घाटावरच्या गंगारतीच्या झांजा, घंटा, शंख वाजू लागले, तसे वेड्याने मोठ्या कष्टाने डोळे उघडले.
डोळ्यांना समांतर वाहत जाणारी गंगेच्या प्रवाहातील दिव्यांची फुलं बघितली, आणि शंकराच्या देवळाबाहेर उडणाऱ्या
प्रसादासाठीच्या झुंबडीत नंबर लागायची त्याची शक्यता केव्हाच मावळल्याचा साक्षात्कार त्याला झाला.
प्रसादातला डाळभात वेड्याला प्राणप्रिय होता. तो मिळाला, की बाकी काही नको असे. रात्रीच्या अंधारात,
लाखो दिव्यांच्या लखलखाटात, वाळक्या काटकीसारखं स्वतःचं शरीर, मणभराचं पोतं उचलावं इतक्या
कष्टाने, जोर लावून उचललं, आणि वेडा पाय फुटतील तिकडे झोकांड्या खात जाऊ लागला. उजव्या
पायाच्या तळव्याला चिकटलेलं शंकर-पार्वती-गणपतीचा फोटो असलेलं कसलंतरी palmphlet डाव्या
पायाच्या चवड्याने, शेणात पाय पडल्याच्या भावनेने बाजूला केलं. गणपतीचा प्रसन्न चेहरा दिसल्यावर मात्र
त्याला स्वतःचीच शरम वाटली, आणि त्याने तो कागद उचलला. भेळीचा शिळा वास, आठ-दहा अर्धवट ओले
कुरमुरे आणि थोडी शेव चिकटलेल्या त्या कागदावर स्वतःच खरडलेलं काहीतरी किलकिल्या डोळ्यांनी
बघितलं. काही केल्या त्याला ते वाचता येईना. शेवटी कुठलासा एक शब्द लागला, आणि तो कागद चुरगळून
त्याने चड्डीच्या खिशात कोंबला. आता मात्र त्याचे पाय शिस्तबद्ध लयीत घाटाशेजारच्या स्मशानाच्या दिशेने धावू लागले.
.....
तो आणि ती गंगाकिनारी एकुलत्या एक मळकट बाकड्यावर एकदम आरामात बसले होते. गेल्या सहा-आठ महिन्यांत फोटोफिचर्सच्यानिमित्ताने घाटावर भटकताना, हायजिन-फायजीन लाडांना गंगेतंच तिलांजली देऊन, दोघे घाटावरचेच झाले होते. बिस्लरीच्या बाटल्याजाऊन हाती चहाचे कुल्हड, आणि मार्लबोरो जाऊन ओठात गोल्ड-फ्लेक, हा आमूलाग्र बदल दोघांच्या लक्षातही आला नव्हता.वेड्याने मात्र तो बरोबर हेरला होता. बाई सिग्रेट पिते, या चमत्काराचा त्याने इतका धसका घेतला होता, की एकदाच तिच्या कानशिलातलगावून सालीला सरळ केलं पाहिजे, असा विचार वेड्याच्या मनात कैकदा येऊन गेला होता. पण घाट खूप दयाळू आहे, तो सगळ्यांनाआपलंसं करतो, आपल्यात सामावून घेतो आणि मग सगळ्या वेडेपणाचा शेवट घाटावरच होतो, या शहाण्या समजुतीने वेड्याने स्वतःलाआवरलं होतं. तिची सिग्रेटची सवयसुद्धा अशीच तिच्यासोबतच कधीतरी विझेल, हे नक्की.
