Sunday, August 31, 2014

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी

कोकणचा कॅलिफोर्निया करायच्या महाराष्ट्र सरकारच्या वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांनाही लाजवेल, अशी किमया आज इथल्या बे एरियातल्या मित्रमंडळींनी करून दाखवली. गणपतीची मिरवणूक ढोल-ताशे वाजवत आणि लेझीमनृत्याच्या तालावर सनीवेलमध्ये काढून, आपापल्या अल्पमतीने जमतील तशा उपचारांनी पूजा आणि तालबद्ध आरती करून साक्षात कॅलिफोर्नियाचा कोकण करून दाखवला. विनोदाचा भाग सोडा, पण नुकताच भारतातल्या बालमित्रांशी, तिथल्या गणेशोत्सवाबद्दल, सहस्त्रावर्तनादी कार्यक्रमांबद्दल भरघोस गप्पा मारून फोन ठेवला आणि वाटलं की योगायोगाने ज्या सांस्कृतिक स्थलांतराचा मी कळतनकळत भाग होऊन गेलोय, ते मुळी स्थलांतर नाहीच. तो विस्तार आहे किंवा झालंच तर सीमोल्लंघन. जो उत्सव भारतात जितक्या उत्साहाने साजरा केला जातोय, जे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम भारतात यथासांग केले जात आहेत, त्याच तोडीचा - किंबहुना कांकणभर सरसच - उत्साह, आणि मुख्य म्हणजे आपलेपणा मला आज इथे जाणवतोय. याचं कारण काय असू शकेल, हा विचार मात्र काही केल्या पाठ सोडायला तयार नाही.

नवीन संबंध, नवीन नाती आणि नवी माणसं जोडणं आणि ती चिरंतन टिकवणं, ही माणसाची आदिम गरज असू शकेल काय? कारण काहीही असो - सण-उत्सव, नाटक किंवा गाण्याचा कार्यक्रम किंवा अगदी परिचयातल्या कोणाच्यातरी घरी कोणाचा तरी वाढदिवस साजरा करणं किंवा अगदी शनिवार-रविवार आहे आणि फावला वेळ आहे, तेव्हा जेवायला किंवा चहापाण्याला एकत्र भेटणं - नेहमीच्या परिचयातल्या किंवा अगदी एक-दोन नवीन माणसांना भेटता येणं, त्यांच्याशी गप्पा मारता येणं, हास्यविनोद करता येणं, यासाठी वेळात वेळ काढण्याची ऊर्मी असणं, हे या आदिम गरजेचं लक्षण आहे. कदाचित आपल्या जिवंतपणाचं किंवा लौकिकार्थाने समाजशील असण्याचं - अर्थात माणूस असण्याचं. तसं नसतं तर आपापल्या घरी गणपती बसवून, पूजाअर्चा-आरती करून, प्रसाद भक्षण करून आणि नैवेद्याच्या ताटावर आडवा हात मारून ताणून दिली आणि कार्यक्रम संपला, इतपतच गणेशोत्सव आटोपशीर राहिला असता. पण काही मिनिटांपूर्वी, तासांपूर्वी किंवा अवध्या दोनेक महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या सगळ्यांना गावजेवणाचं आवताण धाडून, भोजनोत्तर मनोरंजनाच्या आणि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांना सामील करून घ्यावं, इतकं नुसतं 'वाटणं', यातच सगळं आलं. हे 'वाटणं' कधी काळी लोकमान्य टिळकांनी रुजवलं असेल सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करून, पण आज त्याचा वेलु गगनावरी गेलाय, हे सनीवेलमध्ये बाकी नक्की दिसून आलं. ते तसं 'वाटणं'च नसतं, तर कशाला कोणी शंभर-दीडशे मोदक करायच्या, रात्ररात्र खपून मखर आणि इतर सजावट करण्याच्या आणि आपण जे करतोय, ते फेसबुक आणि व्हॉट्सॅप वरून अख्ख्या जगाशी वाटून घ्यायच्या फंदात पडलं असतं?

सारांश हा, की या ऋणानुबंधाच्या गाठी जिथून पडतात, ती ठिकाणं, वेळ, प्रसंग सगळं मागे राहतं आणि माणूस म्हणून आपण त्या किती घट्ट करता येतील, यासाठी प्रयत्न करू लागतो. एकमेकांविषयीचं माणूस म्हणून असलेलं अनाम 'वाटणं' ही या गणगोतनाट्याची तिसरी घंटा असते आणि सुरुवातीला मी म्हटलेल्या आपलेपणाचा अव्याहत प्रवास हा असा चालू झालेला असतो.

No comments: