Friday, April 16, 2021

केसर

 “Mom, how about I take Kesar tonight with me for trick or treat?!” गेविनच्या डोक्यात संध्याकाळ चालू झाली होती.

“Are you kidding me?” स्टेला जराशी अवाक होऊनच म्हणाली

“Why? what’s wrong? She’s already in her costume!” गेविन खो खो हसत म्हणाला

“Now that’s mean! You must apologize!” केसर आवडावीशी नसली, तरी जितके दिवस, महिने ती राहत होती, त्यामुळे, नाही म्हटलं तरी स्टेलाला तिचा लळा लागलाच होता.

“I am so sorry Kesar. Didn't mean it that way; I was just kidding!” केसरच्या गालावरून हात फिरवत गेविन म्हणाला.


केसर नेहमीसारखीच हसली. काय बोलावं तिला कळेना. पण काहीतरी सांगायचंय, या स्थितीपर्यंत डोक्यातले विचार येईतोवर, गेविन दप्तर घेऊन स्कुलबससाठी घराबाहेर पडलाही होता. अर्थात केसरला काहीही सांगता आलं असतं का, हा प्रश्न मला पडलाच.


...


केसर कधीच काहीच बोलायची नाही. इंग्रजी येत नाही, हा भाग अलाहिदा; त्यामुळे स्टेला आणि गेविनशी संवाद खाणाखुणांतूनच चालायचा. पण वसईला असताना सुद्धा ती फारशी बोलायची नाहीच. आपण बरे, आपलं काम बरं. दोन वेळचं जेवण, अंगावर घालायला चार पातळं यातच तिने समाधानी असावं, याची काळजी मी घेत असे. चहा मात्र तिला प्राणप्रिय. मनात येईल तेव्हा, मनाला येईल तेव्हढा चहा बनवून, तो हवा तेव्हा प्यायची मुभा मी तिला दिली होती. खडेमीठ टाकलेला चहा खिरीच्या चवीने पिणारी, मी पाहिलेली केसर पहिलीच! चहा फुंकून घोट घेताना, तिच्या रापलेल्या चेहऱ्यावरच्या, डोळ्यांच्या कडेच्या सुरकुत्या बघून, कुणी म्हटलं नसतं ती गेरूच्याच वयाची आहे. अर्थात गेरू आणि केसर एकमेकांचे कोण, केसर आणि दुलबा एकमेकांचे कोण, याविषयीच्या गजाल्या गावकरी करत नसत, असं नाही; पण दुलबा भंडाऱ्याचा दराराच असा होता, की त्या चावडीवरच्या गप्पा तिथेच धगधगत आणि तिथेच विझून जात.


कांताबेन अनपेक्षितरित्याच गेली आणि तिचे अंत्यसंस्कार करायला दुलबा सीमेवरून परतला, तो केसरला घेऊनच. तोवर केसर माझ्याबरोबर आणि मी केसरबरोबर असे फरफटत होतो. दोघांचीही इच्छा नसताना. झुंजूमुंजू झाल्यावर बापाच्या साथीला केसर मिठागरात शिरली, की ती नेईल तिथे मी तिच्याबरोबर. पन्नास अंश तापमानात ही बया यंत्रमानवाच्या सफाईने सगळी कामं करे. गट्र्रर्रगट्र्रर्रगट्र्रर्रगट्र्रर्र पंप जो सकाळी चालू होई, तो थेट संध्याकाळीच थांबे. त्याने उपसलेलं खारं पाणी कित्येक मीटर पसरलेल्या खाजणवाफ्यात समतल पसरलं, की मीठ तयार होऊन, ते उपसायची वेळ होईतोवर, केसर आणि मी, पंजाबपासून मुंबईपर्यंत सगळीकडे भटकून येत असू. मुळात, कच्छच्या रणाबाहेर असेही देश आहेत, हे आम्हाला विविधभारतीमुळे अपघातानेच कळलं. केसरीया बालमा ऐकून तर केसर इतकी खूष व्हायची, की सतत तेच एक गाणं विविधभारतीने वाजवलं असतं, तर केसर त्या कार्यक्रमाच्या निर्मात्याची आजन्म दासी होऊन राहायलाही तयार झाली असती.


