिटं घासून घेतलेली असते, हे विसरता येत नाही. त्या प्रेमळ तैलभावनेने दाढीचीही छान निगा राखली जाते. पाच वर्षाच्या चिमुरड्याला आजपर्यंत जसं डोळ्यात तेल घालून वाढवलं, तसंच दाढीचंही झालंय, हे तुम्हाला कळतं. जातायेता शक्य असेल तेव्हा केस विंचरावेत, तशी दाढीही विंचरणेबल झालीये, हे लक्षात आल्यापासून तुमच्या जीन्सच्या खिशात एक छोटी फणी आलेलीच असते. मिशीला पीळ देणे, तुर्रेबाज मिशी आरशात न्याहाळणे आता तुम्हाला जमू लागल्याने तुम्ही भलतेच खूष असता. मग 'मिशांना तूप लावणे' वगैरे वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग न करता सरळ स्वतःच्याच मिशांवर करायची स्वप्नं तुम्ही बघू लागता. तोवर डिसेंबरचा मध्य उजाडलेला असतो, आणि साधारण डिसेंबर १६, २०१७ ला अशी स्थिती होते:
उरलेल्या पंधरवाड्यात हवी तेव्हढी वाढो, पण नियमित विंचरणे होईल, मिशांना तूप लावून त्या पिळणे होईल आणि ३१ डिसेंबर २०१७ रोजी रात्री झोपायच्या आधी तुम्ही एक 'क ड क' सेल्फी काढून मगच झोपी जाल, असं प्रॉमिस स्वतःला करून तुम्ही तुमचं ब्लॉग पोस्ट थांबवता.