तो नेहमी दोन्ही हातांच्या चाफेकळी आणि अंगठ्याच्या फ्रेममध्येच तिच्याशी सगळं बोलायचा; आणि तिलाही कधीपासून त्याचीच भुरळपडलेली. एरव्ही ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपायची आणि मग वेड्याच्या डोळ्यांतल्या फ्रेममध्ये ते दोघे चिमणाचिमणी आदर्श क्लिकहोऊन जायचे. ती त्याच्या मांडीवर झोपलेली मात्र वेड्याला काही केल्या आवडायचंच नाही. कारण तेव्हा वेड्याच्या फ्रेममध्ये ती नसायचीच.तेव्हा तोही कधीतरी एखादं मिनिट फ्रेममधून बाकड्यावरच गायब व्हायचा - अगदी एखादंच मिनिट - नि वेड्याच्या पोटात स्वतःचंच किंचितपूर्वायुष्य गलबलून यायचं. स्वतःच्या तिच्यासकट. एक दिवस बाकड्यावरच्या तिने इतकं मोठं व्हावं, की आपल्या फ्रेममध्ये मावूच नये,असं वेड्याला वाटायचं; आणि मावलीच तर फक्त ती, एकटी. दुसरं कोणीच नको. तिने कायम आपल्याच मांडीवर झोपायला हवं,नाहीतर आपण फक्त तिच्याच कुशीत, हे आणि इतकंच वेड्याला हवं होतं. पण तिला हे कोण समजावणार? चालू वर्तमानकाळाला समांतरकुठल्याश्या वेगळ्या काळात, वेगळ्या दुनियेत आपली तिच्याशी जन्मोजन्मीची ओळख आहे, असणार आहे, या शहाणपणावर वेड्याचीकुणीतरी बोळवण केली होती, आणि या चुत्यापणावर पूर्ण विश्वास ठेवून, वेड्याने या जन्मातील ओळख कागदाच्या चिटोऱ्यांवर खरडलेल्याकवितांमध्ये बंदिस्त करून टाकली होती.
इतक्या कविता घाटावर अधूनमधून फडफडत; वाळक्या छोट्या पानांसोबत, काड्यांसोबत मधूनच चक्राकार उडत, की कुणीतरी सगळ्या गोळ्या करून एकत्र शिवल्या असत्या, तर वेड्याची डायरी नाहीतर कवितासंग्रह झाला असता. पण त्यात गाडलेल्या ओळखीमागच्या दोन चेहऱ्यांमागची विसंगती वेड्याच्या नजरेतून सुटली होती. तिचा चेहरा आणि वेड्याच्या पूर्वायुष्यातला चेहरा पूर्णपणे वेगळा होता, इतकंसं मूलभूत शहाणपण वेड्याच्या वाटेला कसं आलं नाही? की आधीच्या चेहऱ्याने नव्या चेहऱ्याचं वेड लागून वेड्याचा वेडा झालेला?
आज मात्र त्या दोघांमध्ये बेबनाव आहे हे नक्की. दोघेही नुसते लांबवर बघत आहेत. त्याची एकही फ्रेम आज काही केल्या सेटच होत नाही. स्वतःच्याच हातांची बोटं एकमेकांत गुंतवून तो गपगुमान बसलाय, तिच्यासारखाच, हे चाणाक्ष वेड्याने हेरलं नसतं तरच नवल. बाकड्याच्या दोन टोकांना दोघे बसलेले; नुसतेच बसलेले. तिच्या backpackने वेगळे केलेले. शेवटी तो उठून चालू पडला, आणि त्याच्यामागोमाग backpack घेऊन ती. आज मात्र गोल्डफ्लेकच्या धुराच्या चिमुकल्या लयकारीऐवजी, पलीकडच्या तीरावर जळणाऱ्या कुणा तिघांच्या चितांच्या धुराचे हे मोठाले ढग.
हा क्लिक करायला वेड्याचं मन धजावेचना. त्याला हव्याश्या क्लिकच्या, हव्याश्या चेहऱ्याच्या शोधात, वेडाही त्यांच्या मागोमाग चालू लागला.
.......
शंकराच्या देवळाबाहेरच्या पटांगणातल्या अन्नछत्रात वेडा त्या क्लिकच्या भुकेची चुळबुळ घेऊन बसला होता. सवयीप्रमाणे ती दोघं वाढायला आली. एरव्ही भाताची भली, जड परात लीलया पेलणारी ती आज विमुख होऊन भात सारत होती, आणि तिच्यामागे तो तसाच विमुख, यांत्रिकपणे डाळीची बादली घेऊन पळीने वाढत येत होता. वेड्याच्या पेपरप्लेट समोर वाकून त्याला भात वाढताना तिची वेड्याशी नजरानजर झाली. आपण ओळख दाखवावी का, असा वेडा विचार वेड्याच्या मनात होता, इतक्यात तिने शेजारी उभ्या असलेल्या त्याच्याकडे काकुळतीने बघितलं. आपण तिला ओळखतच नाही, अशा थाटात तो वेड्याच्या पेपरप्लेटमध्ये, इस्त्री केलेल्या चेहऱ्याने, मख्ख बघत राहिला. नाईलाजाने उठताना डाव्या खांद्यावरून तिची लाल, मलमली ओढणी वेड्याच्या प्लेटमध्ये जराशी सरकली काय, वेड्याची नजर तिच्या पिवळ्या टॉपमागच्या गोऱ्यापान छातीपर्यंत पोचली काय, त्याच्या हातातली बादली तिथेच पडली काय, वेड्याची बखोट धरून त्याने वेड्याला कानफटवायला सुरुवात केली काय...अनावर झालेल्या शंभरएक भुकांचा आगडोंब तिकडेच लाथाबुक्क्यांत उसळला आणि वेड्याला पळता भुई थोडी झाली.
.......
दुपारच्या त्या आठवणींचा ठणका वेड्याला आता अंगाखांद्यावर असह्य झाला होता. स्मशानाबाहेरच्या चबुतऱ्याच्या शेवाळल्या, करड्या, हिरवट, दगडी खांबाची भेग वर्षानुवर्षे रुंदावत गेलेली. वेड्याने आज दुपारपासूनची क्लिकची भूक, पोटातली भूक, तिची मलमली, लाल ओढणी, अन्नछत्रातल्या दुपारच्या आठवणी आणि घाटावरच्या सगळ्या आठवणी त्या किंचित भगदाडात कुठल्यातरी ऐवजासारख्या खुपसून ठेवल्या होत्या. दुपार संपतासंपता आपण देवळातून इकडे कधी कसे पोचलो आणि इकडून मागे घाटावर कसे कधी, हे त्याला काही केल्या आठवेना. स्मशानात शिरताना अंधारातही त्या ओढणीचा लालेलालपणा उठून दिसत होता. वेड्याला खुणावत होता. अशीच लाल ओढणी आपल्या पूर्वायुष्यातही कधीतरी येऊन, खूप काहीतरी देऊन गेली होती; त्याची परतफेड करायचीच आठवण ही आणि ही जिची आहे, ती घाटावरची ती, आपल्याला करून देत आहेत की काय, असं वेड्याला वाटलं. भगदाडापाशी वळलेले त्याचे पाय निमूट माघारी फिरले. चबुतऱ्याच्या पायथ्याशी बसताबसता त्याने मघाचं शंकर-पार्वती-गणपतीचा फोटो असलेलं ते कसलंतरी चुरगळलेलं palmphlet चड्डीच्या खिशातून बाहेर काढलं. त्याला लागलेला मघाचा शब्द होता गुलमोहर. अस्वस्थ होऊनच त्याने चड्डीच्या खिशात, इकडेतिकडे चाचपून बघितलं; पण तुटकं पेन - की पेन्सिलचा बोटभर तुकडा - काहीतरी मागे घाटावरच हरवलं होतं. मनातल्या मनातच वेड्याने उरलेल्या ओळी पूर्ण करून टाकल्या -
मोहरला गुलमोहर, भरली वाट पाकळ्यांनी
धग खेळवली त्याची, या अरभाट पाकळ्यांनी
ऋतुचक्र तुझ्या स्मरणांचे, येते, गोठुन जाते
धुगधुगीचि नेमुन द्यावी, वहिवाट पाकळ्यांनी
पूर्ण झालेल्या या ओळी चुरगळून तो बोळा आतल्या कुठल्याश्या अनोळखी चितेत भिरकावून द्यावा, अशी इच्छा वेड्याला झाली. पण हा
दुपारचा ठणकाच अजून थांबला नसताना, नव्या लाथाबुक्क्यांच्या ओलाव्याचा झवता गाढव अंगावर कशाला घ्या, हा शहाणपणा सुदैवाने, वेळीच सुचला आणि वेडा स्मशानातून दुपारपासूनची भूक घेऊन बाहेर पडला.
कवितेचा पिंड ठेवला
की कवीचा पटकन
कावळा होतो*
या ओळींना जागून मग मी त्या palmphletला चिकटलेल्या शेवकुरमुऱ्यांवर तुटून पडलो.
.......
*श्रेयअव्हेर -
कवीला कवितेचा पिंड द्यावा
म्हणजे तो आपली
धिंड काढीत नाही
अन् डोहांत पडलेल्या चंद्राची
खिंडही अडवीत नाही…
कवितेचा पिंड ठेवला
की कवीचा पटकन्
कावळा होतो