दुलबाने तिला कधी दासीसारखं वागवलं नाही हे, खरं. पण स्वतःच्या आयुष्यातली कांताबेनची जागा इतर कुणाला मिळणार नाही, हेसुद्धा त्याने ठरवून टाकलंच होतं. त्याच्या दगडी अस्तित्त्वावर, पिळदार बाहूंवर आणि मिल्ट्री खाक्यावर केसर भाळली होती खरी, पण अडनिड्या वयातला तो मोह मीच तिला आंदण म्हणून दिला होता, हेही तितकंच खरं. मिठागरात मरेतोवर काम केल्यावर तिला उजवली, की आपलं काम झालं; मग ती दुसऱ्या कुणाचीतरी नमकहलाल, हे तिच्या बापानं ठरवलेलंच होतं. दुलबाच्या डोक्यात मी हे वेळीच शिरू दिलं, आणि त्या रांगड्या गड्यातल्या बापाला जागं केलं, हे एका अर्थी बरंच झालं. तरी केसरच्या बापानं पाचशेच्या खाली घेतले नाहीतच! काही का होईना, रणातून बाहेर पडून ती वसईत रुजली, हे काही कमी नाही.


ही बया कोण, असा प्रश्न गेरुला न पडता, तरच नवल. पण वडिलांपुढे साक्षात ब्रह्म्याचंही काही चाललं नसतं, गेरू तर मर्त्य मानव! यदाकदाचित दुसरी आई म्हणून केसर डोक्यावर बसायची पाळी आलीच, तर थेट पळून जाऊन पणजी गाठायची आणि मग इकडे मरेतोवर परत यायचं नाही, हे त्याने कधीच ठरवून टाकलं होतं. तसंही आपला जन्म या पाड्यात सडण्यासाठी झालाच आहे कुठे?! आपलं नशीब उघडणार गोव्यात, हे सुद्धा त्यानेच ठरवलं होतं. आणि तिकडून मग थेट हॉलिवूड! मग आपण आणि गिटार बस्स! दुसरं कोणी नाही! दुलबाला सांगायची छाती नव्हती, म्हणून केसरकडे बोलून दाखवायचा. पण बोलेल तर ती केसर कसली? असं मस्त हसायची, की गेरू आश्वस्त होऊन जायचा. गोव्यातल्या स्वप्नांनी. त्याच्या स्वप्नांमधला चतकोर तुकडा आपल्यासाठीसुद्धा आहे, हे ठरवण्याचं धैर्य केसरकडे कुठून आलं, हे मात्र मला आजतागायत कळलेलं नाही. पण त्या धाडसाच्या जोरावर, कधीही न बोलणारी केसर, गेरूच्या गिटारच्या तारांवर गुणगुणू लागे, तेव्हा गेरूचा आत्मविश्वास थेट पणजीत पोचलेला असायचा. आणि त्याच्या साथीने केसरसुद्धा मिरामारच्या सोनपिवळ्या वाळूत.


सगळ्यांचीच सगळीच स्वप्नं पूर्ण होत असती, तर केसर आणि मी कधीच एकमेकांपासून वेगळे झाले असतो. किरिस्ताव पोरांच्या घोळक्यात गिटार वाजवत बसलेल्या गेरूला दुलबाने लाथा घालत घरी आणला, तिथेच त्याच्या कपाळावरचा केसर नावाचा शिलालेख लिहिला जायला सुरुवात झाली.


गेरूने केसरला सॅन फ्रान्सिस्कोला घेऊन येणं, हा त्या लेखातला क्षुल्लक परिच्छेद.


खानदानातलं पहिलं पोर इंजिनिअर होतं काय, अमेरिकेला पोचतं काय, दुलबासाठी आयुष्याचं सार्थक झाल्याचा क्षण! दंतकथाच जणू! अख्ख्या पाड्यात आठवडाभर जेवणावळी उठतील, याची व्यवस्था त्याने केली. पाड्याचे दुवे घेऊन गेरूचा सॅन फ्रान्सिस्कोत गॅरी झाला. तिकडचीच एक मड्डम त्याच्या प्रेमात पडली आणि तिकडेच त्याचा संसार चालू झाला.


कितीही म्हणा, नवीन आयुष्य वगैरे; पण सगळ्या भाकडकथा. कितीही ठरवलं वसईला परतायचं नाही, तरी ‘आता येऊन गेलास, की परत बोलावणार नाही, हा माझा शब्द’, या दुलबाच्या एका ओळीच्या तारेखातर, गेरू दोन आठवड्याच्या सुटीवर म्हणून पाड्यावर आलाच. एका रात्री जेवणं आटोपल्यावर, दुलबाने त्याचा वानप्रस्थानाचा निर्णय सांगितला,आणि केसरच्या पोटात खड्डा पडला. मिरामारच्या वाळूसारखा गेरूसुद्धा बोटाच्या फटींमधून कधी कसा निसटला, हे तिला कधीच कळलं नव्हतं. कच्छशी जोडणारे कुठलेच दोर अस्तित्त्वात नव्हते. दुलबाचा आधारसुद्धा संपला की आपण परत कुठल्यातरी मिठागरात नाहीतर आश्रमशाळेत, नाहीतर कुठल्यातरी टाकलेल्या बायांसोबत, हा विचार डोक्यात आला आणि बोलता येत नसूनही तिने मला शिव्यांची लाखोली वाहिली. मिठागरातली पडतील ती कामं आणि भंडाऱ्याच्या घरकामाशिवाय तिसरी काही गोष्ट तिला माहीतच नव्हती. मी कोण, माझं अस्तित्त्व काय, पुढे काय, असे प्रश्न केसरला पहिल्यांदाच पडले असावेत. दुलबाने ते याआधी पडणारच नाहीत, याची सोय लावली होती. कांताबेनची जागा नसली, तरी दुलबाने आपणहून तिला जी जागा दिली, त्याची जाणीव अर्थात तिच्यापेक्षा दुलबालाच जास्त होती. आणि गेरु जेव्हा जसा डोळ्यासमोर वाढला, तेव्हा केसरही आजूबाजूला सारखी दिसतच तर होती.


रविवारी रात्री गेरू परत जायचा होता. शनिवार दुपारच्या जेवणानंतर दुलबाने त्याला आपल्याजवळ बसवलं. कट्ट्यावर नेमाने बसणाऱ्या मित्रासारखा त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाला, ‘केसरला घेऊन गेलास, की मगच मी इकडचं सगळं आवरायला घेईन’. हे कुठेतरी निघून जाणं, राहत्या घरात पाय न राहणं, भंडाऱ्यांचा वारसाहक्क म्हणून आपल्याकडे आलंय की काय, असं गेरुला वाटलं. मग दोघांनीही आता परत न येण्यासाठीच जायचंय, तर हे केसर नावाचं लचांड काय मागे लागतंय? अर्थात, त्याच्या कुठल्याही बंडाळीचा कणा उभा राहण्याआधीच मोडला जाईल, याची काळजी दुलबातल्या सैनिकाने नेहमीच पुरेपूर घेतली होती. गेरूने सवयीने होकारार्थी मान हलवली, आणि दुलबा सवयीनुसार खूष झाला.


“एक फोटो काढ गे आमचा केसर” दुलबाच्या दवंडीने केसर भानावर आली. गेरूने निर्विकारपणे कॅमेरा तिच्या हातात देऊन खुणेनेच बटन दाबायचं शिकवलं. कॅमेऱ्याच्या चौकटीत दुलबा आणि गेरू. कोचावर गेरूच्या शेजारी जागा असती, आणि मी तिथे बसले असते, तर आमचा फोटो कोणी काढला असता? त्या स्वार्थी क्षणात रमलेल्या केसरला, तरीही कांताबेनची आडवी पडलेली तसबीर खुपलीच. किमान ती तरी सरळ हवी होती, या विचारात असतानाच कॅमेऱ्याचं बटन दाबलं गेलं.


डायनिंग टेबलच्या बाजूच्या भिंतीवरचा तो फोटो पाहून केसर किती महिने, किती वर्षं मागे गेली कुणास ठाऊक! गॅरी तिचा नाही, तो फक्त बार्बीडॉल सारख्या देखण्या स्टेलाचा. आणि गेविन त्या दोघांचाच! दुलबा कुठे गेला? सीमेवर? हिमालयात? माहीत नाही. गेरुला तरी कुठे माहीत आहे?! त्याला गिटार वाजवता येतं अजून? आहे त्याच्याकडे? एव्हढ्या मोठ्या महालात शोधू तरी कुठे गिटार?



“Mom, Mom...quick, it’s..” गेविन पुढचं काही बोलायच्या आत, त्याची बोंब ऐकून, स्टेला आणि गेरु धावतच पोर्चकडे पोचले होते. गेविन जे सांगत होता, त्याहीपेक्षा गेरूचे डोळे लागले होते मागून लंगडत येणाऱ्या केसरकडे.


“Oh?! God! Is she hurt? Kesar,...?” केसर लंगडत असली, तरी 911 लेव्हलची इमर्जन्सी नसल्याने स्टेलाची कळकळ तशी निवळलीच.


“I’m not sure but I think she just sprained her ankle or something’” गेविन म्हणाला “But she wouldn’t let me take a look at her feet”


पोर्चमधल्या बाकड्यावर येऊन केसर टेकली आणि गेरूने केसरचा तळवा हातात घेतला. स्टेलाने गेविनला दाबून धरून ठेवलं होतं.


चवडा फुटला होता. पण गेरुने आपल्याला हात लावला, याचा थंडावाच केसरचं मलम झालं होतं.


“Goodness me! Look at her feet..her legs..”


“Gavin, please stop being rude. Come on, let’s get you cleaned up first” स्टेला गेविनला घेऊन गेली.


“काय गे तू? हातात घेऊन चालतीस डोले?” गेरु जरा नाखूषच होता. प्रथमोपचाराचे सोपस्कार पार पडले आणि सगळे आपापल्या खोलीत गेले.


... 


डिनरनंतर गॅरी गेविनला आगरियांबद्दल सांगत होता. मिठागरं, तिकडे राबणारे आगरिया, त्यांचं खडतर आयुष्य, दहनाच्या वेळी पाय वेगळे काढून जाळणं…


“Are you kiddin’ me?” That’s awful!”


“Can’t help it buddy. Since they are standing continuously in salt fields, their feet get wounded and salt gets absorbed in the feet. So the feet would not burn easily in the funeral pyre” दुलबाच्या तुलनेत  गेरू फारच प्रेमळ, समंजस बाप असावा, असं मला वाटलं.


केसरला कुठे कसं जाळतील, माहीत नाही. खडेमिठाचा चहा ती इकडे आल्यापासून मी तिच्यापासून हिरावून घेतलाच आहे. त्याची खंत मला आतून जाळतच असते पदोपदी. त्यात आणि आता हे नकोसे प्रश्न पडायलाच नकोत. गेरूच्या कपाळावर केसरचा शिलालेख लिहिला की तिच्या कपाळी याचा, हे सुद्धा कळत नाही. एक मात्र खरं; केसर माझ्याबरोबर आणि मी केसरबरोबर अजूनही फरफटतच आहोत. दोघांचीही इच्छा नसताना.