शनिवार नि रविवार सकाळी कितीही उशीरा उठायचं ठरवलं, तरी शक्य होतंच असं नाही. मुळात, उशीरापर्यंत लोळत पडणे, ही शिकरण नि मटार उसळीच्या पुढच्या लेव्हलची चैन आहे, हे आमच्यासारख्याना कधी कळणार, हा प्रश्नच आहे. बाकी काही असो वा नसो, पोटच्या पोरासाठी त्याच्या आवडीचं 'सनी साईड अप' आणि 'बेकन बाय द साईड' नाश्त्याला करणं, हे एकमेव 'मोटिव्हेशन' सकाळी लवकर किंवा 'वेळेवर' उठण्यासाठी पुरेसं असलं पाहिजे, हे आमच्या आईवडिलांनी आमच्यातल्या आईवडिलांना लहानपणापासूनच नीट शिकवून ठेवलंय. पोहे, उपमा, थालीपीठ, सकाळचा चहा, कॉफी, दूध यांच्या जोडीलाच स्वतःचा, नवऱ्याचा, पोरांचा डबा करणाऱ्या, आणि तरीही आठ एकोणीसची वगैरे लोकल सराईतपणे पकडणाऱ्या आया बघत मोठे झालेले आम्ही आईबाप, एकवेळ स्वतः कमी खाऊन, पोरांचं पोट भरण्याच्या आयुष्यातल्या परमकर्तव्याच्या कसोटीत नापास होऊन कसं चालेल?! इतकं मोटिव्हेशनसुद्धा बिछान्यात लोळत पडायची दिवास्वप्नं पाहणाऱ्या आमच्यासारख्याना पुरेसं पडत नसेल, तर मग त्या 'सनी साईड अप'वरच्या अंड्याच्या बलकातून दिवसाची मंगल सुरुवात करणारा सूर्यनारायणाच तुमच्याकडे पाहत हसतोय, किंवा तुमच्या पोटच्या पोराचाच हसरा, आनंदी चेहराच तुम्हाला त्या अंड्यात दिसतोय, अशी भिकारचोट मार्केटिंग गिमिक्स हुशार कंपन्यांनी करून ठेवलीच आहेत. त्यामुळे कोणत्याही दिवसाची सुरुवात स्वतःसाठी नंतर, पण दुसऱ्या कुणासाठी तरी आधी करायची, ही त्यागभावना रक्तात कुठेतरी इतकी खोल रुजली आहे, की पालकत्त्व, ममत्त्व वगैरे अनेक तत्त्वे त्यातूनच उगवली असावीत.
तरी पालक किंवा बाप ही आयुष्यात त्यातल्या त्यात उशीरानेच वाट्याला आलेली भूमिका. त्याच्या बरंच आधी मुलगा-भाचा-पुतण्या-भाऊ, विद्यार्थी, प्रियकर, नवरा आणि अशा अनेक भूमिका वठवायला लागल्याच. आणि या सगळ्या भूमिकांची एक दुपदरी गंमत आहे. एक म्हणजे, यातल्या कित्येक भूमिका एकाच वेळी वठवायला लागणे; आणि त्यातल्या काही भूमिकांमधली एंट्री काही अंशी तुमच्या हातात असली, तरी एक्झिट तुमच्या हातात नसणे. आणि दुसरे म्हणजे, या भूमिकांमध्ये कित्येक प्रसंगी तुम्हाला खलनायक व्हावेसे वाटले, तरी होता न येणे. मुळात कोणतेही नाट्य रंगतदार होण्यासाठी नायक-नायिकेप्रमाणेच खलनायकही तितकाच आवश्यक आहे, हे लोकांना का कळत नाही, हे मला कळत नाही. राजपुत्र-राजकन्या म्हटली, की राक्षस हवाच; अनिल कपूर-माधुरी दीक्षित म्हटले, की अमरीश पुरी हवाच, हे सुद्धा आपल्याला कळत नसेल, तर आपल्या बॉलिवूड प्रेमाची आणि दुराभिमानाची आपणच लाज वाटून घेतली पाहिजे. पण लहानपणापासूनच खलनायकी वृत्ती आणि व्यक्तींपासून सगळ्यांनी आम्हाला इतकं लांब ठेवलंय, की खलनायकी बागुलबुवा आम्हाला कितीही मोठे झालो, तरी समर्थपणे घाबरवू शकतो. नाटकात काम करताना सुद्धा सगळ्यांना हिरो, हिरोईन करायचे असतात; व्हिलन शक्यतो कुणाला करायचाच नसतो. 'वेड्यासारखा वागू नकोस' किंवा 'शहाण्यासारखा वाग' हा एककलमी कार्यक्रम जो आमच्या बाबतीत लहानपणापासून राबवण्यात आलाय, त्याला असलेली, पण कुणालाच न दिसणारी किनार हीच, की you have to be a hero. Always! आणि आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी झुंज, सगळ्यात मोठं कोल्ड वॉर जे तेव्हापासून चालू झालंय, ते आजतागायत संपलेलंच नाही.
मुळात प्रॉब्लेम असा आहे, की ही झुंज आहे स्वतःची स्वत:शीच. त्यातून ती आम्ही लावून दिलेली नाहीच, ती बहुतेक आमच्यावर आमच्या मनाविरुद्ध थोपवण्यात आली आहे, किंवा पुर्खोंकी जायदाद में मिळाली आहे. त्यामुळे हार, जीत वगैरे अंतिम परिणाम असायची शक्यताच नाही. ते तसे असलेच तर कदाचित परवडण्यासारखे नाहीत. त्यातल्या त्यात acceptable परिणाम आहे 'तह'. या तहाची कलमं दोनच. एक म्हणजे, हे युद्ध सवडीनुसार मुख्य रंगमंचावर आणि इतर वेळी विंगेत चालू रा हि लं च पाहिजे. आणि दुसरं म्हणजे, वारसाहक्काने ही झुंज पुढच्या पिढीकडे सुपूर्त करता आली पाहिजे. प्रत्येक कुटुंबाचा एक गणपती जसा पिढ्यानुपिढ्या बसत आलेला असतो, तशी ही झुंज हस्तांतरीत झाली पाहिजे. 'शहाण्यासारखं वागणं' किंवा 'वेड्यासारखं न वागणं', हे या युद्धाचं सर्वसमावेशक वर्णन असलं, तरी त्यात परंपरा, नीतीनियम, संस्कृती, धर्म, सद्वर्तन, कायदेपालन इथपासून ते अरे ला का रे न करणं, वडिलधाऱ्यांशी वाद न घालणं, कुणाला न दुखावणं, नाकात बोट न घालणं, नखं न खाणं इथपर्यंत इतक्या झुंजी लागल्या आहेत, काही विचारूच नकात!
फ्रिजमधून बेकनचं पॅकेट काढून बघितल्यावर लक्षात येतं, दोनच स्ट्रिप्स उरल्यात. त्यातली एक स्वतःसाठी बाजूला काढावी म्हटली तर पोराचा हिसमुसला चेहरा डोळ्यासमोर येतो. मग ती झुंज जिंकायला मी एका सकाळपुरतं माझं ब्राह्मण्य ढाल म्हणून वापरतो नि चुपचाप चेहऱ्यावर स्मितहास्य आणून तव्यावर एक सनी साईड अप घालतो.
No comments:
Post a Comment